लेखक – अनिरुद्ध
एका भीषण अपघातात सोहम च्या वडिलांचा मृत्यू झाला होता. वडील गेल्यामुळे घरची सगळी जबाबदारी आता त्याच्यावर आली होती. तो आपल्या आई सोबत राहायचा. तसा दिसायला देखणा, पावणे सहा, सहा फूट उंची, डोळ्यांवर असणारा चष्मा जो अगदी कोणालाही आकर्षित करेल. ओळखीच्या लोकांमध्ये त्याला सगळेच पसंद करायचे. ऑगस्ट महिना होता. सोहम त्याच्या वडिलांच्या गावाला जाणार होता. त्यासाठी कामावरून आधीच सुट्टी ही मागून ठेवली होती. पण अगदी ऐन वेळी त्याच्या बॉस ने सुट्टी नाकारली. कारण काय तर या महिन्यात बरेच काम आहे त्यामुळे आता सुट्टी घेता येणार नाही. पुढच्या महिन्यात सुट्टी घे. हे ऐकून तो जरा नाराजच झाला होता. संध्याकाळी घरी आल्यावर तो त्याच्या खास मित्राला म्हणजे अनिकेत ला भेटायला गेला. अश्या वेळी मित्राकडे जाऊन थोडे मन हलके करावेसे त्याला वाटले.
सोहम (चिडत) – अरे काय तो बॉस पण आता सुट्टी देत नाही, ह्या महिन्यात कसलं काम.. नुसती करणं देतो तो, सप्टेंबर मध्ये जा असं तो म्हणतो आहे.. हे त्याला आधी नाही सांगता येत का..?
अनिकेत त्याला शांत करत म्हणाला – अरे जाऊ दे, तसं पण आता तुझ्या गावाला पावसाचा जोर असेल. पूर येण्याची शक्यता आहे.. मी थोड्या वेळा पूर्वी मोबाईल वर बातमी पहिली.. त्यापेक्षा सप्टेंबर मध्ये गणपती असतील आणि तेव्हा गावी जाणे योग्य वाटतय मला.
त्यावर सोहम म्हणाला “अनिकेत तू पण येशील का माझ्या गावी.. आपण तिथे पूर्ण एक आठवडा राहूया आणि माझ्या बाबांसाठी शेतातल्या मंदिरात एक पूजा पण करायची आहे. ते होते तेव्हा दर पावसळ्यात पूजा करायचे आणि ह्या वेळेस मी करणार आहे.
अनिकेत – वा! मी येईल तुझ्या गावाला. नक्की.. मी कधी आलो नाहीये तिथे.. तुझ्या गावातल्या मित्रांसोबत आपण थोडी ओली पार्टी पण करूया. चालेल ना..
त्याचे असे बोलणे ऐकून सोहम थोडा चिडत म्हणाला “तुम्हाला काय करायचे ते करा.. मी अश्या वेळी ड्रिंक्स घेणार नाही..”
सप्टेंबर महिना आला आणि ते ९ सप्टेंबर ला सकाळी ५ वाजता ते दोघेही गावी जायला निघाले. सोहम कडे गाडी होती. दुपारी गावाला पोहोचल्या वर तोंडा वरचा मास्क काढत सोहम ने मोकळा श्वास घेतला, गावाकडची हवा एक वेगळाच दिलासा देऊन गेली. लॉक डाऊन असल्यामुळे त्याला बरेच महिने गावाला यायला जमलं नव्हत. पण आता आपल्या जिवलग मित्रासोबत यायला मिळालं होत म्हणून तो खूश होता. घरी आल्यावर तो आजी आजोबांना भेटला. हातपाय धुवून घेतले आणि जरा फ्रेश झाला. जेवायची वेळी झाली होती म्हणून सोहमच्या काकू ने सोहम आणि अनिकेत ला जेवण वाढलं. जेवता जेवता गप्पा रंगल्या. सोहम ने आजोबांना विचारलं ” उद्या गणपती बसणार आहेत तर काही तयारी केली आहे की नाही.. त्यावर ते म्हणाले “तुला माहित नसल्यासारखे का बोलतोस, या वर्षी आपल्याला सुतक आहे..” सोहम अश्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही पण आजोबांचे म्हणणे ऐकून तो शांत बसला.गप्पा गोष्टी झाल्यावर सोहम अनिकेत ला घेऊन त्याचा गावातल्या मित्रांना भेटायला गेला. महेश आणि शुभम अनिकेत ला पहिल्यांदा भेटले. समवयस्क आणि एक सारख्याच स्वभावाचे असल्यामुळे पटकन मैत्री झाली. सगळे मिळून शेतात फर फटका मारायला गेले. बराच वेळ फिरून झाल्यावर जवळच्या एका मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसले. पुढचा बेत काय यावर चर्चा सुरू झाली. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या धाब्यावर पार्टी ला जायचे ठरले. महेश आणि शुभम ने ड्रिंक्स ची व्यवस्था केली. पण सोहम म्हणाला की थकल्यावर मी पीत नाही. सोहम या सगळ्यापासून लांब च होता. त्याला आग्रह केला पण सोहम त्याच्या मतावर ठाम राहिला.
