अनुभव – सनील पेरवी

दरवर्शीप्रमाणे यावर्षीही आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. वर्षातून एकदा गावी भेटल्यावर आम्ही सगळी भावंडं खूप धमाल करायचो. दिवसा गावात इकडे तिकडे भटकायचो, पोहायला जायचो आणि रात्री गच्चीवर जाऊन २-३ वाजेपर्यंत खेळ खेळायचो. एकदा असेच संध्याकाळी पोहून घरी येत असताना आमची नजर बाजूच्या आंब्याचा कलमावर गेली. मे महिना असल्याने जिकडे तिकडे आंबेच आंबे दिसत होते. मग आमच्यातील एक भाऊ म्हणाला, “आज रात्री या आमराईत आंबे चोरायला येऊ”. आम्ही सगळे मजा मस्ती करण्याच्या उद्देशाने पटापट तयारही झालो. मग आम्ही सगळे ठरवतच घरी गेलो. रात्री सगळे झोपले की आपण हळूच मागच्या दाराने बाहेर पडायचे, घरातील मोठ्यांना कोणीच याबद्दल सांगायचे नाही असा बेत ठरला. रात्री जेवण वगैरे झाल्यावर घरातील सगळे झोपी गेले. आम्ही मात्र खोलीत बसून निघण्याची तयारी करत होतो. भाऊ बाहेर जाऊन पटकन खात्री करून आला पण सगळे झोपले नव्हते. आम्हाला वाट पहावी लागणार होती. साधारण २ वाजता घरतले सगळे निद्रेच्या आहारी गेल्यानंतर आम्ही हळूच मागच्या दाराने बाहेर पडलो.  

आंबे पाडल्यावर भरायला दोन गोणी घेतल्या होत्या. आणि वाट काढत त्या आमराईत शिरायला एक मोठी बॅटरी सोबत आणली होती. शक्य तेवढा आवाज न करता आम्ही झपाझप पावले टाकत आमराई च्याच दिशेने चालत निघालो. आम्ही त्या जेगापासून काही अंतर लांब असतानाच आम्हाला त्या ठिकाणी एक लाईट दिसला, बहुतेक मोबाईल फ्लॅश लाईट किंवा लहान बॅटरी चा लाईट असावा. आम्ही येण्याआधीच तिथे कोणी तरी होत. आम्हाला वाटले की कोणी राखणदार ठेवला असेल. आम्ही पटापट हातातल्या गोणी एका मोठ्या दगडाखाली लपवल्या आणि तिथे असलेल्या विहिरी मागे जाऊन लपून बसलो. तो राखणदार अजुन थोडा वेळ असेल मग एकतर निघून जाईल किंवा झोपून जाईल असे आम्हाला वाटले. थोडा वेळ आम्ही त्या विहिरी मागेच बसून राहिलो. अर्धा तास उलटला असेल. आता तिथे तो लाईट दिसत नव्हता. बहुतेक तो दुसरीकडे निघून गेला असा विचार करत आमच्यातला एक जण म्हणाला “गेला तो.. चला आपले काम करूया..” पण तितक्यात मी माझ्या मनातील शंका बोलावून दाखवली “अरे आपल्याला कसे कळणार की तो गेलाय.. झाडाखालीच झोपला असेल तर..? 

शेवटी बराच वेळ थांबून आम्ही सगळा बेत रद्द केला. काही वेळ आम्ही तिथेच बसून गप्पा मारत होतो. पण आमच्यातला एक मात्र शांतपणे बसून राहिला होता. अधून मधून आमच्या मागच्या दिशेला पाहायचा. त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसत होते. आम्हा सगळ्यांना पोहायचे खूप वेड होते. असाच बोलता बोलता आम्ही विहिरीच्या कठड्यावर जाऊन उभे राहिलो. विहिरच्या आत जे जिने असतात तिथे. आमचा तो एक भाऊ आमच्या विरुद्ध दिशेला उभा होता. पण त्याचे लक्ष आमच्याकडे नव्हते. तो आमच्या मागे पाहत होता. त्याला नक्कीच काही तरी दिसत होत. तो इतका टक लाऊन पाहत होता की मी त्याला आवाज देऊन सुद्धा त्याने माझ्याकडे पाहिले नाही. मी बाकीच्या भावांना हे सांगितले तसे आम्ही सगळ्यांनी मागे वळुन पाहिले. जे दिसले ते पाहून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास च बसला नाही. एक बाई आमच्या दिशेने धावत येत होती. सगळ्यात भयानक म्हणजे तिच्या शरीराने पेट घेतला होता. आम्हाला काही कळेनासे झाले. भीतीपोटी पाय जिमिनीला खिळले होते. धग धगत्या ज्वाळांनी पेटलेली ती आमच्या दिशेने धावत आली आणि बघता बघता विहिरीत उडी घेतली. 

