हा अनुभव माझ्या आजोबांना आला होता. ते आता ८० वर्षांचे आहेत. जवळपास ५० वर्षांपूर्वी चा अनुभव असेल. १९७० चे दशक. आम्ही मूळ कोल्हापूर जिल्ह्यात राहायला होतो. पण आजोबा तेव्हा कामा निमित्त कोकणात एका गावात होते. तिथल्या एका बंदरावर बोटी मध्ये माल भरणे आणि आलेला माल उतरवणे हे काम ते करत होते. अर्थातच राहण्यासाठी ते तिथल्याच जवळच्या गावात होते. आपल्या एका मित्र सोबत राहायचे. बंदरावरून गावात जाण्यासाठी दोन वाटा होत्या. एकाने लवकर पोहोचता यायचे तर दुसरी वाट मुख्य रस्त्यावरून असल्यामुळे वेळ लागायचा. आजोबा जेव्हा तिथे रुजू झाले होते तेव्हा तिथल्या काही लोकांनी त्यांनी सांगून ठेवले होते की कधी उशीर झाला तरी लवकर येता यावे म्हणून त्या आतल्या वाटेने येऊ नकोस. त्या कामाला काही वेळ नव्हती. सकाळी सुरू झालेले काम दिवस भर चालायचे. कधी लवकर संपायचे तर कधी बराच उशीर व्हायचा. त्यामुळे वेळेत निघणे हे कधीही शक्य होत तसे. त्या दिवशी असाच त्यांना उशीर झाला होता. अंधार खूप गडद झाला होता. दिवसभर काम करून थकल्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी जायचे होते. त्यामुळे ते इतरांचे बोलणे डावलून त्या आतल्या वाटेने निघाले. म्हणतात ना. जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तो पर्यंत माणूस शहाणा होत नाही. आजोबा त्या वाटेला लागले. १५-२० मिनिटांनंतर त्यांना अचानक वातावरणात बदल झालेला जाणवू लागला. त्या भागात एक वेगळाच गारवा पसरला. 

ती थंडगार हवा अंगाला स्पर्श करून जाताना दिलासा नाही तर एक वेगळीच जाणीव देऊन जात होती. तितक्यात अचानक त्यांना एक भेसूर आवाजात हसण्याचा आवाज ऐकू आला आणि तो आवाज जसा थांबला तसे एक शब्द कानावर पडला ” सापडला “. ते चालत चालता जागीच थांबले आणि थांबून आजूबाजूला पाहू लगले. तो आवाज नक्की कुठून आला हे कळायला मार्ग नव्हता. तितक्यात त्यांचे लक्ष त्या वाटेपासून काही पावलं आत असलेल्या एका विहिरीवर गेली. ते निरखून त्या दिशेने पाहू लागले कारण त्या विहिरी च्या कठड्यावर कोणीतरी बसल होत. त्यांना कामावरच्या काही लोकांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या आणि ते एकदम सावध झाले. त्यांनी सरळ घराच्या दिशेने धाव ठोकली. घर येई पर्यंत ते थांबलेच नाहीत. घरी येऊन जोर जोरात दरवाजा वाजवू लागले. त्यांच्या मित्राने दार उघडले आणि आजोबांचा घाबरलेला चेहरा पाहून त्यांना विचारले “अरे काय झाले.. इतका का घाबरला आहेस..?”. आजोबा म्हणाले की मी आतल्या वाटेने आलो, कोणी तरी हसल्याचा आवाज आला म्हणून मी पाहिले तर विहिरीच्या कठड्यावर कोणी तरी बसलं होत, विहिरीत पाय मोकळे सोडून..” त्यांना पुढे जास्त काही बोलता आले नाही. मित्र म्हणाला “तुला या आधी सांगितले होते की काहीही झाले तरी त्या वाटेने यायचे नाही म्हणून..” आजोबा काहीच बोलले नाहीत. काही केल्या त्यांच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता. कसे तरी रात्रीचे जेवण आटोपून ते झोपून गेले. 

मध्यरात्री त्यांना थंडी लागत असल्यामुळे जाग आली. खिडकी वाऱ्याने उघडली असेल म्हणून ती बंद करूया असा विचार करून ते उठून बसले. आणि जसे त्यांनी डोळे उघडले त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास च बसत नव्हता. कारण ते घरी नाही तर त्याच विहिरीच्या कठड्या जवळ खाली जमिनीवर झोपले होते. सगळ काही कल्पनाशक्तीच्या पुढचं घडत होत. काय करावं त्यांना काहीच काळात नव्हत. ते स्वतःशीच बोलू लागले “मी तर घरामध्ये झोपलो होतो, इथे कसा काय आलो..” ते भानावर आले, आजूबाजूचा अंदाज घेत हळु हळू इथले आणि तिथून त्यांनी सरळ पळ काढला. घरी येई पर्यंत पहाट झाली होती. घरी गेल्यावर त्यांनी मित्राला सगळी हकीकत सांगितली. या भयानक प्रसंगानंतर मात्र त्यांनी तिथले काम कायमचे सोडून दिले आणि पुन्हा त्या गावात ते कधीच गेले नाहीत. 

Leave a Reply