पार्टी, ड्रिंक्स करण्यात बराच वेळ गेला. रात्री चे ८ वाजले होते. तसे सोहम कडे ४ व्हीलर होती. तो थकला होता पण त्याला ड्राईव्ह करण्या शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. कारण शुभम, महेश आणि अनिकेत प्यायला मुळे अजिबात शुद्धीत नव्हते. तालुका ते त्यांचे गाव जवळपास २५-३० किलोमिटर अंतर. त्यांनी प्रवसाला सुरुवात केली आणि तितक्यात पावसाला सुरुवात झाली. काही वेळ उलटला असेल. पावसाने जोर धरला होता. रस्ता ही एव्हाना सामसूम झाला होता. तितक्यात अनिकेत ला काय झाले काय माहित, तो सांगू लागला की मला एक काळी आकृती रस्त्याकडे ला उभी दिसतेय. सोहम म्हणाला ” गप रे, चढली आहे तुला.. काहीही बडबडू नकोस..” तितक्यात महेश त्याला चिडवण्यासाठी म्हणाला “अरे मला सुद्धा झाडावर कोणी तरी बसलेले दिसले. ” अनिकेत ला प्रचंड राग आला आणि तो चिडून म्हणाला “मी मस्करी करत नाहीये, मला खरंच काही तरी दिसतेय.. माझ्यावर विश्वास ठेवा.. मी जरी घेतली असली तरी समोर काय दिसतंय ते कळतंय मला..”. सोहम ने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण तितक्यात गाडीतून विचित्र आवाज येऊ लागला आणि तो जरा घाबरला च. अनिकेत च्या बोलण्यामुळे नाही तर इतक्या रात्री गाडी बंद पडली तर तो एकटा काय करणार. मित्र प्यायल्यामुळे अजिबात शुद्धीत नाहीत. गाव अजुन १०-१५ किलोमिटर वर आहे. तितक्यात डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच गाडी समोर कोणी तरी आले आणि काही कळायच्या आत खटकन गाडी त्यावरून निघून गेली. सोहम ने करकचून ब्रेक मारे पर्यंत बराच उशीर झाला होता.
हृदय भीतीने जोर जोरात धड धडत होत. तरीही तो हिम्मत करून खाली उतरला आणि जीव मुठीत धरून गाडी खाली वाकून पाहू लागला. पण अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हत. त्यात मुसळधार पाऊस. त्याने मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू केला आणि गाडी खाली वळवला. पण कोणीही दिसलं नाही. त्यांनी चारही चाकांच्या जवळ जाऊन पाहिले, गाडी मागे पाहिलं पण काहीही नाही. आता मात्र त्याच्या मनात भीती घर करू लागली. गाडी समोर नक्की काही तरी होत ज्याच्या वरून गाडी आली. पण आता काही दिसत कस नाहीये. पावसामुळे तो एव्हाना ओला चिंब झाला होता. तितक्यात अनिकेत त्याच्याच धुंदीत ओरडला “काय रे काय झालं..?”. आणि तितक्यात जंगली कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. नकळत त्याची नजर बाजूच्या गर्द झाडीत गेली आणि एक विचित्र सळसळ जाणवली. जर एखादे जंगली श्वापद असेल तर काय करणार. मित्रांना सांगायची ही काय सोय नाही. तो दबक्या पावलांनी उलट गाडीकडे जाऊ लागला आणि गाडीत जाऊन बसला. पण गाडी काही सुरू होईना. अनिकेत भानावर आला आणि त्याने इतरांना उठवले. गाडी बाहेरून दरवाज्यावर नखाने ओरबाडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र बाहेर नक्की काय आहे हे पाहण्याची हिम्मत होत नव्हती. घडणारा भयानक प्रकार पाहून तिघांचीही झटक्यात उतरली. तेवढ्यात गाडी सुरू झाली आणि ते त्या भागातून बाहेर पडले. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते.
साधारण ११.३० च्या सुमारास ते गावात आले. तोंडावर पाणी मारून ते तिघे शुद्धीत आले तसे सोहम ने सगळा प्रकार सांगितला. ते त्याला समजावत म्हणाले की झाला प्रकार विसरून जा. सोहम म्हणाला की अरे पण गाडीचे काय. त्या सगळ्यांनी गाडी कडे पाहिले पण गाडीवर एकही स्क्रॅच नव्हते. ते सगळेच खूप घाबरले होते. ती रात्र त्यांना नीट झोपही लागत नव्हती. रात्री २ च्या सुमारास सोहम ला मळमळ होऊ लागली. त्याने न राहवून अनिकेत ला उठवले. त्याच्या वडिलांचे मेडिकल स्टोअर असल्याने नेहमी उलटी, एसिडीटी च्या गोळ्या सोबत असायच्या. पण त्या गोळ्यांचे बॉक्स नेमके तो घरी विसरून आला होता. गावाच्या ठिकाणी आता मेडिकल स्टोअर उघडं मिळणं ही कठीण होत. सोहम ची तब्येत अचानक बिघडायला सुरुवात झाली. उलट्या सुरू झाल्या. त्याचे काका उठले आणि गावातल्या एका मेडिकल वाल्याच्या गाहरी जाऊन, त्याला उठवून गोळ्या घेऊन आले. पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. बऱ्याच उलट्या होऊन सोहम पार गळून गेला होता. काकू ला भलतीच शंका येऊ लागली म्हणून तिने विचारायला सुरुवात केली की येताना काही झाले होते का.. तेव्हा अनिकेत ठरल्याप्रमाणे काहीच बोलला नाही. पहाटे डॉक्टरांना बोलवले. सोहम ची तब्येत इतकी खराब झाली होती की त्याला सलाईन लावली आणि एक इंजेक्शन ही दिले. डॉकटर म्हणाले की अपचन जरी झाले तरी इतक्या उलट्या सहसा होत नाहीत. तुम्ही मी सांगतो त्या टेस्ट करून घ्या आणि रिपोर्ट आल्यावर आपण बघू.
