रात्रीचे ३ वाजले होते. उद्या प्रोजेक्ट लाईव्ह जाणार ह्याच प्रेशर होत. क्लाएंट चा कोड अपलोड केला आणि स्कॅन करायला ठेवला. आता स्कॅन होई पर्यंत अर्धा तास तरी वाट पाहायची होती. तोच झोप उडवण्यासाठी कॉफी घेऊन यावी असा विचार मनात आला. तसे मी कॉफी घेऊन ऑफिस च्या ६थ फ्लोअर वर गेले. ऑफिस चा टॉप फ्लोअर. तसे तिथे सहसा कोणी जात नाही. तिथे नको ते भास होतात म्हणे. पण या गोष्टी मी नेहमी हसण्यावर न्यायचे. पण इथे आले की मला खूप बरं वाटायचं. रात्रीची शांतता आणि थंडगार वारा. नाईट शिफ्ट चे हेच मला सगळ्यात जास्त आवडते.

पण आज तिथे मुळीच प्रसन्न वाटतं नव्हतं. फिनाईल चा नुसता घमघमाट सुटला होता. फरशी पुसतात ने तेच फीनाईल. मी स्वतःलाच म्हणाले “आता रात्री कोण फरशी पुस तय.”

“आख्ये आयुष्यच पुसल गेलंय” मागून आवाज आला.
तसे मी दचकून मागे पाहिले. तिथे गॅलरी च्या एका कोपऱ्यात एक मुलगा खाली मान घालून बसला होता. त्याला तसे या वेळी बघून माझ्या ह्रदयाचे ठोके भीतीने वाढू लागले होते. ते दृश्य जरा भयानक च होत. मी त्या मुलाला या आधी कधी पाहिलं नव्हत. दुसऱ्या डिपार्टमेंट चा असावा कदाचित. एक क्षण वाटल की निघून जावं तिथून पण त्याच्या आवाजावरून तो खूप अपसेट वाटत होता. वाटलं की लांबूनच जरा चौकशी करावी म्हणून मी त्याला विचारले “काही प्रोब्लेम आहे का?, तुम्ही असं का बोलता य?”

तो एक स्मित हास्य करत म्हणाला “तुम्ही? अहो मला इतका मान कोणी नाही देत., काही झालंय का विचारणार तर लांब राहील”

त्याचे बोलणे ऐकून त्याला खरंच धीर देण्याची मला खूप गरज वाटली. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना डिप्रेशन मध्ये जायला जास्त वेळ लागत नाही. मी पटकन त्याच्या बाजूला जाऊन बसले. पण तिथे मला बसवत नव्हत. अगदी उग्र वास येत होता. मनात विचार केला की इतका विचित्र परफ्यूम कोणी तरी वापरेल का. तरी कसे बसे मी त्याला माझी कॉफी ऑफर केली. पण काहीही न बोलता मान हलवून त्यांनी नकार दिला.  

तसे मी त्याला म्हणाले “बघ, मनात काही टेंशन असेल तर सगळ सांगून मोकळा हो, बरे वाटेल”.

त्याचे डोळे भरून आले आणि त्याने सांगायला सुरुवात केली. टेंशन च टेंशन आहे. मी गेली ५ वर्ष या ऑफिस मध्ये काम करतोय पण पगार फार काही अजून वाढला नाही. आई वडिलांना गावी दर महिन्याला पैसे पाठवले की इथे काही उरतच नाही. जगणं अवघड झालंय. वर्ष भर मजुरा सारखं काम करायला लावतात, गाढवा सारखं राबवतात आणि पगार वाढीची वेळ आली की “You didn’t meet our expectation” अस म्हणून मोकळे होतात. ह्या वर्षी माझे प्रमोशन होणार होते ते ही झाले नाही. आणि सुट्टी तर मिळतच नाही. आजारी असलो तरी ऑफिस मध्येच असतो मी” बोलता बोलता तो रडू लागला.

