अनुभव क्रमांक – १ – राकेश कुरणे
मी रात्रपाळी करून रिक्षा चालवायचो. नेहमीची सवय असल्यामुळे रात्री अपरात्री फिरणे माझ्या साठी काही विशेष नव्हते. त्या दिवशी ही रात्री २ च्या सुमारास एखादे भाडे मिळतेय का हे शोधत मी फिरत होतो. तितक्यात रस्त्याकडे ला मला एक महिला हात करताना दिसली. मी रिक्षा हळूच तिच्या समोर नेऊन थांबवली. ती काही न बोलता आत बसली तसे मी तिला कुठे जायचे म्हणून विचारले. तिने त्या ठिकाणाहून बराच दूर चा पत्ता सांगितला. तसे लांबचे भाडे मिळाले म्हणून मी खूप खूष झालो.
वस्ती असलेला रस्ता संपल्यावर रिक्षा निर्मनुष्य रस्त्याला लागली. त्यात रात्रीचे २ वाजून गेल्याने रस्ता अगदीच सामसूम होता. एकही वाहन दिसत नव्हते. तिने जो पत्ता सांगितला होता तो परिसर ही जास्त वस्तीचा नव्हता त्यामुळे मनात विचार डोकावून गेला की इतक्या रात्री ही बाई तिथे का बरे जात असावी. पण नंतर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला भाडे मिळाल्याशी मतलब म्हणून तो विचार सोडून दिला.
पुढे मुख्य रस्त्याला जोडणारे बरेच रस्ते असल्याने मी तिला विचारू लागलो तसे ती कधी लेफ्ट घ्या तर कधी राईट घ्या असे सांगू लागली. तिने सांगितल्याप्रमाणे मी रिक्षा त्या दिशेला वळवत होतो. अचानक तिने रिक्षेचा वेग वाढवायला सांगितला. मी तिला विचारले की काय झाले तसे ती फक्त वेग वाढवा अजुन वेग वाढवा म्हणून सांगू लागली. मला वाटले की काही कठीण प्रसंग ओढवला असेल म्हणून मी रीक्षेचा वेग वाढवला. पण तरीही ती अजुन वेग वाढवा म्हणून सांगू लागली आणि एका क्षणी म्हणाली “आता रिक्षा त्या समोरच्या झाडावर नेऊन जोरात आदळा”. तिचे बोलणे ऐकून मी दचकलो आणि हे काय बोलत आहात असे म्हणत मागे वळून पाहिले आणि काळजाचा ठोकाच चुकला. मागे कोणीही नव्हते..
मी रिक्षाचा वेग कमी करू लागलो पण अतिशय वेगात असल्याने माझा ताबा सुटू लागला. शेवटी देवाचे नाव घेत मी हळू हळू वेग कमी करू लागलो आणि वेग नियंत्रणात आणून एकदाची रिक्षा थांबवली. मला दरदरून घाम फुटला होता. स्वतःला सावरत मी तिथून माघारी फिरलो आणि माझ्या नेहमीच्या जागेवर येऊन थांबलो. तिथे २-३ रिक्षावाले मित्र उभे होते. त्यांना घडलेला प्रकार सांगितला तसे ते ही माझे बोलणे ऐकतच राहिले. त्यातला एक जण पटकन म्हणाला “तुला माहित नाहीये बहुतेक पण आज अमावस्या आहे, थोडक्यात वाचलास”. त्या घटनेमुळे मी काही दिवस खूप आजारी होती. पुन्हा रात्री असा अनुभव येऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना केली. पण ती रात्र, तो प्रसंग अगदी माझ्या नजरेसमोर आजही तसाच आहे.
अनुभव क्रमांक – २ – दिपा मावलीकर
हा अनुभव माझ्या वडिलांना साधारण ३० वर्षांपूर्वी आला होता. माझ्या वडिलांचा मोहाची दारू काढायचा व्यवसाय होता. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की मोहाचे झाड असते त्याला एका विशिष्ट प्रकारची फुल येतात. त्यापासून प्रक्रिया करून म्हणजेच चुलीवर उकडून वैगरे त्याची दारू बनवली जाते. तर माझे वडील रोज रात्री ५-६ किलोमीटर चालत जंगल पट्टीच्या भागात जाऊन ती झाड शोधायचे. त्या भागात जवळच स्मशानभूमी ही होती. पण त्यांना देवावर किंवा भूतांवर विश्वास नव्हता. थोडक्यात सांगायचे झाले तर ते अश्या गोष्टी मानत नसत.
त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे रात्री ते जायला निघाले. आई ने त्यांना अडवून सांगितले की आज अमावस्या आहे आजच्या दिवस जाऊ नका. पण ते न ऐकता घराबाहेर पडले. काही मिनिटांची पायपीट करून ते नेहमीच्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांनी चूल पेटवली आणि त्यात मोहाची फुल वैगरे टाकून दारू बनवायच्या प्रक्रियेला सुरुवात केली. भरपूर वेळ लागणार होता म्हणून बाजूलाच थोडी साफ सफाई करून ते झोपी गेले. रात्री साधारण १ च्या सुमारास त्यांना कसल्याश्या आवाजाने जाग आली.
त्यांनी उठून चूल पहिली तर अजुन वेळ लागणार होता. म्हणून ते पुन्हा आपल्या जागेवर झोपायला गेले आणि तितक्यात त्यांचे लक्ष समोरच्या दिशेला गेले. तिथे एक भले मोठे झाड होते. त्या झाडाच्या मागे त्यांना कसलीशी हालचाल जाणवली. चूल पेटत असल्याने त्याच्या जेमतेम पडणाऱ्या प्रकशात दिसले की झाडामागे एक आकृती उभी आहे. ते जसे निरखून पाहू लागले तशी ती आकृती एक वेगळाच आकार घेऊ लागली. त्यांना वाटले की झोपेत असल्यामुळे भास होत असेल म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा गाढ झोपी गेले.
