अनुभव – हर्षल पांडे
ही गोष्ट माझा लहान पणाची आहे, मी ६/७ वर्षाचा होतो ,
माझी आई ही सरकारी डॉक्टर आहे आणि त्यावेळी नाशिक जवळील एका खेड्यात तिची पोस्टिंग होती. त्यावेळी न मोबाईल होते आणि न संपूर्णतः लाईट, त्यामुळे दिवे (कंदील) हे एकमेव साधन आणि खूप चांगलं घर असेल तर मोठी बॅटरी वैगरे असायची. त्या गावात मी अगदी लहान म्हणजे एक दीड वर्षाचा असल्या पासून राहायचो. एक दिवस माझे २ चुलत भाऊ, लहान भाऊ आणि मी असे सर्वे लाईट नसल्याने गप्पा मारत बसलो होतो. तितक्यात माझा आणि माझा मोठ्या चुलत भावातील भुताच्या गोष्टीचा किडा वळवळला. माझा त्या घरापासून अगदी १ किमी वर एक आक्राळ विक्राळ पिंपळाचे भले मोठे झाड होते. आम्ही लहान भावांची मजा घ्यायची ठरवली. त्यांना आम्ही सांगितले की त्या झाडावर भूत राहतात. इतकेच काय तर त्यांना जवळ नेऊन ती भूत कुठे बसतात ते ही दाखवू लागलो. ते दोघेही बरेच घाबरले. तितक्यात माझे वडील तिथे आले आणि त्यांना आमचे उपद्व्याप कळल्यावर ते आम्हाला ओरडले. सांगू लागले की “कसले फालतू खेळ खेळता रे.. ”
आम्ही जास्त काही न बोलता तिथून पळ काढला आणि घरी आलो. जेवण वैगरे आटोपले आणि झोपायची तयारी झाली. पण मी आणि माझा मोठा भाऊ आम्हाला दोघांनाही झोप लागत नव्हती. उन्हाळा त्यात लाईट नाही म्हणून आम्हाला उकडत होत. म्हणून आम्ही दार उघडुन बाहेर आलो. बाहेर गडद अंधार होता. दूरवर असलेल्या अंधुक प्रकाशात आम्हाला ते पिंपळाचे झाड दिसले. ते झाड संध्याकाळ पेक्षा अधिक भकास दिसत होते. तितक्यात माझा भाऊ बोलला हर्षा आज अमावस्या आहे चल घरात. बाहेर थांबणे बरोबर नाही. आम्ही मागे वाळवून घरात जाणार इतक्यात आवाज आला.. “का रे माझा बद्दल बरीच माहिती आहे”. इतक्या रात्री तो आवाज ऐकून आम्ही दोघं घरात पळालो. धावत येऊन अंथरुणात शिरलो. झोपायचा प्रयत्न केला पण तो आवाज कानात घुमत होता. काही वेळ उलटला. अचानक आम्हाला वाटू लागले की कोणीतरी आमच्या घरावरून चालतंय. आम्ही त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. ते जे काही होत ते चालत चालत घराच्या एका कोपऱ्यात जवळ आले. जिथे खिडकी होती. आम्ही श्वास रोखून तो प्रकार पाहत होतो.
तितक्यात खाटकान खिडकी उघडली. आणि मी घाबरून जोरात ओरडलो “नुपूर दादा त्याला जायला सांग..” माझ्या आवाजाने घरातले ही उठले आणि आम्हाला घाबरलेले पाहून माझे वडील म्हणाले “झेपत नाही तर कशाला भुताच्या गोष्टी करता.. चला झोपा भास झाला तुम्हाला..” असं म्हणत त्यांनी एक पायताण आमच्या उशाशी ठेवलं. आज या प्रसंगाला २५ वर्ष उलटली पण अजूनही मला प्रश्न पडतो की तो फक्त भास होता की अजुन काही.. कारण त्या नंतर हि मला तो आवाज ३/४ वेळा येऊन गेला होता ..