आपल्या जिवलग मित्र मैत्रिणीसोबत घालवलेले क्षण काही वेगळेच असतात जे नेहमी लक्षात राहतात. कारण कदाचित आयुष्यातील ते खूप गोड क्षण असतात. पण कधी कधी असे काही अनुभव येऊन जातात जे नुसते आठवल्यावर ही भीतीने अंगावर काटा येतो. रात्री कामानिमित्त गेलेल्या दोन मित्रांना आलेला हा एक भयाण अनुभव..

अनुभव – प्रथमेश आलसे

अनुभव माझा मित्र ओमकार कुंभार याला आला होता. लहानपापासूनच खूप खोडकर असल्यामुळे माझे बालपण माझ्या मामाच्या घरीच गेले. घरच्यांनी जरा सुधारणा होईल या आशेने मला मामाकडेच ठेवले होते. मी आणि विनायक आम्ही दोघं अगदी लहानपणापासून चे मित्र. एके दिवशी विनायक भेटायला माझ्या घरी आला. हि भेट बऱ्याच दिवसांनी झाली असल्यामुळे आमच्या चांगल्याच गोष्टी रंगल्या. बोलता बोलता विनायक मला म्हणाला “भावा आपल्याला आज सोलापूरला जायचे आहे आणि एक एक्विपमेंट खरेदी करायचे आहे.. आपण संध्याकाळी निघू.. चालेल ना..?” हे ऐकताच मी त्याला नकार दिला कारण मामाने 8 नंतर घराबाहेर पडायचे नाही असे सांगितले असल्याने मी लगेच नाही म्हणालो. पण त्याच्या हट्टासमोर मी जास्त वेळ टिकलो नाही. शेवटी मी विचार केला की घरी काही तरी कारण सांगू आणि परवानगी मागू. म्हणून तात्पुरते मी त्याला हो म्हणालो. घरी आल्यावर मी काही तरी थातुर मातुर कारण सांगून परवानगी मागितली आणि पटकन आवरून सर्व प्रथम विनायकच्या घरी निघालो. त्याने त्याच्या आई ला घरी सांगून आम्ही घरा बाहेर पडू लागलो पण आई म्हणाली की आता रात्रीचे नका जाऊ, उद्या सकाळी जा. रात्रीचा प्रवास ते पण त्या जागेवरून मुळीच नको.. त्यात आज अमावस्या आहे. मला जरा कुतूहल वाटले म्हणून मी त्यांना विचारले “त्या जागेवरून म्हणजे..? असे काय आहे त्या जागेत..?” 

त्यावर लगेच विनायक म्हणाला “सोड रे काही नाही.. या सगळ्या अफवा आहेत.. तू नको याकडे लक्ष देऊ..”. विनायक काही ऐकणाऱ्यातला नव्हता म्हणून आई चे म्हणणे डावलून तो बाहेर पडला. साधारण पावणे नऊ ला आम्ही बाईक घेऊन निघालो. अर्धा तास होत आला होता. आम्ही जवळपास १०-१२ किलोमिटर चे अंतर पार केले असेल. तसे एक टपरी पाहून विनायक ने गाडी थांबवली. गरम चहा सोबत सिगारेट ची कश घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. जवळपास तासा भरा नंतर सोलापुरात पोहोचून एका इलेक्ट्रॉनिक्स शोरुम मधून ते इकविपमेन्ट खरेदी केले. जसे आम्ही शोरुम मधून बाहेर पडणार तसे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मी म्हणालो “ये.. तुझीच कमी होती आता..”. बाईक आणल्यामुळे पुन्हा भिजत इतक्या लांब जाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही तिथेच काही वेळ थांबलो आणि पाऊस जायची वाट बघू लागलो. जवळपास पाऊण तासा नंतर पाऊस थांबला. आम्ही लगेच च तिथून बाहेर पडलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आम्ही तासा भरा नंतर एका गावात पोहोचलो. तसे अचानक बाईक ची हेडलाईट ब्लिंक होऊ लागली. तसे मी म्हणालो “अरे विन्या ते रिपेअर करून घे लेका, तुला शोभत नाही..” माझे बोलणे ऐकून त्याने एक हात जोरात त्या हेडलाईट वर मारला. तसे त्याचे ब्लींक होणे थांबले. तसे मी त्याला म्हणालो “अरे वा.. ही ट्रिक भारी आहे..”. आमचे बोलणे सुरूच होते. 

