2014 मी माझे MBA पूर्ण केलं तर माझा जिवलग मित्र सौरभ याने त्याचे इंजिनिरिंग पूर्ण केले.
आमच्या दोघांसमोर शिक्षण झाल्यावर, सर्वांच्या समोर जो प्रश्न पडतो तोच आमच्या समोर ही होता..
आता पुढे काय?
मी पुढे जॉब करण्याचा तर सौरभ ने UPSC ची preparations करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही मूळचे अमरावतीचे, शहर मोठे पण तरीही आम्ही दोघांनी दुसऱ्या शहरात जाण्याचे ठरवले आणि सोबतच फ्लॅट करून एकत्र राहायचे नक्की केले.
ऑगस्ट महिना होता. पावसाळ्याचे दिवस होते. सुरवाती चे काही दिवस राहण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने आम्ही आमच्या एका मित्राकडे सुहास कडे थांबण्याचे ठरवले. तसे ही दुसरी कडे राहण्याची सोय होई पर्यंत आमच्या कडे दुसरा काही पर्याय ही नव्हता. पण तिथे जाण्याआधी शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाऊन यावे असे सौरभ च्या मनात होते. त्यामुळे आम्ही शिर्डी ला गेलो. देवळात दर्शन वैगरे घेतले आणि बाहेर निघताना एक चिमुकली माझ्या जवळ येत म्हणाली “दादा दादा.. हे साईबाबांचे लॉकेट घेना फक्त १० रुपयालाच आहे..”
तिच्याकडे पाहत मी म्हंटले “अग बेटा.. मी लॉकेट वगैरे घालत नाही गं.. तरीही हे घे १० रुपये आणि काही खाऊ घेशील..
तसे ती चिमुकली म्हणाली “दादा नुसते पैसे नको मला..त्या सोबत हे लॉकेट पण घे ना”
तीच हे बोलणं ऐकून मला तीच कौतुक वाटले आणि मी माझ्या साठी तर ते लोकेट घेतलेच सोबत सौरभ साठी सुद्धा घेतले…
तितक्यात सौरभ ही आला आणि त्याने मला पाहत म्हंटले
अरे वाह…! हे तर मला खूप आवडतं..
तिथेच त्याने माझ्या हातून घेऊन ते गळ्यात घातले आणि मला ही घालायला सांगितले… आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन फ्लॅट शोध मोहीम चालू केली.. ब्रोकर्स नी पुष्कळ फ्लॅट्स दाखवले पण एक ही आवडत नव्हता.. सौरभ ऑनलाइन सर्च करतच होता, तेव्हा त्याला डायरेक्ट एक फ्लॅटची इन्फॉर्मेशन मिळाली आणि ती सरळ घरमलकाच्या माध्यमातून होती.. त्याने मला लगेच सांगितले आणि म्हणाला की हे बघ.. लिस्टिंग घर मालकाच्या नावाने आहे आपले ब्रोकरेज ही वाचेल. मी त्याला म्हणालो की मग वाट कसली बघतोय , फोन करून बोलून घे लवकर.
सौरभ ने वेळ न दवडता मोबाईल काढला आणि दिलेल्या नंबर बर फोन केला.
“हॅलो..! आम्ही आत्ताच ऑनलाइन बघितले की तुमचा फ्लॅट आहे आणि तो तुम्ही रेंट वर देणार आहात..हे खरं आहे का..?
“हो.. आहे.. तुम्ही कुठले आणि किती जण आहात..? ” समोरून एका व्यक्तीने गंभीर आवाजात विचारले.
“आम्ही अमरावतीचे आणि आम्ही दोघच जण आहोत.” सौरभ म्हणाला.
“बर.. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो.. आज संध्याकाळी ७ वाजे पर्यंत पोहोचा तिथे..”
“सर,आता 3 वाजले आहेत आणि 7 म्हणजे पुष्कळ उशीर होईल हो आम्हाला.. परत यायला आम्हाला बराच उशीर होईल.. थोडं लवकर जमत असेल तर बघा न..!”
तसे समोरचा व्यक्ती जरा विचार करत म्हणाला “बर ठीक आहे.. ६ ला या..”
