अनुभव – नील ढोकरे

मला ट्रेकिंगची चांगली सवय आहे. आजपर्यंत मी साधारण 60-65 नवनवीन किल्ल्यावर गेलोय पण असा अनुभव या पूर्वी कधीच आला नव्हता आणि त्या नंतर पुन्हा कधीच आला नाही

आम्ही हरिश्चंद्र गडावर जायचा बेत आखला होता. त्यावेळी ट्रेकिंग एवढं काही फेमस नव्हतं. आमच्या साठी ते किल्ल्यावर फिरायला जाणं होतं. मी आणि माझे ६ मित्र शनिवारी सकाळी कल्याण वरून हरिश्चंद्रगडा साठी निघालो. ती दिवाळीची अमावास्या होती. वडीलधाऱ्यांनी सांगितलं होत की बाबांनो अमावास्या आहे, कशाला निर्जन स्थळी जाताय, उलट इथे थांबून आपला सण साजरा करा.पण त्यांचा उपदेश झिडकारून आम्ही जायला निघालो.

गडावर जायला 4 वाटा आहेत त्यापैकी आम्ही खिरेश्वर मार्गे सकाळी ११ वाजता गड चढायला सुरुवात केली. रमत गमत फोटो काढत आम्ही रोहिदास शिखरावर पोहोचलो. तोपर्यंत ६ वाजत आले होते. सूर्यास्त होताना चे सुंदर दृश्य पाहिलं आणि सर्वात उंच तारामती शिखरावर जायला निघालो. हळू हळू अंधार दाटू लागला होता. आम्ही धावतच हरिश्चंद्रेश्वर मंदिर गाठलं. मंदिरात सोलार लाईट ची सोय असल्याने हायसं वाटलं. कारण अंधार पडला होता आणि त्यात राहण्यासाठी चांगली जागा शोधणं खूप अवघड झालं असतं.

आम्ही कामं वाटून घेतली. कुणी मंदिरा मागच्या टाकीतून पाणी आणत होते, कुणी जेवणाची तयारी करत होते ,कुणी सरपण जाळत होते. आम्ही जेवण उरकलं, भांडी धुतली आणि निवांत गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली. अचानक आमच्यातल्या एकाने भुतांचा विषय काढला पण इतरांनी तो आवर्जून टाळला. पण एकदा टाळलेला विषय मनात तर राहतोच ना.आम्ही एकंदरीत ठरवलं होत की सगळे न झोपता अर्धे झोपतील आणि अर्धे जागे राहतील.

जागं राहण्यासाठी काय करणार म्हणून आम्ही भजनं गायला सुरवात केली. इतक्या उंचीवर मंदिराशेजारी काळोख्या रात्री भजनं गायला खूप मजा येत होती. पण खरी गंमत तर पुढे होती. भजनं गाणारे एकामागोमाग हळुहळु पांगु लागले. शेवटी मी आणि एक मित्र उरलो. मित्र म्हणाला की मी फक्त 10 मिनिट झोपतो मला उठव आणि मग तू झोप. मी ही होकारार्थी मान हलवली.

ठाणे,पुणे,अहमदनगर ह्या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या ह्या महाकाय किल्ल्यावर फक्त आमचा ग्रुप आला होता आणि या क्षणी फक्त मी एकटा जागा आहे , तेही रात्री दीड वाजता. मनात विचार आला तशी झोप काही क्षणापूर्ता पूर्ण उडाली. मी पटकन हा विचार मनातून घालवला आणि शेकोटीकडे बघू लागलो. मग उगाचंच हातातली बॅटरी मंदिरावर मारु लागलो. साधारण १.५-२ हजार वर्षे जुनं असलेलं ते मंदिर पाहून मनात वेगळाच विचार डोकावून गेला. मी पटकन बॅटरी बंद केली.