त्या गावाच्या टेकडी वर पोहोचलो असू. मला पुढे कोणीतरी उभे असलेले दिसले. मी विन्या ला म्हणालो “ते उभे कोण आहे रे इतक्या रात्री..”. यावर तो एकही शब्द बोलला नाही. कोणी बाई रस्त्या कडेला उभी दिसली. विन्या चे बहुतेक लक्ष नसल्यामुळे तो बाईक घेऊन पुढे निघून गेला. मला वाटले की तो त्याच्याच तंद्रीत असेल म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नसेल. म्हणून मी ही पुन्हा त्याला विचारले नाही. काही मिनिट झाले असतील जसे त्या टेकडीवरून उतरू लागलो माझे लक्ष समोर गेले. समोरचे दृश्य पाहतच माझ्या काळजात अगदी चर्र झाले. मी काय पाहतोय त्यावर माझा विश्र्वासच बसत नव्हता. यात भर म्हणून बाईक चा हेड लाईट पुन्हा ब्लीनक् होऊ लागला. तीचं बाई रस्त्याकडेला उभी होती आणि कडेवर एक छोट बाळ होत. जसे तिला ओलांडून आम्ही पुढे आलो तसे हेड लाईट पुन्हा नीट सुरू झाला. मी नक्की काय पाहिले ते उमगत नव्हत. जेव्हा काही क्षणासाठी हेड लाईट तिच्यावर पडला तेव्हा मला तिचे रूप दिसले. केसात माळलेला गजरा, डोळ्यात काजळ आणि डोळे. डोळे संपूर्ण पांढरे शुभ्र. डोळ्यांची बुबळ दिसतच नव्हती. जेव्हा गाडी तिच्या जवळून गेली तेव्हा तिच्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला. जो अगदी आताही माझ्या कानात घुमत होता. आणि ती बाई जणू माझ्याच कडे पाहत होती. 

आता मात्र मी न राहवून विन्या ला विचारले “अरे बघितले का काय होते ते..? त्यावर तो अगदी हळु आवाजात म्हणाला “गप्प बस आणि ती दिसली की पुन्हा मागे वळून पाहू नकोस..” तू जितक्या वेळा तिला पाहशील तितक्या वेळा ती आपल्याला पुढे दिसेल. मला त्याचे असे कोड्यात बोलणे ऐकून अजूनच अस्वस्थ वाटू लागले आणि मी त्याला पुन्हा विचारले ” का रे.. असे काय बोलतोय एकदम.. काय आहे हे सांग ना मला..” त्यावर तो दबक्या आवाजात पण रागातच म्हणाला “जेवढं बोललोय तेवढं कर..” पण मला जाणून घ्यायचं होत की मागे नक्की कोण आहे, ती बाई कोण आहे.. म्हणून मी वळून मागे पाहिले आणि काळीज भीतीने धड धडू लागले. कारण ती बाई अतिशय वेगात गाडीच्या मागे धावत येत होती. मी घट्ट डोळे मिटून घेतले आणि पुढे पाहू लागलो. पुढचा अर्धा तास आम्ही दोघं ही एकमेकांशी एक शब्द ही बोललो नाही. त्या जागेपासून दूर आल्यावर विन्या मला सांगू लागला जे ऐकून माझ्या काळजात अगदी धस्स झालं. तो म्हणाला ” तुझ्या आधीच मला ती दिसली होती पण आपल्याला रस्ता पार करायचा होता. मी तुला काहीच सांगितले नाही आणि जरी सांगितले असते तर तू अजुन घाबरला असतास..” पुढे एका ढाब्यावर थांबून आम्ही केवळ केले. भीती मुळे माझी तर भूक च मरून गेली होती पण तरीही थोडे खाऊन घेतले. रात्री त्याने मला घरी सोडले आणि तो त्याच्या घरी निघून गेला. मला त्याच रात्री खूप ताप भरला होता. मामींनी माझी नजर काढली तसे २ दिवसात माझा ताप उतरला. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी विन्या ला भेटायला त्याच्या घरी गेलो. पण दाराला लॉक होते. म्हणून मी त्याला फोन केला तर तो त्याच्या आई ने उचलला. त्या मला म्हणाल्या “अरे विनायक ला २-३ दिवस झाले ताप आहे खूप, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे, एव्हाना ५ सलाईन लाऊन झाल्या आहेत. तू त्याला भेटायला इथेच ये म्हणजे बरे वाटेल त्याला. आणि खर सांग काय झालं त्या रात्री.?” मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसे त्या माझ्यावर आणि विनायक वर खूप चिडल्या. मी त्यांचे बोलणे ऐकून घेतले. त्याला भेटायला हॉस्पिटल ला गेलो. त्यांनी मला त्याच्या सोबत थांबायला सांगितले. आणि लगेच त्यांनी एक उतारा त्याच्या नावाने तिथे टाकला. मला त्यांनी सांगितले की त्या बाईच्या नवऱ्याने दारू आणायला पैसे न दिल्याने तिला आणि तिच्या लहान बाळाला मारहाण करून त्या रस्त्यावर फेकून दिले होते तेव्हा पासून तिचा आत्मा त्या जागेवर भटकतो य. ती रात्री अपरात्री लोकांना दिसते, गाड्यांचा पाठलाग करते. त्यांचे बोलणे ऐकून मी अगदी सुन्न च झालो होतो. विन्या पुढच्या २ दिवसात तो ठणठणीत बरा झाला. पण त्या नंतर मोठ्यांचे ऐकायचे, ते ज्या गोष्टी सांगतात त्याला काही तरी अर्थ असतोच आणि ते ही आपल्या चांगल्या साठीच सांगत असतात.

Leave a Reply