सौरभ मोबाईल च्याच माईक वर हात ठेवत मला मस्करीच्या स्वरात म्हणाला ‘वाह… काय लवकर बोलवलं …! 7 चा 6 वर आला…”..
मी त्याला हसतच हो येऊ असे सांग अस म्हणत इशारा केला त्यावर तो झटकन मोबाईल कानाला लावत म्हणाल “बर.. बर सर आम्ही पोहोचतो तिथे 6 वाजता…”
ठरल्या प्रमाणे वेळेत आम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. सोसायटी पुष्कळ मोठी होती किमान 8-10 मजली अपार्टमेंट असावे, आत मध्ये येत असताना चौकीडाराच्या केबिन मध्ये कोणीच दिसले नाही.. आता विचारायचे कोणाला.. सौरभ म्हणाला की आपण आत जाऊन जरा विचारपूस करू. आम्ही आत आलो आणि बिल्डिंग न्याहाळू लागलो. बांधकामाला जवळपास 2-3 वर्षे झाले असावेत. तीन विंग्ज होत्या A, B आणि C.. कमालची बाब अशी होती A विंग गेटच्या अगदी समोर असून सुद्धा रिकामी वाटत होती. तिथे कोणीच राहायला आलेलं दिसत नव्हतं.. पार्किंग लॉट मध्ये नजर फिरवली तर तिथे ही गाड्या नव्हत्या. मी सहज म्हणून वर पाहिले तर साधारण ५ व्या मजल्यावर एका फ्लॅट मध्ये लाईट चालू दिसला..
कोणी दिसत नाही म्हंटल्यावर सौरभ ने त्या व्यक्तीला पुन्हा फोन लावला.
सर..आम्ही पोहोचलो इथे…तुम्ही कुठे आहात..?
समोरून तो व्यक्ती म्हणाला आणि या वेळेस त्याच्या बोलण्याचा स्वार अगदी उत्साही होता “अरे… मला सर वगैरे नको बोलुस कदाचित आपण एकाच वयाचे आहोत मला सचिन म्हणून आवाज दे.. बस मी पोहोचतोच… तुम्ही A विंग च्या मागच्या साईडला पार्किंग आहे तिथे थांबा मी आलोच…
त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही पार्किंग मध्ये गेलो आणि तिथे त्याची वाट बघत बसलो.. बराच वेळ झाला.
६ चे साडे सहा, साडे सहा चे सात पठ्याने शेवटी केलेच. 7 वाजता अचानक आमच्या समोर एक आमच्या च वयाचा मुलगा समोर आला आणि आम्हाला म्हणाला.. “हाय… मी सचिन…अ.. अ… सौरभ राईट..?”
सॉरी मित्रानो..मला लेट झाले…
त्यावर मी त्याला म्हणालो “Its ok, काही हरकत नाही.. फ्लॅट बघूया..?”
तसे तो म्हणाला “हो नक्कीच.. चला..”
आम्ही त्याच्या मागे चालू लागलो. मी जरा विचारपूस करायला सुरुवात केली.
फ्लॅट तसा कितव्या मजल्यावर आहे..
तसे तो म्हणाला ” ५ व्या मजल्यावर”..
काही वेळा पूर्वी वर पाहिले तर नेमका ५ व्या मजल्यावर चा एक लाईट चालू दिसला होता. तसा मनात विचार आला “बर झाल.. निदान शेजार तर आहे.. नाही तर या भयाण बिल्डिंग मध्ये एकट राहणं कठीणच झालं असत”.
आम्ही लिफ्ट जवळ येऊन पोहोचलो. मी इंडिकेटर पाहिले तर लिफ्ट पाचव्या मजल्यावरून हळु हळू खाली येत होती. पुढच्या काही सेकंदात लिफ्ट आमच्या समोर येऊन थांबली. पण बराच वेळ झाला तरी लिफ्ट चे दार काही उघडतं नव्हते. एक मिनिट झाला, दोन मिनिट झाली तरी तेच.. मी प्रश्न केला “लिफ्ट खराब आहे का?” तसे तो म्हणाल “जास्त वापरात नसल्यामुळे कधी कधी त्रास देते लिफ्ट”.. त्याचे वाक्य संपते न संपते तोच लिफ्ट उघडली. सौरभ आणि सचिन आत बेले पण माझी आत जायची काही हिम्मत होत नव्हती. खर तर इथे आल्यापासून खूप अस्वस्थ वाटत होत त्यामुळे असेल कदाचित. तितक्यात सौरभ म्हणाला ” ये ना रे आत.. बाहेर का उभा आहेस”.
