अनुभव – प्रसन्न सोनावणे
मी नाशिकला वास्तव्यास आहे. प्रसंग मागच्या वर्षीचा आहे. मी आणि माझा मित्र प्रशांत ज्याला मी प्रेमाने बबल्या म्हणतो आम्ही दोघं मुंबई ला गेलो होतो. आम्ही शॉपिंग च्या निमित्ताने आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबई ला जात असतो. मित्राकडे कार असल्यामुळे आम्ही बाय रोड जातो. त्या दिवशी ही आम्ही कार ने गेलो होतो. पण सकाळी निघण्या ऐवजी रात्री निघालो म्हणजे जास्त ट्रॅफिक लागत नाही. जेवण वैगरे आटोपून साधारण १० ला निघालो. रस्त्या मध्ये एका पेट्रोल पंपावर थांबून गाडीत पेट्रोल फुल करून घेतले. आम्ही दोघं च होतो त्यामुळे मनसोक्त गप्पा चालल्या होत्या. साधारण एक दीड तासांच्या प्रवासानंतर मित्र म्हणाला की एखाद्या टपरी वर थांबून चहा घेऊ म्हणजे ड्राईव्ह करताना झोप लागणार नाही. तसे मी ही म्हणालो “ वातावरणात ही गारवा जाणवतोय, मस्त गरम गरम चहा घेऊ आणि सोबत भजी वैगरे मिळाली तर मग विषयच नाही.. “ आमचे बोलणे सुरू असतानाच रस्त्याकडे ला एक चहाची टपरी दिसली तसे आम्ही तिथे थांबलो.
तिथून पुढे काही अंतरावरून कसारा घाट लागणार होता. १० मिनिटात चहा प्यायलो आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. या आधी ही आम्ही असा रात्रीचा प्रवास केला होता. त्यामुळे नाईट ड्राईव्ह करणे आम्हाला काही नवीन नव्हते. काही वेळात आम्ही कसारा घाटात पोहोचलो. गाड्यांची ये जा सुरूच होती पण जस जसे आम्ही घट चढू लागलो तसे वर्दळ कमी जाणवू लागली. काही अंतर पार केले असेल आणि गाडी अचानक झटके खात बंद पडली. आम्ही कार सुरू करायचा प्रयत्न करू लागलो पण काही केल्या कार सुरूच होत नव्हती.
तितक्यात बाबल्या हरा गंभीर होत म्हणाला “ पश्या इथे थांबणे चांगले नाही..” मी त्याला मस्करीच्या स्वरात जरा हसतच म्हणालो “ हो रे जसे काही एखादे भूत च समोर येणार आहे ना आपल्या..” मी जसे हे वाक्य बोललो तसे आम्हाला एक वेगळाच आवाज ऐकू आला. आम्ही दोघं ही स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागलो. मला एक गोष्ट खटकली की आपली गाडी बंद पडल्या पासून एकही वाहन दिसले नाही. मी काही बोलणार तितक्यात समोरून कोणी तरी येताना दिसले. वाहन नव्हते , कोणी व्यक्ती अंधारातून चालत येत होती. आमच्या कार हेड लाईट चा प्रकाश जरी समोर असला तरीही त्याच्या थोडे बाजूला ती व्यक्ती चालत येत होती त्यामुळे काही क्षण आम्हाला कळले नाही. पण जस जसे ती व्यक्ती आमच्या दिशेने चालत येऊ लागली तसे आम्हाला दिसले की ती एक नव वधू असावी. म्हणजे तिचा पेहराव च तसा असावा.. लाल रंगाची साडी नेसली होती, जी खूप चकमत होती.
तिची नजर समोर होती आणि ती त्याच एका नजरेत पाहत सरळ चालत होती. मी म्हणालो “ हा काही तरी वेगळाच प्रकार दिसतोय.. एक तर ही एकटी नसणार यांची टोळी असेल.. आपण काही विचारायला गेलो तर काही खरे नाही.. “ पण त्यावर मित्र म्हणाला “ असेल ही.. पण तिच्याकडे पाहून मला काही तरी वेगळच वाटतेय पश्या.. आपल्याला या भागातून निघायला हवे “ आम्ही कार सुरू करायचा प्रयत्न करू लागलो. बऱ्याच प्रयत्नानंतर कार सुरू झाली आणि आम्ही पुढे निघालो.” काही वेळ आम्ही शांत च होतो.
