हा अनुभव मला फेब्रुवारी २०२० मध्ये आला होता. लॉक डाऊन होण्या पूर्वी. मी मुंबई च्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये ट्रेनी म्हणून काम करत होतो. डिसेंबर २०१९ पासून मी रुजू झालो तेव्हा पासून मी नाईट शिफ्ट करायचो, पहिल्याच महिन्यात मी नाईट शिफ्ट ला जॉईन झालो तेव्हापासून मला पुढे ३ महिने नाईट शिफ्टचं मिळाली होती. जेव्हा मी रुजू झालो तेव्हा मला पहिल्या महिन्यात हाऊसकिपिंग डिपार्टमेंट मध्ये काम करायला दिले. मी नवीन असल्या मुळे मला सिनियर सोबत काम करावं लागायचं, तेव्हा ते सिनियर नेहमी सांगायचे की कधी तुला हॉटेल मध्ये कोणत्या भागात भिती वाटली तर तू सरळ स्टाफ एरिया मध्ये येत जा. मला कळायचे नाही की ते असे का म्हणत आहेत आणि तेव्हा मी ते काही फार मनावर घेतले नाही. पण एक दिवस मला स्पा मध्ये सफाई करताना एक प्रसंग वाट्याला आला. मी नेहमी प्रमाणे तिथे साफ सफाई करायला गेलो. रात्रीचे ३ – ३.३० झाले असतील. तितक्यात अचानक लाईटस आपोआप बंद चालू होऊ लागल्या. मला जरा विचित्र च वाटले. मी माझे काम थांबवून बघू लागलो की असे काय होतंय. मुंबई शहारा सारख्या ठिकाणी लाईट अजिबात जात नाही. आणि जरी गेल्या तरी सुद्धा जन रेटर बॅकअप असतो. असा विचित्र फॉल्ट कसा काय होऊ शकतो हेच मी पाहू लागलो. 

तितक्यात माझे सिनियर तिथे आले आणि मला म्हणाले “चल आपण जरा बाहेर जाऊन येऊया.” मला थोड विचित्र च वाटल. पण मला तिथून बाहेर घेऊन जायची घाई त्यांच्या डोळ्यांतून मला दिसत होती. मी ही जास्त अक्कल न लावता त्यांचा सोबत तिकडून बाहेर निघून गेलो. काही दिवस उलटले. एकदिवस हॉटेलच्या मागच्या बाजूला जिकडे स्विमिंगपूल होता तिकडे मी एकटाच सफाई च काम करत होतो, एकटा असल्यामुळे मला जरा भीती वाटत होती. त्यात भर म्हणून मला अचानक झाडात सळसळ ऐकू येऊ लागली. दोन मिनिटे आधी जिथे मी सफाई करून घेतली होतं तिथून कोणीतरी अगदी वेगात पळत जाऊन झाडावर गेल्याच मला जाणवलं. तसा मी खूप घाबरलो आणि फक्त जाऊन सफाई केलेल्या जागेवर पाहिलं. लांबूनच पाहिलं. तर तिथे एखादा पक्ष्यासारखा प्राणी फडफडत असल्याचे जाणवले. रात्रीची वेळ असल्यामुळे मी कसलाच विचार न करता मी तिथून पळ काढला. आता मला हॉटेलला जायला पण खूप भीती वाटू लागली होती, सिनियर्सला खूप काही विनवण्या केल्या तरी ते काही सांगत नव्हते. जवळपास रोज शिफ्ट ला आल्यावर मी त्यांना विचारायचा प्रयत्न करायचो पण त्यांनी कोणीही मला काहीच सांगितले नाही. रोज नाईट शिफ्ट ला येणं मला आता दिव्यच वाटू लागले. 

शेवटी मी कसेबसे उरलेले ८ दिवस त्या डिपार्टमेंटमध्ये काढले. त्याच्या पुढच्या महिन्यात जानेवारीत मी फ्रंट ऑफिस म्हणजे रीसेपशन ला रुजू झालो. त्यावेळी जानेवारी महिन्यात हॉटेल खूप गजबजलेले असायचे. खूप कामे असायची. रिसेप्शनला असताना मला बेल डेस्क वरची काम ही करावी लागायची. बेल डेस्क वर मला येणाऱ्या जाणाऱ्या कस्टमर्सच्या बॅग्स लगेज रूम मध्ये न्यायला लागायच्या. त्याच वेळ एका व्यक्तीने लग्न कार्य असल्यामुळे हॉटेल मध्ये १०० रूम्स बुक केल्या होत्या. आणि त्याची इच्छा होती की संगीत सेरेमनी दिवशी जेव्हा लग्नाचे सारे पाहुणे कार्यक्रमात व्यस्त असतील तेव्हा त्यांच्या रूम्स मध्ये गिफ्ट्स आणि खाऊचे बास्केट्स ठेवावे. सिनियर ने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्यामुळे त्यांच्या या इच्छेमुळे मला सेकंड आणि नाईट आशा दोन्ही शिफ्ट एकत्र कराव्या लागणार होत्या. शिवाय त्या व्यक्तीने मला ते काम सोपावतानाच १००० टीप दिली होती आणि शिवाय सोबत आलेल्या सगळयाच गेस्टस ने रूम मध्ये टीप ठेवली असेल ती घेऊन जा असं सांगितलं होतं. त्यामुळे पैसे मिळतील ह्या आशेने मी सुद्धा काम करत होतो. या महिन्यात पगारा व्यतिरिक्त थोडे जास्त पैसे कमवू असा विचार आला आणि मी मनोमन खुश झालो. 