मी त्याला धीर देत समजावू लागले “अरे आवर स्वतःला, हा एकच जॉब आहे का?, पूर्ण शहरात अजून किती तरी जॉब अवेलेबाल आहेत. काही टेंशन वर खूप सोप्पे उपाय असतात पण आपण इतका जास्त विचार करतो की आपल्याला साध्या गोष्टी ही लक्षात येत नाहीत. मी ही या सगळ्यातून गेले आहे. पण वेळीच सावरले मी स्वताला. माझ्या मित्राच्या कंपनी मध्ये सध्या ओपनिंग आहेत मी तुझे नाव सुचवते. तुला तिथे नक्कीच जॉब मिळेल”

तो थोड्या आशेने माझ्याकडे पाहू लागला. पण त्याच्या चेहऱ्यावरचे टेन्शन काही कमी झाले नव्हते. तो रडवेल्या स्वरातच म्हणाला “तू मला थोड लवकर भेटायला हवं होत श्वेता, आता उशीर झाला”.

मला आश्चर्य वाटलं की याला माझ नाव कसं कळलं. पण नंतर वाटल की कदाचित माझ्या आय कार्ड वर वाचले असेल.

तेवढ्यात माझा फोन वाजला आणि मी बोलत कॉरिडॉर मध्ये आले. फोन ठेवल्यावर मी मागे वळले तर तो मुलगा तिथे नव्हता. मी गॅलरी तून खाली डोकावले पण कोणी दिसले नाही. त्या फ्लोअर वर मी त्याला सगळी कडे शोधले पण तो कुठे ही दिसला नाही. बहुतेक घरी गेला असावा असे वाटले म्हणून मी माझ्या डेस्क वर येऊन बसले. नाईट शिफ्ट संपल्यावर मी घरी गेले. पण त्या मुलाचा विचार मनातून जात नव्हता. 

दुसऱ्या दिवशी जरा लवकरच ऑफिस ला आले. थोडी विचारपूस केली पण त्याचे नाव माहीत नव्हते. माझ्या बरोबर काम करणाऱ्या ना विचारले पण असा कोणताच मुलगा आपल्या ऑफिस मध्ये नाही असे कळले. मला जरा विचित्रच वाटले. मी या बद्दल चौकशी करताना मात्र माझ्या टीम ची लीडर मला पाहत होती. ती माझ्या जवळ येऊन म्हणाली की शिफ्ट संपल्यावर भेट आपण बोलू.

आम्ही शिफ्ट संपवून पहाटे एका कॉफी शॉप मध्ये गेलो. तिने मला विचारले की नक्की काय झालय, तू कोणत्या मुला बद्दल सगळ्यांना विचारतेय. त्यावर मी तिला त्या रात्री घडलेला प्रकार सांगितला. तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. प्रचंड भीती दाटून आली. तिने आपल्या मोबाईलमध्ये मला एक फोटो दाखवला आणि मी म्हणाले “अग हाच होता, याच्या बद्दल तर मी विचारतेय कधी पासून, कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आहे, खूप डिप्रेस्ड वाटला, आपण बोलायला हवं त्याच्याशी, त्याला पुन्हा समजावून सांगायला हवं” तस ती मला शांत करत म्हणाली “श्वेता हा मुलगा ३ वर्षांपूर्वी मेलाय. आपल्या ऑफिस मध्ये त्याने फिनेल पिऊन आत्महत्या केली होती”. तिचे बोलणे ऐकून मी अगदी सुन्न झाले, काय बोलावे काही कळत नव्हते. मस्करी करण्याचा प्रश्न नव्हता कारण माझ्या पेक्षा जास्त भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तरीही माझा विश्वास बसत नव्हता.

मी त्याची फेसबुक प्रोफाईल चेक केली. शेवटची पोस्ट ३ वर्षांपूर्वीची होती. त्याच्या फ्रेंड लिस्ट मधल्या मित्रांना मी कॉन्टॅक्ट केला आणि कळले की तो आमच्या च ऑफिस मध्ये होता आणि ३ वर्षां पूर्वी त्याने डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या केली होती. त्या फ्लोअर वर भास होतात इथपर्यंत ठीक होत पण आमचे झालेले संभाषण हा भास कसा असू शकतो. कदाचित त्याला मन मोकळ करायचं होत जे त्यानं केलं. पण आता तो मुक्त झाला असावा. कायमचा.. 

Leave a Reply