लेखिका – नेहा जाधव

दारावरची बेल वाजली. रात्रीचे दहा वाजले होते. पल्लवीने दार उघडले. समोर कामावरून थकून आलेला विलास उभा होता. पल्लवीच्या मनात वेगळचं चक्रव्यूह चालू होतं. ते तिला विलासला सांगायचं होतं पण तो थकलेला आहे हे समजून ती काही बोलली नाही. पल्लवी ” विलास तू फ्रेश होऊन ये, मी ताट वाढते तुला”. विलास ” ठीक आहे ” म्हणून तो फ्रेश होण्यासाठी गेला. तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि पल्लवीने त्याला जेवण वाढले. जेवताना त्याने पल्लवीकडे एक कटाक्ष टाकला. ती आपल्याच विश्वात रमून गेली होती. त्यातही ती थोडी दुःखीच वाटत होती. विलासने तिला विचारलं “पल्लवी, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का ?”. तशी पल्लवी बोलली “काही नाही, तू जेव “. पल्लवी अजूनही शांतच होती, ती वाटच बघत होती की विलासचं कधी जेवून होतंय मगच ती त्याला सांगणार होती. विलासचं जेवण करून झालं. तशी पल्लवी बोलू लागली ” विलास, सॉरी पण मगाशी तू निवांत जेवत होतास म्हणून नाही सांगितलं, पण आता सांगतेय”. विलास ” काय सांगायचं आहे? सांग”. पल्लवी ” ते……” पल्लवी बोलणार इतक्यात त्या दोघांना निरवच्या रडण्याचा आवाज आला.

ते दोघेही तडक त्या खोलीत गेले. निरवच्या बाजूला गारगी होती आणि तिच्या हातात काठी होती. निरव रडत रडतच पल्लवीला सांगू लागला ” आई, दीदी मला मारतेय. मी काही नाही केलय तिला. मी तर शांत झोपलो होतो”. आणि तो अजूनच रडायला लागला. तशी पल्लवी गारगीला म्हणाली ” काय झालंय तुला गारगी, त्याला का मारतेय?”. यावर गारगी बोलली ” त्याने माझी पर्कची कॅडबरी घेतलीय, त्याला ती द्यायला सांग “. पल्लवी ” कुठली कॅडबरी? तो तर झोपला होता ना”. गारगी ” नाही, त्याच्याकडेच आहे, निरवकडेच आहे” ती जोर जोराने बोलू लागली. तिचा आवाज ऐकून मेघाही जागी झाली आणि त्या खोलीत आली. मेघा” काय झालं मॅडम, मी झोपले होते, आवाज आला इथून म्हणून लगेच इथे आले. तशी पल्लवी बोलली ” काही नाही झालं, जा तू झोप. या भावंडांची भांडणं चालू आहेत रात्रीची. अगाव झाली आहेत कार्टी .” असं बोलून पल्लवीने दोघांनाही धपाटे घालून झोपवलं. थोड्या वेळात दोघेही झोपले. पल्लवी त्याच खोलीत राहून विलासशी बोलू लागली ” विलास आज शाळेत गारगीने फार तमाशा करून सोडला” विलास “का? काय केलं तिने असं?”. पल्लवी “ती कारण नसताना श्रेयाला मारत होती. बोलत होती की तुला सोडणार नाही. आधी कार्तिकला सोड वैगरे .” विलास ” पण श्रेया तर तिची बेस्ट फ्रेंड आहे ना आणि हा कार्तिक कोण आहे?”.

पल्लवी ” तेच तर तिच्या वर्गात कार्तिक नावाचा कोणी मुलगाच नाही आहे”. विलास “आणि ती कार्तिक म्हणून नसणाऱ्या मुलासाठी श्रेयाला मारत होती?”. पल्लवी ” हो ना, तेच तर कळत नाही आहे. आता निरवलाही तिने मारलं ते पण नसलेल्या कॅडबरीसाठी, आधी क्वचितच असं केलं असेल तिने पण हल्ली तिचं हे विचित्र वागणं वाढलंय”. विलास ” तू जास्त विचार करू नको. ती लहान आहे अजून, आठ वर्षांची आहे फक्त. थोडी अगाव पण आहे, पण हळू हळू वागेल नीट.” असं बोलून विलासने तिची समजूत काढली.

