अनुभव – अभी पाटील

साधारण ६-७ वर्षांपूर्वीची घटना आहे. माझ्या वडिलांची बदली झाल्याने त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागले. मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही इतर कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो. सोसायटी तशी खूप मस्त आणि मोठी होती.  ४ बिल्डिंग आणि प्रत्येकी २ विंग. आम्ही गेल्यावर अगदी काही दिवसात ओळखी झाल्या. नवीन मित्र मैत्रिणी वैगरे सगळे काही अगदी सुरळीत चालू होते. शाळा सुरू झाली. पावसाळ्याचे दिवस होते. आमचा फ्लॅट हा मागच्या विंग मध्ये ४ थ्या मजल्यावर होता. मागच्या बाजूला खूप डेरेदार झाड होती. त्यामुळे आमच्या फ्लॅट च्या खिडकीतून मागच्या कंपाऊंड ची भिंत आणि तिथे असलेली पपई, केळी आणि नारळाची झाडं सगळ काही नीट दिसायचं. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. कधी कधी मला मागच्या बाजूला कोणी तरी सतत चालत असल्याचा आवाज यायचा. तो सुद्धा रात्री उशिरा. पैंजण घालून कोणीतरी मागे फेऱ्या मारतय असा..

आधी वाटलं की तळ मजल्यावर राहणारे कोणी रात्री शतपावली करत असतील. पण हा आवाज मध्येच वाढत जाई आणि अचानक एके क्षणी बंद होई. पावसाळा संपला, कोजागिरी पौर्णिमा झाली. माझी सहामाही परीक्षा ही संपली. मग काय.. दिवसभर मित्रांसोबत क्रिकेट आणि संध्याकाळी लपा छुपी , चोर पोलीस असे सगळे खेळ खेळणे सुरू असायचे. पण कोणताही खेळ खेळताना, सायकल चालवताना कोणीच मागच्या बाजूला जायचे नाही. खास करून संध्याकाळ झाली की लपा छूपी खेळताना मागच्या बाजूला लपायला जायचे नाही असा नियम च केला होता. एकदा असेच मित्र मैत्रिणी एकत्र बसून गोष्टी करत असताना मी सहज त्यांना सांगितले की आपण मागे का खेळायला जात नाही.. मागे कोणी जायला सांगितले नाहीये का..? पण मला कधी कधी रात्री मागच्या बाजूला कोणीतरी चालत असल्याचे जाणवते. 

आमच्यातला माझा एक मित्र गणेश माझ्याच बाजूच्या बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर राहायचा. त्याने मला जरा गंभीर स्वरात विचारले ” काय झालं पुन्हा नीट सांग मला..?” आणि सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा सगळ्यांनी मला सांगितले की आपली सोसायटी आहे तिथे आधी एक वाडी होती. बैठी घर होती. माझ्या बिल्डिंग मगच्या बाजूला टाकी आणि नळ. तिथेच लागून एका घरात गुलाब ताई नावाची बाई राहायची. नळाला लागून घर असल्याने सतत येणाऱ्या जाणाऱ्या पाणी भरायला येणाऱ्या बायांशी गप्पा, चेष्टा, भांडण, वाद हेच चालायचं च तीच. गुलाबताई ला एक सवय होती ती म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर सुस्कारा देणे. मागे तिने पपई, केळी, नारळ, पेरू यांची झाडं लावली होती. एक वेगळीच नजर असायची म्हणे तिची. सगळ्यांना अगदी ओरडून सांगायची कोणी हात लावू नका, फळं तोडू नका.

अशाच एका संध्याकाळी पाणी भरताना, मागल्या टाकीत पाय घसरून ती पडली अन् त्यातच तिचा जीव गेला. या गोष्टीला १०-१२ वर्ष झाली, काळाच्या ओघात नंतर ती टाकी वरून बंद केली गेली. वाडीच रूपांतर सोसायटी मध्ये झाला. पण तेव्हापासून रात्री उशिरा खूपदा तिथेच त्या टाकी आणि झाडी जवळ कोणी तरी पैंजण घालून सतत फेरी मारताना दिसतं. सतत पैंजणांचा आवाज ऐकू येतो. ही गोष्ट सांगून झाल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम गंभीर झाले होते. सगळे माझी थट्टा करत आहेत, मी नवीन आहे म्हणून घाबरवत आहेत असे समजून हसू लागलो. आणि हसतच म्हणालो “चल गण्या.. तुझ्या गुलाब ताई ला भेटून येऊ, मला सुद्धा बघू दे की नक्की कोण आहे”. तेव्हा गणेश घाबरतच म्हणाला,”तुला मस्करी वाटते आहे आता, मी लहानाचा मोठा झालो आहे इथेच, घर सुद्धा तळ मजल्यावर आहे आमचं, हा आवाज, ती कोणी तरी दिसत असल्याची चाहूल हे सगळ अनुभवलय अरे मी, आणि घरातल्या सगळ्यांनीच.” 

