प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा मी साधारण 9 ते 10 वर्षांचा असेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या म्हणून मी आणि आई आमच्या गावी गेलो होतो. गाव खूपच सुंदर होतं – डोंगरांच्या कुशीत वसलेलं, मधोमध शांतपणे वाहणारी नदी आणि सगळीकडे हिरवळ. गावातल्या नदीकाठी एक जुनं मंदिर मंदिर होतं. दरवर्षी पावसाळ्यानंतर मोठी जत्रा भरायची, पण उन्हाळ्यातसुद्धा दर पंधरा दिवसांनी भजन – कीर्तन किंवा जागरण असायचं. त्या दिवशीही असंच एक मोठं भजनाचं आयोजन केलं होतं. गावकरी, लहान मुलं, स्त्रिया, सगळेच नदीकाठच्या मंदिरात जमले होते. मी, आई आणि मामा तिथं गेलो होतो. रात्री दहा वाजेपर्यंत भजन झालं. त्यानंतर लोकं हळूहळू घरी परतायला लागले. मामा थांबला कारण त्याला भजनमंडळीतल्या लोकांसोबत काम उरकायचं होतं. आईनं त्याला सांगितलं, “आम्ही घरी निघतो, तुझे आटोपले की लवकर ये” आणि आम्ही दोघं निघालो. मामाचं घर थोडं आतल्या बाजूला होतं. तिथं पोहोचायला शेतातून पायवाटेने जावं लागायचं. दिवसा तो रस्ता छान वाटायचा – डावीकडे हिरवीगार शेती, उजवीकडे नारळाची झाडं, मधोमध वळण घेत जाणारी छोटी वाट. पण त्या रात्री सगळं वेगळं वाटत होतं. आकाशात ढग होते. त्यामुळे चंद्र प्रकाश अधून मधून चं जाणवत होता. कधी वाट नीट दिसायची, कधी काळोख पसरायचा. मी आईच्या हातात हात धरून चालत होतो. सुरुवातीला सगळं शांत होतं. पण शेताच्या मधोमध आलो तेव्हा वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटलं. वारा अचानक थांबला. झाडं स्तब्ध झाली. इतकी शांतता होती की मला माझ्या हृदयाची धड धड ही स्पष्ट ऐकू येत होती.
चालता चालता अचानक आई थांबली.. मी लगेच तिच्याकडे पहिले – ती घाबरलेली होती. तिने माझा हात घट्ट पकडला आणि हळू आवाजात म्हणाली,
“काहीही झालं तरी मागे वळून बघू नकोस.” आणि झपाझप चालू लागली. मला काही समजलं नाही. मी विचारणार होतो, पण तिच्या डोळ्यांतला भीतीचा भाव इतका स्पष्ट होता की माझ्या तोंडातून शब्दच फुटले नाहीत. आम्ही चालण्याची गती वाढवली. तेवढ्यात मागून घंटेसारखा आवाज ऐकू आला. आईचा हात थरथरायला लागला. जोरात चालून माझ्या पायात गोळे आले होते. त्या आवाजाबरोबरच मला एक गंध आला – धूप – अगरबत्तीचा. सुरुवातीला वाटलं गावातून येत असेल. पण तो सुगंध एवढा दाट झाला की श्वास गुदमरायला लागला. मी घाबरून आईकडे पाहिलं. ती काहीतरी पुटपुटत होती. तिचे ओठ हलत होते, पण शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते. कदाचित ती मंत्र म्हणत होती. पुढच्याच क्षणी मला जाणवलं – आमच्यासोबत अजून कुणीतरी चालतंय.
पावलांचा आवाज नव्हता, पण कसे काय माहित नाही हालचाल मला स्पष्ट जाणवत होती. मी लहान असलो तरी काही तरी विचित्र घडतंय हे मी ओळखलं होतं.. माझ्या मागे वळून पाहायचा प्रयत्न केला, तसे झटकन आईने हात घट्ट धरून मला जवळ ओढलं. “बघायचं नाही!” – ती पुन्हा म्हणाली.. आता मी घामाघूम झालो होतो. डोळे घट्ट मिटून घेतले, आई चा हात हातात होता. मी डोळे मिटून चालत राहिलो. प्रत्येक पाऊल जड वाटत होतं. वाट काही केल्या संपेना.
अचानक अंगावर थंड शहारा आला. जणू कुणीतरी माझ्या कानाजवळून श्वास घेतला. आई चालत होती त्या दिशेने नाही तर दुसऱ्या बाजूने.. मी डोळे उघडले तर समोर मामाचं घर दिसलं. घराच्या अंगणातल्या दिव्याचा उजेड पाहून माझा जीव भांड्यात पडला. आईनं वेग वाढवला. आम्ही घरात शिरलो तसे तिनं दार लावून घेतलं.
आत शिरताच ती थेट देवघरात गेली. दिवा लावला, समई प्रज्वलित केली. तिच्या हातातलं थरथरणं मला अजूनही आठवतंय. तिनं मला पाणी दिलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी गोंधळून विचारलं, “आई, तिथं काय होतं? तू इतकी कां घाबरली होतीस?”..ती काही क्षण शांत राहिली. मग फक्त एवढंच म्हणाली, “गावातल्या काही वाटा रिकाम्या नसतात रे… आपल्याला न दिसणारंही कुणीतरी तिथं चालतं असतं. आपण गावच्या राखणदाराच्या वाटेत आलो होतो..”. त्या रात्री मी झोपलो नाही. सकाळी मामाला सगळं सांगितलं. तो थोडा शांत राहिला, मग म्हणाला, “त्या पायवाटेला खूप लोक टाळतात. राखण दाराचा फेरा असतो तिथे..” काही वाटा, काही रात्री, आणि काही अनुभव खरोखरच आपल्या कल्पनेपलीकडचे असतात.