अनुभव – रोहित चौघुले
प्रसंग साधारण ४-५ वर्षांपूर्वीचा आहे. मी आणि माझ्या घरातल्या सगळ्या जणांनी कोकण ट्रिप चा प्लॅन केला होता. माझ्या घरचे ४ जण आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या प्रीती काकू आणि त्यांचे मिस्टर असे सगळ्यांनी फिरायला जायचे नक्की केले. आमच्या कडे मोठी कार होती. संध्याकाळी ६ ला निघणार होतो म्हणजे रात्री प्रवासाचा त्रास होणार नाही. वातावरण ही दुपार पेक्षा थंड असेल असा विचार केला. मीच ड्राईव्ह करत होतो. अगदी तशी ८० ते ९० च्या वेगात असेल. गाडीत मंद आवाजात गाणे सुरू होते. इतर सगळे गप्पा मारण्यात गुंग झाले होते पण मी मात्र गाणे ऐकत मस्त ड्राईव्ह करत होतो. आम्हाला निघून जवळपास ४ तास होत आले. एव्हाना १० वाजून गेले होते त्यामुळे सगळे म्हणाले की एखादे हॉटेल बघून गाडी थांबव.
त्यावर मी म्हणालो की हो बघतो एखादे चांगले हॉटेल. तसे ही मला सुद्धा भूक लागली होती. गाडी चा वेग थोडा कमी केला आणि गाडी रस्त्याकडे ला घेतली. काही वेळातच एक हॉटेल नजरेस पडले जे रस्त्याच्या थोड आतल्या बाजूला होत. मी आजू बाजूला पाहिलं तर वस्ती दिसत नव्हती. पण आधीच उशीर झाल्याने आणि भूक लागल्याने मी जास्त विचार न करता त्या हॉटेल समोरच्या भागात गाडी पार्क केली. आम्ही सगळे उतरून आत गेलो. हॉटेल तस जून वाटत होत. कौलारू.. आत जाऊन बसलो तसे अधून मधून थंड वाऱ्याची झुळूक आत येत होती. मी वेटर ला हाक दिली तसे तो पटकन धावत आला.
आम्ही सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली. तितक्यात मी म्हणालो की जेवण येई पर्यंत मी जरा वॉश रूम ला जाऊन फ्रेश होऊन येतो. वॉश रूम हॉटेल च्या मागच्या बाजूला थोडे लांब होते जे मी त्या वेटर लाच विचारले. मी त्या दिशेने चालत गेलो. जाताना गाणं गुणगुणत जात होतो. तितक्यात मला वाटल की माझ्या मागून कोणी तर चालत येत य. मला वाटले असेल कोणी तरी हॉटेल मध्ये आलेले म्हणून मी दुर्लक्ष केलं. मी तसाच वॉश रूम मध्ये गेलो आणि मला जाणवले की कसला तरी आवाज येतोय. कोणाच्या रडण्याचा. लहान मुलगी होती की बाई काही कळायला मार्ग नव्हता पण कोणी तरी हुंदके देत रडत होत. मला जरा आश्चर्य वाटलं. मी जास्त वेळ न घालवता पटकन फ्रेश होऊन बाहेर आलो.
पण तितक्यात मला जाणवलं की माझ्या मागे कोणी तरी उभ आहे. मला थोडी का होईना भीती वाटली कारण त्या भागात दुसर कोणी येताना दिसले नव्हते. तितक्यात माझ्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवल्यासारखे वाटले आणि मी झटकन मागे वळून पाहिले. आणि मी जे काही पहिले ते उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्या अंधारात कोणी तरी उभ होत. मला च पाहत होत. एक मानव सदृश धुरकट आकृती. जिला हात पाय असून नसल्या सारखे वाटत होते. पण त्या अंधारात ही डोळे एखाद्या प्रखर दिव्या सारखे चमकत होते. ते जे काही होत ते हळु हळू माझ्या दिशेने पुढे सरकू लागले. मी तिथून पळायचा प्रयत्न केला पण माझी पावलं जणू जखडून गेली आहेत असे वाटू लागले. तितक्यात मला माझ्या नावाने हाक ऐकू आली आणि मी भानावर आलो.
माझ्या घरच्यांपैकी कोणी तरी मला हाक दिली होती. मी धावतच पुन्हा हॉटेल मध्ये टेबल जवळ आलो. सगळ्यांना फक्त एकच वाक्य म्हणालो ” आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून निघायला हवे, मी गाडी काढतोय पटकन चला.. ” मी तसाच धावत गाडी जवळ गेलो, गाडी रिव्हर्स घेऊन रस्त्याच्या दिशेला केली तसे सगळे पटापट गाडीत येऊन बसले. मला सगळे विचारू लागले की काय झालं अचानक. मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण मला त्या भागातून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते. मला माहित नव्हत मी काय पाहिलं होत पण तिथून थेट गाडी पुढच्या गावात थांबवली. त्या रात्री मी कोणाला काहीच सांगू शकलो नाही पण दुसऱ्या दिवशी सगळा प्रकार सांगितला. घरच्यांनी मला समजावले पण माझे मलाच माहीत की मी काय पाहिले होते. बहुतेक हा भयानक प्रसंग मला संपूर्ण आयुष्य भर लक्षात राहील. ते काय होत ते माहीत नाही पण जे काही होत ते खूप भयानक होत.