लेखक – अभिराम

हा अनुभव खूप वर्षा आधीचा आहे. घटना माझ्या मूळ गावातली.

आमच गावातल घर बऱ्याच दिवसा पासून रिकाम होत. एकानंतर एक बरेच भाडेकरू तिथे राहून गेले होते पण गेल्या २ वर्षांत कोणी आल नव्हत. आम्हालाही दोन वर्ष गावाकडे जाणे जमले नाही. त्यामुळे घराची अवस्था खूप खराब झाली होती, अक्षरशः घरात भिंतींवर छोटी रोपटी, गवत उगवलं होत. संपूर्ण घर धुळीने, जाळोख्यांनी माखल होत. म्हणून एकदा येऊन गेल्यावर जरा काही दिवस काढून साफफाई आणि डाग डुजी च काम करायला मी पुन्हा गावी आलो. एकट्याने सगळे घर साफ करणे जवळ जवळ अशक्य होते म्हणून मजूर लाऊन काम सुरू करू असे ठरवले. त्या गावाच्या बाहेर एक मोठ्ठी सिमेंट फॅक्टरी होती. त्यात माझा मामा अभियंता म्हणून कामाला होता. त्याला जसे कळले की मी त्या गावात खास घराच्या कामाला आलो आहे तसे त्याने मला आधी त्याच्या घरी बोलावून घेतले. तो त्याच्या कंपनीकडून मिळालेल्या क्वार्टर मध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहायचा. त्यात मामा, मामी आणि आजी असे तिघे जण राहायचे. बऱ्याच वर्षांनंतर भेटल्यामुळे खूप गप्पा, गोष्टी रंगल्या, खाणे पिणे झाले. मामा मला म्हणाला की तू पुष्कळ प्रवास करून आला आहेस जरा आराम करून घे. तो पर्यंत आम्ही आजीला डॉक्टर कडे चेक अप ला नेऊन आणतो. तसे मी काळजीपोटी एकदम विचारले “काय झाले आजी ला..?” तसे आजी कापऱ्या आवाजात म्हणाली “काही नाही रे.. बरेच दिवसांपासून छातीत दुखतंय..” मी ठीक आहे म्हंटले आणि विचारले की मामा मी सोबत येऊ का.. पण त्याने मला प्रवास करून आल्यामुळे आराम करायला सांगितला. 

मी घरी एकटा होतो. दुपारची वेळ होती. जेवण जास्त झाल्यामुळे जरा सुस्ती आली होती. त्यामुळे बसल्या बसल्या डोळा लागला. तितक्यात दारावर जोरात थाप पडली. मी खाडकन झोपेतून जागा झालो. दार उघडून पाहिले तर तिथे एक तरुण बाई होती. ती मला बाजूला करून सरळ आत गेली आणि घरात काही पाहू लागली. मी त्यांना म्हटलं “अहो बाई तुम्ही कोण आहात.. अश्या एकदम घरात कश्या काय आलात..?” ती बॉय घरात काही तरी शोधत च होती आणि माझ्याकडे न बघताच म्हणाली “झुमकी कहा है..?” मी जरा विचारत पडलो पण एकदम झटकन म्हणालो “कोण झुमकी.. इथे असे कोणी राहत नाही..” तिने एकदा माझ्याकडे पाहिले पण काहीच बोलली नाही आणि तशीच तिथून निघून गेली. माझी झोपमोड झाली होती आणि आता पुन्हा झोपायची इच्छा नव्हती म्हणून मी मोरीत जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले. मी मोरीतून बाहेर आलो तसे मला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे बघू लागलो की हा आवाज नक्की कुठून येतोय. पण आवाजाची दिशा कळत नव्हती. तो आवाज काही कमी होत नव्हता म्हणून मी घराच्या बाहेर पडलो आणि शोध घेऊ लागलो. पण आजू बाजूला कोणी दिसत नव्हते. शेजारच्या घरात एखादे लहान बाळ असेल असा विचार करून कंटाळून मी घरी आलो. घरात येऊन बसलो आणि तितक्यात लाईट गेली. उन्हाचा जोर इतका होता की अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. प्रचंड उकडू लागले म्हणून अंगणात येऊन बसलो. 

मनात आले कोण असेल ती बाई, इथे कशाला आली असेल. आणि यांना डॉक्टर कडे जाऊन ही खूप वेळ झाला आहे. अजून कसे आले नाहीत. बराच वेळ त्यांची वाट पहिली. मामा मामी येताना दिसले पण त्यांचे चेहरे खूप उतरलेले आणि हताश वाटत होते. मी पटकन जाऊन विचारले काय झालं..? तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसत आहात आणि आजी कुठे आहे. मामा म्हणाला की आजी च्या टेस्ट झाल्या आणि डॉक्टरांनी तिला ऍडमिट करायचा सल्ला दिला. मामा चे असे बोलणे ऐकून मी विचारले “खूप काळजी करण्यासारखं काही नाही ना.. त्यावर त्या दोघांपैकी कोणी काहीच बोलले नाही. मला त्यांचे हाव भाव काही बरे दिसत नव्हते. मी परत विचारले “अरे काय झालंय तुम्ही मला सांगत का नाही आहात. मामा दबक्या आवाजात म्हणाला “जिथे आम्ही आजीला नेल त्याच हॉस्पिटल मध्ये आमच्या कंपनी च्या ज्युनिअर इंजिनिअर आणि त्याच्या बायको चे प्रेत आणले होते.. आज सकाळी त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते दोघेही गेले. मी मामी ला सोडायला आलोय, मला परत लगेच जायचेय. मी त्याला म्हणालो की एकटा नको जाऊस, मी ही येतो तुझ्यासोबत. मामा आणि मी दोघंही हॉस्पिटल ला आलो. फॅक्टरी चे बरेच लोक इस्पितळात आले होते त्यामुळे खूप गर्दी झाली होती. मामा मला त्यांच्या बद्दल सांगत होता. बिनोय आणि त्याची बायको पर्णा हे बंगाल मधून इथे आपल्या गावात कामाच्या शोधात आले होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक छोटी मुलगी होती. 