आम्ही सगळे इतके घाबरलो होतो की कसलाही विचार न करता घराच्या दिशेने धावत सुटलो. मागून आम्हाला आर्त किंचाळ्या ऐकू येत होत्या. मला वाचवा.. अश्या मदतीसाठी हाका ऐकू येत होत्या. पण आम्ही मागे वळून न पाहता फक्त धावत होतो. कसे बसे आम्ही घरी पोहोचलो. मागच्या दरवाज्यातून आत शिरून थेट खोलीत धाव घेतली. पटापट सगळ्या लाईट सुरू केल्या. आमच्या सोबत जे घडले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. त्यात कोणालाही याबद्दल काहीच माहीत नव्हते. जे घडले ते भयंकर होते. म्हणून आम्ही जाणून घेण्यासाठी घडलेला प्रकार घरच्यांना सांगायचा निर्णय घेतला. त्या रात्री काही आम्हाला झोप लागली नाही. सकाळी सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. दुपारी जेवण झाल्यावर सगळे ऐकत्र बसलो होतो. तेव्हा रात्री घडलेला भयानक प्रकार आम्ही सांगून टाकला. आम्हाला सगळे खूप ओरडले. “तुम्हाला इथले काही माहीत नाही तर कशाला रात्री बाहेर जाता , ही मुंबई नाही आहे” असे खूप काही बोलले. आम्ही मान खाली घालून निमूटपणे सगळे ऐकून घेतले. किती ही झाले तरी चूक शेवटी आमची होती. पण आमच्या मनात असंख्य प्रश्न होते.

दुपारी सगळे झोपल्यानंतर आम्ही माझ्या काकीला सगळे विचारायला सुरुवात केली.  “हा नक्की काय प्रकार होता. ती बाई कोण होती, तिच्या सोबत काही घडले होते का?” ती आम्हाला शांत करत म्हणाली. सांगते पण हे तुमच्यातच ठेवा, घरात कोणाला कलुंडे नका. काकूंनी आम्हाला गोष्ट सांगायला सुरुवात केली. “जेव्हा मी लहान होते तेव्हा आपल्या शेजारी नुकतेच नवीन लग्न झाले होते. तिचे नाव वासंती होते. माझी तिच्याशी मस्त गट्टी झाली. मी दररोज तिच्याशी गप्पा मारायला जायचे. सुरुवातीचे काही महिने नीट गेले. पण नंतर वासंतीचा नवरा तिला रोज मारायचा. तिचा छळ करायचा. तिचे सासू सासरे सुद्धा तिला त्रास द्यायचे. पण तिला मात्र ते सहन करायला लागत होते. वासंती कडे दुसरा काही पर्याय नव्हता. ती तिचे मन माझ्या कडे येऊन मोकळे करायची. एके दिवशी शेवटी कंटाळून ती माहेरी निघून गेली. पण नाईलाज होता म्हणून काही दिवसांनी तिला परत घरी यावे लागले. त्या नंतर मात्र तिचा छळ वाढतच गेला. पण त्या रात्री जे घडले ते मी कधीच विसरू शकणार नाही. तिचे सासू , सासरे आणि नवरा तिला खाली शेतावर घेऊन गेले. ती गयावया करू लागली कारण बहुतेक तिला कळून चुकले होते की तिचे काय होणार आहे. 

तिथेच त्यांनी वासंतीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले. तिच्या किंचाळ्या गावापर्यंत ऐकू येत होत्या. ती वेदनेने ओरडत होती. गावकरी धावत येईपर्यंत खूप उशीर झाला. कोणीही वेळेवर तिच्या मदतीला येऊ शकले नाही. तिने विहिरीच्या दिशेने धाव घेतली. पण धावता धावता ठेच लागून तिचे डोके विहिरीच्या कठड्यावर आपटले आणि ती बेशुद्ध होऊन तिथेच बेशुध्द पडली. शरीराने पेट घेतल्यामुळे बेशुद्धावस्थेत च ती जळाली. गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले. तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली पण त्याचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यामुळे कालांतराने सगळे प्रकरण दाबण्यात आले. काही दिवसात तो सुटून बाहेर आला. मला खूप वाईट वाटत होते. कारण मी एक चांगली मैत्रीण गमावली होती. काही दिवसांनी त्यांच्या घरात खूप विचित्र प्रसंग घडू लागले. रात्री घराचे दार वाजायचे पण बाहेर कोणीही नसायचे. नंतर एके दिवशी त्यांच्या घरातली मांजर मरून पडलेली दिसली. काय घडतंय गावातल्या लोकांना कळत नव्हत. तिचा सासरा एक दिवशी – शेजारच्या गावी जातो ,असे सांगून गेला तो कधी परत आलाच नाही. बराच शोध घेण्यात आला पण तो कुठे गेला , त्याचं काय झालं , जिवंत आहे की नाही , कुणाला काहीच समजले नाही. पुढच्या काही दिवसात तिच्या सासूला हृदयवकाराचा झटका आला त्यात तीही देवाघरी गेली. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे २-३ महिन्यानंतर तिच्या नवऱ्यानेही राहत्या घरात तिच्याच साडीने पंख्याला लटकून आत्महत्या केली.

गावातले लोक असे म्हणायचे की वासंतीने तिचा सुड पूर्ण केला. आजही ती कधी कधी विहिरीजवळ दिसते. पण आजपर्यंत तिने कधी कोणाला त्रास दिलेला नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत असते रात्री बाहेर फिरत जाऊ नका..

Leave a Reply