अनुभव मे २०१८ चा आहे. माझ्या लग्नाला सहा महिने झाले होते. माझ्या बायकोच्या भावाचे लग्न ठरले होते म्हणून मी माझ्या सासुरवाडी ला जाणार होतो. माझी बायको ४ दिवसांआधी च तिथे गेली. मी माझे काम आटोपून लग्नाच्या २ दिवस आधी जायचे ठरवले. मी राहायला मुंबई चा आणि माझी सासुरवाडी ही गगनबावडा कोल्हापूर. मी माझी फोर व्हीलर घेऊन जाणार होतो. त्या दिवशी सकाळी सगळी कामे आटोपून दुपारी १ च्याच सुमारास मी प्रवासाला सुरुवात केली. एकटाच असल्यामुळे मस्तपैकी कार मध्ये गाणी ऐकत चाललो होतो. पण जाताना मला कराड जवळ ट्रॅफिक लागले त्यामुळे कोल्हापूर ला जरा उशीराच पोहोचलो. त्यात lमी एक चूक केली आणि ती म्हणजे हायवे ला डिझेल भरले नाही. विचार केला को एकदा गगनबावडा रोड ला लागलो की पुढे डिझेल भरुया. पण रात्री पोहोचेपर्यंत ९ वाजले त्यामुळे तिथले पेट्रोल पंप ही बंद झाले होते. आणि नेमकी ज्याची भीती होती तेच झाले. 

माझ्या सासुरवाडी च्याच ७-८ किमी आधीच माझ्या कार मधले डिझेल संपले. आजूबाजूला कोणताही पेट्रोल पंप नव्हता. मी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि काही अंतर चालत जाऊन पाहिले. पण कुठे ही डिझेल मिळेल असे वाटत नव्हते. शेवटी मी गाडी काही अंतर ढकलत आणली आणि एका हॉटेल जवळ पार्क केली. रात्री ची वेळ असल्यामुळे रोड वर एक ही गाडी दिसत नव्हती. तरीही मी बराच वेळ वाट पाहिली एव्हाना खूप उशीर झाला होता. रात्रीचे ११ वाजले. या सगळ्यात भरीस भर म्हणून मोबाईल ची बॅटरी लो होऊन मोबाईल ही स्विच ऑफ झाला. म्हणजे घरी फोन करून कोणाला घ्यायला बोलवायची ही सोय राहिली नाही. काय करू काही सुचत नव्हते. शेवटी कार लॉक केली आणि चालत जायला निघालो. वाटले की रस्त्यात कोणी ना कोणी लिफ्ट देईलच. काही अंतर चालत गेलो असेन आणि तितक्यात एक माणूस बाईक वरून येताना दिसला. त्याला हात करून लिफ्ट मागितली. त्याने ही मला असे एकट्याला पाहून लिफ्ट दिली. 

त्याने मला गावाच्या जवळपास ४ किलोमिटर आधी सोडले कारण त्याला वळून दुसऱ्या रस्त्याने पुढे जायचे होते. मी त्याचे आभार मानले. आता पुन्हा मला एकट्याला चालत जायचे होते. वेळ पाहिली तर ११.३० वाजायला आले होते. एकटा असल्यामुळे मला जरा भीती वाटत होतीच. त्यात अनोळखी रस्ता तो ही अगदी निर्मनुष्य. बराच वेळ चालल्यानंतर मला रस्त्यावर एक वृद्ध जोडपं चालत जाताना दिसल. ते हळु हळू जात असल्याने मी काही मिनिटात त्यांच्या जवळ आलो. वयाची सत्तरी किंवा पंच्यात्तरी ओलांडली असेल. मला लक्षात आले की ते दोघे नाही त तर त्यांच्या सोबत एक लहान मुलगा ही आहे. बहुतेक त्यांचा नातू असावा. मी त्यांना गावाचा रस्ता बरोबर आहे याची खात्री करून घेतली. ते म्हणाले की आम्हीही त्याच गावात चाललो आहोत, आमच्या सोबत च चल. मला जरा बरे वाटले. शेवटी कोणाची तरी मदत मिळाली शेवटी असा विचार करून मी मनोमन सुखावलो. 

त्यांच्याशी बोलत च मी चालत होतो. पण मला एक गोष्ट वेगळीच वाटली कारण फक्त ते आजोबाच माझ्याशी बोलत होते. त्या आजी आणि तो मुलगा खाली मान घालून फक्त चालत होते. अगदी शांत पणे. आम्ही चालत एका विहिरीजवळ आलो. म्हणजे रस्त्यापासून काही पावले आत ती विहीर होती. ते तिघेही तिथे थांबले. मला ते आजोबा बोलले की तुम्ही इथून खालच्या रस्त्याने जा म्हणजे काही मिनिटात घरी पोहोचाल. मी त्यांना काही बोलणार तितक्यात ते तिघे ही एक विचित्र आवाज करू लागले. मी एकदम दचकलो आणि एका जागीच स्तब्ध झालो. बघता बघता त्या तिघांनी एका मागोमाग एक त्या विहिरी मध्ये उड्या घेतल्या. मला एक मिनिटांसाठी काही कळले च नाही की काय झाले. मी झटकन जाऊन त्या विहिरीत आत डोकावून पाहिले पण मला काही च दिसत नव्हते. पाण्याचा आवाज ही आला नाही. मी प्रचंड घाबरलो. एव्हाना मला गोष्टी कळल्या होत्या. मी दबकत उलट पावली विहिरीपासून दूर जाऊ लागलो आणि मागे वळलो. 

समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली. कारण ते तिघे पुन्हा माझ्या समोर उभे होते. ते तसेच चालत पुढे आले आणि पुन्हा एका मागोमाग विहिरीत उडी घेतली. ते भयाण दृश्य पाहून मी प्रचंड घाबरलो आणि गावाच्या दिशेने धावत सुटलो. गावात आल्यावर मी कसाबसा माझ्या सासुरवाडी च्याच घरात येऊन पोहोचलो. मला असे पळत आलेले पाहून घरातले सगळे बाहेर आले. सगळे माझ्याकडे पाहू लागले. मी मात्र काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी घरात येऊन सोफ्यावर बसलो तसे मला माझ्या बायकोने पाणी आणून दिले. पाणी पिण्यासाठी मी मान थोडी वर केली आणि समोर भिंतीवरच्या फोटो वर सणाजार गेली. ती फोटो त्याच आजी, आजोबा आणि लहान मुलाचा होता. फोटोच्या खाली लिहिले होते मृत्यू दिनांक – ६ नोव्हेंबर १९९४. ते पाहून माझ्या हातातून पाण्याचा पेला निसटला आणि मी जागीच बेशुध्द पडलो. मला थेट सकाळी जाग आली. मला सगळे विचारू लागले की काल रात्री नक्की काय झाले. 

तसे मी सगळा प्रकार सविस्तर सांगितला. तेव्हा मला पहिल्यांदा कळले की ते वृध्द जोडपं म्हणजे माझ्या बायकोचे आणि आजोबा होते आणि तो लहान मुलगा माझ्या बायकोचा चुलत भाऊ होता. १९९४ साली त्यांचा त्या विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला होता. तिघांचा असा अकस्मात मृत्यू कसा झाला त्याचे नेमके कारण मी त्यांना कधीच विचारले नाही. किंबहुना माझी हिंमतच झाली नाही. 

Leave a Reply