ओव्हरटाइम करून निघाल्यामुळे घरी यायला खूपच उशीर झाला.. रात्रीचा एक वाजत आला होता. येताना दुरूनच माझ्या गाडीची लाईट घराच्या भिंतीवर पडली. साधारण पडणाऱ्या प्रकाशामध्ये दिसले कि घराच्या छातीवरती कोणी तरी उभं आहे.. कसली तरी काळी सावली.. छतावरून थेट मला येताना पाहत होती. भास होता कि आणखी काही हे माहित नाही पण तिथं कोणी तरी उभं असल्यासारखे जाणवले एवढे मात्र नक्की. मी जस-जसा घराजवळ येऊ लागलो तशी ती सावली हळू हळू मागे सरकत दिसेनाशी झाली.. मनात अगदी धस्स झालं.. माझे हात थंड पडू लागले आणि गाडीवरून माझ्या हाताची पकड सैल होताना मला जाणवू लागली..

मी घराजवळ येऊन थांबलो.. जे काही पाहिलं त्यावरून मनात वेगवेगळे विचार येत होते. लाईट्स बंद असल्यामुळे सगळी कडे अंधार होता.. माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरे कोणीच राहत नव्हते.. फक्त माझ्या शेजारी राहणार रोहित अधून मधून माझ्या घरी येत असे.. त्याला बोलवावे असे वाटले पण आता तो ही गाढ झोपला असणार.. मी गाडी तशीच चालू ठेवली आणि कधी नव्हे ते माझ्याच घराकडे संशयी आणि भीतीच्या नजरेने पाहू लागलो.. सतत वाटत होत कि घरात कोणी तरी शिरलं आहे पण घरात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.. ते भयाण वातावरण कुठल्या हि एकट्या माणसाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेस होत..

मी गाडी बंद करून हळू हळू घराच्या दरवाज्याकडे जाऊ लागलो.. काही दिसेना म्हणून मी फोन ची टॉर्च चालू केली.. त्याच उजेडात कुलूप चमकले.. मी तसाच खिशात हात घालून चावी काढून कुलुपाला लावली.. कुलूप उघडले पण त्या अंधारात दरवाजा ढकलून आत जाण्याची हिम्मत होत नव्हती.. शेवटी कशी बशी हिम्मत करून दार आत ढकलले.. टॉर्च फिरवली पण आत कोणी दिसत नव्हतं.. हुश्श.. नको तो विचार करतो मी म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला आणि वळलो तोच मला किचनच्या माळ्यावर दोन डोळे चमकताना दिसले… माझ्या छातीत ते पाहून धस्स झालं मी नीट निरखल तर तिथं मला एक काळीकुट्ट केसांची जाडजूड मांजर बसलेली दिसली.. 

ती एक टक माझ्याकडे बघत होती.. मी पुरता घाबरलो होतो.. कसे बसे त्या मांजरीला हाकलले.. तिने हि आपले पंजे उचलून जायची नक्कल केली पण काही पावले चालल्यावर पुन्हा थांबली.. आणि अचानक एका ठिकाणी थांबून गुरगुरू लागली.. तिचे घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात पाहून गुरगुरणे अगदी भयंकर वाटत होते जसे तिला काही तरी दिसत होते.. मी मांजरीकडे दुर्लक्ष करत मागे फिरलो आणि समोर बघतो तर दरवाजा पूर्णपणे आपोआप उघडला गेला होता.. मला चांगलेच लक्षात होते कि आत आल्यावर मी दरवाजा बंद केला होता.. कदाचित वाऱ्यामुळे उघडला गेला असेल असा विचार करून मी पुन्हा तो पूर्णपणे नीट बंद केला.. खूप भूक लागली होती.. बॅगेतून खायला आणलेले पार्सल मी उघडले आणि पटापट खाऊ लागलो.. मला जाणवले कि माझ्या मागे असलेल्या कपाटावर कोणी तरी बसले आहे.. तोच एक आवाज आला.. आणि कपाटावर बसलेल्या मांजरीने मी खात असलेल्या पार्सल वर झपकन उडी घेतली.. मी ते चुकवले आणि मांजर खाली पडून पुन्हा उभी राहून माझ्या कडे एक टक बघू लागली.. शेवटी मी तिला एका कागदावर थोडं खायला काढून दिल.. 