साधारण तासाभराने ते पुन्हा उठले आणि चूल पाहू लागले. तसे पुन्हा त्यांना त्या झाडामागे सळसळ ऐकू आली. त्या दिशेला ते पाहू लागले तसे आधी सारखीच एक आकृती त्यांना दिसू लागली. आता मात्र ते झोपेतून पूर्णपणे जागे झाले होते. त्यांनी नीट पाहायला सुरुवात केली. ती आकृती वेगवेगळी रूप घेत होती. नेमके काही दिसत नव्हते पण तिच्या आकारावरून कधी बाईचे रुप तर कधी पुरुषाचे. त्यांना असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसल्याने हा नक्की काय प्रकार आहे हे पाहायचे ठरवले. चुलीतील एक पेटते लाकूड काढून त्याच्या प्रकाशात ते त्या दिशेने पुढे चालू लागले.
काही पावले चालत ते त्या झाडाजवळ येऊन पोहोचले. ती आकृती आता त्यांच्या अगदी समोर होती. त्यांनी ते जळते लाकूड वर करून पाहण्याचा प्रयत्न केला आणि काळजात धडकी च भरली. चित्रविचित्र चेहऱ्याची ती आकृती पाहून त्यांचे काळीज धड धडू लागले. पण घाबरून चालणार नव्हते. त्यांनी हळू हळु मागे पावले टाकत तिथून सरळ घर गाठले. दुसऱ्या दिवशी आई ला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा आई म्हणाली की आता पासून हे काम बंद करायचे. तसे बाबांनी ते काम कायमचे सोडून दिले.
अनुभव क्रमांक – ३ – संकेत रजाणे
अनुभव आहे 7 मे 2018 चा. त्या दिवशी आम्ही एका छोट्याश्या गावात पिकनिक काढायचे ठरवले होते. तिथे एक छोटेसे मंदिर होते. तिथे दिवस भर राहून जेवण वैगरे करून मग संध्याकाळी घरी जायला निघायचे असा बेत ठरला. माझे कुटुंब आणि माझे मित्र ही होते. पण तिथे जाऊन तिथून निघायला अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला. निघाल्यावर मुख्य हाय वे ला पोहोचेपर्यंत १० वाजणार होते म्हणून आम्ही रस्त्यात च एका चहा च्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. माझे काही मित्र बाईक वर तर माझे कुटुंब आणि काही पाहुणे कार मध्ये होते.
पण पुढचा प्रवास मी मित्रांबरोबर बाईक वर करायचे ठरवले. आम्हाला थोडा वेळ लागणार होता म्हणून आम्ही मागेच थांबून बाकी गाड्यांना पुढे पाठवून दिलं. काही वेळानंतर गप्पा आटोपून आम्ही प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. मी आणि माझा मित्र वेगात पुढे आलो. आमचे २ मित्र बाईक वर बरेच मागे राहिले होते. थोडे अंतर पुढे गेल्यावर एक मोठा पुल लागला. त्या पुलावर रस्त्याकडे ला एक बाई उभी होती. बाईक हेड लाईट च्या प्रकाशात दिसले की तिने एक मळकट आणि फाटकी साडी नेसली आहे. मला वाटले की एखादी गरीब बाई असेल पण जस जसे जवळ गेलो तशी माझी नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली. तिचा संपूर्ण चेहरा जळालेला होता. केस अर्धवट जळून अजुन विचित्र वाटत होते. माझ्या मित्राने ही तिचे ते भयंकर रूप पाहिले होते.
त्याने काहीही न बोलता बाईक चा वेग वाढवला. मी ही समजून गेलो की त्याने ही तिला पाहिले. काही मिनिटानंतर मला वाटले की ती बाई बरीच मागे राहिली असेल. म्हणून मी मागे वळून पाहिले आणि शरीरातला सगळा त्राण च संपला. ती बाई हात पाय न हलवता आमच्या मागे अतिशय वेगात पुढे सरकत येत होती. मी मित्राला काही बोलणार तितक्यात तो म्हणाला “हो मी गेले काही मिनिट तिला समोरच्या आरशा तून मागे येताना पाहतोय काही बोलू नकोस”. त्याने बाईक चा वेग अजुन वाढवला होता. साधारण २० मिनिटानंतर एक गाव लागले. तिथे काही पाहुण्यांना उतरायचे होते म्हणून आमची गाडी तिथे थांबली होती.
तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनी आमची अवस्था पाहिली आणि काही तरी विपरीत घडल्याचे ओळखले. त्यांनी आमची विचारपूस केली. तसे आम्ही त्यांना घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली. तितक्यात आमच्या बरोबर असलेली दुसरी बाईक मागून आली. ती बाईक आमच्या २-३ किमी मागे असेल कदाचित. आम्ही त्या दोघांना विचारले की येताना पुलावर ती बाई दिसली का पण त्या दोघांना असा कोणताही अनुभव आला नव्हता. त्या पुढचा प्रवास आम्ही सगळ्यांनी सोबत केला आणि घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर आजी ने मला आणि मित्राला देवीचा अंगारा लावला. त्या घटने नंतर मी रात्री अपरात्री प्रवास करणे आवर्जून टाळतो.