लेखक – प्रथम शहा
दुपारचे 2 वाजले होते. श्रुती व तिची आई स्टोर रुम ची साफ सफाई करत होते. स्टोर रुम अत्यंत धुळकट व विविध पद्धतींच्या सामानांनी भरली होती. श्रुती देखील त्या कामामध्ये आईला हातभार लावत होती. तिला असे मदत करताना पाहून आईला थोड समाधान वाटत होत. तितक्यातचं श्रुती ने एक मोडक्या टेबलचा कप्पा उघडला व तिला तेथे एक लाकडी चौकोनी पेटी दिसली. कुतूहल म्हणून तिने ती पेटी बाहेर काढली आणि आपल्या जवळच्या फडक्याने त्यावरून एक हात फिरवला. बऱ्याच वर्षांपासून त्यावर साचलेली धूळ स्वच्छ झाली तसे त्यावर ठळक व टपोर्या अक्षरात ‘ SPIRIT BOARD ‘ असे लिहिलेले दिसले. तिला ते काहीसे कळाले नाही. कारण तिने कधीच ऐकले नव्हते. तशीच तो बोर्ड हातात घेऊन एकटक पाहत राहिली. शेवटी न राहवून तिने त्या बोर्डबद्दल आपल्या आईला विचारले “आई.. हे काय आहे ग..?”. आई ने तिच्याकडे पाहताच जोरात ओरडली ” ठेव ते तिकडे.. पुन्हा त्या पेटीला हात नाही लावायचा आणि बास झाली मदत, वर तुझ्या खोलीत जा.. कॉलेज च्या नोट्स पुर्ण करायच्या आहेत ना, त्या कर जाऊन “. आईचे असे चिडलेले रूप पाहून तिने तो बोर्ड पुन्हा आत सरकवला आणि गप गुमान उठून आपल्या खोलीत चालत निघून गेली. पण आता मात्र तिच्या मनात बरेच कुतूहल निर्माण झाले होते. एवढी मदत करत होते पण तरीही अचानक आई का ओरडली असेल इतकी. नक्की काय आहे त्या बोर्ड मध्ये..
तिने पटकन आपला कम्प्युटर चालू केला आणि इंटरनेट वर सर्च करून पाहू लागली. अवघ्या काही मिनिटांत तिला सगळी माहिती मिळाली. वेगवेगळ्या संकेत स्थळांवर या बद्दल ची माहिती तिने पटापट वाचून काढली. हा काही साधा सुधा बोर्ड नव्हता तर एक स्पिरीट बोर्ड होता ज्या द्वारे अमानवीय शक्तींशी, आत्म्याशी संवाद साधता येतो. त्या बोर्ड बरोबरचं ‘प्लॅनचेट’ नामक एक वस्तु असते. ते प्लॅनचेट एका त्रिकोणी लाकडासारखे असुन मध्यभागी त्याला एक मोठे छिद्र असते. आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती अमानवीय शक्ती याच प्लॅनचेटच्या सहाय्याने देते. अशी तिची बरीचशी माहिती वाचून झाली. ती त्या सर्व गोष्टींवर मनातल्या मनात हसु लागली व एकदातरी आपण त्या बोर्डचा वापर करायचा असे तिने ठरवले. पण हे कुतूहल तिला किती महागात पडणार होते याची पुसटशी कल्पना ही तिला नव्हती. दुसऱ्या दिवशी ती कॉलेज ला गेली. पोहोचल्यावर लगेच मैत्रिणींना त्या स्पिरीट बोर्ड विषयी सांगितले. तिचे बोलणे ऐकून एक चांगलाच हशा पिकला. तिची रेश्मा नावाची मैत्रीण म्हणाली ” अगं! हे सगळं इंग्लिश सिनेमा मध्ये होतं , खऱ्या आयुष्यात नाही ”
” श्रुती , तू असा कसा विश्वास ठेवलास गं या सगळ्यांवर ?” रियाने प्रश्न केला.
” नाही गं , माझा ही विश्वास नाही ह्यावर. ह्या सर्व गोष्टी खोट्या असतात, म्हणून तर मी ठरवलंय एकदा तरी त्या बोर्डचा प्रयोग करून नक्की पहायचा ” श्रुती म्हणाली.
” बरं , तसं असेल तर आम्हालाही सांग. आम्हाला पण आवडेल त्या बोर्डचा वापर करायला. बघुयात ना कि आपल्या बोलावण्याने एखादी आत्मा खरोखरचं येते कि आपल्यालाचं भिऊन पळून जाते. ” रिया येवढे बोलताचं सर्व मैत्रिणी एकमेकींना टाळ्या देत हसू लागल्या.