तसे मी झटकन म्हणालो “अरे आत आल्यावर बंद पडली तर?..”
त्यावर सचिन जरा विक्षिप्त हसत म्हणाला “मग काय 5व्या मजल्यावर चढत जाशील का?” ये घाबरू नको मी आहे..आता नाही अडकणार ही..
मी कसाबसा आत आलो आणि लिफ्ट सुरू झाली. सुदैवाने लिफ्ट मध्ये बंद पडली नाही आम्ही 5व्या मजल्यावर पोहोचलो..
तिथे पोहोचल्यावर लगेच तिथे समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारी फॅमिली, एक बाई आणि तिच्या 2मुली बाहेर आल्या.. विशेष म्हणजे त्या इंडियन नसून आफ्रिकन होत्या..
त्या सचिन कडे रागाने बघत होत्या आणि सचिन सुध्दा त्यांच्या कडे रागाने बघत होता..
ती बाई त्यांच्या भाषेत बडबड करत होती..
आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाहिले. आम्हाला भाषा कळत नसली तरीही तिच्या हाव भावा वरून असे वाटले की ती आम्हाला शीव्याच देत असावी..
तितक्यात सचिन म्हणाला “त्यांच्या कडे लक्ष देऊ नका चला आत मी तुम्हाला फ्लॅट दाखवतो..”
फ्लॅट जवळ आल्यावर त्याने दार उघडले आणि आम्ही आत गेलो.
आत आल्यावर बघितलं तर लाईटच नव्हते..
तसे सौरभ म्हणाला “सचिन, इतका अंधार का?लाईट नाही का इथे?
त्यावर सचिन म्हणाला “अरे, फ्लॅट घेतला तेव्हा पासून इथे कोणी राहायला आलेच नाही.. कनेक्शन आहे पण ट्यूब लाईट वगैरे लावलीच नाही…
अरे मग,आम्ही बघायचे कसे?.. मी म्हणालो.
त्याने मोबाईल चा फ्लॅश चालू केला आणि आम्हाला ही चालू करायला सांगितला.. आणि त्याच्या उजेडात तो आम्हाला घर दाखवू लागला….
त्यानी टॉर्च आमच्या कडे वळवली आणि त्याला आमच्या गळ्यात साई बाबांचे लॉकेट दिसले, तसे तो म्हणाला “”शिर्डीला गेले होते का?”
मी हो म्हणालो. मी त्याला पुढे काही विचारणार तितक्यात त्याच्या मोबाईल ची रिंग वाजली. तसे तो फोन वर बोलत बाहेर गेला. आम्ही दोघच फ्लॅश च्याच प्रकाशा त फ्लॅट न्याहाळत लागलो. सौरभ बेड रूम बघत होता तर मी किचनमध्ये गेलो. युटिलिटी स्पेस च दार उघडून बघतो तर काय…? त्या गडद अंधारात दोन डोळे चमकले. मी घाबरत सोरभ ला हाक दिली.. सौरभ…..
माझा आवाज ऐकून तो पटकन धावत आला.
“काय रे काय झालं एवढं ओरडायला..?”
त्या अंधाऱ्या कोपऱ्यात मी इशारा केला. तसे सौरभ ने फ्लॅश लाईट त्या दिशेला वळवला. एक काळीभोर मांजर तिथे बसली होती.
तिला पाहत सौरभ हसत च म्हणाला ” काय राहुल्या, भित्रा कुठचा??”
