अनुभव – तेजस देशमुख
मी माझ्या मित्रानं सोबत कोकणात ट्रीप ला जायचं ठरवल होत. मी आणि माझे पाच मीत्र अखिलेश, कल्पेश, नीलेश, सुरेश आणि शिल्पा असे आम्ही सगळेच जण कोकणात निघालो. कल्पेश ने त्याची 6 sitter SUV आणली होती. आम्ही सकाळी 9 च्या सुमारास निघालो. काही तासांच्या प्रवासानंतर मध्ये एका ढाब्यावर थांबलो. थोडे फ्रेश झालो, जेवण उरकले आणि मग पुढच्या मार्गाला लागलो. काही वेळात अंधार पडायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही घाटाच्या रस्त्याला लागलो होतो. घाटात हवे तसे स्ट्रीट लाईट स् नव्हते. त्यामुळे गडद अंधार जाणवत होता. फक्त गाडीच्या हेड लाईट स मुळे घाटातली वळणं दिसत होती. बऱ्याच वेळानंतर कल्पेश ला एक मोठा वाडा नजरेस पडला. तसे त्याने वाड्याच्या समोर असलेल्या मोठ्या गेट जवळ गाडी थांबवायला सांगितली. तितक्यात शिल्पा म्हणाली ” काय रे.. इथे कुठे गाडी थांबवायला सांगतोय.. कोणाचा वाडा आहे का..? तुला माहितीये का..?. त्यावर तो म्हणाला “अरे वाडा बंद दिसतोय, इथे आजूबाजूला ही कोणी दिसत नाही.. चला आत जाऊन पाहू ” त्याचे असे विचित्र बोलणे ऐकून आम्ही त्याच्यावर चिडतच म्हणालो “काहीही काय बोलतोय.. कोणाचा वाडा आहे माहीत नाही, हा परिसर आपल्याला अनोळखी आहे, कोणाच्याही वाड्यात कसे जाणार..?”. पण तो काही ऐकायला तयार नव्हता.
तसे आमच्यातला एक जण म्हणाला “अरे जाऊन तर बघू कोण केअर टेकर आहे का ते..” मी त्या वाड्याकडे एक नजर फिरवली. तो वाडा खूपच जुना वाटत होता. आणि रात्रीच्या अंधारात त्याच्यावर पडणाऱ्या आमच्या गाडीच्या हेड लाईट मुळे त्याचे रूप अजूनच भयाण वाटत होते. माझी इच्छा नसताना ही मी गाडीतून खाली उतरलो. कल्पेश ने गाडी लॉक केली आणि वाड्याचा गेट उघडला. खूप जुना गेट असल्यामुळे एक वेगळाच आवाज परिसरात घुमला. त्या आवाजाने सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. आम्ही आत जाऊन कोणी दिसतंय का ते पाहू लागलो. वाड्याचा मुख्य दरवाजा उघडाच होता, म्हणजे त्याला कुलूप वैगरे काही नव्हते. आम्ही तो लोटून आत गेलो. मोबाईल फ्लॅश लाईट च्या प्रकाशात आम्ही तो वाडा पाहू लागलो. आत गेल्यावर कळले की तो वाडा खूप मोठा आहे. ५-६ खोल्या खाली आणि तश्याच वरती. आमच्यातले एक दोन जण वर जाऊन पाहून ही आले. मी मात्र गप गुमान उभा होऊन सगळं काही पाहत होतो. एकूण १०-१२ खोल्यांचा प्रशस्त वाडा होता तो. मधला भाग ही खूप मोठा होता जिथे उभे राहून आम्ही सगळा वाडा न्याहाळत होतो. वाडा बाहेरून जरी जुना वाटत असला तरी आतून मात्र तसा चांगला होता. कदाचित कोणीतरी सगळी साफ सफाई करणार असावं असं वाटल. पण आम्ही आल्यापासून कोणीही दिसत नव्हत. मित्राने चार पाच वेळा हाका मारूनही पहिल्या पण कोणी प्रतिसाद दिला नाही. तसे मी म्हणालो की चला परत जाऊ.
