अनुभव क्रमांक – १ – वासिम खान

ही घटना २००८ साली माझ्यासोबत घडली होती. आम्ही नुकतेच एक घर भाड्यावर घेतले होते. घरात मी, आई, बाबा आणि माझी ३ वर्षाची भाची असे ४ जण राहत होतो. घर तसे छान होते म्हणजे हॉल, किचन, बेडरूम आणि घरा समोर एक छोटासा बगीचा. आजूबाजूला वस्ती तशी तुरळक होती. आम्ही नवीनच राहायला आल्यामुळे त्या परिसरा बद्दल आणि घरा बद्दल काही माहिती नव्हती. आमचा त्या घरात पहिलाच दिवस होता. सगळे सामान शिफ्ट करे पर्यंत संध्याकाळ होत आली होती. शिफ्टिंग च्या कामामुळे आम्ही सगळे प्रचंड थकलो होतो. त्यामुळे लवकर जेवण आटोपून आम्ही झोपायची तयारी करू लागलो. 

त्या दिवशी आम्ही सगळे हॉल मध्येच झोपलो होतो. माझा बेड हॉल च्याच मोठ्या खिडकी ला लागून होता. थकवा आल्यामुळे अंथरुणात पडल्या पडल्या मला गाढ झोप लागली. पण काही तासाने मला अचानक जाग आली. मध्य रात्र उलटुन गेली असावी. मी घड्याळात पाहिले तर दीड वाजला होता. मला कळले नाही की अचानक जाग का आली. मी डोळे मिटून तसाच पडलो आणि मला एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज तसा साधा नव्हता. असे वाटत होते की कोणीतरी तिला बेदम मारते य आणि मदतीच्या आशेने ती रडतेय. मला वाटले की शेजारी वैगरे कोणाकडे भांडण चालू असेल म्हणून दुर्लक्ष केलं आणि पुन्हा झोपून गेलो. 

दुसरा दिवस ही राहिलेल्या सामानाची शिफ्टींग करण्यात गेला. बेडरूम, किचन मध्ये सगळे समान नीट लावले. त्या रात्री ही पुन्हा मला दीड च्याच सुमारास अचानक जाग आली. कारण तेच. एका मुलीच्या विचित्र रडण्याचा आवाज. मी जरा गांभीर्याने विचार करून बाहेर जाऊन पाहायचे ठरवले. आई बाबा गाढ झोपेत होते. हॉल चाई दरवाजा उघडला तर त्याच्या आवाजाने त्यांना जाग येईल म्हणून मी बेडरूम मधून गॅलरी मध्ये गेलो आणि तिथून उडी मारून घराच्या बाहेर पडलो. तिथून काही पावलं चालत बाहेर आलो आणि सगळी कडे पाहू लागलो. तितक्यात रस्त्याकडे एक लहान मुलगी बसलेली दिसली. काळया रंगाचा फ्रॉक घातला होता. अंधार असल्यामुळे चेहरा नीट दिसला नाही. त्यात ती मान खाली टाकून बसली होती. तसे मी २-३ पावले तिच्या जवळ जात विचारले “क्या हुआ आपा?.. आप इतनी रात मे यहा क्या कर रही हो?”

तिने मान वर करून माझ्या कडे पाहिले आणि सुन्न च झालो. तिच्या डोक्यावरून रक्ताची पिचकारी उडत होती जसे कोणी एखाद्या लोखंडी रॉड ने डोक्यावर जोरदार प्रहार केला आहे. डोळ्याची बुबळे पांढरी शुभ्र होती. तिच्या चेहऱ्यावरून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मी प्रचंड घाबरलो आणि तसाच मागे वळून घराच्या दिशेने धावत सुटलो. गॅलरीत उडी घेऊन बेडरूम मध्ये आलो. बेडरूम चा दरवाजा ही तसाच उघडा ठेऊन हॉल मध्ये आलो आणि अंथरुणात जाऊन ब्लँकेट घाबरून चेहऱ्यावर घेतले. काही वेळानंतर मला माझ्या बेड च्याच बाजूच्या खिडकी बाहेर कसलीशी हालचाल जाणवली. मी हळूच चेहऱ्यावरून ब्लँकेट खाली करून पाहू लागलो आणि माझी बोलतीच बंद झाली. 

ती मुलगी खिडकी ला अगदी लागून उभी होती. या वेळेस ती रडत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होते. ती हसतच मला म्हणाली “चल मेरे साथ.. मै बहोत परेशान हूं । मुझे यहां से निकाल कर ले जा कहीं।”.. तिचे ते बोलणे ऐकून अंगातला सगळा त्राणच संपला होता. घाबरत पुन्हा ब्लँकेट चेहऱ्यावर घेतले आणि तसाच पडून राहिलो. ती रात्र मी एक क्षण ही झोपलो नाही कारण भीतीपोटी झोप लागणे शक्यच नव्हते. इतके सगळे घडूनही मी आई बाबांना काहीच सांगितले नाही. पण हा प्रकार रोज रात्री घडू लागला. रोज त्याच वेळेला म्हणजे साधारण दीड वाजता मला जाग यायची आणि खिडकी जवळ येऊन ती मुलगी मला बोलवायची. 

