अनुभव – आदित्य
उन्हाळ्याची सुट्टी असायची तेव्हा आम्ही घरातले सर्व जण साताऱ्याला आमच्या गावी जायचो. तिथे आमच्या आजीचा मोठा बंगला होता. आम्ही जवळपास दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे राहायला जायचो. मी आई आणि आजोबा. कामामुळे बाबा आमच्या सोबत येत नसत, ते आम्ही गेल्यावर साधारण २ आठवड्याने येत असत. असेच आम्ही एके वर्षी साताऱ्याला गेलेलो. त्या वर्षी माझे इतर नातेवाईक २ काका काकू, त्यांची मुलं असे सगळे त्याच सुट्टीत राहायला आले होते. तो बंगला २ मजली होता. पहिल्या मजल्यावर आम्ही सगळी भावंड झोपायचो व वरच्या मजल्यावर सर्व वडीलधारे झोपायचे. आमचा सगळ्यात मोठा भाऊ कुलदीप याचे त्या गावात हॉटेल होते. त्यामुळे सगळे आटोपून घरी पर ते पर्यंत त्याला बराच उशीर होत असे. त्याचे नेहमीचे होते. कधी रात्री १ नंतर तर कधी २ नंतर तो घरी यायचा. हॉटेल चा व्यवसाय म्हंटला की काळ वेळ पाळता येत नाही. कधी गिऱ्हाईक जास्त असेल की मग उशीर होणे साहजिक असते.
मला चांगले लक्षात आहे. शनिवार ची रात्र होती. जवळपास १२ वाजून गेले होते होते. आम्ही सगळी भावंडं मजा, मस्ती, खेळ खेळत रोज उशिरा झोपायचो. त्यामुळे सगळे खाली गप्पा मारत बसलो होतो. तितक्यात बाहेरच्या दारावर अचानक थाप पडली. मी उठून दार उघडायला गेलो. सोबत कोणीही आले नव्हते. मी दार उघडुन बाहेर पहिले पान बाहेर कोणीही नव्हते. जास्त विचार न करता मी दार लावून घेतले आणि मागे वळलो. तसे मला दाराबाहेर कोणी तरी चालत असल्याची चाहूल जाणवली. वातावरण तसे शांत असल्याने तो आवाज अगदी स्पष्ट येत होता. मी पुन्हा दार उघडुन पाहिले पण बाहेर कोणीच नव्हते. भास झाला असेल असा विचार करून मी पुन्हा आत आलो आणि दार लावून घेतले. खिडकी जवळ पाण्याचा तांब्या ठेवला होता. तिथेच उभे राहून पाणी पिऊ लागलो. तितक्यात माझे लक्ष खिडकीतून समोरील बंगल्याच्या बाहेरील आंब्याच्या झाडाकडे गेलं. त्या झाडामागे कोणी तरी उभ होत. इतक्या रात्री ते ही अश्या वेळी झाडाजवळ कोण उभ असेल असा विचार मनात डोकावून गेला. मी पटकन दार उघडुन थोडे बाहेर गेलो आणि त्या दिशेला वाकून पाहू लागलो. तिथे खरंच कोणी तरी उभ होती. पांढरट रंगाची वस्त्र परिधान करून…
मी धावतच आत आलो आणि सगळ्या भावंडाना सांगितले पण त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांना वाटले की मी त्यांची थट्टा करतोय, त्यांना फसवतोय. म्हणून मग त्यांनी दुर्लक्ष केलं तसे मी ही काही बोललो नाही. अर्धा – पाऊण तास उलटला असेल. तितक्यात पुन्हा दारावर थापा पडल्या. आता मात्र आम्ही सगळे एकदम स्तब्ध झालो. आदित्य सांगतोय तर खरंच कोणी असेल का बाहेर असे बोलणे सुरू झाले. या वेळेस आम्ही सगळे दार उघडुन बाहेर गेलो पण तिथे कोणीही नव्हते. ते बोलू लागले की आपण त्या समोरच्या बंगल्याच्या आवारात जाऊन त्या झाडाजवळ कोण आहे ते पाहून येऊ. मी आधीच घाबरलो होतो म्हणून त्यांना म्हणालो की तुम्हीच जा.. मी इथेच थांबतो. पण ते काही ऐकत नव्हते. शेवटी मला ही त्यांच्या सोबत घेऊन गेले. मी सांगितलेल्या त्या झाडाजवळ कोणीही नव्हते. तसे सगळे म्हणू लागले “हे बघ.. इथे कोणीच नाहीये तू उगाच घाबरतोस..”