गणेश च्या या गोष्टीला सगळ्यांनीच दुजोरा दिला. वर दाखवत नसलो तरी मला सुधा या गोष्टी ऐकल्यामुळे जरा विचित्र वाटत होत. आणि तेव्हापासून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ लागलो. आता रात्री उशिरा टीव्ही बघण्याच निमित्त करून मी जागायचं ठरवलं, साधारण १२:१५-१२:३० झाले असतील आणि पुन्हा तो आवाज सुरू झाला. त्या आवाजा सोबत च माझ्या मनात धडकी भरू लागली. पण कुतूहल इतके होते की मी उठून खिडकी जवळ आलो आणि खाली निरखून पाहू लागलो. पण फक्त आवाज येत होता. कोणी तरी सतत फेरी मारत आहे असा.. वातावरण एकदम शांत होत. आणि त्यात भयाण शांततेत तो आवाज. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो तसे मला सुस्कारा सोडण्याचा सुद्धा आवाज येऊ लागला.

बराच वेळ मी ऐकत राहिलो. १०-१५ मिनिट झाले असतील आणि शेवटी मी न राहवून खिडकीतून च आवाज दिला ” कोण आहे..? “.. बस्.. तो पैंजनांचा आवाज एकदम बंद झाला. बहुतेक ते जे कोणी होत ते निघून गेलं असावं. मला त्या क्षणी भीती जनवण्या पेक्षा एक वेगळीच हुरहूर वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ आवरून खाली क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा गणेश ला आदल्या रात्री चा प्रकार सांगितला. तसे त्याने पुन्हा त्याच्या परी ने समजावण्याचा प्रयत्न केला की या गोष्टीच्या वाट्याला जाऊ नकोस.. मी त्याला हो म्हणालो. दुपारी तिसऱ्या मजल्यावरच्या काकू घरी डबा द्यायला आल्या. माझे आई बाबा २ दिवसांसाठी गावी गेल्याने त्यांना डबा सांगितला होता. ते दुसऱ्या दिवशी येणार होते. त्या काकूंनी मला सांगितले की संध्याकाळी लवकर डबा घेऊन जा आम्ही रात्री गावी निघतोय.. मी होकारार्थी मान हलवली. रात्र झाली.. पुन्हा तेच होणार का..? की काल आपण आवाज दिलाय तर आज कोणी येणार नाही..? राहून राहून हाच एक विचार मनात डोकावत होता. रात्री चे १२.३० वाजून गेले होते. मी टीव्ही बघण्यात गुंग होतो. तेवढ्यात लाईट गेली. 

पंखा, टिव्ही सगळ बंद झालं आणि अगदी निरव शांतता पसरली. मला पुन्हा तोच आवाज ऐकू येऊ लागला. पैंजण चा. आज मात्र मी ठरवल होत की खाली जाऊन पहायचं की हे नेमके काय प्रकरण आहे. टॉर्च घेतली, मोबाईल खिशात च होता. दार ओढून घेतलं आणि पायऱ्या उतरू लागलो. तिसऱ्या मजल्यावर आलो तर काकू दारा समोरच्या पॅसेजमध्ये झाडू मारत होत्या. मला तिथून जाताना पाहून त्या थांबल्या आणि वेगळ्याच आवाजात म्हणाल्या ” कशाला उगाच बाधा आणतोय..? ” त्यांचे बोलणे ऐकून मी थांबलो आणि त्यांच्या दिशेने पाहिले कारण मला कळले नाही की त्या असे का बोलत आहेत. मी तिथून वळून पायऱ्या उतरू लागलो तसे त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या ” ऐकलस का.. म्हणती ती.. उगा आत घुसू नग..” आणि तितक्यात माझ्या अंगावर भीती ने सर्रकन काटा येऊन गेला..

आठवलं की काकू आणि त्यांचे कुटुंब तर आज गावी गेलं. माझे सर्वांग शहारले.. मी झटकन त्या ३-४ पायऱ्या चढून वर आलो आणि त्या वरह्यांड्यात पाहिले पण तिथे कोणी ही नव्हत. विजेचा तीव्र झटका लागावा तसे मी शहारलो आणि तसाच वर घराच्या दिशेने धावत सुटलो. घराचा दरवाजा उघडून आत आलो, सगळी दारे खिडक्या बंद केल्या. एकटाच होतो म्हणून संपूर्ण रात्र गादीवर डोळे मिटून निपचित पडून राहिलो. दारा बाहेर सतत पैंजणां चा आवाज येत होता, सुस्कारा सोडण्याचा आवाज येत होता. मनात देवाचा धावा करू लागलो. साधारण तासाभराने सगळे शांत झाले. पण मी मात्र संपूर्ण रात्र जागून च काढली.. सकाळी उठून काकूंना फोन केला तेव्हा समजल की काल रात्री ९ वाजताच सगळी फॅमिली गावी निघाली होती. झालेला एकूण प्रकार माझ्यासाठी खूपच अनाकलनीय होता, काल रात्री मला दिसलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसुन गुलाब ताई होती……….

दुपारी मित्रांना घरी बोलवून घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा मात्र गणेश ने सांगायला सुरुवात केली. असा अनुभव सोसायटी मध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या अनेकांना आलाय, लहान असताना आमचाच मित्र सागर तिथे लपायला गेला होता, तेव्हा त्याला सुद्धा असाच अनुभव आला होता. सागर ला ही ती दिसली होती.  माझे आई बाबा गावाहून परत आले, तेव्हा जीवात जीव आला. या प्रसंगानंतर मात्र यापुढे अशा गोष्टी थट्टा मस्करीत घायच्या नाहीत असा कानाला खडाच लावला.

Leave a Reply