आमचे बोलणे चालू असतानाच आम्ही चालत त्यांच्या प्रेता जवळ गेलो. खाली स्ट्रेचर वर त्यांची प्रेत ठेवली होती. इतक्या तरुण वयात मृत्यू नशिबी होता यांच्या असे वाटून गेले. तितक्यात माझे लक्ष त्या बाईच्या प्रेताकडे गेले आणि विजेचा तीव्र झटका लागावा असे मी शहारलो. अंगात कापरच भरलं. काही सेकंदा साठी जणू श्वासच थांबला. मी थरथरत्या आवाजात तिथल्या लोकांना विचारू लागलो “हे सगळं कधी आणि कुठे घडलं.. कारण ही बाई दुपारी माझ्या मामाच्या घरी आली होती, मी पाहिले हिला..” त्यावर ते सगळे म्हणाले “काही तरी काय बोलत आहात.. यांचा अपघात आज सकाळी झालाय आणि अपघाताच्या ठिकाणापासून इथे आणे पर्यंत यांना मृत गिशित केलं होत. मी मात्र आतून हादरून गेलो होतो. कसे बसे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्या ओळखीचे लोक मामा ला विचारत होते “झूमकी कुठे आहे..?”. मी एका विचित्र नजरेने मामा कडे पाहत बसलो. त्यावर तो म्हणाला ” आज ती काळेंकडे आहे, मला काम आल्यामुळे तिला बीनोय ने त्यांच्या कडे ठेवले आहे..” तितक्यात काळे नावाचे एक गृहस्थ एका चिमुरडीला कडेवर घेऊन आले. एक वर्षाची पण नसेल ती.. बंगाल मध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना कळवले, तसे ते तिथून इकडे यायला निघाले. इकडे रात्र होऊन गेली होती. सगळे आपल्या घरी निघाले. मामा म्हणाला “तु जा मी थांबतो.. तुझी आजी पण इथेच आहे..” पण मी त्याला म्हणालो “नाही.. मी कुठे ही जाणार नाही..” मी थांबतो इथे तुझ्या सोबत. आम्ही दोघेपण तिथेच थांबलो.

आजीच्या खोलीतच एका पाळण्यात झूमकीला ठेवण्यात आले कारण हे तिच्या ओळखीचे लोक होते. मामा बाजूच्या गादीवर झोपून गेला होता. आजीला जेवण वैगरे आणून दिले, मामा ने ही थोडे खाऊन घेतले. मला मात्र रात्रभर झोपच येत नव्हती. सारखा त्या लहान मुलीचा विचार येत होता, कस होईल तीच.. या जगात कोण आहे तीच आता. विचारांनी मेंदू पोखरून निघत होता. सतत तेच विचार डोक्यात घोळत होते. वेळेचे भान नव्हते पण बरीच रात्र झाली होती. सगळे रुग्ण, त्यांच्या सोबत आलेले लोक एव्हाना झोपी गेले होते. त्यामुळे इस्पितळात ही शुकशुकाट झाला होता. तितक्यात एकदम बाळ रडण्याचा आवाज आला.. मी पटकन धावत त्या दिशेने गेलो आणि जे पाहिले त्याने माझ डोकं सुन्न झालं.. अंगावर सरसरून काटा आला, मी जागच्या काहीच स्तब्ध झालो. ती तरुण बाई पर्णा आपल्या मुलीला घेऊन जात होती. माझी तर बोबडीच वळली. ते भयाण दृश्य मी धड धडत्या काळजाने पाहत राहिलो. इतक्यात आजीला जाग आली. ती बेडवरून उठली आणि झूमकीला कडे वर घेतले. पण ती अतिशय गाढ झोपली होती. तितक्यात आजी म्हणाली “अरे बघ रे ही काहीच हालचाल करत नाहीये..” आजीच्या आवाजाने मामा उठला आणि त्याने झुमकीला कडेवर घेतले. बराच वेळ थोपटले, वर खाली केले, हलवले. “काही उपयोग नाही..” मी मोठ्या आवाजात म्हणालो. “तिची आई तिला घेऊन गेली आपल्यासोबत..” माझ्या त्या वाक्यानंतर एक निरव शांतता पसरली. धावपळ झाली. आजूबाजूचे लोक ही कुठून आले काय माहीत. काय झाले मामा ला विचारू लागले. 

सगळ्या गोष्टींचा उलगडा मला झाला होता. ते नवरा बायको दोघेही एकत्र बाहेर जाताना त्यांच्या मुलीला मामा कडे सुरक्षित ठेवायचे. पण नेमके त्या दिवशी मामा नसल्यामुळे काळेंकडे झूमकीला ठेवलं होतं आणि हे तिच्या आईला म्हणजे पर्णाला सांगितला नव्हत. म्हणून ती सरळ मामाच्या घरी तिच्या शोधत आली होती. कारण मृत्यू होऊन सुद्धा तीच मन तिच्या मुलीत होत. ती झूमकीला दुपारी नाही तर रात्री घेऊन गेली आपल्या सोबत.. ते ही कायमची.. मी या निष्कर्षावर आलो की ती आपल्या इवलुष्या मुलीला या निर्दयी जगात एकटी सोडून गेली नाही.

Leave a Reply