लेखिका – प्रियांका निकम
मी आई बाबांची लाडकी लेक. एकुलती एक. लहान आहे, पण सर्व जाणून आहे. खास करून वयाच्या ६ व्या वर्षी आई बाबांना फसवायच कसं.. म्हणजे मामा कस बनवायच! खूप खोड्या काढते मी त्यांच्या. दोघेही साधे, लगेच ऐकतात. तळहाता च्या फोडासारखं जपतात. हवा तो हट्ट मान्य करतात. हव ते बोलणं मान्य करतात. खेळत असताना मुद्दाम पडायच नाटक करते, मग दोघेही येतात धावत, उगी उगी करत. कुठे लागल आमच्या बाळाला, दुखत तर नाही ना, म्हणत. मला काही झालेल नाही आणि मी त्यांना फसवलं हे कळताच त्यांचा झालेला चेहरा पाहायची मज्जा वेगळीच वाटते. काही ना काही युक्त्या शोधत असते त्यांना फसवायला आणि मग त्यांचे कासावीस झालेले चेहरे पाहायला. पण गेले काही दिवस सारख्या सारख्या त्याच खोड्या करून कंटाळा आला आहे. आज काहीतरी नवीन खोडं सुचायला पाहिजे, असा माझा विचार आहे. दिवसभर विचार करत बसले होते पण आता कुठे जाऊन सुचलं!.. आज रात्री मजा येणार हा विचार करून मी पुन्हा खेळण्यात रमले. रात्र झाली, आणि आई बाबांनी माझ्या खूप साऱ्या पाप्या घेऊन माझ्या खोलीत झोपवलं. पण नवीन खोडी करायच्या आतुरतेने मला झोप काही येईना. आई बाबा केव्हाच झोपी गेले. पण माझे लक्ष खोलीतल्या घड्याळाकडे होते. माझ्या मनात जे चालले होते ते फक्त मलाच माहीत होते. रात्री २ च्या ठोक्याला मी जोर जोरात रडायला सुरुवात केली. पहिल्या क्षणाला धावून येणारे आई बाबा अजून आले नाहीत, हे पाहून अस वाटलं आपलीच तर नाही ना फजिती होणार?.. पण मी काही सहज हार मानणारी नव्हते.
गाढ झोपले असतील, त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद असेल, कदाचित आवाज जात नसेल म्हणून मी आणखी जोरात रडू लागले. आणि माझा आवाज त्यांच्या पर्यंत गेला. यावेळी मात्र दोघेही धावत आले. काय झालं? का रडतेयस बाळा ? आई पोटतिडकीने विचारू लागली. मी सुद्धा तिला रडतच उत्तर दिल “आई पलंगा खाली कोणीतरी आहे..” माझे असे बोलणे ऐकून आई आणि बाबा दोघांचे हि चेहरे पांढरे पडले, जणू त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. माझे बोलणे ऐकल्यावर क्षणाचाही विलंब न करता बाबांनी लगेच पलंगा खाली पहिले, आई ने खिडक्या दरवाजे तपासले. पुन्हा पुन्हा सर्व बंद आहे याची खात्री केली. बाबांनी सुद्धा पलंगाखाली कोण नाही याची बऱ्याच वेळा खात्री केली. कोणीच नव्हतं. कस असेल?.. आई बाबा गोंधळात पडले, तसं मला हसू आवरेना. पण माझ्या खोट्या आसवांच्या मागे मी हसत होते. मनात विचार करू लागले किती साधे माझे आई बाबा. माझ सगळं मान्य करतात. मी बोलेन त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात.. ते मात्र शोधा शोध करण्यात, काही दिसतंय का ते पाहण्यात गुंतले होते. त्यांनी पुन्हा सगळं नीट तपासलं आणि माझी समजूत काढून झोपायला गेले. खर त्यांना मला एकटीला सोडून जायचे नव्हते पण मी माझ्या खोलीत एकटेच झोपायचा हट्ट करायचे त्यामुळे त्यांचा नाईलाज व्हायचा. जाताना त्यांच्या आणि माझ्या खोलीचा दरवाजा उघडाच ठेवला. माझ्या मनासारखे झाले होते. हि खोडी सर्वात जास्त आवडली. म्हणून मनाशी पक्के केले आता जो पर्यंत नवीन काही सापडत नाही तो पर्यंत हीच युक्ती वापरून दोघांची मजा घ्यायची.