पण मी न राहवून त्याला विचारले “ काय होत रे ते.. ? “ त्यावर तो काहीच बोलला नाही. काही अंतर पुढे गेल्यावर एक वळण आले की तो म्हणाला “ पश्या समोर बघ.. “ त्याच्या आवाजात मला भीती अगदी स्पष्ट जाणवली. माझ्या तोंडून नकळत पणे बाहेर पडले “ अरे ही तर तीच बाई आहे .. “ कसलाही विचार न करता मी गियर टाकला आणि कार चा वेग वाढवला. ताशी सत्तर ते ऐंशी च्या वेगात मी त्या घाटाच्या वळणातून गाडी चालवत होतो. पुन्हा एक वळण आले आणि तीच बाई रस्त्याकडे ला उभी दिसली. त्या नंतर च्या प्रत्येक वळणावर ती बाई निर्विकार भाव आणून रस्त्याकडे ला उभी दिसायची. आम्ही देवाचे नाव घेऊ लागलो आणि कार चा वेग वाढवला. आणि तितक्यात पुन्हा एकदा गाडी बंद पडली.
आता मात्र आम्हा दोघांची भीती ने चांगलीच तंतरली. एव्हाना आमच्या सोबत घडत असलेला प्रकार अमानवीय आहे हे आम्हाला कळून चुकले होते. “ आता काय करायचे..?” माझ्या तोंडून नकळत हे वाक्य बाहेर पडले. त्यावर मित्र काहीच म्हणाला नाही. म्हणून मी त्याच्या कडे पाहिले तर तो कार च्या साईड मिरर मध्ये एक टक पाहत होता. तो काय पाहतोय हे मी ही थोडे वाकून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिथले दृश्य पाहून माझा उरला सुरला त्राण ही निघून गेला. गाडीच्या टेल लाईट च्या प्रकाशात पुसटशे दिसले की तिचं बाई आ वासून उभी आहे. जणू आम्ही गाडी तून उतरण्याची च वाट पाहतेय.. मी देवाचे नाव घेतले आणि जोरात गाडी इग्नाईट केली आणि ती चालू ही झाली. मग काय.. सुसाट वेगात घेत आम्ही घाटातून बाहेर आलो. काय घडलं कस घडल हे बोलायची इच्छा नव्हती. बराच वेळ आम्ही काहीच न बोलता गाडी चालवत राहिलो होतो. एव्हाना ३.३० होऊन गेले होते.
काही अंतरावर थोडा वस्तीचा परिसर लागला तेव्हा जरा हायसे वाटले. तेवढ्यात एक टपरी दिसली तसे मी गाडी रस्त्याकडे ला घेत थांबवली. आणि दोघं ही खाली उतरलो. मी पुढे चालत गेलो आणि दोन चहा द्या म्हणून सांगितले. आम्हा दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ते पाहून तो टपरी वाला म्हणाला “ काय झालं.. ? तुम्हाला काही दिसलं का रस्त्यात.. “ मी एकदम त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोललो नाही. त्यावर तो काही न विचारताच सांगू लागला “ बहुतेक तुम्ही त्या बाईला पाहिले.. खूप जणांना दिसते ती.. तुमची गाडी बंद पडली होती का घाटात..? “
मी फक्त होकारार्थी मान डोलावली त्यावर तो म्हणाला “ ७ वर्षांपूर्वी नवीन च लग्न झालेल्या एका जोडप्याचा अपघात झाला होता. त्यात ती जागीच गेली होती. तेव्हा पासून तिचा आत्मा तिथेच अडकून पडलाय असे सगळे म्हणतात. त्या भागात हमखास गाडी बंद पडते. का पडते ते कोणाला माहित नाही. पण ती बाई खूप जणांना दिसली आहे.” आम्ही गणपती बाप्पा चे नाव घेतले आणि पुढच्या प्रवासाला लागलो. आज ही कधी मुंबई ला जायचा बेत झाला की आम्ही रात्री चा प्रवास आवर्जून टाळतो.