अनुभव – कुणाल वारके

अनुभव २०१७ च आहे जो मला आणि माझ्या प्रांजल नावाच्या मित्राला आला होता. तेव्हा आम्ही दोघं ही १२ वी ला कॉलेज मध्ये शिकत होतो. आम्ही बालपणी पासूनचे मित्र आहोत आणि आजूनही सोबत आहोत. आम्ही एक रूम करून राहायचो आणि १२ चा अभ्यास करण्यासाठी आम्ही स्टडी लायब्ररी लावली होती. ती लायब्ररी आमच्या रूम पासून चालत अर्ध्या तासावर होती. तसे तिथे जायला रुमच्या मागच्या बाजूने एक पायवाट होती पण तो रस्ता काही कारणाने बंद केला होता. कॉलेज संपले होते आणि परीक्षा जवळ आली होती. लायब्ररी लाऊन महिना झाला होता आणि आमचे दिवसाचे वेळापत्रक ही ठरले होते.

सकाळी ५ ला उठायचे, लायब्ररी मध्ये जायचे आणि मग तिकडेच दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करून रात्री ११ पर्यंत घरी यायचे. पण काही आठवड्यांनी आमच्या कॉलेज मध्ये सराव परीक्षा चे वेळा पत्रक आले त्यामुळे आम्ही पहाटे च जायचे ठरवले. लायब्ररी च्या मालकाला विनंती केली आणि ते तयार झाले. त्यांनी आम्हाला एक चावी देऊन ठेवली होती त्यामुळे आम्हाला अगदी कधीही लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करता येईल. आम्ही ठरवले की रात्री जेवण करून लवकर झोपायचे आणि मग दीड ला उठून लायब्ररी मध्ये जायचे.

म्हणजे त्या वेळी इतर कोणी नसेल आणि आम्हाला शांत वातावरणात मन लाऊन अभ्यास करता येईल. त्या पहिल्या रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही आठ साडे आठ ला जेवण आटोपले, दीड चा अलार्म लाऊन आम्ही झोपून गेलो. दिनक्रमात एरव्ही पेक्षा बदल झाल्यामुळे अलार्म वाजल्यावर उठायला थोडा त्रास झाला. पण तरीही आम्ही उठून फ्रेश झालो आणि साधारण १५ मिनिटांनी रूम बाहेर पडलो. पावणे दोन झाले होते. आणि इतक्या रात्री रस्त्यावर चालताना वेगळेच वाटत होते..

संपूर्ण परिसर अगदी शांत होता. ना वाहनांचा आवाज ना लोकांचा. या आधी मी इतक्या रात्री त्या भागात कधीही बाहेर फिरलो नव्हतो त्यामुळे मला ती शांतता हवी हवी शी वाटत होती. तितक्यात माझा मित्र प्रांजल म्हणाला की आज आपण मागच्या शॉर्टकट ने जाऊ. आता इतक्या रात्री तिथे कोणीही नसेल आपल्याला हटकायला. मजा येईल आणि आपण लवकर पोहोचू. आम्ही आमची पावले त्या वाटेने वळवली. काही पावलं त्या वाटेवर चालल्या वर जाणवले की तिथे कोणीही फिरकत नसावे.

कारण वाटेच्या दुतर्फा गार्ड झाडी वाढली होती. आणि त्या झाडीतून फक्त रात किड्यांचा कर्कश आवाज तेवढाच काय तो कानावर पडत होता. आम्ही मात्र कसलाच विचार न करता चालत जात होतो. तितक्यात कुठून तरी २-३ कुत्रे धावत आले आणि आमच्या कडे पाहून जोर जोरात भुंकू लागले. खर तर त्यांनी आम्हाला घेरले होते. जरा विचित्र वाटलं कारण कुत्रे असे कारण नसताना भुंकत नाहीत. पण नंतर वाटले की आम्ही या भागात नवीन आलो आहोत हे समजून भुंकत असावेत म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही दोघं सोबतच चालत राहिलो पण ते कुत्रे त्याच भागात भुंकत राहिले म्हणून माझ्या मित्राने मागे वळून पाहिले.