तेवढ्यात श्रुतीने सर्वांचे हसणे थांबवले व जरा गंभीर होत म्हणाली, ” बरं ऐका, जवळपास १० दिवसांनी माझ्या मावशीच्या मुलीचे लग्न आहे त्यामुळेे माझे आई बाबा त्या कार्यक्रमाला नक्की जातील. त्याच दिवशी आपण हा खेळ खेळुया. ” सर्व मैत्रिणींनी श्रुतीच्या बोलण्यावर होकार दर्शावला. बघता बघता १० दिवस उलटले. श्रुती चे आई वडील निघायच्या तयारीत होते आणि त्यांना उशीर झाला होता.
” अगं श्रुती, तु पण चल ना आमच्यासोबत का नको म्हणतीयेस ?” श्रुतीच्या आईने श्रुतीला विचारले.
” नको आई , एकतर एवढा लांबचा कंटाळवाणा प्रवास आणि हे लग्न समारंभ वगैरे मला आवडत नाहीत, तुम्हीच जा ” जरा वैतागतचं श्रुती म्हणाली.
” बरं, आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत परत येतोचं, काळजी घे ” असे म्हणत श्रुतीचे आई बाबा गाडीत बसून कार्यक्रमाला निघाले.
श्रुतीने घराचे दार लावले व पटापट जीना चढत ती वर तिच्या खोलीत आली. खोलीत येताचं तिने फोन करून आपल्या मैत्रिणींना तिच्या घरी यायला सांगितले. साधारण तासाभरात तिच्या मैत्रिणी म्हणजे रेश्मा आणि रिया घरी आल्या. जवळपास 11 वाजले होते. श्रुती खूप खुश होती कारण तिला काही तरी थ्री ल करण्याची खूप इच्छा होती आणि आज तिच्या मनासारखे वागता येणार होते. तिने जमिनीवर चटई अंथरली व धावतचं स्टोर रुम मध्ये आली. त्या टेबलचा कप्पा उघडला व त्यातून ती चौकोनी पेटी बाहेर काढली. ती पेटी घेऊन धावतचं बाहेर हाॅल मध्ये आली. मैत्रिणी कुतूहलाने तिच्याकडे पाहत होत्या. त्या पेटीतून तिने ‘SPIRIT BOARD’ व प्लॅनचेट बाहेर काढले. तो बोर्ड मुळातचं फार भयावह भासत होता. त्या बोर्डवर YES , NO असे इंग्रजी शब्द लिहिले होते. त्या व्यतिरिक्त ‘ A to Z’ ही इंग्रजी मुळाक्षरे व ‘ 0 ते 9 ‘ असे अनुक्रमे आकडे लिहिले होते. तिनही मैत्रिणी त्या बोर्डच्या अवती भवती बसल्या. “तयार आहात ” श्रुती ने विचारले. तश्या मैत्रिणींनी होकारार्थी माना डोलवल्या.
” आमच्या घराजवळच्या हायवेवर अनेक जणांनी भुताटकी अनुभवली आहे. आपण त्याच आत्म्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुयात.” श्रुती म्हणाली.
माहिती मिळवल्या प्रमाणे तिने त्या बोर्ड भोवती ३ मेणबत्या लावल्या व खोलीतले दिवे बंद केले. खोलीत सर्वत्र अंधार पसरला, फक्त मेणबत्त्या चा मंद प्रकाश, तो बोर्ड आणि त्या तिघीच्या सावल्या तेव्हढ्याच काय त्या दिसत होत्या. सर्व मैत्रिणींनी त्या प्लॅनचेटवर आपले एक बोट ठेवले व ते प्लॅनचेट त्या बोर्डवर ठेवले. थोडीशी का होईना पण मनात भीती घर करू लागली होती पण त्याहून जास्त होते ते कुतूहल. तेच कुतूहल पुढे काय पाहायला लावणार होते यापासून त्या अनभिज्ञ होत्या. तोच श्रुतीने जोरात प्रश्न विचारला , ” आम्ही या घरा जवळच्या हायवेला दिसणाऱ्या आत्म्याला इथे बोलावू इच्छितो.. आमची इच्छा आहे की तिने इथे यावे आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी..” सगळीकडे भयाण शांतता पसरली. कसला आवाज येतोय का, एखादी अनामिक हालचाल जाणवतेय का याचा कानोसा घेऊ लागले. श्रुतीने तोच प्रश्न पुन्हा विचारला “हे आत्मा , तु खरंच इथे आली आहेस का? ” पण काहीचं उत्तर आले नाही. सर्व मैत्रीणी आता त्या बोर्डची थट्टा करु लागल्या. तिची मैत्रीण म्हणाली “मी बोलले होते ना हे सगळे खोटे असते ग, खऱ्या आयुष्यात असे काही होत नाही. पण श्रुती मात्र इतक्यावर हार मानायला तयार नव्हती. तिने एक शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला. एव्हाना तिघांनीही त्या पलांचेट वरून बोट काढले होते. पुन्हा तिने तोच प्रश्न विचारला. आणि यावेळी जे घडले ते विचारांच्या पलीकडले होते. ते प्लॅनचेट आपोआप त्या बोर्डवर सरकू लागले व YES या शब्दावर येऊन थांबले. इतक्या वेळेपासून वाटणारी मजेने आता भीती चे रुप धारण केले होते.
