अनुभव – प्रसाद शिवशरण

माझा या भुत प्रेत हडळ तंत्र मंत्र यावर विश्वास नाही पण एका घटनेमुळे या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला मला भाग पाडले. हि चित्तथरारक घटना माझ्यासोबत साधारण पणे २ वर्षांपुर्वी घडली होती. आमचे मुळ गाव सोलापुरचे पण माझे आई वडिल पहिल्यापासुनच शहरात राहतात. सुट्टीत आम्ही नेहमी गावाला जायचो. त्या वर्षी ही गेलो होतो. गावी गेल्यानंतर दिवस भर फिरणे झाले, मित्रांना, नातेवाईकांना भेटणे झाले. घरी आलो ते थेट संध्याकाळीच. कंटाळा आला होता म्हणून टिव्ही बघत बसलो. कोणता तरी सिनेमा होता तो बघता बघता ८:३० झाले. तितक्यात बाहेरून माझा मोठा भाऊ आला. त्याच्यासोबत आमचे काही मित्र सुद्धा होते. तो मला म्हणाला ” चल प्रसाद.. आज उदय चा वाढदिवस आहे.. तो पार्टी देतोय..”

आईला सांगुन मी त्यांच्यासोबत बाहेर गेलो. आम्ही केक घेऊन थेट त्याच्या घरी गेलो. त्याचे वडिल नाईट ड्युटी ला गेले होते आणि आई माहेरी गेली होती त्यामुळे घरी कोणीही नव्हते. मग काय.. आम्हाला रान मोकळे होते. घरी जाऊन‌ आम्ही केक वैगरे कापला. त्याने आधीच सगळी सोय करून ठेवले होते. केक कापून झाल्यावर आमचा पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पार्टी एकदम जोरातच झाली. बसल्या बसल्या प्रथमेश म्हणाला ” यार खुप भुक लागलिए चला काही तरी खाऊन येउ..”.. रात्रीचे ११:३० वाजले होते. या वेळी एखादे हाॅटेल उघड असेल असं वाटतं तर नव्हत. पण तरी सुद्धा आम्ही बाहेर गेलो. बाहेर कोणीही दिसत नव्हत. कुठल हाॅटेलही उघड नव्हत. आम्ही फिरत फिरत खुप लांब आलो होतो. तितक्यात आम्हाला समोर एक हातगाडी वाला दिसला. 

तसे उदय म्हणाला की चला आपण इथेच काही तरी खाऊन घेऊ. तसेही दुसरे एखादे हॉटेल वैगरे उघडे मिळणार नाही. एवढ्या रात्री त्यात इतक्या निर्जन ठिकाणी त्या हातगाडी चालवणाऱ्या ला पाहून मला जरा वेगळेच वाटले. आमच्यातले बाकीचे प्यायल्यामुळे धुंदीत होते. सर्वांनी त्यांच्या ऑर्डर्स दिल्या आणि तिथल्याच एका बाकड्यावर टाईमपास करत बसले. मी न राहवून त्या माणसाला विचारले “काय ओ भाऊ.. इतक्या रात्री तुमचा धंदा होतो तरी का..” त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. मला वाटले कदाचित त्याने ऐकले नसावे किंवा ऐकून न ऐकल्या सारखे केले असावे. तेवढ्यात माझ्या लक्ष नकळत शेजारच्या पडक्या इमारतीकडे गेले. ती इमारत जळून खाक झालेली असल्यामुळे तिथल्या लुकलुकणा ऱ्या स्ट्रीट लाईट ला पाहून अंगावर भीतीने काटाच आला. 

वाऱ्याची एक थंडगार झुळूक अंगाला स्पर्श करून गेली आणि अचानक वातावरणात बदल होत गेला. कसला तरी जाळण्याचा वास येऊ लागला. बघता बघता त्या परिसरात सर्वत्र धूर पसरला. पहिलं तर काही कळलंच नाही. अचानक नजर त्या पडक्या इमारतीकडे गेली. तिथल्या एका फुटलेल्या खिडकीच्या आत काहीतरी दिसत होते. मी काही बोलणार इतक्यात प्रथमेश म्हणाला प्रसाद तुला तिकडे काय दिसतय का? आम्ही दोघे तिकडेच पाहत होतो. ती आक्रूती आकाराने 7 ते 8 फुट उंच, पुर्ण शरीर जळाल्यासारखे, डोळे लाल भडक, आणि डोक्यावर दोन शिंगे जणू काही दानवच. ते भयाण दृश्य आम्ही पाहतच राहिलो. प्रथमेशची तर पूर्ण उतरली होती, माझ्या भावाला काही बोलायच तर तो आणि उदय त्यांच्याच धुंदीत होते. ते जे काही होते ते आता बाहेर येत असल्यासारखे भासू लागले. भितीने आम्ही त्या हातगाडीवाल्याकडे वळलो तर आमची दातखिळच बसली, तिथे कोणीही नव्हते.. फक्त ती हातगाडी आणि आम्ही..