जेवून झालं आणि मी हिम्मत करून छतावर जायचे ठरवले.. छतावर जाऊन पहिले तर काहीच दिसले नाही शेवटी वाटले कि मला नक्की भास झाला असणार.. मी पुन्हा खाली आलो.. झोप तर खूप येत होती पण ती लागणार कशी.. सतत त्या सावली चा विचार मनात येत होता.. फोन ची टॉर्च चालूच होती.. सहज समोर असलेल्या बंद टीव्ही कडे लक्ष गेलं.. टीव्ही च्या काचेत दिसणाऱ्या माझ्या पुसटश्या प्रतिबिंबामागे तीच सावली उभी होती.. 

ओरडायचा प्रयत्न केला पण तोंडून शब्द फुटेना.. सर्वांगात जणू विजेचा झटका बसल्यासारखे मी उठलो आणि सरळ दरवाज्याच्या दिशेने थेट धावत सुटलो.. आतून लावलेली कडी तर मी उघडली होती पण दार उघडायचे नाव घेत नव्हते.. शेवटी जिथे पळता येईल तिथून धावत मी बेडरूम मध्ये जाऊन सरळ कपाटात घुसून लपलो.. दरवाजा बंद करून तोंड दाबून पायांचा मुटका करून बसलो..

मला आता सगळ्या गोष्टी उमगत होत्या.. रात्री झोपल्यावर मला नेहमी वाटायचे बाजूला कोणी तरी झोपले आहे.. कधी वाटायचे कि कोणी तरी मला सतत बघत आहे.. मध्यरात्री अचानक जाग आल्यावर तो कानाजवळ येणार श्वास.. इतके दिवस भास समजून दुर्लक्ष करणारा मी.. आज सगळ्या गोष्टींचा उलगडा होत होता कारण मी या घरात कधीच एकटा नव्हतो.. आणि कदाचित त्याला मी आज नकोस झालोय.. वेळेचे भान नव्हते.. कपाटात बंद असल्यामुळे मी घामाने ओला चिंब झालो होतो.. भीती पोटी मला रडू कोसळत होत पण मी जमेल तितके स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.. अचानक माझ्या कानावर आवाज पडला “अर्रे राजा कुठे लपून बसला आहेस तू?” आणि पुन्हा भयाण शांतता.. हा आवाज अगदी माझ्या कानात कोणी तरी पुटपुटल्या सारखा होता.. तोच श्वास मला पुन्हा माझ्या कानाजवळ जाणवू लागला.. तो आवाज माझ्या अंगावर सरसरून एक न एक केस उभं करत होत..

इतक्यात त्या मांजरीने जोरात चित्कार केला.. तिच्या चित्काराने धडधड करत माझ्या काळजाला चीर गेली आतमध्ये एक कळ उठली व माझं डोकं थेट मागच्या कपाटाच्या लाकडी भागावर आदळल.. हळू हळू मला ग्लानी येऊ लागली.. आणि मी तिथेच बेशुद्ध झालो.. काही तास उलटले असतील अचानक बाहेरच्या दरवाज्यावर थापा पडू लागल्या.. मी तो आवाज ऐकून शुद्धीत आलो.. कपाटातून बाहेर निघायचा प्रयत्न करू लागलो पण डोक्याला लागलेल्या जबरदस्त मारामुळे मला उठता येत नव्हते.. तितक्यात कोणी तरी बाहेरचे दार उघडले आणि मी कानोसा घेऊ लागलो.. बाहेर रोहित आला होता.. त्याचे बोल कानावर पडले.. “अरे तन्मय आहेस कुठे तू..?? दुपारचे २ वाजत आले.. तुझी बाईक बाहेर पाहून मला वाटले तू घरी असशील..” 

पुढच्या क्षणी त्याच्या प्रश्नाला माझ्या आवाजात उत्तर मिळाले “अरे तब्येत बारी नव्हती म्हणून घरीच थांबलो मी”…… पण मी तर आत बंदिस्त झालेलो मग बाहेरचा माझ्या आवाजात बोलणारा… 

Leave a Reply