हा अनुभव मला अगदी काही महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये आला होता. तसे मी भूत वैगरे अश्या काही गोष्टी अजिबात मानत नव्हतो पण त्या दिवशी माझ्या सोबत जे काही झालं त्या प्रसंगामुळे माझं या  विषयावरचं मत पूर्णपणे बदलून गेलं. मी कोल्हापूर चा आहे आणि सध्या तिथल्याच एका कॉलेज मध्ये शिकतोय. मला बाहेर फिरायची खूप आवड आहे त्यामुळे मी कोल्हापुरात सतत फिरत असतो. त्या दिवशी ही असेच एका कामा निमित्त मी बाहेर गेलो होतो. सकाळी काम आटोपले आणि दुपारी घरी यायला निघालो. दुपारचे १२ वाजले होते. कडक उन असल्यामुळेत्या रस्त्यावर कोणीही नव्हते. तो रस्ता ही तसा वेगळाच आहे.

मी आपल्या धुंदीत च मस्त गाणी ऐकत चाललो होतो. तितक्यात अचानक एक म्हातारी बाई रस्त्याकडे ला उभी दिसली. जणू एखाद्या पूतळ्यासारखी उभी समोर पाहत होती, कसलीच हालचाल करत नव्हती. मी तिच्याकडे लक्ष न देता पुढे निघून गेलो. तुरळक रहदारी असणाऱ्या त्या रस्त्यावर त्या दिवशी कोणीही नव्हते. त्यामुळे मला जरा वेगळेच वाटत होते. मी पुढे निघून गेलो आणि ३-४ मिनिटानंतर ती म्हातारी बाई मला पुन्हा दिसली. या वेळेस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी दिसली. मला वाटले की असेल कोणी बाई. मी दुचाकी वर असल्यामुळे जास्त विचार न करता पुढे गेलो. आता पर्यंत मला काहीच वेगळे वाटले नव्हते.

पण जसे मी एका वळणावर आलो ती म्हातारी बाई मला रस्त्याच्या मधोमध उभी दिसली. आता मात्र मी दचकलो आणि विचारात पडलो की हा काय प्रकार आहे. तितक्यात माझी गाडी बंद पडली आणि हळु हळू वेग कमी होत तिच्या अगदी समोर येऊन थांबली. आधीच मला काही सुचत नव्हते आणि त्यात गाडी बंद पडली होती. मी खूप प्रयत्न करू लागलो पण गाडी काही सुरू होत नव्हती. गाडीवरून उतरून मी किक मारू लागलो पण प्रयत्नांना यश मिळत नव्हतं.

पण तितक्यात वातावरणात बदल होत असलेला जाणवू लागला. डोक्यावर तळपणारा सूर्य, कडक ऊन असं सगळं असूनही एक थंडगार वारा अंगाला स्पर्शून गेला. आणि एक जीवघेणी शांतता पसरली. मला जाणवले मी माझे हात पाय जागेवरून हलत नाहीयेत. मी बाजूला वळून पाहिले तशी माझी वाचाच बंद झाली. कारण ती म्हातारी बाई माझ्या जवळ अगदी काही पावलांवर येऊन उभी होती. तिची भेदक नजर माझ्या वरच रोखली होती. इतक्या जवळ असल्यामुळे मी तिला निरखून पाहू लागलो. हातात कोयता, डोक्यावरून पदर घेतला होता आणि हळु हळू माझ्या दिशेने सरकत येत होती.

मी पळायचा प्रयत्न केला पण पळणे दूर मला साधे पाऊल ही उचलता येत नव्हते. हृदयाची धड धड कमालीची वाढली होती. माझ्यासोबत काय घडतंय हे मला कळत नव्हत पण एक गोष्ट मात्र नक्की होती की आज माझे काही खरे नाही. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेऊ लागलो. तरीही ती म्हातारी बाई मात्र माझ्या जवळ येतच होती. जस जशी ती जवळ येऊ लागली तसे एक विभत्स हास्य कानावर पडू लागलं. ते ऐकून जणू अंगातला त्राण च संपला. बघता बघता तिने माझ्या खांद्यावर हता ठेवला आणि पुढच्या क्षणी एक वेदनेने भरलेली कर्ण कर्कश किंचाळी देत डोळ्यांदेखत अदृश्य झाली.

इतक्या वेळेपासून जखडलेले पाय अचानक मोकळे झाल्यासारखे वाटले. मी पुन्हा एकदा गाडी सुरू करायचा प्रयत्न केला आणि काय नशीब माझ. गाडी पटकन सुरू ही झाली. मी लगेच घरी आलो. सगळा प्रकार सांगितला तसे घरच्यांनी देवाचा अंगारा लाऊन मला काही वेळ देवघरात च बसवले. घडलेला सगळा प्रकार मला काहीच समजत नव्हता. त्याच विचारात मला झोप लागली. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. फ्रेश होण्यासाठी मी बेसीन जवळ गेलो आणि आरश्यात लक्ष गेलं. 

माझ्या गळ्यात असलेल्या हनुमानाच्या लॉकेट वर नजर पडली आणि मला सगळ्या गोष्टींची प्रचिती आली. ती माझ्या अंगाला हात लावल्यावर वेदनेने का किंचाळली आणि नाहीशी झाली. आणि का मला काहीच इजा पोहोचवू शकली नाही. म्हणतात ना वाईट शक्ती असतील तर त्या वाईट शक्तींवर मात करण्यासाठी चांगल्या शक्ती ही अस्तित्वात आहेत. त्या दिवशी मला देवावर श्रध्दा असण्याची खरी ताकद कळली. आज त्या प्रसंगाला काही महिने उलटले असले तरीही हा प्रसंग आठवला तरीही भीतीने अंगावर काटा येतो..

Leave a Reply