लेखक – अजय रामदास नान्नर

मी , राजु आणि सुरज आम्ही तिघेही चांगले मित्र आहोत. त्या दिवशी सहज म्हणून सकाळी आम्ही तिघांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला की आज रात्री मस्त नाईट ड्राईव्ह ला निघायचे. आम्हाला रात्री बाहेर फिरण्याची सवय होती आणि तेवढीच मज्जा ही येत असे. राजुला कधी एकदा आपण निघणार असे झाले होते. आम्ही ठरल्याप्रमाणे रात्री सगळे आटोपून आमच्या कार ने निघालो. बरीच रात्र झाली होती. मी वेळ पाहिले नाही पण कदाचित 11 वाजले असावेत. मी ड्रायव्हिंग करत होतो. पण ती रात्र या आधीच्या इतर रात्रीं सारखी नव्हती कारण आमच्या सोबत त्या भयाण रात्री काय घडणार आहे याची कोणालाही कल्पना नव्हती.

आम्ही आमचे गाव ओलांडून पुढे आलो. मी एकदम आरामात ड्रायव्हिंग करत होतो कारण रस्ता अगदीच सामसूम होता. एव्हाना रात्रीचे 12 वाजुन गेले होते. आता रस्त्यावर फक्त आम्ही होतो. सोबतीला आकाशातील चांदण्या आणि रातकिड्यांची किर्र आवाज तेवढाच काय तो होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी गडद अंधार पसरला होता. आमच्या वाहना शिवाय एकही वाहन दिसत नव्हते.. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरणात गारवा चांगलाच जाणवू लागला. आमच्या मस्त गप्पा चालल्या होत्या. गप्पा मारता मारता वेळ कधी निघून गेला कळलेच नाही. आमची कार आता पुढे घाटाच्या रस्त्याला लागणार होती. त्या घाटाला खूप जीवघेणी वळणे होती. जशी आमची गाडी त्या घाटाच्या रस्त्याला लागणार तसे राजू जरा घाबरतच म्हणाला “आपण या घाटात जायला नको कारण मी ऐकले आहे की या घाटात रात्री खुप अपघाती मृत्यू होतात आणि येथे रात्री अपरात्री आत्म्यांचा वावर असतो”. 

तसे मी जरा हसतच राजुला म्हणालो “राजू.. आजच्या जगात ही तुझा भुताखेतांवर विश्वास आहे. असे काहीही नसते रे.. हे सगळे आपल्या मनाचे भास असतात.. आणि आपण काय पहिल्यांदा रात्री बाहेर फिरतोय का..” माझे बोलणे ऐकून तो शांत बसला. पण तो जरा अस्वस्थ च वाटत होता. घाटाच्या रस्त्याला गाडी लागून निव्वळ काही मिनिट झाली असतील आणि तितक्यात आमची गाडी अचानक बंद पडली. बहुतेक पेट्रोल संपले. निघण्या आधी गाडीत पेट्रोल भरायचे लक्षात होते पण निघाल्यावर गप्पांच्या धुंदीत पूर्णपणे विसरून गेलो. मित्रांनी शिव्या घालाय ला सुरुवात केली की असे कसे विसरलास, आता इथे कोणी मदतीला ही येणार नाही वैगरे. मी गप्प बसून सगळे ऐकून घेतले. आता पुन्हा मागे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. काही वेळ थांबून कोणाची मदत मिळतेय का ते पाहू लागलो. पण जवळपास १०-१५ मिनिट झाली , साधे एकही वाहन दिसले नाही. शेवटी विचार केला की इथे थाबण्यात काही अर्थ नाही. आम्ही तिघांनीही गाडी तशीच लोटत घाटा बाहेर आणली. इतके काही जाणवले नाही कारण रस्ता तसा उताराचा होता. पण नंतर तिथून अजुन दीड दोन किलोमीटर गाडी ढकलत न्यावी लागली आणि ते अंतर मात्र आम्हाला चांगलेच जाणवले. नाईट ड्राईव्ह चांगलीच पथ्यावर पडली. नशीब चांगले की तिथून अलीकडे काही अंतरावर पेट्रोल पंप होते. आम्ही पेट्रोल भरले आणि घाटात जाण्यासाठी पुन्हा गाडी वळवली. तितक्यात गाडी समोर कुठून तरी एक माणूस आला आणि कार अडवत म्हणाला ” काय रे पोरांनो.. एवढ्या रात्रीचे तुम्ही या घाटात कुठे चालला आहात. तिथूनच आलात ना आत्ता..”