तर त्याला एक वृद्ध इसम उभा दिसला. तेव्हा कळले की ते कुत्रे आमच्यावर नाही तर आमच्या मागे असणाऱ्या त्या वृध्द इसमावर भुंकत होते. पण तितक्यात एक विचित्र गोष्ट घडली. जसे माझ्या मित्राने मागे वळून पाहिले तसे ते कुत्रे भुंकायचे थांबून एका विचित्र आवाजात रडू लागले. प्रांजल पटकन म्हणाला ” कुणाल पटकन चल इथून.. ” बहुतेक त्याला पुढे घडणाऱ्या गोष्टींची चाहूल जाणवली असावी. कारण ते कुत्र्यांचे रडणे खूप विचित्र आणि तितकेच भीती दायक वाटत होते. 

पण मला मात्र काहीच वाटले नाही. मी त्याला म्हणालो ” अरे काय झाले, कुत्रे त्या वृद्ध इसमाला बघून भुंकत आहेत त्यात इतके घाबरायला काय झाले.. मी दुर्लक्ष करतो अश्या गोष्टीकडे.. तू पण कर.. ” इतके बोलून मी मागे वळलो आणि मी जे काही भयाण दृश्य पाहिले ते मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तो साधारण ऐंशितला वृध्द इसम आमच्या जवळ येऊन थांबला होता. हातात एक काठी होती, रक्ताळलेले लाल भडक डोळे जे मी या आधी कधीच पाहिले नव्हते. आणि त्याचे पाय.. त्याचे पाय मागच्या बाजूला दुमडलेले होते. मला माहित नाही तो एखादा माणूस च आहे की अजुन काही.

बघता बघता त्याने त्याच्या हातातली काठी वर केली आणि ते कुत्रे अजुन च कर्णकर्कश आवाजात रडू लागले जणू ते दयेची भिक मागत आहेत. त्याच सोबत तो आपोआप जमिनीपासून वर हवेत अर्धा फूट तरंगू लागला आणि आमच्या दिशेने येऊ लागला. हा सगळा भयानक प्रकार पाहत मी त्याच ठिकाणी उभा होतो आणि जणू शून्यात हरवून गेलो होतो. प्रांजल ने मला खांद्याला धरून जोरात मागे खेचले तसे मी झटकन भानावर आलो. त्या नंतर मात्र आम्ही जीव मुठीत धरून धावत सुटलो. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते. चालत गेल्यावर १५ मिनिटांचा तो रस्ता काही केल्या संपतच नव्हता.

आम्ही खूप वेगात धावत होतो पण जणू त्या वाटेत आम्ही अडकून पडलो होतो. या आधी मी चकवा वैगरे गोष्टी फक्त ऐकून होतो. पण त्या रात्री मला जाणवले की खरा चकवा काय असतो. आम्ही फक्त धावत होतो पण त्या वाटेतून दुसऱ्या बाजूने निघणारा मार्गच दिसत नव्हता. जवळपास तास होत आला होता पण आम्ही तिथून बाहेर पडलो नव्हतो. प्रांजल चे बोलणे ऐकून कुठे या वाटेने आलो असे झाले होते. काय करावे काय नाही काहीच सुचत नव्हते. अश्या वेळी सगळ्याच गोष्टी साथ देणं बंद करतात तसे च माझे काहीसे झाले होते. 

आम्ही धाऊन इतके दमलो होतो की आता थांबण्या शिवाय काही पर्याय नव्हता. घसा सुकून कोरडा पडला होता. धाप लागली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हते. प्रांजल ने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला की आता देवाचे नाव घेऊ आणि पुन्हा वाट सापडते य का ते पाहू. आपल्या चुकीने आपण आलोय पण आता सगळे त्या कर्त्या धर्त्याच्या हातात आहे तोच आपल्या ला वाचवू शकतो आणि यातून बाहेर काढू शकतो. त्याच्या या वाक्याने थोडे का होईना पण बळ मिळाले आणि आम्ही दोघं पुन्हा उठून धावत सुटलो. मी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणत होतो. आणि काय आश्चर्य.