दुसरा दिवस उजाडला. रविवार होता. पल्लवी ब्रेकफास्टची तयारी करत होती. त्यातही तिला कालचेच आठवत होते. तिने काहीतरी विचार केला आणि विलासला बोलावलं ” विलास, एक काम कर निरव आणि गारगीसाठी पर्क आण. काल खूप मारलं ना मी त्यांना, मलाच वाईट वाटतंय आणि तसं ही त्यामुळेच गारगी काल हट्टाला पेटली होती ना. विलास ” ओके, पण हो मी गारगीला ताकीद देणार आहे की असं वागणार असशील तर नाही मिळणार पर्क.” पल्लवी ” हो नक्की बोल तिला.” थोड्याच वेळात विलासने दोघांसाठी पर्क आणली. पण निरव घरी न्हवता. तो सोहम, जो त्यांच्या बाजूला राहायचा तिथे खेळायला गेला होता. विलासने त्याची पर्क फ्रिजमध्ये ठेवली आणि गारगीला पर्क देत म्हणाला” गारगी, हे घे तुला पाहिजे होती ना पर्क, आईने आणायला सांगितली, काल खूप मारलं ना तुम्हाला तिने, आता तिलाच वाईट वाटतंय. पण तुही या पुढे असं निरव आणि श्रेयाला मारायचं नाही आणि एवढा हट्टही करायचा नाही. यावर गारगी चिडतचं बोलली ” काय बाबा, डेअरी मिल्क आणायची होती ना, मला तीच आवडते पर्क नाही आवडत मला आणि मी कधी मारलं श्रेया आणि निरवला?”.

तिचं हे वाक्य ऐकून विलास गोंधळात पडला. विलास ” गारगी, पण काल रात्री तुलाच पर्क हवी होती ना? आणि तू काल काय केलं हे तुला आठवत पण नाही आहे आता.” गारगी ” काय केलं मी? पण मला ही कॅडबरी नोकोय. हे ऐकून विलास आणि पल्लवी दोघांनाही हा प्रकार वेगळा असल्याचं जाणवलं. ते पुढे काहीच बोलले नाहीत. काही वेळात दारावरची बेल वाजली. मेघाने दार उघडले, पल्लवीच्या मावशी आल्या होत्या.

पल्लवी ” मावशी तू, ये ना किती दिवसांनी भेटतोय आपण.” मावशी ” हो ना, आज सुट्टी होती ना म्हटलं बघून यावं तुम्हाला”. पल्लवी ” बरं केलं”. मावशी बिस्कीटचा पुडा गारगीला देत म्हणाल्या ” गारगी, हे घे”. पण गारगी त्यांच्याकडेच एकटक पाहत होती आणि प्रतिसादही देत न्हवती. त्या पुन्हा म्हणाल्या ” गारगी, ये इथे बघ मी काय आणलंय”. पण तरीही ती स्तबदच. शेवटी मावशी तिच्याजवळ गेल्या आणि तिच्या हातात बिस्कीटचा पुडा देऊ केला. त्या म्हणाल्या ” तुला बोलवत होती ना मी, का नाही आलीस तू?”. तशी गारगी म्हणाली ” मला कुठे बोलावलं? माझं नाव तर रेहा आहे ना”. हे ऐकून मावशी फार गोंधळात पडल्या. पल्लवी त्यांना म्हणाली ” मावशी ते राहूदे. आपण किचनमध्ये जाऊन बोलू. त्या दोघीही किचनमध्ये गेल्या. पल्लवी बोलू लागली ” मावशी हे असंच चाललं आहे तिचं. माहीत नाही का अशी वागतेय.” मावशी ” गारगी एवढी पण खोडकर नाही आहे, मला तर वेगळाच संशय येतोय.” पल्लवी ” कसला?”. मावशी ” कदाचित तिला कोणी झपाटलं असेल, असंच वाटतंय”. पल्लवी ” मला पण असंच वाटतंय आता, काय करू आता मी ?”. मावशी ” घाबरू नोको, माझ्याकडे एका मांत्रिकाचा पत्ता आहे तिथे जाऊन बघ एकदा काय होतं का ते”.