. मी मनातल्या मनात म्हंटले “मला नक्कीच भास झाला..”. आम्ही वळून पुन्हा आमच्या बंगल्याकडे जाऊ लागलो. त्यात भागात बराच अंधार होता. रस्त्यावर स्ट्रीट लाईट स् होते पण ते खूप दूर असल्यामुळे त्यांचा प्रकाश जेमतेम च होता. तसे अचानक रस्त्याकडे ला एक बाई उभी दिसली. तिच्या जवळ एक लहान मुलगा ही उभा होता. आम्ही जरा दचकलोच. कोण आहात तुम्ही असे १-२ वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
आमच्यातला एक जण म्हणाला “चला रे.. आपल्या घरी जाऊ..” आम्ही रस्ता ओलांडून पुढे आलो आणि समोरचे दृश्य पाहून हादरून च गेलो. तीच बाई एका दगडावर बसली होती. तिच्या लहान मुलाच्या कपड्याला रक्त लागले होते. अंधार असला तरी दूर असलेल्या स्ट्रीट लाईट चा प्रकाश तिथपर्यंत पोहोचत होता. मी त्यांच्या कडे पाहतच राहिलो. तितक्यात जाणवले की त्या लहान मुलाच्या हातात कुऱ्हाड आहे कारण त्या कुऱ्हाडी चे पाते चकाकल्यामुळे तिथे लक्ष गेले. आम्ही सगळे तिथून धावतच सुटलो तितक्यात दादा बाईक वरून येताना दिसला. तो आम्हाला पाहताच म्हणाला ” तुम्ही इतक्या रात्री इथे बाहेर काय करताय.. चला घरात पटकन..”. आम्ही पटापट धावत जाऊन घरात शिरलो. पण जे पाहिलं त्यावर आमचा विश्वास च बसत नव्हता. इतरांचे माहीत नाही पण त्या दिवशी मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ला आम्ही असेच घरा बाहेर पडलो. शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या एका काकूंकडे गेलो. त्यांचं आडनाव कडकोळ असं होत. त्यांच्या कडे ३ पाळीव कुत्रे होते, त्यांच्या सोबत खेळायला आम्ही अधून मधून जायचो. त्यांनी आमचे बदलेले चेहरे पाहून लगेच ओळखले की काहीतरी नक्कीच बिनसले आहे.
त्यांनी आम्हाला विचारले “काय झाले पोरांनो.. चेहरे का असे तुमचे..” त्यावर आम्ही त्यांना काल रात्रीचा प्रसंग सांगितला. त्यावर त्या म्हणाल्या “हे काही नवीन नाही.. २० वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. इथून ३ बंगले सोडून जी पडीक बंगला आहे ना तिथे एक जोडपं राहायचं. त्यांना एक लहान मुलगा होता. तो व्यक्ती काही कारणाने खूप लवकर म्हणजे तरुणपणी च मरण पावला. त्यांची बंगल्यासमोर एक जमीन होती. आणि त्या जमिनीची केस कोर्टात सुरू होती. इथले सगळे लोक म्हणतात की त्या बाई चा आणि मुलाचा एके दिवशी अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. ती केस अधुरीच राहिली. तेव्हा पासून त्यांचा जीव त्या पडीक बंगल्यात आणि त्या समोरच्या जमिनीत अडकून राहिलाय असे म्हणतात. त्याच ठिकाणी ते रात्री अपरात्री लोकांना अजूनही दिसतात. त्यांना कधी मुक्ती मिळणार आहे काय माहीत..
त्या काकुंचे बोलणे ऐकल्यावर आम्ही अगदी सुन्न झालो होतो.