अनुभव – स्वानंद दिक्षित

अनुभव माझ्या आजोबांना बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. माझे आजोबा म्हणजे अगदी निडर आणि दांडगे व्यक्तिमत्त्व. त्या काळी रात्री अपरात्री प्रवास करणे त्यांच्यासाठी काही नवल नव्हते. बाजूच्या गावात काही काम निघाले की त्यांचे येणे जाणे व्हायचे आणि बहुतेक वेळी काम आटोपून निघायला रात्र व्हायची. त्या काळी दळण वळणाची साधने नव्हती. बैलगाडी किंवा सायकल ने प्रवास करावा लागत असे. एके दिवशी त्यांना शेजारच्या गावातून पुजे चे आमंत्रण आले होते. ते आपल्या सायकल वरून एकटेच संध्याकाळी पूजेला गेले. बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे त्यांना जेवून जायचा आग्रह केला म्हणून ते थांबले. नंतर जेवण वैगरे उरकून, गप्पा झाल्या आणि निघे पर्यंत बराच उशीर झाला. खर तर इतका उशीर व्हायचे काही कारण नव्हते पण त्यांच्या गोष्टी इतक्या रंगल्या की त्यांना वेळेचे भान च राहिले नाही. जवळपास ११.३० वाजले. निरोप घेऊन ते आपल्या सायकल वर घरी यायला निघाले. त्या गावातून बाहेर निघाल्यावर एक ओढा लागायचा. तिथे घडणारे भुताटकी चे प्रकार त्यांना माहीत होते. त्या रस्त्याला लागल्यावर त्यांना एक माणूस रस्त्या कडेच्या मोठ्या दगडावर बसलेला दिसला. साधारण ४०-४५ वर्षांचा वाटत होता. आजोबांनी त्याला बघून न बघितल्या सारखे केले. 

आजोबा जसे त्याला ओलांडून पुढे जाऊ लागले तसे तो अतिशय भरड्या आणि किळसवाण्या आवाजात म्हणाला “आहेस तिथेच थांब..” आजोबांना कळायला वेळ लागला नाही की हा प्रकार काही तरी विचित्र च आहे. त्यांच्याकडे देवीचा अंगारा होता. ते नेहमी तो खिशात ठेवायचे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तो अंगारा काढून त्या माणसाच्या दिशेने भिरकावला. तसे तो जागच्या जागीच थांबून कळवळू लागला कारण तो माणूस नव्हताच. आजोबा मागे वळून न बघता सायकल चा वेग वाढवू लागले. तितक्यात मागून पुन्हा एक वाक्य कानावर पडले ” तुझ्या कडच्या अंगाऱ्या मुळे वाचलास.. परत इथे दिसलास आणि माझ्या वाटेत आलास तर जिवंत सोडणार नाही..” आजोबांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. गावात पोहोचेपर्यंत ते वेगात सायकल चालवत राहिले. घरी आले आणि तसेच अंथरुणात पडले. इतके दमले होते की पडल्या पडल्या त्यांना गाढ झोप लागली. सकाळी जाग आली आणि रात्रीचा प्रसंग आठवला. त्यांनी या प्रसंगाबद्दल तेव्हा घरी कोणालाच सांगितले नाही. कारण असे बरेच त्यांच्या वाटेला येऊन गेले होते. आजोबांनी जेव्हा मला हा प्रसंग सांगितला तेव्हा मात्र माझ्या अंगावर भीतीने शहारे नक्कीच आले. 

Leave a Reply