अनुभव – तुषार कोळसकर
मी सध्या जॉब करतोय. हा अनुभव माझ्या दादा सोबत घडला होता. तेव्हा मी ११ वीला होतो. मी दरवर्षी माझ्या आत्त्या च्याच घरी गावी जायचो. त्या वर्षी मात्र सोबत माझा मोठा भाऊ सुशांत दादा ही सोबत येणार होता. तेव्हा तो दुसऱ्या शहरात जॉब ला असल्यामुळे त्याला गावी येणे जमायचे नाही. पण या वेळेस तो खूप वर्षांनी गावी खास यात्रेसाठी येणार होता. माझे वडील, आई आणि मी आम्ही बस ने गावी जायला निघालो. माझे वडील कामावरून उशिरा आल्यामुळे आम्हाला निघायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे शेवटची बस पकडुन आम्ही गावाला जायला निघालो. ती बस आम्हाला माझ्या आत्याच्या गावापासून ४ किलोमिटर अलीकडे हायवे ला सोडणार होती. आणि पुढून आम्हाला एखादे खासगी वाहन करून जावे लागणार होते. आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला तिथे सुशांत दादा सुद्धा भेटला. त्याला सुद्धा हायवे पर्यंत यायला वाहन मिळाले होते. मग आम्ही एकत्र जायला निघालो. पण बराच वेळ थांबून ही एकही वाहन मिळाले नाही. मग माझ्या वडिलांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
पण आई मात्र नको म्हणत होती, ती म्हणाली की थोडा वेळ आणखी वाट बघू एखादे वाहन मिळेल. इतक्या रात्री चालत जाणे कसे जाणार. त्यावर माझे वडील म्हणाले की आधीच आपण खूप वेळ थांबलोय, अजुन थांबलो तर उशीर होईल. एव्हाना आपण चालत निघालो असतो तर अर्धा रस्ता पार केला असता. पाऊण तासात आपण पोहोचू गावात. आई नको म्हणत होती कारण गावात जाणारा रस्ता रात्री अगदी निर्मनुष्य असायचा. आजूबाजूला घनदाट जंगल होते. पण वडिलांचे ऐकून आम्ही गावाकडचा रस्ता धरला. मला आणि आई ला भीती वाटत होती. त्यात किर्र अंधार. मध्येच कुठल्या तरी प्राण्याचा आवाज यायचा आणि धडकीच भरायची. माझे वडील आणि दादा रस्त्याने बिनधास्त चालत होते. त्या दोघांनीही हातात काठ्या घेतल्या होत्या. माझे वडील पुढे, मी आणि आई मध्ये तर दादा मागे असे आम्ही रस्त्याने चालत निघालो होतो. आम्ही जवळपास अर्धे अंतर पार केले असेल तितक्यात कुत्री व्हीवळण्याचा आवाज आला तसे मी आणि आई आम्ही दोघं ही घाबरलो. वडील मात्र आम्हाला धीर देत होते. तितक्यात आम्हाला लक्षात आले की आमच्या मागे दादा नाहीये.
आम्ही चौफेर नजर फिरवली पण तो कुठेही नजरेस पडत नव्हता. आई तर काळजी पोटी रडूच लागली. वडील तिला शांत करत होते पण मला जाणवत होते की ते ही आता घाबरले आहेत पण आम्हाला दाखवत नाहीयेत. आम्ही तिघही दादा ला हाका मारू लागलो. तो कुठे निघून गेला काही काळात नव्हत. वडील आम्हाला म्हणाले की अगोदर तुम्हाला गावात सोडतो आणि मग मी दादा ला शोधायला जातो. आई त्यांचे ऐकायला तयार नव्हती. वडिलांनी जेमतेम तिची समजूत काढली आणि म्हणाले की दादा ठीक असेल, सध्या तुम्ही सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढच्या २०-२५ मिनिटात आम्हाला गावात आणून सोडले. काही गावकऱ्यांना सोबत घेऊन ते पुन्हा दादा ला शोधायला निघाले. पण गावाच्या वेशी पर्यंत आले आणि समोर पाहतात तर काय.. दादा जंगलातून बाहेरच्या दिशेने चालत येताना दिसला. तो आपल्याच धुंदीत होता. अगदी शांत. तो जवळ आल्यावर वडिलांना त्याला भानावर आणत विचारले “सुशांत.. अरे सुशांत कुठे गेला होतास..”. पण तो एकदम शांत होता. त्याला बहुतेक काही कळत नव्हत. किंवा काय चाललेय ते समजत नव्हत.