आम्हाला त्या वाटेतच एक लहान हनुमानाचे मंदिर दिसले. रात्र असल्यामुळे ते बंद होते त्यामुळे आम्ही आत जाऊ शकलो नाही. पण त्या मंदिराच्या मागे उभ राहून नारळ फोडण्यासाठी एक जागा होती. आम्ही पटकन त्या ठिकाणी जाऊन वर चढलो. त्या वाटे भोवतीच्या झाडीतून अजूनही सळसळ ऐकू येत होती. अधून मधून चित्र विचित्र आवाज ऐकू यायचे पण आम्ही त्याच ठिकाणी बसून राहिलो. हळु हळु आमची भीती कमी होऊ लागली. माहीत नाही किती तास आम्ही तिथे तसेच बसून राहिलो होतो. पहाटे ५ च्या सुमारास मंदिराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे आम्ही खाली उतरून पुढच्या बाजूला गेलो.

मंदिराचा पुजारी येऊन दार उघडतं होता. तो आम्हाला पाहत म्हणाला ” तुम्ही पोर इथे काय करताय..? इतके घाबरले ले का दिसताय..? ” आम्ही त्या पुजऱ्याला सगळा भयानक प्रसंग सांगितला. त्यावर त्याने आम्हाला त्या मागचा त्याहूनही भयानक इतिहास सांगायला सुरुवात केली. बऱ्याच वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे.  लायब्ररी मागच्या झोपड पट्टी मध्ये एके काळी अचानक लहान मूल बेपत्ता होऊ लागली. बऱ्याच महिन्यांनी कळले की एक वृद्ध इसम काळी जादू करण्यासाठी त्यांचा बळी द्यायचा. जेव्हा या बद्दल तिथल्या लोकांना कळले तेव्हा त्यांनी त्याला मरे पर्यंत मारहाण केली. 

लहान मुलांचेच नाही तर तो प्रण्यांचेही बळी द्यायचा. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने याच वाटेवर त्याला गाढले होते. पण मेल्या नंतर ही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही. याच वाटेवर तो भटकत असतो. जो कोणी त्याच्या वाटेत येईल त्याला तो इजा पोहोचवतो. अमावस्येच्या रात्री त्याच्या शक्ती वाढतात आणि तो लोकांना दिसायला लागतो. ही वाट बंद करण्याचं खर कारण हेच आहे. तुमचं नशिब वाईट म्हणून तुम्ही अमावस्येच्या रात्री असे बाहेर निघाला त आणि ते ही या वाटेने आलात. त्याने आम्हाला प्रश्न विचारला ” तुम्हाला कुत्रे भूंकताना दिसले का..? ” त्यावर आम्ही होकारार्थी मान हलवली. तसे तो पुजारी म्हणाला ” तो वृध्द इसम या कुत्र्यांचे ही बळी द्यायचा.

तुम्ही जे पाहिले ते कुत्रे मेलेले होते कारण इथल्या लोकांना ही असे अनुभव आले आहेत. ते म्हणतात की त्यांचे आत्मे आपल्या सारख्या लोकांना त्या इसमापासून वाचवायला येतात. आम्ही त्याचे बोलणे ऐकून सुन्न झालो होतो. आम्ही मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडलो. तिथून रूम वर आलो पण तो भयाण प्रसंग डोक्यातून जातच नव्हता. पण तितक्यात प्रांजल ला ताप भरला. इतका की त्यांचे अंग प्रचंड तापले होते. मी वेळ न घालवता डॉक्टरांना बोलावले पण ते म्हणाले की ताप येण्याचे असे काही विशेष कारण दिसत नाही कदाचित वायरल फ्लू असेल.

मला कारण माहीत होते म्हणून मी लगेच त्याच्या वडिलांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. जवळपास २ तासानंतर त्याचे आई वडील एका माणसाला घेऊन आले जो बहुतेक बाहेरचे बघणारा होता. त्याने आल्या आल्या त्याच्या कपाळावर महादेव रक्षा लावले आणि काही मंत्र पुटपुटला. त्या नंतर प्रांजल ला शांत झोप लागली. ५-६ तासानंतर त्याला जाग आली तेव्हा त्याच्या हातात एक धागा बांधला आणि म्हणाले की आता याला काही त्रास होणार नाही. त्या नंतर मात्र आम्ही त्या वाटेने दिवस सुद्धा फिरकलो नाही. 

Leave a Reply