हा अनुभव माझ्या बाबांना जवळपास ४० वर्षापूर्वी आला होता. तेव्हा बाबांचे वय १३ वर्ष होते. सुट्टी निमित्त बाबा त्यांच्या मामाच्या गावी गेले होते. त्यांचे मामा म्हणजे माझे आजोबा तेव्हा शेती करायचे. त्याच सोबत लग्ना मध्ये आणि कार्यक्रमामध्ये स्पीकर भाड्याने देण्याचा ही व्यवसाय करायचे. एके दिवशी अशीच भाड्याने स्पीकर देण्यासाठी ऑर्डर आली. ऑर्डर देण्याआधी बॅटरी चार्जिंग करून आणायची होती. आणि ती चार्ज करण्यासाठी गावात सोय नव्हती. त्यामुळे त्यांना जवळच्या शहराच्या ठिकाणी जावे लागायचे. बाबांना तेव्हा नेमकी सुट्टी होती. त्यामुळे मामा ने त्यांना नेले जेणेकरून त्यांना ही दुसऱ्या गावात फिरून आणता येईल. बॅटरी सायकल च्या मागे लावली होती. आणि बाबांना मध्ये बसवून मामा सायकल चालवत होते. गाव उंच टेकडी वर असल्यामुळे टेकडी उतरून खाली मुख्य रस्त्याला यायला लागतं होते. बाबांकडे एक लहान बॅटरी हातात धरायला दिली होती आणि ते प्रकाश पाडून वाट दाखवत होते. गावाच्या बाहेर येऊन ते टेकडीच्या उतरला लागले. आणि तितक्यात ती हातातली लहान बॅटरी अचानक बंद पडली. तसे मामा बाबांना म्हणाले,” बाळू, काहीही झालं तरी काय बोलू नकोस. शांत बस.” बाबा ना काही कळले नाही की मामा असे का सांगतोय पण तरीही ते हळूच हो म्हणाले. वाटेवर गडद अंधार होता. जेमतेम वाट नजरेस पडत होती. त्याकाळी रस्त्यावर लाईट चे पोल असा काही प्रकार नव्हता.
मामाचा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता असल्यामुळे अंदाज घेत ते हळु हळू टेकडी उतरून खाली आले. शेवटचे वळण घेऊन जसे मामा थोडे पुढे गेले तसे बाजूच्या झुडपा तून आवाज आला. ” काय गा.. उशीर केल्यासा..”. मामा काहीच बोलले नाहीत आणि बाबा ही सांगितल्याप्रमाणे गप्प बसून राहिले. पुन्हा एक अमानवीय भरडा कोणाच्या हसण्याचा आवाज आला. मामा ने सायकल चा वेग वाढवला आणि पुढे निघून गेले. बाबा तेव्हा लहान असल्यामुळे त्यांना कळले नाही की नक्की काय होत, कोण होत. आणि नंतर ही बाबांनी कधी या बद्दल पुन्हा विचारले नाही. त्यामुळे त्या भागात काय आहे, तो आवाज कसला होता हे गूढ अजूनही तसेच कायम आहे. गावात ही त्याच्या बद्दल लोक बोलतात पण त्या मागचे कारण मात्र कोणालाही माहीत नाही. काही जणांनी आवाज आल्यावर तिथे थांबून ही पाहिले आहे पण त्या वाटेवर कोणीही दिसत नाही. आजही कधी गावातली लाईट गेली तर रात्री त्या वाटेने जाताना तो आवाज ऐकू येतो.