पल्लवी हे ऐकून कोड्यात पडली. मावशीचा मानपान झाला आणि थोडी जुजबी चौकशी ही झाली. त्या थोड्या वेळाने आपल्या घरी गेल्या. पल्लवीने मावशीचा सल्ला विलासला सांगितला. पल्लवी ” काय करायचं मग? जाऊया का तिथे, पत्ता दिलाय मावशीने मला”. विलास ” माझा यावर विश्वास न्हवता पण आता असं वाटतंय की खरंच असंच आहे”. पल्लवी ” हो ना, ती जशी वागतेय त्या वरून तरी हेच सिद्ध होतंय”. विलास ” जाऊ आपण उद्या, पण तेही गारगीसाठी पहिलं आणि शेवटचं”.

इथे गारगी एकटीच आपल्या खोलीत होती. आरश्यासमोर उभी होती आणि बडबडत होती. ” निरव खेळत असेल त्या सोहमबरोबर , तो मुलगा आहे ना, त्यांचं त्यांचं जमतं. मी कुठे मुलगा आहे?”. असं बोलून तिने आपले केस असेच वरती बांधले आणि बोलू लागली ” अरे मी तर मुलगाच आहे”. त्याच क्षणी तिने बांधलेले केस परत खाली आले आणि ती परत आरश्यासमोर राहून बडबडू लागली ” मी मुलगा आहे ना, मग एवढे केस कशाला पाहिजे.” तिने लगेच ड्रॉवर मधून कात्री काढली आणि झपाझप आपले केस कापले. आरश्यात बघून एक स्मितहास्य देत म्हणाली ” आता कसं! मी मुलगा आहे ना, एवढे लांब केस कशाला हवे मग”. थोडा वेळ गेला. मेघा गारगीच्या खोलीत गेली, आवराआवर करण्यासाठी.

ती गारगीचा अवतार बघून मोठ्याने किंचाळली. तसे पल्लवी आणि विलास त्या खोलीत आले. त्यांना आता हे सगळं बघवत न्हवतं. पल्लवीने गारगीचे केस नीट केले आणि ते तिघेही त्या मांत्रिकाकडे जायला निघाले. बिल्डिंगच्या खालती आले आणि तिथे त्यांना डॉक्टर प्रभू भेटल्या. गारगीची ती अवस्था बघून म्हणाल्या ” पल्लवी, गारगीने केसाची नवीन हेरस्टाईल केली वाटतं.” तशी गारगी म्हणाली ” हेरस्टाईल कुठे? मी तर मुलगा आहे ना मग, मुलांचे केस असेच असतात ना”. हे ऐकून डॉक्टर प्रभूंना काहीतरी संशय आला. त्यांनी पल्लवीला विचारले ” तुम्ही तिला कुठे घेऊन जात आहात?”. पल्लवी बोलणार इतक्यात गारगी बोलली ” ते काहीतरी मांत्रिक बोलतायत. पण मांत्रिक म्हणजे काय हे मला माहित नाही”. गारगी बोलली आणि डॉक्टर प्रभूंसमोर पल्लवी आणि विलास निशब्द झाले. डॉक्टर प्रभू ” पल्लवी, विलास तुम्ही सुशिक्षित आहात ना तरीही असे वागता. तुम्ही गारगीला माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन या. मी तर म्हणते आताच चला. पल्लवी ” हो डॉक्टर, चला”.