आम्ही फ्लॅटच्या हॉल मध्ये आलो.. त्याला लागूनच बाल्कनी होती, हॉल आणि बाल्कनीच्या मधले गेट मी ओपन केले.. तसा थंडगार वारा आत शिरला.. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आभाळ भरून आले होते.. हलकासा गडगडाट आणि सोबत विजा चमकत होत्या. मी मोबाईल मध्ये वेळ पाहिली तर संध्याकाळचे 7:20 झाले होते. सचिन केव्हाचा बाहेर गेला होता.. परत येण्याचा त्याचा काही पत्ताच नव्हता.. तितक्यात अचानक गॅलरीतून जोरदार वारा आत आला आणि त्या वाऱ्याने फ्लॅट चे मेन दार जोरात आप टून बंद झाले. मी पुष्कळ घाबरलो आणि तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागलो.. पण दार काही उघडेना.. सौरभ पण प्रयत्न करत होता.. त्याच्या कडून सुद्धा दार उघडत नव्हतं..
आम्ही सचिनला आवाज देऊ लागलो पण त्याचा त्यावर काही प्रतिसाद येत नव्हता.. सौरभ ने त्याच्या मोबाइलवर कॉल केला तर त्याचा कॉल व्यस्त येत होता.
जवळपास 20 मिनिटे झाली.. दार काही उघडतं नव्हत.. सचिन कुठे कल मडला होता काय माहीत. आता मात्र आम्हा दोघांना घाम फुटू लागला. वातावरणात थंडावा असला तरी भीतीमुळे त्वचेवर घामाचे थेंब जमा होऊ लागले. परिसरात एकदम उदासीनता जाणवू लागली.. त्यात काही तर करपट वास येऊ लागला.. काही तर जळत असल्याचा.
मी साईबाबांच्या नामाचा जाप सुरू केला.. तितक्यात बाहेरून सचिन ने आवाज दिला.
“सौरभ,काय झाले रे..?
तसे सौरभ म्हणाला ” अरे..सचिन कुठे गायब झाला होतास रे..?”
“दार लॉक झालय, किती प्रयत्न करतोय पण ओपन च होत नाही, तू बाहेरून प्रयत्न करून बघ”. त्याने दार उघडले. बाहेर पेसेज मध्ये लक्ष गेले तर समोरच्या घरातून खूप धूर येत होता. बहुतेक याचाच जळका करपट वास येत होता. मी सचिन कडे पाहत म्हंटले “हा धूर कसला रे.”
तसे तो म्हणाला “अरे.. हे लोक काही पण करतात, लक्ष नका देऊ चला तुम्ही, बघा लिफ्ट पण आली..”
पेसेज मधून चालत जाताना ती मुलगी माझ्या कडे बघून मला खुणावत होती की त्याच्या सोबत लिफ्ट मध्ये नका जाऊ..
एकंदरीत झालेल्या प्रकार मुळे मी पण घाबरलो होतोच, सचिन लिफ्ट मध्ये गेल्यावर सौरभ पण त्याच्या मागे आत जाणार मी त्याचा हात पकडला..
तसे सचिन म्हणाला ” काय रे काय झालं..? या की आत लवकर…”
मी जरा घाबरतच म्हणालो ” सचिन तू ये लिफ्ट नी आम्ही पायऱ्यांनी येतो.”
आम्ही पायऱ्यांनी खाली पार्किंग मध्ये आलो.. सगळी कडे बघितलं पण सचिनचा काही पत्ता नव्हता.. फोन ट्राय केला पण तो ही लागत नव्हता. सौरभ म्हणाला “चल तो गेला असावा कदाचित, आपण पण निघू पुष्कळ वेळ झालाय, सुहास आणि वहिनी आपली वाट बघत असतील..” मी बाईक स्टार्ट केली आणि निघालो, पुष्कळ वेळ आम्ही एकमेका सोबत काहीच बोललो नाही. झालेल्या प्रकारावर आम्हा दोघांना भीती ही वाटत होती सोबत हसुपण येत होत कदाचित हा सगळा योगायोग असला तर विनाकारण आपण उगाच भितोय..
जवळपास साडे नऊ दहा वाजता आम्ही सुहास कडे पोहोचलो.
विहिनी ने विचारले ” का रे इतका वेळ..? शेवटी घराचं ऍग्रीमेंट करूनच आलात की काय..?
सुहास ही लगोलग म्हणाला ” हो,मला पण असाच वाटलं..”