त्या तिघिही चांगल्याच घाबरल्या. हा काही मस्करीचा भाग नाही हे त्यांना कळाले.. पुढे काही करणार तितक्यात एका क्षणात साऱ्या मेणबत्या आपोआप विझल्या. त्या तिघींनी आरडा ओरडा सुरू केला. श्रुती धावत गेली आणि घरातले दिवे लावू लागली पण वीज गेली होती. त्यांनी घरा बाहेर पडण्यासाठी दाराकडे धावा घेतली. पण दार काही केल्या उघडेना, जणू बाहेरून कोणीतरी घट्ट पकडून ठेवले आहे. त्या तिघीही घाबरून रडू लागल्या. तितक्यात एकदम सगळं काही शांत झालं. अगदी आपल्या श्र्वासांचा आवाज येईल इतकी भयाण शांतता. आणि त्या शांततेला भाग करत एक विचित्र हसण्याचा आवाज त्या खोलीत घूमला. आता मात्र त्या तिघी चांगल्याच अडकल्या. कारण त्या तिघी नव्हत्या तर त्या खोलीत अजुन कोणी तरी आले होते. जे दिसत नव्हते पण होते एवढे मात्र नक्की. त्या तिघी एका कोपऱ्यात एकमेकांचे हात पकडुन, घाबरून रडत होत्या.
वरच्या मजल्यावरून जिना उतरत खाली कोणीतरी येतयं असं त्यांना जाणवू लागले. घरातल्या वस्तु अचानक आपोआप हलू लागल्या. ह्या सर्व गोष्टी हे दर्शावत होत्या कि, त्या घरात एका विचित्र वाईट शक्तीने प्रवेश केला आहे. तोच एका स्त्रीचा विचित्र आवाज आला “हा खेळ तुम्ही असा अर्ध्यावर सोडू शकत नाही”.. आणि एक किळसवाणे हास्य ऐकू आले.
तितक्यात तो स्पिरीट बोर्ड झपकन सरकून त्यांच्या पुढ्यात आला आणि त्यातून अचानक रक्ताची धार लागली. ते प्लॅनचेट जलद गतीने त्या बोर्डवर इकडे तिकडे सरकू लागले. आता त्या तिघींनाही आपले मरण जवळ आले आहे असे वाटु लागले. तो हसण्याचा, बोलण्याचा आवाज कुठून येतोय ते त्यांना कळतचं नव्हते. तोच कुठूनतरी जोरदार किंचाळण्याचा आवाज देखील आला व त्या तिघिही दचकल्या. ते आवाज बहुतेक त्या अपघातांचे होते असे वाटले. किचन मधील काचेच्या वस्तु फुटू लागल्या. ” आपण काही केले नाही तर आज आपली काही खैर नाही ” असे पुटपुटत श्रुती वाऱ्याच्या वेगाने स्टोर रुम मध्ये गेली व तेथून तिने रॉकेल व आगपेटी उचलली. रेशमा आणि रिया तर चक्क घामाघुम झाल्या होत्या. श्रुती रॉकेल व आगपेटी घेऊन हॉलमध्ये आली व तिने तो रॉकेलचा कॅन त्या बोर्डवर पालथा केला व काडीपेटीची काडी ओढून त्यावर भिरकावली. त्या घरात आगीचा एकच भडका उडाला. ” वाचवा ! वाचवा! ” मदतीच्या आशेने ती अतृप्त अमानवीय शक्ती ओरडू लागली. काही क्षणात तो बोर्ड संपूर्ण जळून गेला आणि त्या सोबत घरातले ते विचित्र आवाज हळु हळू कमी होत बंद झाले. घरातले दिवे सुरू झाले. त्या तिघींनीही एकमेकींना रडतचं घट्ट मिठी मारली. कदाचित आता सारे नीट झाले होते. असे म्हणतात तो खेळ पुर्ण केल्याशिवाय ती आत्मा परत जात नसते पण काय माहिती सुदैवाने त्या दिवसापासून त्या घरात व त्या हायवेवर कसलीचं भूताटकी कोणालाचं जाणवली नाही. त्या तिघींचा जीव ही थोडक्यात वाचला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.