मला लघवीला जायचे होते, त्यासाठी मंदिर बाहेर असलेल्या डॉल्फिन सारखी प्रतिकृती असलेल्या कचऱ्याच्या डब्यापर्यंत मला पोहोचणं गरजेचं होतं. मी बॅटरी त्या डॉल्फिन वर मारली, तो जबडा उघडून माझ्याकडे पाहून हसत होता असं वाटू लागलं. मी पटकन टॉर्च बंद केला.अर्थात ही माझ्या मनातली भीती होती.मग मी उगाच बाहेर असलेल्या काळोखात बॅटरी मारली, तो अंधार त्या बॅटरीचा प्रकाशाला चक्क गिळत होता. आता मात्र मी पुरता घाबरलो होतो. इकडे तिकडे पाहायची पण माझी हिम्मत होत नव्हती.

मी दोन्ही कान हाताने दाबून शेकोटीकडे टक लावून पाहू लागलो.आयुष्यात घडलेल्या घटना सर्रकन माझ्या नजरेसमोरून जाऊ लागल्या.लांब कुठून तरी टाळ वाजवल्या सारखं वाटू लागलं होतं. कदाचित मघाशी आम्ही भजन गात असतानाचा ताल माझ्या मनात घोळत असावा. 5-10 min झोपतो असं सांगून तो मित्र साधारण तासाभराने उठला.त्याला सोबत घेऊन मी पटकन लघवीला जाऊन आलो आणि झोपी गेलो.

सकाळी उठलो तेव्हा प्रसन्न वाटत होतं.रात्रीचा अनुभव मी पुरता विसरलो होतो पण पुढे काय वाढून ठेवलंय ते तेव्हा कुठे माहीत होतं.

आम्ही नाश्ता संपवून सगळी आवरा आवर करून निघायची तयारी करत होतो.काही जण फ़ोटो सेशन करत होते.
आणि!!!!!!!
बांबूची उभी असलेली काठी जमिनीवर जशी आदळते तसा एक मित्र गुडघेही न वाकवता जमिनीवर कोसळला.पडताना तो तोंडावर पडला आणि पुढंचे 3 दात तोंडात गेले.तो हात पाय झाडू लागला.रक्ताने तोंड माखलं होतं. त्याची ती अवस्था पाहून आम्हाला काहीच सुचत नव्हतं.मेंदु पूर्ण ब्लॅंक झाला होता.रक्त पाहून आणखी एक मित्राला भोवळ आली आणि तो बाजूला आडवा झाला.

आम्ही कसंबसं एकमेकांना सावरलं.त्याला प्यायला पाणी देऊन जखम धुवून काढली.हा तोच मित्र होता जो रात्री माझ्यानंतर जागा होता!!!!!! आम्ही सगळे 2-3 तास तिथेच बसून होतो.शेवटी आम्ही गड उतार व्हायचं ठरवलं.पायथ्याचं गावी पोहचेपर्यंत सगळे शांत च होतो.विषण्ण मनाने आम्ही मुंबईत परतलो.

हा मित्र काही नवखा ट्रेकर नव्हता की गडचढाई केल्याने दमून खाली पडला.१०-१२ वर्षांचा ट्रेकिंग चा अनुभव शिवाय लहानपण गावातल्या दऱ्या खोऱ्यात गेलेलं.त्याला त्या आधी कधीच फीट आली नव्हती आणि त्या घटनेनंतर आज पर्यंत ही नाही आली.रिपोर्ट्स काढले तेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त होता.फक्त दातांची ट्रीटमेंट कारावी लागली.

मला आजवर राहून राहून वाटतंय की माझ्यावरचं संकट त्याच्यावर तर ओढवलं नाही ना. किंवा मी जसा रात्री घाबरलो होतो तसा अनुभव त्याला आला होता का. कारण तो एक वाक्य नेहमी बोलत होता “मी जेव्हा जागा होतो ना तेव्हा कुठून तरी डमरू वाजवल्याचा आवाज येत होता”

Leave a Reply