अनुभव – अविनाश क्षीरसागर

गोष्ट ८ जानेवारी २०२१ ची आहे. माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीच्या लग्नाला आमचा संपूर्ण ग्रुप जाणार होता. तशी येण्या जाण्यासाठी बस ची व्यवस्था केली होती. ग्रुप असल्यामुळे मजा येणार होती त्यामुळे मी ही लगेच तयार झालो. लग्न कार्य वैगरे खूप छान रित्या पार पडले. सगळ्यांनी खूप धमाल केली. आम्ही सगळे आटोपल्यावर रात्रीच परतीच्या प्रवासाला निघणार होतो. आमच्या ग्रुप मध्ये मी आणि २ मैत्रिणी सोडल्या तर सगळेच जण लग्नाच्या हॉल जवळच एका हॉटेल वर रात्री थांबणार होते. आम्ही मात्र तिथून रात्री दीड पावणे दोन च्याच सुमारास मैत्रिणीच्या घरा जवळ पोहोचलो. तिथूनच बस चा पीक अप आणि ड्रॉप पॉइंट होता. खूप रात्र झाली होती म्हणून आम्ही तिघे ही निघालो. साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही आमच्या घराजवळ आलो. त्या दोघी मैत्रिणी एकाचं ठिकाणी राहत असल्यामुळे मी त्यांना त्यांच्या बिल्डिंग खाली ड्रॉप करून माझ्या घरी निघालो. जवळपास २० मिनिटांचे अंतर होते. रात्र झाल्यामुळे रस्त्यावर अगदी शुकशुकाट पसरला होता. तितक्यात मला मित्राकडून तिथून अवघ्या १० मिनिटांवर असलेल्या एका जागे बद्दल आठवले. खर तर तो रस्ता माझ्या घरी जाण्यासाठी अगदी रस्त्यात नव्हता.

तेव्हा मला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती मी त्या रस्त्याने जाऊन पाहायचे ठरवले. तसे तर घराजवळ चा परिसर असल्यामुळे दिवसा बऱ्याचदा मी तिथे येऊन गेलो होतो पण इतक्या रात्री मी पहिल्यांदा च जात होतो. बरेचदा आपण राहणाऱ्या परिसरात अशी काही ठिकाणं असतात जिथे आपण रात्री कधीच गेलेलो नसतो. त्यामुळे तो परिसर अगदी वेगळाच भासू लागतो. माझे ही काहीसे तसेच झाले. ती जागा म्हणजे बिल्डिंग च्याच सरळ रांगांमधला एक साधारण ३०० मीटर चा रस्ता होता. दोन्ही बाजूला बिल्डिंग, काही अंतरावर तुरळक दुकानं. पण ती कधीच बंद होऊन रस्ता अगदी सामसूम झाला होता. विचार केला की पटकन एक राऊंड मारून मग आपल्या वाटेला लागू. म्हणून मी त्या रस्त्याने चालू लागलो. बस मधून येताना माझ्या एका मित्राने भुताची गोष्ट सांगितली होती तीच डोक्यात घोळत होती. कदाचित त्यामुळेच की काय मला अचानक माझ्या मागून कोणी तरी चालत येत असल्याची चाहूल जाणवू लागली. मी झटकन मागे वळून पाहिले पण कोणीही दिसले नाही. नको ते भास होत आहेत असे वाटून गेले. तितक्यात मोबाईल काढून गाणी ऐकत जाऊ असा विचार केला पण बघतो तर काय.. मोबाईल ची बॅटरी अवघ्या ९ टक्क्यांवर आली होती. 

पाठीवरची बॅग पुढे घेत चेन उघडुन मी पावर बँक शोधू लागलो तर लक्षात आले की ते मी मित्रा कडेच विसरून आलोय. मोबाईल खिशात ठेवला आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो. तितक्यात पुन्हा कोणाची तरी चाहूल जाणवू लागली. यावेळेस मी मागे न बघता सरळ चालत राहिलो आणि काही क्षणात तो आवाज बंद झाला. माझ्या मनात हळु हळु भीती घर करू लागली होती. इथे येऊन राऊंड मारायचा विचार चांगलाच पथ्यावर पडणार असे वाटू लागले होते. गेले काही दिवस या भागात बरेच अपघात झाल्याचे ही ऐकून होतो. भीती वाटू लागली म्हणून मी वळून पुन्हा घराच्या रस्त्याकडे जायला निघालो. एव्हाना मी बराच लांब आलो होतो. तोच ती चाहूल पुन्हा एकदा जाणवली आणि अंगावर शहारे येऊन गेले. नकळत माझा हात माझ्या गळ्यात असलेल्या तुळशी च्याच माळेवर गेला आणि मनाला काहीसा आधार वाटला. मी तुळशी माळेतल्या गुरूमणी ला हात लावतच मागे पाहिलं पण यावेळीही कोणीच दिसलं नाही. फक्त मोकळा निर्मनुष्य रस्ता दिसत होता. मी नकळत चालण्याचा वेग वाढवला कारण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीती दाटून आली होती. मला जेव्हा लक्षात आले की या भागातून मुख्य रस्त्यावर जायला अजुन अर्धा रस्ता चालत जायचे आहे तेव्हा मात्र माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले. 

