अनुभव – प्रतीक पेरवी
ही घटना आमच्या सोबत दोन वर्षा आधी गावी घडली होती. मी आणि माझे दोन भाऊ. आम्ही गावी गेल्यानंतर खूप मजा-मस्ती करायचो. दिवसभर इकडे तिकडे भटकायचो. दिवसाच काय पण रात्री सुद्धा जेवण झाल्यावर घराबाहेर कुठे ही फिरत असायचो. वेळेचा काही पत्ताच नसायचा. असेच एकेदिवशी आम्ही रात्री ११ वाजता फिरून घरी आलो. आता गावाला रात्री चे ११ म्हणजे मध्यरात्रच. आमच्यासाठी घरच्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. त्यांना माहीत असायचं की ही पोरं रात्री अपरात्री घरी येणार. त्या रात्री घरात आलो तेव्हा सगळेच गाढ झोपले होते. आम्ही अंथरूण केले आणि पडल्या पडल्या गप्पा मारू लागलो. आम्ही आदल्या दिवशी फियारायला गेलो होतो त्याचेच विषय चालू होते. तेवढ्यात मी माझ्या छोट्या भावाला म्हणजेच अथर्वला त्याच्या मोबाईल मधले कालचे फोटोज् सेंड करायला सांगितले.
त्याने टेबलावर ठेवलेला त्याचा फोन माझ्या हातात दिला आणि म्हणाला “ तू घे तुला जे फोटो पाहिजेत ते, मी लघवी करून आलो “. इतके बोलून तो दार उघडुन बाहेर लघवी करायला गेला. कारण आम्ही पहिल्या च खोलीत झोपलो होतो. मी त्याचा मोबाईल घेऊन फोटो सिलेक्ट केले आणि माझ्या फोन वर पाठवले. सगळे सेंड झाले तरीही याचा काही पत्ताच नाही. खूप वेळ झाला तरी तो आत घरात आला नव्हता. मी उठून त्याला पाहायला जाणार तेवढ्यात तो आत आला आणि जे काही म्हणाला ते ऐकून मी आणि माझा भाऊ दोघे ही आश्चर्य चकित झालो. तो म्हणाला “ माझा फोन दे पटकन, त्या बाई ला घरी सोडून यायचय..” हा अचानक असे का बोलतोय, नक्की कोण बद्दल बोलतोय काहीच कळत नव्हते.
त्यावर मी त्याला म्हणालो “”तुला काय वेड लागलंय का! असा का बोलतोयस , रात्रीचे १२ वाजत आलेत , आता कोण कसं असू शकते बाहेर.” कारण संपूर्ण गाव एव्हाना निद्रेच्या आहारी गेलेले असायचे. आणि त्यात एखादी स्त्री अशी एकटी असणे शक्यच नव्हते. पण तो ऐकतच नव्हता. त्याच माझ्या बोलण्या कडे लक्ष च नव्हत. फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होय. “माझा फोन दे , मला जाऊ दे , आलोच १० मिनिटात”. आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. तुला भास वगैरे झाला असेल, कोणी नाहीये बाहेर. तेवढ्यात तो अजून एक वाक्य म्हणाला, “ती बघ आवाज देतेय, मला बोलवतेय.” आम्ही दोघं गप्प च झालो. कारण आम्हा दोघांना कसलाही आवाज आला नव्हता. आम्हाला समजले होते, हा काही तरी वेगळा प्रकार आहे.
अथर्वकडे बघून असे अजिबात वाटत नव्हते की तो मस्करी करतोय. कारण तो एकदम नॉर्मल वाटत होता. घडत असलेल्या विचित्र प्रकारामुळे आमची जागेवरून उठून बाहेर पाहण्याची हिम्मत होत नव्हती. तोच दरवाजा हळुवारपणे उघडला. आणि आम्ही दोघं दचकून बाहेर पाहू लागलो पण बाहेर कोणीही दिसत नव्हते. अथर्व हे बघ बाहेर कोणीच नाहीये, असे मी बोलणार तेवढ्यात अथर्व माझे वाक्य तोडत म्हणाला, ती बघ कशी वाकून बघतेय. त्याचे ते एक वाक्य ऐकून आमच्या अंगावर सर्रकन काटा आला. आम्हाला तर कोणी ही दिसत नव्हते पण अथर्व तिकडे अस पाहत होता जसे खरंच तिथे कोणी तरी आहे जे वाकून आम्हाला पहातेय.
तेवढ्यात माझा दुसरा भाऊ उठला आणि धावतच जाऊन दरवाजा बंद केला व कडी लावली. अथर्व मात्र ऐकायला तयार नव्हता. त्याचे एकच वाक्य सुरू होते.. मोबाईल द्या मला, मी जाऊन त्या बाईला सोडून येतो, ती एकटीच थांबली आहे कधी पासून.. आम्ही कसे बसे त्याला समजावून झोपवले. बऱ्याच वेळा नंतर तो शांत झाला आणि गाढ झोपून गेला. पण आम्हा दोघांना काही त्या रात्री झोप लागली नाही. अथर्व रात्री झोपेत घाबरत होता असे वाटत होते पण त्याला उठवायची इच्छा नव्हती. आणि तेवढ्यात अचानक तो दचकून जागा झाला आणि म्हणाला “मला एक वाईट स्वप्न पडले , कोणी तरी मला बाहेर बोलावून विहिरीत नेऊन ढकलले.” अथर्वचे बोलणे ऐकून आम्हाला कळून चुकले, जर मगाशी तो बाहेर गेला असता तर त्याच्या बरोबर काय घडले असते..