पूर्वी कधीतरी होऊन गेलेल्या एखाद्या भीषण अपघाताच्या ठिकाणी कधी कधी उगाचच खिन्न, उदास का वाटतं ? कारण तिथे राहिलेल्या मानवी भावनांचा अंश आपल्याला कोणत्यातरी गुढ मार्गानं जाणवत असतो. आयुष्यात पहिल्यांदाच भेट दिलेल्या जागेमध्ये कोणताही पूर्वग्रह नसतानाही कधीकधी विलक्षण अस्वस्थ वाटतं, तिथुन ताबडतोब निघुन जावं अशी तीव्र इच्छा होते. कारण भुतकाळात, कदाचित तुमच्या जन्माच्याही आधी त्या जागेवर घडलेल्या काही अमानवी गोष्टींची तुम्हाला कोणत्यातरी अगम्य मार्गानं जाणिव करून दिली जात असते. तुमचं मन तुम्हाला धोक्याचा इशारा देत असतं.
कितीतरी वेळा एखादी घटना घडत असताना तुम्ही ती अगोदर केव्हातरी घडताना पाहिल्याचं/अनुभवल्याचं तुम्हाला स्मरतं. वास्तविक ती घटना तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात ज्ञात ज्ञानेंद्रियांमार्फत या पूर्वी अनुभवलेली नाही हे हि तुम्हाला माहिती असतं. पण तरीही त्याबद्दल तुम्हाला आधीपासुन माहित होतं या निष्कर्षावर तुम्ही ठाम असता. मग याचं ज्ञान तुम्हाला कसं झालं? हे मात्र कळत नाही. काही गोष्टी अश्याच असतात ज्या प्रत्येक वेळी जाणवत नाहीत त्या साठी काळ आणि वेळ जुळून यावी लागते. आणि मग असे काही अनुभवायला मिळते जे आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. असाच हा एक चित्त थरारक अनुभव.
अनुभव – श्रावणी सामंत
मी आत्ता फायनल ईयर इंजिनिअरिंग करतेय पण माझं हॉस्टेल आणि कॉलेज मुख्य गावापासून पासून १ तासाच्या अंतरावर डोंगरात आहे. येण्याजाण्याची एकच एसटी आहे जी दिवसातनं ४ वेळा जाते. अगदीच डोंगरात असल्यामुळे बेसिक गोष्टी जसं पुस्तकं आणि स्टेशनरी तिथे मिळत नाही. आणि येण्याजाण्याचा रस्ता जणू जंगलासारखा आहे. मी आणि माझ्या रूममेट न ठरवलं होतं की आपण इथून निघून बाहेर जायचे आणि शॉपिंग करायची. शॉपिंगची मला खास हौस नाही पण तिला जायचं होतं आणि मला पण हॉस्टेलवर राहून कंटाळा आला होता म्हणून आम्ही सकाळी ६ ची बस घेऊन निघालो. दिवसभर छान शॉपिंग करून आलो. परत येतानाची शेवटची बस ७:३० ची होती. आणि वेळेचा अंदाज न आल्यामुळे आमची बस चुकली. आता विद्यापीठात पोहोचण्याचा एकच मार्ग होता – ऑटो रिक्षा. आणि रिक्षा मिळणं ही अवघड काम होत.
आम्ही एका धाब्यावरून चिकन बांधून घेतलं आणि पुढच्या काही वेळात आम्हाला एक एक ऑटो रिक्षा मिळाली.. अंधार कधीच गडद झाला होता. गाव सोडून काही वेळ उलटला असेल. हळूहळू जंगलाचा परिसर लागला. आम्हाला एक वेगळेच टेन्शन होते ते म्हणजे आमच्या हॉस्टेल चे गेट्स ९ ला बंद होतात. फोन असून नसल्यासारखा कारण सकाळी चार्ज करून निघाल्यामुळे एव्हाना बॅटरी संपत आली होती आणि जंगलाचा भाग असल्यामुळे नेटवर्क रेंज पण नाही. कधी एकदा हॉस्टेल ला पोहोचतो असे झाले होते. वातावरण एकदम शांत वाटू लागले. ऑटो रिक्षा वेगात जात होती त्यामुळे बाहेरचा थंड गार वारा लागत होता. तस बघायला गेलं तर खूप थंडी नव्हती पण का कोण जाणे अचानक गारवा वाढला.
मी माझं जॅकेट घातलं पण अजूनही खूप थंडी जाणवू लागली. माझे लक्ष बाहेरच होते. तितक्यात अचानक एका झाडावर काही बसल्यासारखं दिसलं. ते झाड खूप लांब होत आणि ऑटो रिक्षा वेगात असल्यामुळे नीट काही कळलं नाही. कदाचित घुबड असेल असा विचार करून मी दुर्लक्ष केलं. आणि मी माझ्या मित्रिणीशी बोलायला तिच्याकडे वळले. कॉलेज हॉस्टेल बद्दल बोलत होते की वेळेवर नाही पोहोचलो तर वांदे होतील… वॉर्डन आत घेणार नाही मग आपण काय करायचं. कारण आधीच ८:३० वाजले होते आणि पोहोचायला अजुन बराच वेळ लागणार होता. या सगळ्यात भरीस भर म्हणून अचानक ऑटो बंद पडली… माझी रूममेट आधीच जरा भित्री. तिला भलते सलते विचार येऊ लागले आणि मला सगळ सांगायला लागली “अगं या जंगलात एक बाई आहे मी सिनीअर्स कडून ऐकलं आहे, ती रात्री अपरात्री गावच्या लोकांना दिसते.. खूप जणांना धरलं आहे तिने..”