काही अंतर पुढे जाताच मला पुन्हा एकदा तीच अनोळखी चाहूल मागून जाणवू लागली. मी देवाचे नाव घेऊ लागलो. या वेळेस मात्र माझा भास नव्हता कारण मला अगदी स्पष्ट जाणवत होत की मागे नक्की कोणी तरी आहे. जे कोणी असेल त्याने मागून च हल्ला केला तर.. मी अस्वस्थ झालो. जे होईल ते होईल असा विचार करून मी मागे वळून पाहिले आणि तिथले दृश्य पाहून माझ्या शरीरातला त्राण च संपला. स्ट्रीट लाईट च्याच अंधुक प्रका शात एक पुसटशी काळपट आकृती माझ्या पासून अवघ्या २०-२२ फूट अंतरावर होती आणि माझ्या दिशेने पुढे सरकत होती. मी जीव मुठीत धरून तिथून धावत सुटलो. मनातल्या मनात स्वतःलाच शिव्या देऊ लागलो.. गपगुमान घरी जायचे सोडून कशाला आलो इथे मरायला. आता काही खरे नाही. धावत असताना ते जे काही आहे ते अजूनही माझ्या मागावर आहे का याची खात्री करून घ्यायला मी पुन्हा एकदा मागे पाहिले. ती आकृती माझ्या पासून अगदी ५-७ फुटांवर होती. आणि तरंगत माझ्याच मागे येत होती. मी होता नव्हता त्राण एकवटून अजुन जोरात पळण्याचा प्रयत्न केला पण त्या नादात माझा पाय माझ्याच दुसऱ्या पायात अडकून मी जोरात जमिनीवर आदळलो. पण लगेच उठून पुन्हा धावत सुटलो. 

मनात फक्त एकच विचार होता हा थोडासा राहिलेला रस्ता पार केला की वाचेन मी. पुढच्या २-३ मिनिटात मी मुख्य रस्त्यावर आलो जिथे मी बस मधून उतरलो होतो. इतक्या जिवाच्या आकांताने धावलो होतो की मला धाप लागत होती. दोन्ही हात गुडघ्यावर टेकवून मी तिथेच थांबून धापा टाकू लागलो. तितक्यात माझे लक्ष हाताच्या कोपऱ्याकडे गेले. त्यातून थोड रक्त येत होत. आणि माझा गुडघा ही दुखू लागला होता. पडलो तेव्हा मार लागला होता पण भीती पोटी पळणाच्या नादात पूर्ण विसरून गेलो होतो. तितक्यात एक टॅक्सी जाताना दिसली. मी पटकन हात दाखवून थांबवली. मी माझ्या घराचे ठिकाण सांगितले. त्याने माझी अवस्था बघून फक्त मान डोलवून होकार दिला. मी दरवाजा उघडून आत अंगच टाकून दिले. त्याने समोरच्या आरश्यात पाहून मला विचारले “ठीक आहेस का तु..?” मी हो म्हणत माझ्या बॅगेत ली पाण्याची बॉटल काढली आणि पाणी पिऊ लागलो. झोपूनच पाणी पीत असल्यामुळे टॅक्सी च्याच हेलकाव्यामुळे माझ्या तोंडावर पाणी सांडले. तसे मी उठून बसलो आणि रुमाल काढून चेहरा पुसू लागलो. त्या ड्रायव्हर ला विचारू लागलो “काका तुम्ही या भागात इथेच राहता का..?” तो माणूस म्हणाला “हो.. का रे.. असे का विचारतोस..” 

मी न राहवून त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सांगितल्यावर माझ्या मनातली भीती थोडी कमी झाली असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मला भय जाणवू लागले. त्यांनी दीर्घ श्वास घेत मला विचारले “इथे पहिल्यांदा आला आहेस का..?” मी म्हणालो “पहिल्यांदा नाही.. म्हणजे दिवसा आलो आहे बऱ्याचदा पण एवढ्या रात्री हो पहिल्यांदाच..” तसे ते मला सांगू लागले.. १७ वर्षांपूर्वी इथे एका दारुड्या ला काही टवाळक्या करणाऱ्या पोरांनी सुसाट गाडी चालवत उडवले होते. तो जबर जखमी झाला पण ती पोरं त्याला तशीच टाकून पळून गेली. रात्रभर तडफडून त्याने तिथेच रस्त्यावर जीव सोडला. पण हे सगळे इतक्यावरच थांबले नाही. तो मेल्यानंतर काही महिन्यांतच ते ३-४ जण ज्यांनी त्याला उडवले होते त्यांचा याच रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाला. तेव्हापासून हे सत्र असेच चालू आहे. ती आकृती म्हणजे त्या दारुड्या च भूत खूप लोकांना दिसते. लोकांचा जीव ही गेला आहे त्यामुळे. तू चांगले नशीब घेऊन आला आहेस म्हणुन थोडक्यात यातून बाहेर पडलास. त्या भागात राहणारे लोक ही ११-११.३० नंतर घरातून बाहेर पडत नाहीत. हे सगळे ऐकताना अंगावर शहारे येत होते. मनातल्या मनात मी गणपती बाप्पाचे नाव घेत होतो. त्याच्याच कृपेने मी थोडक्यात वाचलो होतो.

Leave a Reply