पण कल्पेश म्हणाला “आजची रात्र इथेच काढू आणि उद्या सकाळी जाऊ..”. तसे सगळे चिडून सांगू लागले ” काय बोलतोय तुला तरी कळतेय का..? अश्या अनोळखी जागेत थांबायला सांगतोय..? कोणाचा आहे माहीत नाही, कोण राहते की नाही ते ही माहीत नाही.. कोणाला विचारायचे म्हंटले तर ते ही शक्य नाही..” पण तो काही आमचे ऐकायला तयार नव्हता. त्याला कितीतरी समजावून सुद्धा तो त्याच्या मतावर ठाम राहिला. असे का वागत होता हे आम्हाला कळत नव्हत. शेवटी नाईलाजाने आम्ही तयार झालो. त्यावर कल्पेश ने अजुन एक अट ठेवली. काही तरी थ्रिल म्हणून सगळ्यांनी वेग वेगळ्या खोलीत झोपायचे. पुन्हा वाद पेटला. बराच वेळ भांडण झाली पण कल्पेश कोणाचे ऐकणार नव्हता. या आधी मी त्याला असे बोलताना, वागताना कधीच पाहिले नव्हते. त्या वाड्याच्या परिसरात आल्यापासून त्याच्या स्वभावात अचानक बदल झाला होता. शेवटी त्याने त्याचेच खरे केले. आम्ही सगळे वेग वेगळ्या खोलीत गेलो. कुठून या ट्रीप ला आलो असे मला झाले होते. मी दबकतच वर एका खोलीत गेलो. आत एक पलंग होता. मला अश्या अनोळखी जागेत झोप तर लागणार नव्हती पण तरीही जाऊन अंग टाकले. मोबाईल फ्लॅश लाईट सुरूच होता. प्रत्येक क्षणाला भीती ने अंगावर काटा येत होता. पण मित्रांसमोर हसू नको व्हायला म्हणून मी नाईलाजानं आलो होतो. वेळ पाहिली तर ११.३० वाजले होते. हतातल घड्याळ बाजूलाच ठेऊन मी तसाच पडून राहिलो. अर्धा तास उलटला असेल. अचानक खोलीत दुर्गंध पसरू लागला. एखादे मांस सडल्यासारखा. आम्ही सगळेच आप आपल्या खोलीतून बाहेर आलो.
कळायला जास्त वेळ लागला नाही की तो वास एका विशिष्ट खोलीतून येत होता. खरं तर खोली नव्हती ती, स्वयंपाक घर होत. तितक्यात आम्हाला लक्षात आले की शिल्पा खोलीतून बाहेर आली नाहीये. म्हणून ती असलेल्या खोलीचे दार वाजवले पण ती उघडत नव्हती. मी सहज म्हणून दार ढकलून पाहिलं तर ते आत लोटल गेलं. आत गेलो तर ती खोलीत नव्हती. आता मात्र आम्ही सगळे घाबरलो. तिला शोधण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. आम्ही वाड्यात सगळी कडे तिला शोधू लागलो. मोबाईल चे फ्लॅश लाईट सुरू च होते. मनात प्रत्येक क्षणाला विचार येत होता, कुठून आलो या वाड्यात आणि आलो तर आलो पण इथे थांबायचा विचार करून खूप मोठी चूक केली. तितक्यात माझे लक्ष स्वयंपाक घरात गेले आणि मी पाहतच राहिलो. आत शिल्पा पाठमोरी उभी होती आणि काही तरी करत होती. मी ती काय करतेय त्याचा अंदाज घेऊ लागलो. बहुतेक काही तरी कापत होती. तितक्यात इतर मित्र ही तिथे आले आणि आम्ही सगळेच तिला पाहू लागलो. तिला जशी आमची चाहूल लागली तिने झटकन मागे वळून पाहिले. तिचे डोळे लालभडक झाले होते, हातात रक्ताने माखलेला सुरा होता. पुढच्या क्षणी ती अतिशय घोगऱ्या आवाजात म्हणाली “आताच्या आता वरती जाऊन झोपा नाही तर कापून टाकेन सगळ्यांना..” आम्ही धावतच तिथून वर आलो.
सगळे जण कल्पेश ला पुन्हा बोलू लागले. काय प्रकार आहे काही समजत नव्हते. चूक आमची ही तितकीच होती. कारण या अनोळखी वाड्यात डोक्यावर परिणाम झाल्यासारखे आम्ही इथे या बंद वाड्यात येऊन थांबलो होतो. काय करावे काही सुचत नव्हते. एक एक क्षण तासासारखा भासू लागला. कशी तरी करत ती रात्र सरली. पहाटे शिल्पा चा जोरात ओरडण्याचा आवाज आला तसे आम्ही त्या दिशेने धाव घेतली. पण ती स्वयंपाक घरात नाही तर तिच्या खोलीत होती. ती खूप घाबरली होती. कपड्यावरचे डाग ती आम्हाला दाखवत रडू लागली. शिल्पा ला घेऊन आम्ही एक क्षणही तिथे थांबलो नाही. जसे बाहेर पडून गाडीत बसलो तसे एक म्हातारा व्यक्ती आमच्याकडे चालत आला आणि विचारले “की वाड्यातून कसे आलात..?” त्यावर आम्ही घाबरतच त्यांना सगळे काही सांगितले. त्यावर तो जे म्हणाला ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तो म्हणाला की हा वाडा कित्येक वर्ष बंद आहे, तुम्ही आत कसे गेलात. या वाड्यात एक अतृप्त आत्म्याचा वास आहे. तो आत्मा या वाड्यात कित्येक वर्षापासून बंदिस्त आहे. तुम्ही कोणालाही न विचारता आत कसे काय गेलात. त्यावर आम्ही काहीच बोललो नाहीत फक्त कल्पेश कडे चिडून पाहत राहिलो..