मी पटकन बोललो “काही नाही हो असेच फिरायला निघालो आहोत, नेहमी रात्री फिरतो. आज फक्त इथपर्यंत आलो आहोत. आम्हाला सवय आहे.” तो माणूस आम्हाला एक टक पाहतच होता. मी गाडी त्याच्या बाजूने नेऊ लागलो तसे तो म्हणाला “तुमचे तिथे जाणे बरे नाही. तिथे मृत्यूचा खेळ चालतो रात्री. आजपर्यंत ज्या कोणी या घाटात रात्रीच्या वेळी प्रवास केला आहे तो क्वचितच त्यातून बाहेर आलाय.. तुम्ही येथे नवीन दिसताय म्हणून सांगतो जाऊ नका.” आम्ही हो म्हणून पुढे निघालो. तसे ही आम्ही काही त्याचे ऐकणाऱ्यातले नव्हतो म्हणून आम्ही सरळ दुर्लक्ष केले. जवळपास निम्मा घाट आम्ही ओलांडला होता तोच अचानक एक विचित्र आवाज ऐकू येऊ लागला.. मी गाडीचा वेग कमी केला आणि आम्ही तिघे ही एकमेकांकडे पाहू लागलो. चेहऱ्यावर चांगलीच भीती जाणवत होती. राजू लगेच म्हणाला “मी तुला सांगत होतो.. आपण उगाच आलो इथे..” त्याचे बोलणे संपते ना संपते तोच समोरून एक सावली अगदी वाऱ्याच्या वेगाने सर्रकन गेल्या सारखे जाणवले. माझ्या अंगावर काटाच आला.

पण मी गाडी अजिबात थांबवली नाही. तितक्यात मला समोरून भरदाव वेगाने एक ट्रक आमच्या दिशेने येताना दिसला. मी त्याकडे पाहतच राहिलो कारण ट्रक जस जसा जवळ येऊ लागला तसे माझ्या लक्षात आले की आत ट्रक चालवणारा चालक च नाहीये.. सुरुवातीला मला वाटले की ट्रक च्या हेड लाईट मुळे मला ड्राइव्हर सीट वर बसलेला व्यक्ती दिसत नसावा. पण तसे नव्हते. मी नीट निरखून पहिल्या वर कळले की त्या ट्रक मध्ये खरंच कोणीही नाहीये. मी मित्रांना सांगायला म्हणून काही क्षणासाठी त्यावरून नजर हटवली आणि पुन्हा समोर पाहिले पण तिथे तो ट्रक नव्हता. माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला.. मला नक्की भास झाला की समोरून खरंच ट्रक येत होता. मला हा काय प्रकार काय आहे तेच कळत नव्हत.

असे वाटू लागले की हा प्रकार पंपावर असलेल्या माणसाने सांगितल्या प्रमाणे ” मृत्यूचा खेळ ” आहे. आणि आता आम्ही या खेळात पुरते अडकून पडलो आहोत. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेऊ लागलो आणि माझे लक्ष पुन्हा समोर गेले. तोच ट्रक पुन्हा आमच्या समोरून येताना दिसला. पुढच्या काही सेकंदात त्याने कार ला अतिशय जोरात धडक दिली. तो अपघात इतका भीषण होता की जबर जखमी होऊन आमची तिथेच शुद्ध हरपली. डोळे उघडले तेव्हा आम्ही गावात दवाखान्यामध्ये होतो. मला कळत नव्हते की त्या निर्जन रस्त्यावर आमचा अपघात झाल्यावर आम्हाला इथे कधी आणि कोणी आणून ठेवले. माझ्या घरच्यांना कळल्यावर ते सगळे दवाखान्यात आले. देवाच्या कृपेने आम्ही थोडक्यात वाचलो. आम्ही घडलेला सगळा प्रकार घरी सांगितला. पूर्ण बरे व्हायला बरेच दिवस लागले. काही दिवसांनी आम्हाला हॉस्पिटल मधून डीस चार्ज मिळाला आणि मी घरी आलो. 

बरेच दिवस उलटले. त्या दिवशी घरात साफ सफाई सुरू होती तेव्हा एका जुन्या फोटो अल्बम कडे लक्ष गेले. सहज म्हणून मी तो अल्बम पाहायला घेतला. जुने फोटो पाहून छान वाटत होते. त्या अल्बम ची पाने पलटत असताना मी ६व्या किंवा ७व्या पानावर आलो आणि एक फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोटो मध्ये तोच माणूस होता जो पेट्रोल पंपा जवळ आमच्या गाडी समोर आला होता. मी धावत आई कडे गेलो आणि तिला विचारले की हा व्यक्ती कोण आहे. तसे आई ने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. आई म्हणाली की हे तुझे मामा.. पेट्रोल पंपावर कामाला होते. एकदा घाटातून जात असताना त्यांना एका ट्रक ने चिरडले आणि त्यातच ते गेले. तू खूप लहान होतास तेव्हा. तुला आठवत ही नसेल त्यांचा चेहरा.. मी विचार करतच राहिलो. ते आम्हाला तिथे जाऊ नका हे सांगायला आले होते पण आम्ही त्यांना न जुमानता घाटात गेलोच. बहुतेक त्यांनीच आम्हाला येऊन वाचवले असेल. मी शांत झालो होतो. ते म्हणतात ना ” देव तारी त्याला कोण मारी..”

या घटनेनंतर आम्ही कधीच त्या घाटात फिरायला गेलो नाही.

Leave a Reply