अचानक ते जे काही होत ते एका भयानक किळसवाण्या आवाजात ओरडले. आम्ही चौघेही घाबरलेल्या अवस्थेत आवाजाच्या दिशेने पाहु लागलो. ते आमच्या दिशेने वेगाने येत होत. भितीने तर माझे पायही जागेवरून हालत नव्हते. प्रथमेश मला धरून पळु लागला. उदय ने तिथल्या प्लेट्स उचलल्या आणि त्याच्या दिशेने भिरकवु लागला. आम्ही जिवाच्या आकांताने पळत होतो. पळता पळता उदयने भिरकाव लेली एक प्लेट त्याच्या शिंगावर जावुन आदळली आणि त्याचे एक शिंग तुटून पडले. तसे पुन्हा त्या जीवघेण्या आवाजाने सारा परिसर दणाणून उठला. आम्हाला आमचे मरण जवळ आल्यासारखे वाटत होते. आमचा पाठलाग होत होता आणि आम्ही जीव मुठीत धरून जीवाच्या आकांताने धावत सुटलो होतो. पळत पळत आम्ही फार दुर आलो. मी घाबरलेल्या नजरेने मागे वळुन पाहीले तर दूरवर ते उभे दिसले. एकटक उदय कडे पाहत होते. आणि बघता बघता दिसे नासे झाले..

अचानक मागुन आम्हाला एक आवाज आला “काय रे पोरांनो इकड काय करताय”. आम्ही दचकून मागे पाहिले तर एक साठी ओलांडलेला म्हातारा होता. आमचे घाबरलेले चेहरे पाहुन तो म्हणाला ‘हममम कळल काय झाल ते, तो मागे लागला होता ना’.. त्याचे ते बोलणे ऐकून आम्ही अवाक झालो. आम्ही घाबरतच विचारले “काय होते ते.. तुम्हाला माहितीये का?”. तसे तो म्हातारा माणूस सांगू लागला ” ज्या जागेवरून तुम्ही आलात तिथे कित्येक वर्षांपुर्वी एक दगड होता. तो नुसता दगड नसुन तो एक खविस होता ज्याला मांत्रिकांनी दगडा मध्ये बांधुन ठेवले होते. पण दहा वर्षांपुर्वी एका बिल्डर ने ही जागा घेतली आणि आम्ही विनवण्या करूनही त्याने तो दगड काढला. मग काय व्हायचे ते झाल.. एके रात्री अचानक त्या बिल्डिंग ला आग लागली आणि कित्येक जण त्यात दगावले.. तेव्हा पासुन तिकडे कोणी साधे ढुंकून ही पाहत नाही. 

तो खविस आता मोकाट सुटलाय.. त्याच्या नादाला कोणी लागले की तो त्याचा बदला घेतोच.. मग कुठल्याही रुपात यावे लागले तरीही.. हे सर्व ऐकुन तर आमची वाचाच बंद झाली. आम्हाला वाटले की आम्ही थोडक्यात वाचलो पण नाही कारण उदय ने त्याचे एक शिंग तोडले होते. उदय तर भितीने रडायलाच लागला. आम्ही त्या म्हाताऱ्याला घडलेले सांगितले तर तो एकटक उदय कडे पाहु लागला. त्याने उदय ला जवळ घेतले त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही पुटपुटू लागला. कदाचित तो हे सगळ जाणून होता. त्याने खाडकन डोळे उघडले, तो म्हणाला काळजी घ्या पुढील काही दिवस रात्री एकटे फिरू नका. तो तिथुन त्याच्या वाटेने निघुन गेला. तो असा का म्हणाला हे मात्र आम्हाला नीट से काही कळले नाही. त्यानंतर आम्ही थेट घराच्या दिशेला निघालो. 

सगळेच घाबरलेल्या मनस्थितीत होते. सगळे आपापल्या घराकडे निघाले. मी सुद्धा अंथरुणात जाऊन पडलो पण त्या प्रसंगामुळे बिल्कुल झोप येत नव्हती. मी तसाच पडुन राहीलो. सकाळी कसल्यातरी आवाजाने जाग आली. बाहेर कसलीतरी चर्चा चालु होती. मी जाऊन विचारले आणि मला जे कळले ते ऐकुन माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. काल रात्री घरी जाताना उदयचा अपघात होऊन म्रूत्यु झाला होता. 

Leave a Reply