अनुभव – इशंकित पाटील

२०१७ ची गोष्ट आहे. माझ्या लहान चुलत काका चे लग्न ठरले होते म्हणून मी, माझे आई बाबा आणि माझी बहिण असे चार जण आम्ही लग्नाला जाणार होतो. आमची कार होती आणि त्यानेच आम्ही जाणार होतो. प्रवासाचा जास्त त्रास होऊन नये म्हणून आम्ही रात्री निघायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी काका ची हळद होती. मला रस्ता तसा माहीत नव्हता पण जाताना प्रवासात घाट लागणार आहे हे माहीत होते. आम्ही थोड फार जेवण करून रात्री प्रवासाला सुरुवात केली. माझे वडील कार ड्राईव्ह करत होते. आई त्यांच्या बाजूला बसली होती. मी आणि माझी बहिण आम्ही दोघं मागे बसलो होतो. जवळपास पावणे बारा ला आम्ही घाटाच्या रस्त्याला लागलो. माझ्या बहिणीला झोप लागली होती. मी आणि आई मात्र जागे होतो. 

घाटाचे चढण अगदी वळणा वळणाचे होते. त्यात रस्त्याकडे ला स्ट्रीट लाईट ही नव्हते. त्यामुळे आमच्या कार च्याच हेड लाईट च्याच प्रकाशात च समोरचा रस्ता दिसत होता. रस्त्याच्या एका बाजूला डोंगराचा भाग तर दुसऱ्या बाजूला खोल दरी..बाबांना ड्रायव्हिंग ची सवय असल्यामुळे ते अगदी आरामात घाटातून गाडी चालवत होते. एखादे वळण आले की मलाच भीती वाटायची. अश्याच एका वळणावर रस्त्याकडे ला एका दगडावर आम्हाला एक म्हातारी बाई बसलेली दिसली. वडिलांनी गाडी चा वेग कमी केला तसे आम्हाला जाणवले की ती रडतेय. त्यांना वाटले की म्हातारी बाई आहे, कुठे जायचे असेल पण वाहन मिळत नसेल म्हणून इथे रडत बसली आहे. त्यांनी गाडी थांबवली. तसे माझी बहीण ही झोपेतून उठली. आजूबाजूच्या परिसरात काहीच दिसत नव्हते. फक्त रातकिड्यांचा किर्र करणारा आवाज कान बधीर करत होता. 

आम्ही गाडीतच बसलो होतो. आम्ही गाडी तिच्यापासून काही अंतरावर थांबवली तरीही ती डोके मांडीत घुसवून तशीच बसली होती. वडिलांनी तिला विचारले “तुम्हाला कुठे जायचे आहे का..? आता वाहन मिळणार नाही.. आमच्या गाडीत बसा आम्ही सोडतो तुम्हाला..?”. वडिलांचे बोलणे ऐकून तिने डोके वर करत आमच्याकडे पाहिले. तिला डोळे नव्हते, डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या. माझी आई वडिलांना म्हणाली “अहो.. हे काय आहे..” ती आमच्याकडे पाहत तशीच जोरजोरात रडू लागली. वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता पटकन गे अर टाकला आणि गाडी वेगात घेतली. मी घाबरत विचारले “आई कोण होती ती बाई.. तिचा चेहरा असा का दिसत होता..” आई मला म्हणाली की शांत बस आणि खिडकीतून बाहेर पाहू नकोस. ती ही खूप घाबरली होती हे मला कळायला वेळ लागला नाही. तसे ही माझी खिडकीतून बाहेर पहायची आता हिम्मत ही होत नव्हती. 

तितक्यात माझ्या बाजूच्या खिडकीवर काही तरी आपटण्याचा आवाज आला आणि नकळत माझे लक्ष तिथे गेले. ती म्हातारी आमच्या गाडी सोबत त्याच वेगात येत होती. धावत नव्हती पण फक्त तरंगत येत होती. काचेवर हात मारत होती. ते भयाण दृश्य पाहून मी त्या दरवाज्यापासून लांब सरकलो आणि डोळे बंद करून बसून राहिलो. ती बराच वेळ आमच्या गाडी सोबत होती कारण मला काचेवर मारण्याचा आवाज येत होता. काही वेळा नंतर तो आवाज बंद झाला. माझ्या वडिलांनी मध्ये कुठेच गाडी थांबवली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही कोणाला काहीच सांगितले नाही. आज पर्यंत आमच्या सोबत घडलेला प्रकार नक्की काय होता हे एक न उलगडलेलं कोडं च आहे. 

Leave a Reply