अनिकेत डॉक्टरांशी बोलत बोलत बाहेर सोडायला गेला. येताना त्याच लक्ष सोहम च्या गाडीकडे गेलं आणि त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. कारण गाडीत पांढर कापड गुंडाळून ठेवलेलं एक शव होत. जणू काही ते आताच शवगृहातून आणलं असावं. त्याला आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही म्हणून त्याने गाडीचे दार उघडून पाहिले. त्याला काल रात्रीचा भयाण प्रसंग आठवला आणि वाटले की हे तेच प्रेत तर नाही जे गाडी खाली आले होते. पण असे कसे घडेल, कुठून आले हे, काय घडतंय हे सगळ. तो धावतच घरात आला आणि आजीला घडलेला प्रकार सांगू लागला. पण पुढे जे घडले ते अतिशय भयानक होते. आजीचा आवाज अचानक बदलू लागला आणि जड होऊ लागला. तो आवाज एका पुरुषी आवाजात बदलला जो अगदी सोहम च्या वडीलांसारखा वाटू लागला. अनिकेत फक्त आजी काय होतंय इतकचं विचारू लागला. ” काही महिन्यांपूर्वी तू दारू पिऊन गाडी चालवत होतास आणि नशेत एका माणसाला उडवून निघून गेलास.. एकदाही वाटले नाही की गाडी थांबवून बघावे कोण आहे.. तो मी होतो.. पण आता मी परत आलोय.. तुला सोडणार नाही..” इतके म्हणत अनिकेत चा गळा धरला तसे तो खाडकन जागा झाला. डॉक्टरांना सोडून आल्यावर तो अंथरुणात पडला आणि त्याला झोप लागली होती. आणि त्याने हे भयाण स्वप्न पाहिले. पण स्वप्नात सोहम चे वडील जे बोलले ते खरे होते की नाही हे कळत नव्हतं. अनिकेत या बाबतीत कोणाला काहीच बोलला नाही. तो सोहम जवळ जाऊन बसला, त्याची सलाईन तपासली आणि डोळे मिटून बसून राहिला.
सोहम ला सकाळी जाग आली. बाथरूम ला जाण्यासाठी तो उठला आणि बाहेर जाणार तोच त्याला त्याच्या वडिलांचा आवाज आला. तो खोलीत सगळी कडे पाहू लागला. घराच्या बाहेर खिडकीत त्यांचा चेहरा दिसला आणि सोहम च्या अंगावर सरसरून काटा आला. डोळ्यात अश्रू तरळले. पण आपल्याला भास होतोय असे समजून त्याने नजर हटवली आणि ते समोर उभे दिसले. अनिकेत ला सांगितल्या प्रमाणे सोहम ला ही त्यांनी काही महिन्यांपूर्वी घडलेला अपघात सांगितला. त्या वेळी अनिकेत एकटा नव्हता तर त्याच्या सोबत सोहम ही होता आणि दोघं ही दारूच्या नशेत होते. अनिकेत प्रमाणे सोहम ही त्यांच्या मृत्यूला तितकाच जबाबदार होता. तो धाय मोकलून रडू लागला पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. दुसऱ्या दिवशी ते गावावरून आपल्या घरी यायला निघाले. इतके सगळे होऊन ही अनिकेत मात्र गाडी वेगात पळवत होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. गाडी इतक्या वेगात होती की त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. काही कळण्या आधी गाडी एका मोठ्या झाडावर जाऊन जोरात आदळली. तो अपघात इतका जबरदस्त होता की शेवटचे दृश्य जे दिसले ते कारच्या काचेचे तुटून त्यांच्या दिशेने येणे.. डोळे उघडले तेव्हा अगदी शांत वाटत होत. दुपार झाली होती. थोड उन होत पण त्या झाडाखाली असल्याचे त्याला जाणवले. तितक्यात सोहम ला एक गोष्ट लक्षात आली की चष्मा नसताना ही त्याला समोरच अगदी स्पष्ट दिसत य. त्याने अनिकेत कडे पाहिले आणि त्याला सगळ्या गोष्टी उमगल्या. त्या दोघांचे फक्त डोके गाडीच्या बोनेट वर होते, शरीर तशीच गाडीत…