अनुभव – खागेश उमाकांत चौधरी
मी मामाच्या गावाला दर वर्षी प्रमाणे दिवाळी साजरी करायला गेलो होतो. खेडेगाव असल्यामुळे तिथे अंधार पडायला लागला की लगेच शुकशुकाट व्हायचा. मी आणि माझ्या मामाची दोन मुलं असे आम्ही तिघे जण बाहेर खाट टाकून मस्त गप्पा करत बसायचो. बहुतेक गप्पांचा विषय असायचा भुटाखेतांच्या गोष्टी. त्या रात्री ही जेवण वैगरे आटोपून आम्ही गप्पा करत बसलो होतो. मामा ही जागा होता. आमच्या गोष्टी ऐकुन तो बाहेर आला आणि म्हणाला तुम्हाला मी आज एक खरी गोष्ट सांगतो तुमच्या आजोबांबरोबर घडलेली. तसे आम्ही तिघेही उत्सुकतेने ऐकू लागलो आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
साधारण १९८२ चा काळ असावा. तेव्हा मी अगदी लहान होतो. तुमचे आजोबा म्हणजे माझे बाबा त्याचं गावात शिक्षक होते आणि त्याच बरोबर शेती सुद्धा करायचे. दिसायला अगदी रुबाबदार आणि शरीरयष्टी ही अगदी भक्कम होती. भूत वैगरे असल्या गोष्टी ते कधीच मनात नसतं. त्यामुळे अगदी बिनधास्त रात्री एकटे शेताला पाणी द्यायला जातं. रात्री १०.३०-११ च्या सुमाराला रोज जाऊन शेताला पाणी देऊन यायचे तर कधी अधून मधून वाटले तर तिथेच झोपुनही जायचे. आमचे शेत तेव्हा गावाच्या वेशीबाहेर होते. आमच्या शेताला लागून च दुसऱ्या गावाचा फाटा होता. तिथून दुसरे गाव ५-६ किलोमीटर वर असेल. रस्ता अगदी सरळ होता आणि रस्त्याकडे ला एकही विजेचा खांब नाही त्यामुळे तो रस्ता अतिशय भयाण वाटायचा. अंधार पडल्यावर तर अगदी निर्मनुष्य व्हायचा.
घरी त्या काळी ही मोटार होती पण बाबा चालतच जायचे. रोज जेवण आटोपल्यावर तासाभराने तोंडात तंबाखू असायचा आणि हातात बॅटरी घेऊन शेतात जायला निघायचे. त्या रात्री ही ते जायला निघाले तसे मी त्यांना विचारले “बाबा मी पण येऊ का मला उद्या सुट्टी आहे”. त्यांनी माझ्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली. मी पुन्हा म्हणालो “अहो बाबा येऊ द्या ना” तसे ते चिडले आणि “नाही” इतकेच म्हणाले. त्यांचा एक शब्द माझ्यासाठी पुरेसा होता. मग मी तरी काय करणार, गाव गुमान गोधडी घेऊन आईच्या बाजूला जाऊन झोपलो. त्यांनी नेहमी प्रमाणे दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले आणि शेतावर जायला निघाले.
बॅटरी घेऊन तिच्या उजेडात वाट काढत ते काही मिनिटात शेतावर येऊन पोहोचले. जाताना एक नजर त्या अंधाऱ्या रस्त्यावर गेली. तो आजही निर्मनुष्य होता अगदी भयाण. शेताच्या बांधावरून ते आत शिरले. नेहमी प्रमाणे बॅटरी जवळच्या खांबावर ठेऊन मोटार सुरू केली आणि बाजूच्या बाकावर पाठ टेकवून थोड्यावेळ पडले. थंडी चे दिवस असल्यामुळे गार वारा सुटला होता. त्या मंद वाऱ्याने त्यांचा डोळा लागला. बऱ्याच वेळा नंतर जाग आली. त्यांनी हातातल्या घड्याळात पाहिले तर दीड वाजून गेला होता. त्यांनी लगेच उठून मोटार बंद केली आणि पुन्हा एक तंबाखूची पुडी उघडून तोंडा त टाकून बॅटरी हातात धरून घराच्या वाटेला लागले.
बांधावरून निघताच त्यांना कसलीशी चाहूल जाणवली. तसे त्यांनी दूरवर नजर टाकली आणि त्यांना विडीचा चटका चमकताना दिसला. तसे मनातच म्हणाले “चला गावात जायला कोणाची तरी साथ मिळाली”. तसे ते थोडे हळू चालू लागले. तितक्यात त्यांना मागून हाक ऐकू आली “दादा थांबा.. ओह दादा”. त्यांनी मागे वळून बॅटरी त्या दिशेला वळवली तसे त्यांना एक व्यक्ती हातात विडी घेऊन त्यांच्या दिशेने येताना दिसला. बाबा त्याच्या येण्याची वाट बघत तिथेच थांबले होते. तो व्यक्ती ही मस्त विडी ओढत , त्याचा धूर सोडत अगदी आरामात चालत येत होता.