म्हणजे.. धरलं आहे म्हणजे काय म्हणायचे आहे तुला..? मी तिला प्रश्न केला केला. त्यावर ती म्हणाली “ अग म्हणजे झपाटले आहे..” मी तिला गप्प करण्यासाठी जरा मोठ्या आवाजात च बोलले “अगं.. गप्प बस काही बोलत असते नुसतं… सिनीअर्स तुला घाबरवतात आणि तू घाबरते उगाच… काय सगळ्या जंगलात भूत प्रेत असतात काय.. काही बोलतेय… झोप गप्प माझ्या खांद्यावर डोकं ठेवून”. आमचे बोलणे सुरू होते आणि ऑटो रिक्षावाला अजून ही बघत होता काय प्रॉब्लेम झालाय ते… आम्ही ऑटो मधून उतरलो नव्हतो आणि मी विचारात पडले की काही वेळापूर्वी वाटेत जे मला घुबड वाटलं होतं ते घुबड नसून काही वेगळं असेल तर?
असंख्य विचार माझ्या डोक्यात घोळू लागले आणि पुन्हा माझी रूममेट म्हणाली “अगं आपल्या कॉलेजच्या बॅक रोडला सुद्धा पोरांनी पाहिलं आहे तिला.. पैंजणाचा आवाज येतो आणि असं वाटतं की कोणी तरी बघतंय त्यांना.” मी जरा रागातच बोलले “आता गप्प बसते का.. का देऊ एक ठेवून.. झोप शांत तू.. काही बोलू नकोस..आपण पोहोचलो की उठवते मी तुला”. तितक्यात ऑटो रिक्षावाला आत येऊन बसला आणि सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. देवाच्या कृपेने एकदाची रिक्षा सुरू झाली. हॉस्टेलला पोहोचायला अजून ३० मिनिटे होती म्हणून मी फोन काढून गेम खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता वेळेचं भान राहिलं नाही आणि जवळपास ४५ मिनिटं उलटून गेले होते. जेव्हा मला लक्षात आले तेव्हा मी लगेच रिक्षावाल्या काकांना विचारलं “अहो अजून किती वेळ लागेल पोहोचायला?”
ते जरा दबक्या स्वरात बोलले “ताई आपण एव्हाना पोहोचायला पाहिजे होतं पण मला वाटतंय आपण एकाच रस्त्यावर फेऱ्या घेतोय”.. त्याचे असे बोलणे ऐकून मी जरा वैतागत च म्हणाले “काय! तुम्हाला रस्ता माहिती आहे ना?”.. तसे तो मला समजावत सांगू लागला “हो ताई मी पोरांना सोडायला येत जात असतो विद्यापीठात.. असं ह्या आधी नाही झालं कधीच, मला वाटतं आपल्याला चकवा लागला आहे” त्यांच्या आवाजातील भीती मला स्पष्ट जाणवाली. मी ह्या आधी बसने रात्रीचा प्रवास केला होता आणि तेव्हा असा कसलाच अनुभव मला आला नव्हता. फोन बॅगेत ठेऊन आता माझे सगळे लक्ष रस्त्यावर केंद्रित झालं होतं. नकळत माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. तेव्हाच ऑटोवरती काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला.
ऑटो रिक्षा थांबवायच्या ऐवजी काकांनी वेगात घेतली. तेव्हा एक जोरात किंकाळी ऐकू आली. मला काय सुचलं खरंच माहीत नाही पण मी डोकं रिक्षातून बाहेर काढत मागे वळून पाहिले. तर एक बाई सदृश्य आकृती, लाल भडक डोळे, विस्फारलेले केस, हातांवर रक्त, रागात आमच्या ऑटो रिक्षाच्या दिशेने वेगात धावत येत होती. मी लगेच डोकं आत घेतलं आणि तेवढ्यात माझी रूममेट सुद्धा घाबरून उठली होती होती. कदाचित त्या आवाजाने. आम्ही देवाचं नाव घ्यायला लागलो. काहीच कळत नव्हतं काय करावं.. ते जे काही होत ते आमच्या ऑटो रिक्षाच्या अगदी बाजूला धावत होत.. तेवढ्याच प्रचंड वेगात.. आणि बघता बघता एक हात तिने माझ्या दिशेने टाकला. मी आतल्या बाजूला सरकले पण तिची लांब धार धार नखं माझ्या मांडीवरून फिरली.
ती तीक्ष्ण नख माझ्या पँटमधून जाऊन माझी त्वचा ओरबाडली गेली. त्या वेदनेने मी जोरात ओरडले.. कारण एखाद्या हिंस्त्र श्वापदाने त्वचेचा लचका तोडवा तश्या वेदना मला होऊ लागल्या. त्यातून रक्त यायला लागलं.. ऑटो रिक्षावाल्या काकांनी अजून वेग वाढवला. मी अगदी आतल्या बाजूला माझ्या मांडीवर रक्त थांबण्यासाठी दाब देत तशीच बसून राहिले. काही वेळानंतर पुन्हा एकदा खूप दुरून एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. कदाचित तिची हद्द संपली होती. आणि तो आवाज मागच्या बाजूने खूप लांबून आल्यासारखा वाटला. तिने पाटलाग करणं सोडलं होतं. पुढच्या काही वेळात तिच्या घेऱ्यातून आम्ही बाहेर पडलो आणि हॉस्टेल वर पोहोचलो. त्या काकांनी प्रसंगावधान राखत आम्हाला सुखरूप हॉस्टेल वर आणलं होत. आम्ही त्यांचे आभार मानले आणि वॉर्डन ची समजूत काढून हॉस्टेल मध्ये आलो.