गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वी ची आहे जेव्हा मी दहावी इयत्तेत शिकत होते. बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. माझे बाबा अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यामुळे दिवस रात्र अभ्यासाच्या मागे लागलेले असायचे. मला अगदी नीट आठवतंय, त्या दिवशी सोमवार होता आणि अमावस्याही होती. कारण आमच्याकडे अमावस्येच्या दिवशी राखणदाराला नारळ द्यायची पद्धत आहे. आम्ही मध्यमवर्गीय आहोत आणि त्या काळी मुंबईत चाळीत रहायचो. दोन खोल्यांचे घर होते चाळीत. आतल्या खोलीत देवघर आणि टीव्ही. तर बाहेरच्या खोलीत स्वयंपाक घर.. त्या काळी जास्त चॅनल्स नव्हती. फक्त एकच नॅशनल चॅनल. त्यावर सुराग नावाची मालिका रात्री १० वाजता लागायची. माझ्या घरचे ती मालिका आवर्जून पाहायचे. मला सुद्धा सवय झाली होती म्हणून सांगून सुद्धा तिथून मी हलत नव्हते. शेवटी ती मालिका सुरू झाल्यावर बाबा ओरडले आणि मला बाहेरच्या खोलीत जायला सांगितले. मला वाईट वाटले पण त्यांचे ही बरोबर होते. बोर्डाची परीक्षा असल्यामुळे मला अभ्यास करायला पाहिजे हे मला कळले. मी आतल्या खोलीचा दरवाजा बंद करून बाहेरच्या खोलीत आले आणि रडत बसले. आई घरात नव्हती. बहुतेक शेजारी कोणाकडे गेली होती. 

लहान भाऊ आणि बहीण सुद्धा शेजारी टिव्ही पाहायला गेले होते. तेव्हा आमच्याकडे सगळे चॅनल असलेली केबल नव्हती. त्यामुळे फक्त एकच नॅशनल टेलिव्हिजन चे चॅनल लागायचे. मी पाय जवळ घेऊन, मांडीत डोक घालून रडत बसलेले. तितक्यात एक आवाज कानावर पडला.. श.. श.. मी पटकन वर बघितले. तर समोर एक काळा, धिप्पाड माणूस उभा होता. त्याने पांढऱ्या रंगाची बनियन घातली होती आणि लुंगी नेसली होती. डोळे अतिशय भडक जाणवत होते कारण तो खूप रागाने नजर रोखून माझ्याकडे पाहत होता. त्या माणसाला मी या पूर्वी आमच्या इथे कधीच पाहिले नव्हते. मी त्याला बघून खूप घाबरले. ओरडावे तर आई घरात नव्हती. मी तशीच बसून त्याच्याकडे पाहत होते. काय करावे काही सुचत नव्हते. मग मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं आणि परत हळूच मान खाली घालून डोळे बंद करून बसून राहिले. काही वेळ उलटला. कसलीही चाहूल जाणवत नव्हती. तो माणूस आहे की गेला हे ही कळायला मार्ग नव्हता. थोड्या वेळाने आई ची हाक ऐकू आली तेव्हा डोळे उघडले. आईला पाहून झटकन तिच्या जवळ जाऊन मिठी मारली आणि रडू लागले. तिला सर्व काही सांगितले पण ती म्हणाली की तुला भास झाला असेल. पण मला माहित होत की तो माझा भास नव्हता. 

मी उठून बाहेर जाऊन पाहिले, चाळीच्या परिसरात ही तो माणूस कुठे दिसतोय का ते पाहिले पण तो कुठेच दिसला नाही. हा प्रसंग साधा वाटत असला तरी तो साधा नव्हता. कारण आई ला घरात कसली तरी चाहूल जाणवायची. दुपारी दाराची साखळी वाजायची पण बाहेर कोणी नसायचे. कधी स्वयंपाक घरातून भांडी वाजल्याचा आवाज यायचा पण आत कोणीही नसायचे. आमची चाळ होण्या आधी तिथे रेतीची वखार होती. त्या मालकाने वखारीचा मागचा हिस्सा आम्हाला विकला होता. आणि नंतर काही दिवसांनी वखार सुद्धा एका मिठाई वाल्याला विकून ते तडका फडकी तिथून निघून गेलेले. तिथे काय होते ते माहीत नाही पण त्या घरात समाधान नव्हते. सारखे वाद व्हायचे. नंतर आम्ही डेव्हलपमेंट च्या कारणामुळे घर बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. 

Leave a Reply