जवळ आल्यावर त्यांना कळले की त्याची उंची साधारण माणसापेक्षा बरीच कमी आहे. मळकट कपडे आणि त्याच्या शरीरातून घाण वास येत होता. त्याने बाबांना विचारले “कुठे जातोय भाऊ”. माझे बाबा म्हणाले “आपल्या गावात जायला निघालोय”. तसे तो म्हणाला “तुमच्याकडे बॅटरी आहे ना.. मला जरा पुढच्या फाट्या पर्यंत वाट दाखवतात का?.” बाबा म्हणाले “हो चला ना, मला ही तेवढीच सोबत मिळेल”. ते दोघेही चालत निघाले. त्याने बाबांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की कुठे राहतोस, काय करतोस वैगरे. बाबांना असे प्रश्न विचारले की ते सगळे आवडिनिशी सगळे सांगायचे. त्यानंतर बाबांनी त्याला विचारले “तू कुठे राहतोस” त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त विडी ओढत राहिला आणि बाबांच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांना थोड विचित्र वाटलं पण ते पुढे चालत राहिले.
नंतर बाबांना एक गोष्ट खटकली की हा गेले १५ मिनिट सतत विडी ओढतोय पण याची विडी संपतच नाहीये. तितक्यात तो स्मित हास्य करत म्हणाला “चला मग, भेटू परत कधी योग आला तर”. तसे बाबा ही म्हणाले “हो भाऊ तू पण सांभाळून घरी जा”. बाबा आपल्या रस्त्याला लागले आणि काही वेळात त्यांच्या मनात एक विचार येऊन गेला “तो माणूस इतक्या गडद अंधारात हातात काहीही नसताना वाट काढत कसा निघून गेला?”. त्यांनी झटकन मागे वळून बॅटरी त्या रस्त्यावर मारली. पण त्या रत्यावर त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्यांना वाटले की तो व्यक्ती थोडा पुढे गेला असेल आणि अंधार असल्यामुळे दिसत नसावा. तसे ते धावतच पुढे गेले आणि चोहीकडे नजर फिरवून पाहू लागले. पण त्या सरळ असलेल्या रस्त्यावर दूरपर्यंत कोणीही दृष्टीस पडले नाही.
आता मात्र त्यांना धडकी भरल्यासारखे झाले. काही मिनिटात तो माणूस अचानक दिसेनासा झाला होता. ते झपाझप पावले टाकत घराकडे जायला निघाले. त्यांना एक वेगळ्याच भीतीने ग्रासले होते. ते धावतच सुटले पण काही वेळा नंतर त्यांना असे वाटू लागले की रस्त्याचं अंतर आपोआप वाढतंय. काय घडतंय काही कळत नव्हत. किती तरी वेळ झाला तरी तो रस्ता संपतच नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही. जो पर्यंत घर नजरेस पडत नाही तो पर्यंत ते जिवाच्या आकांताने धावत राहिले. घरात शिरल्यावर ते दमल्यामुळे धापा टाकू लागले. आम्ही त्यांच्या आवाजाने जागे झालो. त्यांनी सगळे आई ला म्हणजे तुमच्या आजीला सांगितले. तिने त्यांना एक तुळशीचे पान खायला दिले आणि शांतपणे झोपायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मित्रांसमोर हा विषय काढला तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला “तुला भेटणारे दुसरे तिसरे कोणी नसून बिज्याच भूत होत”. तसे बाबांनी विचारले “कोण बिज्या?”. तसे तो मित्र सांगू लागला “काही वर्षांपूर्वी बाजूच्या गावाच्या फाट्याजवळ बीज्या नावाचा एक माणूस राहायचा. तो खूप विड्या ओढायचा. एके दिवशी गावाच्या सरपंचाच्या पोराने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना त्याला छोटी धडक दिली. बिजू पडला आणि उठून पुन्हा शिव्या वैगरे देऊन त्याला खूप बोलू लागला. त्यामुळे त्या मुलाने बिजुला मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांनी ही बिजुवर हात साफ करून घेतला. त्या मारहाणीत च त्याचा जीव गेला. नंतर हे प्रकरण दाबण्यात आले. पण त्या नंतर गावातल्या लोकांना बिजु त्या रस्त्यावर दिसायला लागला. तू थोडक्यात वाचलास.”
त्या प्रसंगाला काही वर्ष उलटली आणि बाबा ही सगळे विसरून रात्री शेतात पाणी द्यायला जायला लागले. पण एके दिवशी सकाळी ते परतलेच नाहीत. गावातले लोक त्यांचे प्रेत घेऊन आले आणि म्हणाले की हे त्या फाट्याजवळ मृत अवस्थेत आढळले. मी, माझी आई म्हणजे तुमची आजी आम्ही त्यांना पाहून खाली कोसळलो. त्यांचे असे अकस्मात जाणे आम्हाला खूप मोठा धक्का देऊन गेले. ओटोपसी रिपोर्ट मध्ये हार्ट अटॅक चे कारण दिले होते पण आम्हाला आजपर्यंत कळले नाही की ते नक्की कोणत्या धक्याने आम्हाला सोडून गेले.
मामा ने अश्रू पुसतच आम्हाला जवळ घेतले. एव्हाना आमच्या डोळ्यात ही पाणी तरळू लागले होते.