रोज रात्री मी हेच करू लागले. रात्री मुद्दामून जागायचे आणि बरोबर २ वाजले की रडायला सुरुवात करायचे. त्यांना बोलवायचे. ते गाढ झोपेतून उठून येत, घाबरून संपूर्ण खोली चेक करत. पण हाती काहीच लागत नसे. लागणार तरी कसे कारण ते माझे फक्त एक नाटक असायचे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटायचं की एकदाही त्यांनी कधी तक्रार केली नाही. उलट खोलीत कोण लपलं आहे हे शोधायचे प्रयत्न कमी केले नाहीत. काही दिवस असेच गेले. मला त्यांनी एकदाही उलट प्रश्न केला नाही की कारण विचारले नाही. त्यामुळे ना माझे वागणे बदलले होते ना त्यांचे. त्या रात्री ही मी पुन्हा तसेच नाटक केले. खोलीची झडती घेत असताना मी त्या दोघांकडे पाहत होते. त्या रात्री ते खूपच अस्वस्थ वाटत होते. म्हणून की काय पण त्यांचे चेहरे पाहून मला हसू आवरले नाही आणि माझा संयम सुटला. मी जोरात हसू लागले. त्यावर ते दोघे ही माझ्याकडे पाहू लागले की ही अशी अचानक का हसतेय. आता मात्र मला त्यांना खरं काय ते सांगावेसे वाटले. मी त्यांना समजावत म्हणाले ” मी तुमची थट्टा केली आई बाबा, इथे कोणी नाही, ना पलंग खाली ना माझ्या खोलीत.. इतके दिवस मी तुम्हाला फसवत होते, तुमची मजा घेत होते..” माझा बोलणं ऐकताच आई बाबांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माझे हसणे सुरूच होते. हसता हसताच मी त्यांना त्यांना विचारले ” आई बाबा मला एक सांगा, तुम्ही दर दिवशी कसे फसता? तुमचा एवढा कसा विश्वास आहे हो माझ्या बोलण्यावर?..” माझे प्रश्न ऐकताच त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले.
त्यांच्याकडे बघून वाटले की बहुतेक त्यांना काही तरी सांगायचे आहे पण ते सांगायचे की नाही या आविर्भावात ते आहेत. बराच वेळ खोलीत शांतता पसरली. मी काही बोलले नाही उलट त्यांच्या बोलण्याची वाट पाहत बसले. बराच विचार केल्या नंतर आई माझ्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, “बाळा तुला माहित आहे ना तुला एक दादा होता? तू आमच्या आयुष्यात येण्या आधीच तो गेला.”
हो, माहित होत हे मला.. ” मी माझे हसणे थांबवत म्हणाले. आई बाबांनी मला त्याच्या बद्दल सांगितले होते. पण अचानक आई ने दादा बद्दल का विचारले हे मात्र मला कळले नाही. मी तिला काही विचारणार तितक्यात तिला ला एकदम रडू कोसळले. मला कसं तरीच झाले. ” आई तू का रडतेस..” मी तिला प्रश्न केला पण ती काही बोलली नाही. बाबा आमच्या बाजूला येऊन बसले आणि तिला धीर देत मला म्हणाले, ” बाळा, तो याच खोलीत झोपायचा. त्याच्या शेवटच्या दिवसात असाच रात्री अपरात्री जागा व्हायचा, आई बाबा पलंगा खाली कोणी तरी आहे बोलायचा. आम्ही सुद्धा नियमित झडती घ्यायचो खोली ची, फक्त एकादाच आम्ही त्याच ऐकलं नाही.. आम्हाला वाटलं की नेहमी सारखे आमची मस्करी करत असेल.. पण.. आता वाटते कि ऐकायला हव होत.. त्याच ऐकलं असत, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर आज तो आपल्या सोबत असता..” बाबांच्या डोळ्यात पाणी तराळल. पण त्यांनी जे मला सांगितले ते ऐकून मी निशब्द झाले. मला माझी चूक कळली होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. आणि त्या रात्री नंतर मी खोडी केली नाही.