अनुभव – अभिजित शिंदे
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी जवळच्या एका गावात माझे घर आहे. दिवाळी संपली होती आणि मी मित्रांसोबत कोकणात जाण्याचा बेत आखला होता. खूप दिवसांनी बाहेर जाणार होतो त्यामुळे खूप भारी वाटत होत. आम्ही एकूण ५ जण होतो. निघालो त्या दिवशी नेमके आमच्या फोर व्हीलर चे टाय र पंक्चर झाले. त्यामुळे आम्ही खूप उशिरा रूम वर पोहोचलो. आमच्या पैकी २ जणांना दारू प्यायची खूप सवय होती. त्यामुळे ते कोणाचेही न ऐकता समुद्र किनाऱ्यावर जाऊन दारू प्यायले. तिथे जाण्यासाठी आम्ही रिसॉर्ट वरून दोन बाईक घेतल्या होत्या.
साधारण १० च्या सुमारास आम्ही रूम बर परत आलो आणि जेवण वैगरे केलं. आमच्या एका मित्राने इतकी घेतली होती की नशेत तो मोबाईल आणि कार ची चावी बीच वरच विसरून आला होता. आणि सगळ्यात मूर्ख पणाची गोष्ट म्हणजे त्याने मला ही गोष्ट रात्री १ ला सांगितली. बाकीचे मित्र झोपून गेल्यामुळे आम्ही दोघं मोबाईल आणि चावी शोधायला बाहेर पडलो. मध्यरात्र उलटून गेल्या मुळे सर्वत्र काळोख आणि भयाण शांतता पसरली होती. समुद्र किनाऱ्यापासून ते रिसॉर्ट जवळपास ३ किलोमिटर लांब होत. माझा मित्र म्हणाला की आपण चालत जाऊ. मी त्याला हो म्हणालो कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
बाईक इतक्या रात्री नेणं बरे वाटत नव्हते आणि आमची फोर व्हीलर असूनही काही उपयोग नव्हता. कारण तिचीच चावी शोधायला आम्ही बाहेर पडलो होतो. साधारण एक किलोमीटर चालून झाल्यावर आम्हाला एक लिंबाचे झाड लागले. तिथून जात असताना वेगळेच वाटू लागले. मला वाटले की समुद्र जवळ असल्यामुळे तसे वाटत असावे. रस्ता अगदी लहान असल्यामुळे एवढ्या रात्री तिथे कोणीही दिसत नव्हते. बऱ्याच वेळेच्या पाय पिटी नंतर आम्ही एकदाचे त्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. आम्ही जिथे बसलो होत त्या ठिकाणी आलो आणि चावी आणि मोबाईल शोधू लागलो.
दोन्ही गोष्टी सापडल्या तर खऱ्या पण नियतीने पुढ्यात काही भलतच वाढून ठेवलं होत. आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. जाताना रस्त्यात त्या लिंबाच्या झाडाखाली लक्ष गेलं आणि जाणवलं की तिथे एक मोठी काळी बाहुली, लिंबू ज्याला कुंकू लावले होते, टाचण्या टोचल्या होत्या, एका पिशवी मध्ये मांस आणि भात रस्त्याच्या अगदी मधोमध ठेवलं होत. ते दृश्य पाहून भीती पेक्षा जास्त कुतूहल वाटलं. कारण येताना कोणीही नव्हत मग गेल्या ५ मिनिटात हे अचानक कोण ठेऊन गेलं. कारण ती वाट तशी सरळ होती. आणि कोणी तरी आल्याची किंवा जाताना ची चाहूल लागायला हवी होती.
मी त्याकडे दुर्लक्ष करून बाजूने जाऊ लागलो पण नशेत असलेल्या माझ्या मित्राने ती पिशवी आणि बाहुली उचलून हातात धरली. मी त्याला म्हणालो की काय फालतुगिरी करतोय, खाली टाक ते आणि चल इथून. असं म्हणत मी त्याच्या हातावर एक फटका मारला आणि त्याचा हात धरून पुढे निघालो. जशी मी दोन पाऊल टाकली तसे मागे एक अनामिक चाहूल जाणवली. आणि त्याच बरोबर पावलांचा आवाज. मी झटकन मागे वळून पाहिले पण मागे कोणीही नव्हते.
आता मात्र माझ्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली. मित्राने दारूच्या नशेत जे केले हे चांगलेच अंगाशी येणार आणि कदाचित जीवावर बेतणार असे वाटू लागले. मी त्याला काहीच बोललो नाही. समुद्राला खेटून च ती वाट असल्यामुळे दोन्ही बाजूंनी गार्ड झाडी होती. आम्ही जस जसे पुढे जाऊ लागलो तसे पावलांचा आवाज वाढत जाऊ लागला.
हे सगळे बघून मित्राची नशा जागीच उतरली कारण आमच्या मागे कोणीही नव्हत पण प्रत्येक पावलाला असं जाणवत होत की आमच्या दोघा व्यतिरिक्त आणखी कोणी तरी आहे. आम्ही त्या भागातून थोडे बाहेर येऊन एका मोठ्या दगडावर बसलो. कारण भीतीने घाम फुटला होता आणि झपझप चालत आल्यामुळे आम्ही दमून गेलो होतो. बाजूला च एक स्ट्रीट लाईट होता. तितक्यात मागून एक विचित्र आवाज येऊ लागला. जस कोणी तरी गुरगुरत आहे. माझे काळीज भीतीने धड धडू लागले होते. मी हिम्मत करून मागे वळून पाहिले आणि माझी वाचाच बंद झाली. मला माहित नव्हत ते काय होत.
एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखे आपल्या चार पायांवर उभं होत. संपूर्ण शरीरातून धुता सारखा वायू बाहेर पडत होता. संपूर्ण केसाळ.. चेहरा नीट दिसत नसला तरी सुद्धा तोंडातून लाळेसारखा चिकट पदार्थ खाली जमिनीवर पडत होता. जणू एखाद नर पिशाच्च.. मला वाटले की आम्ही मटणाची पिशवी उचलल्यामुळे ते जे काही होत ते आमच्या मागे आले होते. पण आम्ही ती पिशवी तिथेच टाकून दिली होती आणि आता देण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हत. मी मित्राला खुणावले, त्याचा हात धरला आणि एका झटक्यात उठून आम्ही रिसॉर्ट च्या दिशेने धाव घेतली. ते जे काही होत ते आमच्या मागावर होत आणि धावत येत होत.
आम्ही दोघं ही जिवाच्या आकांताने पळत कसे बसे रिसॉर्ट मध्ये आलो. आणि मित्रांना हाका मारून उठवले. आमच्या ओरडण्याने तिथले इतर लोक ही जागे झाले. आम्ही मित्रांना सगळ काही सांगितले तेव्हा त्या रिसॉर्ट चे मालक म्हणाले की त्या भागात एका व्यक्ती ने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हा पासून हे सगळे घडायला सुरुवात झाली. तिथे रोज रात्री उतारा ठेवला जातो.. आम्हाला कळून चुकले होते की आम्ही एका अतृप्त आत्म्याच्या उतऱ्याला हात लावला होता ज्यावर फक्त त्याचा हक्क होता. या प्रकारानंतर मात्र आम्ही रात्री अपरात्री फिरणेच बंद केले.