तो पर्यंत आमची भीती ओसरली होती.
त्या दोघांना झालेला सर्व प्रकार आम्ही गंमतीदार पध्दतीने सांगितला.. पण तेव्हा आम्ही खरच घाबरलो होतो, त्यामुळे त्या फ्लॅटचा विचार आम्ही आमच्या डोक्यातून काढून टाकला होता.
दोन दिवस उलटून गेले पण आम्हाला आमच्या मना सारखा फ्लॅट काही सापडेना..
सौरभ ने पुन्हा त्या फ्लॅट चा विषय काढला. राहुल,काही म्हण पण त्या सचिनचा फ्लॅट चांगला होता यार, रेंट पण कमी आणि आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागणार नाही..
हो, बरोबर आहे तुझं,पण….
पण.. बिण.. काही नाही,तू उगाच भितोय थांब मी सचिन ला कॉल करतो आणि त्या फ्लॅटच फायनल करून टाकू.
सौरभ ने फोन कानाला लावला आणि म्हणाला ” अरे..नंबर अस्तित्वात नाही म्हणतोय..चल त्या सोसायटी मध्ये जाऊ आणि तिथेच एखाद्याला विचारून विचारून बघू…
आम्ही वेळ न दवडता तिथे पोहोचलो.. आज गार्ड गेट बाहेर च उभा होता. एका व्यक्ती सोबत बोलत होता. आम्ही त्याच्या जवळ जात विचारले “काका,त्या A विंग च्या 5व्या मजल्यावर सचिन म्हणून एकाचा फ्लॅट आहे.. त्याचा नंबर आहे का ओ तुमच्या जवळ..?”
गार्ड आमच्याकडे आश्चर्याने पाहत उद्गारला ” काय..?”
तितक्यात समोरचे ते वयस्कर व्यक्ती म्हणाले
“तुम्हाला हे नाव आणि या फ्लॅट बद्दल कोणी सांगितलं?”
तसे सौरभ म्हणाला “अहो.. काका,दोन दिवस अगोदर आम्ही स्वतःच इथे आलो होतो,सचिन ने स्वतः आम्हाला तो फ्लॅट दाखवला..
अशक्य आहे हे..!
का..?
8 महिन्या अगोदर त्याच्या बाबांनी तो फ्लॅट त्याला त्याच्या birthday ला गिफ्ट केला होता. सचिन आपल्या हिशोबाने त्या फ्लॅटचे इंटेरिअर करत होता. एकेदिवशी संध्याकाळी फ्लॅट वरचे आपले काम आटपून घरी येण्या करीत निघाला, लिफ्ट मध्ये एंटर झाला तसाच समोर राहणाऱ्या आफ्रिकन फॅमिलीच्या घरात सिलेंडर चा स्फोट झाला त्यामध्ये त्या घरातील एक बाई व तिच्या 2 मुली गेल्या.. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे लिफ्ट ची तार तुटली आणि लिफ्ट 5व्या माजल्यावरून खाली कोसळली आणि त्यातच सचिन गेला. तेव्हा पासून तो 5 व्या मजल्यावर चा फ्लॅट तसाच जळक्या अवस्थेत आहे सोबत लिफ्ट पण बंद पडली आहे. त्यामुळे तिथे कोणी राहायला तयार नाही.
आम्ही दोघं ही एकमेकांकडे पाहत होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर भीती दाटली होती. तरीही मी त्यांना विचारले “काका,तुम्हाला कस माहीत हे?”
ते अगदी शांत पणे म्हणाले “सचिन माझा एकुलता एक मुलगा होता..”
हे ऐकल्यावर तर आम्हाला धक्का च बसला…
सौरभ ने पुन्हा प्रश्न केला ” तुम्ही म्हणताय की हा सर्व प्रकार त्या दिवशी संध्याकाळी झाला, साधारणपणे किती वाजता झाला असावा?”
त्यानंतर चे त्यांचे एक वाक्य ऐकून आम्ही तिथून सरळ चाल मांडली. ते म्हणाले ” तो अपघात 7 ते 8 वाजताच्या दरम्यान झाला होता..”
आम्हाला सचिन ने सात ची वेळ दिली होती..