बऱ्याच दिवसांनी गावाला जाण्याचा योग आला होता.. प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आणि विश्वासाचा एक असा कणा असतो जसा आमच्या गावाच्या मधोमध असलेल्या त्या वडाच्या झाडाचा. माझे गाव एक धार्मिक स्थळ असलं तरी गावाच्या बाजूला असलेल्या जंगलामुळे आणि त्या जंगलात घडलेल्या विचित्र घटनांमुळे गावात अनेक कथा आणि भूतांच्या गोष्टी प्रसिद्ध होत्या. मी अगदी लहान पणापासून ऐकत आलो होतो की त्या जंगलामध्ये दरवर्षी “भूतांची जत्रा” भरते. आता यात कितपत सत्य होते हे माझ्या सारख्या बऱ्याच जणांना माहीत नव्हते. पण वर्षातला तो काळ आला की गावकरी तिथे जाण्याचं टाळायचे. आणि आमच्याच गावात नाही पण आजू बाजूच्या इतर गावात ही बरीच चर्चा रांगायची.

बऱ्याच महिन्यांनी गावात आल्यामुळे रात्री मित्रांसोबत भेटायचं ठरलं होत. जेवण अटोपल आणि घरातून बाहेर पडलो. वडाच्या पारावर सगळे मित्र भेटणार होतो. आकाशात काळ्या ढगांचा थर जमलेला होता आणि विजांचा कडकडाट सुरु झाला होता. साहजिक च वारा जोरात वाहत होता आणि पानांच्या सळसळण्याचा आवाज ऐकू येत होता. पारावर आलो तर ३-४ मित्र आधीच येऊन गप्पा मारत बसले होते. आणि विषय दुसरा तिसरा कसला नसून होता तो “ भुतांच्या जत्रेचा “. मी ही लगेच त्यांच्या बोलण्यात सामील झालो आणि उत्सुक तेपोटी विचारू लागलो.. काय रे तुम्हाला की वाटते ? लहान पणापासून ऐकत आलोय पण असं खरंच काही असेल का ? की नुसता भाकड कथा असतील. 

त्यावर सुमित नावाचा मित्र म्हणाला “ तू काय आता शहरात राहायला गेलास.. तुला सगळं खोटच वाटणार..” त्यावर मी म्हणालो “ तस नाही रे पण मला खरंच जाणून घ्यायचं आहे की यात कितपत तथ्य आहे.. आपण जाऊया ना जंगलात.. आज अमावस्या पण आहे.. “ सुमित तयार झाला आणि त्याने इतर दोघांना ही तयार केलं. त्यांनाही काही थ्रील करायचे होते. वेळ न घालवता सगळे आप आपल्या घरी गेले आणि टॉर्च, कंदील, एखादा कोयता किंवा कुऱ्हाड जे काही मिळेल ते घेऊन आले. घरी कोणाला काहीच सांगून निघाले नव्हते. कारण जंगलात जायचं म्हणजे तेवढी घाबरदरी घ्यायलाच हवी. साधारण १५-२० मिनिटांच्या पायपीटी नंतर ते जंगलाच्या वेशीवर येऊन पोहोचले. इथून पुढे होत ते घनदाट जंगल.. आणि त्यात रात्रीची वेळ. साडे बारा एक वाजला असेल. संपूर्ण गाव केव्हाच निद्रेच्या आधीन झालं होत.

त्यामुळे स्मशान शांतता पसरली होती. आवाज होता तो फक्त दुरून होत असलेल्या कोल्हेकुई चा.. त्यात वेस ओलांडून आत चालायला सुरुवात केली. सगळ वातावरण खूप गंभीर झालं होत. तितक्यात एक वीज चमकली तसे संपूर्ण परिसर अवघ्या सेकांदासाठी प्रकाशमय झाला आणि जोराचा कडकडाट झाला. माझ्या सोबत माझ्या मित्रंच्याही मनात थोडी का होईना पण भीती घर करू लागली होती. अर्धा तास आम्ही चालत होतो त्यामुळे जंगलात खूप आत आलो होतो. आम्ही तिथेच काही वेळ थांबायच ठरवल. आता फक्त वात बघायची होती की इथे काय घडतं. तसे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आम्ही सगळ्या गोष्टी आणल्या असल्या तरीही पावसापासून वाचण्यासाठी काहीच आणलं नव्हतं. म्हणून मग एका मोठ्या झाडाच्या खोडाचा आडोसा घेऊन उभे राहिलो. 

नीटसा आडोसा नसल्यामुळे हळु हळु भिजत होतो. तितक्यात कसलासा आवाज कानावर पडला. प्राण्याचा नक्कीच नव्हता कारण मी तो आवाज कधी ऐकला नव्हता. पण वाटलं जंगलात आत आलोय, एखादा वेगळा प्राणी असेल आणि आवाज करत असेल. मी हातातली टॉर्च चोहो बाजूंनी फिरवू लागलो कारण त्या आवाजाची दिशा समजत नव्हती. तितक्यात तो आवाज पुन्हा आला आणि जाणवले की तो आवाज वरच्या बाजूने येतोय. मी समोरच्या झाडावर टॉर्च मारली आणि आम्ही सगळे तिथे पाहतच राहिलो. त्या झाडावर एक दोन नव्हते तर किती तरी मानव सदृश्य आकृत्या बसल्या होत्या. आत खोबणीत गेलेले डोळे, किळसवाणे चेहरे, विस्फारलेल्या जबडा.. आणि सगळ्यात जीवघेणी गोष्ट म्हणजे ते सगळे आम्हालाच पाहत होते..

इतकं भयाण दृश्य मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही पाहिलं नव्हत. खूप जोरात ओरडावेसे वाटत होते पण तोंडातून आवाजच निघत नव्हता. माझा हात पकडुन एका मित्राने जोरात मला खेचले तेव्हा मी भानावर आलो. ते मला केव्हापासून तिथून पाळायला खुणावत होते पण मी जणू अडकून गेलो होतो तिथे. आम्ही सगळ्यांनी तिथून पळ काढला तसे मागून चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. या सगळ्यात पावसाचा जोर अजूनही वाढतच चालला होता. आम्ही कसे बसे जंगलाच्या बाहेर येऊन पोहोचलो. कोणाशी काहीच न बोलता थेट घरी निघून आलो. बहुतेक मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. या प्रसंगानंतर मात्र मी असा उपद्व्याप करायचा कधी विचारही केला नाही. 

Leave a Reply