ते चौघेही क्लिनिकमध्ये आले. डॉक्टर प्रभू चांगल्या सायक्यातरिस्ट होत्या. त्या गारगीला घेऊन क्लिनिकच्या एका खोलीत गेल्या. वीस मिनिटांनी बाहेर आल्या. पण गारगी खोलीतच होती.

डॉक्टर प्रभू ” काळजी करू नका, गारगी त्या खोलीतच आहे आणि तिथे माझी असिस्टंट आहे. पल्लवी, विलास तुम्ही गारगीला घेऊन मांत्रिकाकडे जाणार होता ना?”. तशी पल्लवी बोलली ” सॉरी डॉक्टर, पण तिचं वागणं बघून आम्हाला हा एकचं पर्याय सुचला”. डॉक्टर ” पल्लवी, मांत्रिकाकडे जाऊन काही होणार नाही, गारगीला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे “. विलास ” मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे ?” डॉक्टर ” सांगते ऐका, मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ज्याला दिसअसोशीएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर ही म्हणतात हा एक मानसिक आजार आहे. एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळी माणसे वावरू लागतात. अर्थात ती माणसे त्या व्यक्तीनेच आपल्या विचारातून घडवलेली असतात. तिच्यातही तशी आहेत. त्यांना अलटर म्हणतात. तिचे असे 6 अलटर आहेत. रेहा, कार्तिक, चार्ली, मिनी जी मांजर आहे, पार्वती आणि आता तो नवीन मुलगा. ह्या आजारात तिचं शरीर ड्राइवर नसून पॅसेंजर आहे. तिला स्वतःचा असा वेळ खूप कमी मिळतो. ती 24 तास गारगी नसतेच मुळात.

पल्लवी ” पण हे कसं शक्य आहे? तिला हा आजार कसा झाला?”. डॉक्टर ” हा आजार, जेव्हा लहानपणी त्या व्यक्तीला प्रचंड त्रास झाला असेल तेव्हाच होतो.” तुम्ही थोडा वेळ थांबा मी येतेच गारगीला घेऊन. 10 मिनिटांनी डॉक्टर गारगीला घेऊन बाहेर आल्या. डॉक्टर ” मी गारगीला हिपनोताइज्ड केलं होतं. तिने मला सांगितलं की लहानपणी तुमच्याकडे जी बाई कामाला होती, तिने तिला खूप त्रास दिला होता. मानसिक आणि शारीरिक दोन्ही. तुम्ही दोघे ऑफिसमध्ये आणि घरी गारगी आणि ती बाई, मग काय ती त्यामुळे डाव साधायची आणि गारगीला त्रास द्यायची. ती तिच्या जखमांवर मलमपट्टी करायची आणि सगळं निस्तरायची. तुम्ही घरी आलात की तिच्याशी चांगली वागायची . तिने धमकी दिली होती गारगीला. तीच भित्ती तिच्या मनात उतरली. पल्लवी ” हो ती रंजना, तिला आम्ही एकदा घरी चोरी करताना पकडलं आणि कामावरून काढून टाकलं.” डॉक्टर ” हो तीच, गारगीही तिचचं नाव घेत होती, तिच्यामुळेच गारगीला हा आजार झाला आहे”. विलास ” मग डॉक्टर यावर उपाय?”. डॉक्टर ” काळजी करू नका, थेरपी आहेत जसं की इमदीआर , डीबीटी आणि अजून आहेत आणि हो तिला खूप सारं प्रेम द्या, वेळ द्या, थोडा वेळ लागेल पण होईल ठीक हळूहळू. मी तिची पूर्ण ट्रीटमेंट करीन.” सगळे प्रोसिजर पूर्ण करून ते तिघेही घरी निघाले. विलास पल्लवीला बोलला “आपण गारगीच्या आजाराला अंधश्रदेचं नाव देत होतो . या पुढे आपण असा विचारचं नाही करायचा”. पल्लवी ” हो, मी पण तेच बोलणार होती आणि आपण गारगीची पूर्ण काळजी घेऊ. तिच्या सगळ्या अल्टरना सांभाळू”.

Leave a Reply