पंचतारांकित हॉटेल्स मध्ये स्टाफ कडे मास्टर की असते जिने रूम उघडता येतो पण लाईट्स साठी डमी की किव्वा रूम की ची गरज असते. पण मी येताना मास्टर किचं आणली होती आणि डमी की विसरलो होतो. इतक्या रूम्स मध्ये जाऊन सामान ठेवायचे म्हंटल्यावर बराच वेळ लागणार होता. शिवाय सोबतीला पण कोणीही नव्हते. मी गिफ्ट्सच काम दुपारी ४ पासून सुरू केलं होतं त्यामुळे सुरुवातीला मला लाईट्सची गरज भासली नाही पण जसा जसा अंधार पडू लागला तसं मला रूम मध्ये जाताना थोडं दडपण येऊ लागलं. काम लवकर व्हावं यासाठी मी वरून खाली यायचं ठरवलं. वरच्या फ्लोअर वर सगळे गिफ्टस ठेवत ठेवत मी खालच्या फ्लोअर वर येऊ लागलो. आमच्या हॉटेल मध्ये एक रूम होती. रूम नंबर २२२. मी तिथे येऊन जरा थांबलो. कारण ही रूम कधीही कोणत्याच गेस्टला द्यायचे नाहीत. पण त्या महिन्यात हॉटेल बुकिंग इतकी होती की ती रूम अलॉट केली गेली. मला ही गोष्ट आठवायला लक्षात यायला जरा वेळच लागला. एव्हाना मला बराच उशीर झाला होता. रात्रीचे दीड वाजून गेले असतील. संगीत सेरेमनी चा कार्यक्रम जवळजवळ रात्र भर चालणार होता त्यामुळे माझ्या हाताशी तसा अजुन थोडा वेळ होता. 

मी ती रूम उघडुन आत शिरलो तसे मला जरा भीती च वाटू लागली. कारण त्या रूम मध्ये इतर रूम पेक्षा जरा जास्तच काळोख जाणवत होता. मी इथे तिथे न बघता सरळ ते गिफ्ट्स मिनीबार टेबल वर ठेऊन तसाच मागे वळलो. आणि वळताना माझं लक्ष बेडवर गेलं. एक स्त्री बेडवर पण बेडपासून जरा वर हवेत तरंगत होती आणि विशेष म्हणजे रूम मध्ये लाईट्स नसताना ही तिच्या चेहऱ्यावर एखाद्या लाईट चा प्रकाशझोत मारावा असे दिसत होते. अगदी विचित्र दिसत होती. चेहरा फाटलेला दिसत होता. ते दृश्य पाहून भीती ने सर्वांगाला घाम फुटला होता. मी दबक्या पावलांनी उलट मागे जाऊ लागलो तितक्यात तिला माझी चाहूल लागली. तसे ती एक जीवघेणा कटाक्ष माझ्याकडे तिला आणि रागात काही तरी बडबडू लागली. तिने माझा कडे पाहताच मी कसलाच विचार न करता तिकडून पळ काढला. धावत धडपडत खाली बेल डेस्क वर घडलेला प्रकार सांगितला. तसं आमचे कॅप्टन दुसऱ्या बेलबॉय वर चिडलेच आणि त्याला खूप काही बोलू लागले. याला तुम्ही हे काम का दिले, नवीन आहे हा अजुन, तुम्हाला कितीवेळा सांगितले तरी एक गोष्ट कळत नाही वैगरे.. माझी अवस्था बघून मला घरी सोडलं. मी ही जास्त विचार न करता हॉटेल मधून बाहेर पडलो आणि घरी आलो. 

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा राहिलेले गिफ्ट्स ठेऊन रात्री वर्तमानपत्र हँग करायला गेलो, हॉटेल मध्ये नाईट शिफ्ट ला सकाळी ४ ला सगळे हाऊस किपिंग स्टाफला झोपायला २ तासाचा ब्रेक असायचा,तेव्हा २ तासासाठी हॉटेल मध्ये एकही हाऊस किपिंगचा स्टाफ नसायचा. याच वेळेत ट्रेनीच्या द्वारे वर्तमानपत्र रूम्स ला हँग केले जातात, तेव्हा मी वर्तमानपत्र हँग करत असताना मला २ऱ्या मजल्यावर माझ्या मागे कोणीतरी असल्याचा सारखा भास होत होता, शेवटी कसेतरी ते काम उरकून मी रूम नं २२२ च्या बाहेरून जाताना विचित्र हसण्याचा आवाज माझा कानावर पडला. तसा मी पळतच लॉबी मध्ये आलो आणि कॅप्टन ला परत घडलेला प्रकार सांगितला, तसं त्यांनी मला तू आता घरी जा आम्ही राहिलेले काम करतो असे बोलून सकाळी ५ ला सोडलं. मागचे२ दिवस मी डबल शिफ्ट केल्यामुळे मला १ सुट्टी मिळाली होतो आणि माझी एक सुट्टी असं मला मागोमाग २ सुट्ट्या मिळाल्या होत्या. मी २ दिवसाने जेव्हा पुन्हा हॉटेल ला आलो तेव्हा मला कळलं की गेले २ दिवस कोणीही रूम्स ला वर्तमानपत्र हँग नाही केलेत, हॉटेल चा कोणत्याच स्टाफ ने हे काम केले नाही. ही गोष्ट मला फार खटकली. शेवटी खुप माहिती काढल्यावर कळलं की रूम नं २२२ मध्ये एका स्त्रीची मानेत चाकू घुसवून हत्या करण्यात आली होती आणि ती खूप लोकांना दिसते.

स्पा मध्ये याचं स्रीच्या सोबत असलेल्या स्त्रीची हत्या झाली होती. असे म्हणतात की तिची आत्मा अजूनही त्या रूम मध्ये अडकून पडली आहे. 

Leave a Reply