अनुभव – रुपाली नवले
अनुभव साधारण ५ ते ६ वर्षांपूर्वीचा आहे. माझे लग्न होण्या पूर्वीचा. मी जॉब करून रात्री टायपिंग चे काम करायचे. तेव्हा आम्ही एका चाळ सिस्टीम बिल्डिंग मध्ये राहायचो. बिल्डिंग ला ए बी सी विंग्ज होत्या. एका विंग मध्ये एकूण आठ रूम्स आहेत, ४ वर आणि ४ खाली. आम्ही वरती राहायचो. आमच्या रूम चा दरवाजा जरी बंद असला आणि वरती कोणी चढत आले किंवा बाहेर जात असले तरी आवाजाने लगेच समजायचे. मी घरी बुक्स टायपिंग करून द्यायचे काम करत होते. रोज सराव व्हावा म्हणून वडिलांनी त्यांच्या ऑफिसमधून जुना संगणक आणून दिला होता. मी रोज रात्री जेवल्यावर दीड दोन तास बसून काम करायचे. घरात मी एकटीच जागी असायचे. त्यामुळे झोपायला १२.३० – १ व्हायचा. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे जॉब वरून आले, जेवण आटोपले आणि टायपिंग चे काम करायला घेतले. जवळजवळ निम्मे बुक टाईप करुन झाले. मी वेळ पाहिली तर साडे बारा होऊन गेले होते. मी रोज या वेळेपर्यंत टायपिंग चे काम करून मग च झोपायला जायचे. पण त्या दिवशी असं काही घडलं जे मला आयुष्यभर लक्षात राहील. मी संगणक बंद करायला घेतला आणि झोपायची तयारी करू लागले.
तितक्यात मला अचानक दारा बाहेरून पैजणांचा आवाज येऊ लागला. जाणवले की पैंजण एकाच पायात घातले असावेत. मला वाटले की शेजारी कोणी पाहुणे वैगरे आले असतील. पण मला जाणवू लागले की तो आवाज हळु हळु आपल्या रूम जवळ येतोय. म्हणून मी त्याकडे जरा जास्तच लक्ष देऊन ऐकू लागले. हळु हळु तो आवाज माझ्या रूम जवळ येत अचानक थांबला. मला वाटले की जे कोणी आहे ते शेजारच्या कोणाचा दरवाजा वाजवेल पण नाही.. कोणाचेही दार वाजवण्याचा आवाजच आला नाही. मी दारा जवळ गेले आणि कानोसा घेऊ लागले. पण तितक्यात एक विचित्र आवाज आला. आता मात्र मी घाबरले. दरवाज्याच्या होल मधून पहायची हिम्मत च झाली नाही. मी लगेच संगणक बंद केला आणि चादर घेऊन झोपून गेले. काही वेळ मी जागीच होते पण नंतर कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी उठून मी माझ्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला तर ती म्हणाली की तुला भास झाला असेल. पण मला चांगलेच माहीत आहे की तो आवाज मी अगदी स्पष्ट ऐकला होता. तेव्हा पासून मी रात्री उशिरापर्यंत कधीच काम केले नाही.