त्याला घेऊन ते घरी आले, तो बाथरूम मध्ये जाऊन थोडा फ्रेश झाला. पण घरात थांबण्या ऐवजी तो घरातून बाहेर पडला आणि पुन्हा जंगलाच्या वाटेने चालू लागला. मी जोरात ओरडलो “दादा परत जंगलात चाललाय..” तसे वडील धावत त्याच्या मागे गेले आणि त्याला अडवले. त्याला विचारू लागले “काय झालेय.. काही बोलत का नाहीये स.. आणि कुठे जायला निघाला आहेस..”. त्याने वडिलांकडे पाहिले आणि अतिशय भरड्या आवाजात म्हणाला ” तू कोण रे मला विचारणारा..” त्याचा बदलेला आवाज समजून सगळ्यांना कळले की याला नक्कीच बाहेरची बाधा झाली आहे. जास्त वेळ न दवडता मामा ने जाऊन गावातल्या एका मांत्रिकाला बोलावून आणले. पण दादा काही कोणाचे ऐकत नव्हता. त्याला सांभाळणे माझ्या वडिलांना एकट्याला जमत नव्हते. म्हणून मग गावातल्या काही लोकांनी त्याला धरून ठेवले होते. पण काही वेळानंतर असे वाटू लागले की त्या ४-५ जणांना ही तो सावरत नाहीये. कुठून एवढी शक्ती संचारली होती काय माहित. शेवटी त्यातले दोघं तिघ म्हणाले की याला एका खांबाला बांधून ठेवू नाही तर आपल्याला ही जंगलात ओढत नेईल हा..
बऱ्याच प्रयत्नांनी त्याला एका मोठ्या खांबाला दोर खंडाने बांधून ठेवले. तो जोर जोरात ओरडू लागला, आक्रोश करू लागला. तितक्यात मामा त्या मांत्रिकाला घेऊन आला. त्याच्याकडे एका कलशात कसे तरी पाणी होते. तो काही तरी मंत्रोच्चार करत त्यातले पाणी त्याच्या अंगावर शिंपडू लागला. तसा दादा वेदनेने खूप ओरडू लागला. आम्हाला तर काहीच कळत नव्हते की त्याला काय झालंय. आई ला त्याची अवस्था पाहवत नव्हती. ती खूप रडत होती. हा सगळा प्रकार पाहून मला ही रडू आवरे नासे झाले. पण तितक्यात एक विचित्र प्रकार घडला. मांत्रिकाने मंत्रोच्चार आणि त्याच्या अंगावर कलशातले पाणी शिंपडायचे थांबवले आणि दादाला प्रश्न विचारला “कोण आहेस तू..” तसे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो जोरजोरात हसू लागला. मी त्याचे हे असे अचानक बदलले ले रूप पाहून प्रचंड घाबरलो. ते हास्य साधे नव्हते. त्यात प्रचंड चीड जाणवली. मांत्रिकाने पुन्हा त्याच्या नकळत ते पाणी त्याच्या अंगावर शिंपडले. तसे त्याने वेदनेने पुन्हा एक आरोळी ठोकली आणि रागातच बोलू लागला “सोड मला नाही तर मारून टाकेन तुला..”
मांत्रिकाने पुन्हा प्रश्न केला “कोण आहेस तू बोल.. कशाला या मुलाच्या अंगात प्रवेश केलाय.. निघून जा नाही तर तुझी खैर नाही..” तसे दादाच्या तोंडून अतिशय किळसवाण्या आणि भरड्या आवाजात एक वाक्य बाहेर पडल “मी शिरप्या.. विसरलास काय मला..”. तसे मांत्रिक म्हणाला “तू का आलास परत गावात.. याचे शरीर सोड.. या मुलाची काही चूक नाही..” तसे दादा पुन्हा म्हणाला “तो माझ्या वाटेत आडवा आला म्हणून मी याला धरले य.”. गावातली सगळी लोक हा भयाण प्रकार पाहत होती. बहुतेक त्यांना या बद्दल माहीत असावे असे मला उगाच वाटून गेले. त्या लोकांकडून पुन्हा माझे लक्ष मांत्रिकाकडे गेले. तो मोठ्याने मंत्रोच्चार करू लागला आणि दादा कडे पाहत विचारले “काय पाहिजे तुला.. तू मागशील ते देईन मी पण या मुलाचे शरीर सोडावे लागेल..”. दादा पुन्हा किळसवाण्या आवाजात हसू लागला आणि म्हणाला “मला माझा मान हवाय.. कोंबडा हवाय मला.. आणि दारू हविये दारू.. तरच याला सोडेन मी..”. मांत्रिकाने माझ्या मामा कडे पाहिले. तसे मामा ने पटकन जाऊन त्याच्या मागणीची व्यवस्था केली. जिथून दादा हरवला होता त्याच भागात त्या मांत्रिकाने तो कोंबडा आणि दारू ठेवायला सांगितली.
गावातल्या दोघा तिघा ना घेऊन मामा त्या जागेवर गेला आणि ते साहित्य तिथे ठेऊन आला. मामा परत येई पर्यंत दादा बेशुध्द झाला होता. आई खूप रडत होती.. पण दादा ची या भयानक प्रकारापासून सुटका झाली होती. नंतर आम्हाला मामा कडून समजले की ती शिरपा त्यांच्या गावातील एक दारुडा होता. दादा ला ज्या जागेवर त्याने धरले होते त्याच जागेवर त्याचा पाच वर्षांपूर्वी अपघात होऊन मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो रात्री येणाऱ्या वाटसरु ना त्रास देतो तर कधी कोणी त्याच्या वाटेत आले तर त्यांना झपटतो सुद्धा..