अनुभव – श्रुती परब

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरचे काही कामा निमित्त गावी गेले होते. त्यामुळे ती घरी एकटीच होती. त्यात परीक्षा ही होती त्यामुळे तिला गावी जाता आले नाही. त्या दिवशी घरच्यांना स्टेशन वर सोडून आली. एकटीच असल्यामुळे तिने मला तिच्या घरी बोलावले. मी ही लगेच सगळी पुस्तके वैगरे घेऊन तिच्याकडे गेले आणि आम्ही अभ्यास करत बसलो. तसे तर माझा अभ्यास झाला होता त्यामुळे मी तिला सांगून लवकर झोपले. पण ती रात्री जागून अभ्यास करणार होती. काही वेळ असाच निघून गेला. ती अभ्यासात अतिशय मग्न झाली होती. तितक्यात कसल्याश्या आवाजाने तिचे लक्ष विचलित झाले. तिने आजुबाजुला पाहिले आणि त्या कडे दुर्लक्ष करत पुन्हा अभ्यासात मग्न झाली. अधून मधून २-३ वेळा पुन्हा तसाच आवाज आला आणि नंतर अचानक यायचा बंद झाला. मध्यरात्र उलटून गेली होती. मी तर अगदी गाढ झोपेत होते. पण ती मात्र अजूनही अभ्यास करत होती. तितक्यात घराच्या बाहेरून अतिशय जोरात कोणीतरी धावत गेलं. ती एकदम दचकली आणि विचारत पडली की इतक्या रात्री कोण असेल. नंतर वाटले की शेजारी कोणी आले असतील उशिरा. त्यांचाच आवाज असेल. ती पुन्हा अभ्यास करू लागली. काही क्षण उलटले असतील आणि तितक्यात खिडकीवर एक थाप पडली. 

आता मात्र ती जरा घाबरली कारण तिचे घर ४थ्या मजल्यावर होते. आणि बाहेर कोणी असणे शक्य नव्हते. कदाचित भास झाला असेल असा विचार मनात आला. पण पुन्हा जोरात खिडकी वाजली. यावेळेस अगदी स्पष्ट जाणवले की बाहेर नक्की कोणी आहे जे खिडकी वाजवतेय. ती घाबरून माझा जवळ आली आणि बाजूला येऊन बसलो. न राहवून तिने मला उठवले आणि सर्व काही सांगितले. मी सुद्धा विचार करू लागले की बाहेरून असा आवाज कसा काय येऊ शकतो. आम्ही दोघींनी तिथे जाऊन खिडकी उघडून पाहायचे ठरवले. मी तिला म्हणाले की घाबरु नकोस, आपण दोघीही जाऊन पाहू. दबक्या पावलांनी या खिडकी जवळ गेलो. थरथरत्या हातांनी मी हळूच खिडकी उघडली. पण तेव्हा तिथे काहीच नव्हत. मी तिला समजावले आणि म्हणाले की खूप रात्र झाली आहे, तुझ्या डोळ्यांवर झोप ही आहे म्हणून तुला भास झाला असेल. आता झोप तू पण. तिने मान डोलावून होकार दिला. आम्ही दोघेही जाऊन झोपून गेलो. सुमारे रात्री ३ च्या सुमारास ती बाथरूम मध्ये जायला उठली. जशी आत गेली तशीच जोरात किंचाळत बाहेर धावत आली. तिच्या आवाजाने मी ही एकदम दचकून उठले. तिला पाहिले तर भीतीने गाळण च उडाली. ती घाबरून रडू लागली. काय झाले ते कळत नव्हते. मी तिला विचारू लागले “अग काय झालं.. काही पाहिलं स का तू.. काही दिसलं का तुला.. का रडतिये इतकी..?”. पण ती इतकी घाबरली होती की तिला काहीच सांगता येत नव्हत. मी तिला कसे बसे शांत केले. पाणी प्यायला दिले. आणि धीर देत म्हणाले “शांत हो.. मी आहे.. काळजी नको करुस..”

ती जरा शाfत झाली आणि मग सांगू लागली. बाथरूम मध्ये गेले आणि नकळत माझे लक्ष बाथरूम च्या लहान खिडकीत गेले. तिथे वाकून मला कोणीतरी पाहत होत. फक्त दोन मोठे लालभडक डोळे दिसले. तिचे असे बोलणे ऐकून मी सुद्धा खूप घाबरले. माझ्या मनात एकच विचार घोळू लागला की आम्ही जर ४थ्या मजल्यावर राहतोय तर मग इतक्या वर कोण येऊ शकत. आम्ही दोघीही बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा लाऊन घेतला आणि ती रात्र तशीच जागून काढली. सकाळी जेव्हा तिने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या की मला सुद्धा असा अनुभव एकदा आला होता. त्या जागेवर नक्की काय आहे हे कोणाला माहीत नाही. पण या घटने नंतर माझी मैत्रीण घरी कधीच एकटी थांबली नाही. 

Leave a Reply