कित्येक दिवस मी कोणालाही न सांगता हा सगळा प्रकार अनुभवत होतो. नंतर माझी तब्येत बिघडू लागली. मी खूप आजारी पडलो. शेवटी n राहवून आई ला इतके दिवस घडत असलेला सगळा प्रकार सांगितला. तसे तिने सुचवले “तू इमाम सहाब के पास जा और उन्हें ये सब बता”. आईच्या सांगण्यानुसार त्याच दिवशी मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना राहायला आल्यापासून च्याच सगळ्या घटना सविस्तर सांगितल्या. त्यांनी मला एक ताविज दिले आणि कायम जवळ बाळगायला सांगितले. मी ते घेऊन घरी आलो. एवढे सगळे घडत असल्यामुळे माझी रात्रीची झोप जवळ जवळ उडाली होती. म्हणजे भीतीने रात्री झोपच लागायची नाही. पण त्या रात्री मला बऱ्यापैकी झोप लागली. अधून मधून जाग यायची पण पुन्हा झोपही लागायची. पण त्या दिवसानंतर ती मुलगी मला पुन्हा कधीच दिसली नाही आणि तो आवाज यायचा ही कायमचा बंद झाला. 

आम्ही ते घर २००९ साली सोडून स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला आलो. पण आजही रात्री कधी अचानक जाग आली की जाणवते की ती माझ्या जवळच आहे आणि मला बोलावतेय. 

अनुभव क्रमांक – २ – अनिकेत मसाये

हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईब र अनिकेत मसाये यांनी पाठवला आहे. 

भूत, प्रेत, आत्मा याबाबत खूप काही ऐकले असेल आपण सर्वांनी. काही जणांचा विश्वास असतो तर काही जण सरळ हा विषय निघाला की चेष्टा , मस्करी करतात. मी सुद्धा त्यातलाच एक होतो पण त्या दिवशी मला तो अनुभव आला आणि…

नुकतीच आमची बारावी ची परीक्षा संपली होती. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी सगळ्या मित्रांनी पिकनिक ला जायचे ठरवले. खूप चर्चा करून शेवटी माझ्या गावी कोकणात जायचा बेत पक्का झाला. निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी कोकणासारखे दुसरे सुंदर ठिकाण क्वचितच असेल. माझे गाव तेव्हा ही तसे बरेच प्रगत झाले होते. आम्ही ही नुकतेच नवीन घर बांधले होते. त्यामुळे पिकनिक होईल आणि त्या निमित्ताने मित्रांना घर बघता येईल असा विचार करून मी सगळे ठरवले होते. 

शेवटचा पेपर झाल्यावर २ दिवसातच आम्ही सगळी तयारी करून गावी जायला निघालो. सगळे खूपच उत्साही होते. रात्रीची कोकण कन्या एक्स्प्रेस पकडून मस्त मजा मस्ती करत आम्ही गावी पोहोचलो. माझ्या मित्रांना सगळे खूप आवडले. सगळे खूप खुश होते त्यामुळे २ दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. आमच्या पिकनिक चा ३ रा दिवस होता आणि त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही पुन्हा घरी जायला निघणार होतो. त्यामुळे तिथली शेवटची रात्र असल्यामुळे आम्ही जागरण करायचे ठरवले. त्या रात्री जेवण उरकून आम्ही साधारण ११ च्याच सुमारास घराच्या बाहेरच्या बाजूला मस्त गप्पा मारत बसलो होतो. शाळेतल्या , कॉलेजच्या आठवणी मुळे गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. 

गोष्टींमध्ये रमल्यामुळे २ कधी वाजून गेले कोणाला पत्ताच लागला नाही. आमच्यापैकी बरेच जण आता पेंगु लागले होते. हळू हळू एक दोन करत सगळे घरात जाऊन झोपून गेले. पण मला आणि माझ्या २ मित्रांना झोपच येत नव्हती त्यामुळे आमच्या गप्पा चालूच होत्या. साधारण २.३० वाजून गेल्यावर वातावरणात अचानक थंडावा वाटू लागला. मला आश्चर्य वाटले की मे महिना चालू असताना असा थंडावा येण्याचे कारण काय असावे. मला आजोबांनी सांगितलेल्या विचित्र गोष्टी आठवू लागल्या. तसे वातावरण ही एकदम भकास वाटू लागले. मी मित्रांना म्हणालो की चला खूप उशीर झालाय आपण आत जाऊ. पण मित्र इतके गप्पांमध्ये रंगले होते की त्यांना झोपायची अजिबात इच्छा होत नव्हती. 

मी त्यांना सांगायला काय गेलो आणि उलट ते माझीच टिंगल करू लागले, मला भित्रा म्हणू लागले. म्हणून मग मी सुद्धा धीर दाखवत स्वतःचे हसू होऊ नये म्हणून त्यांच्यासोबत बाहेरच बसलो. तितक्यात बाजूच्या आमाराईतून आंबे पडण्याचा आवाज येऊ लागला. जसे कोणी पोतेभर आंबे झाडावरून सरळ खाली टाकतेय. वारा तर अजिबात नव्हताच पण जरी वादळी वारा सुटला असता तरी इतके आंबे पडणे शक्य नव्हते. आम्ही तिघेही शांत राहून त्या दिशेने पाहत होतो. तितक्यात अचानक घराच्या खालच्या बाजूने एक पांढरी आकृती सर्रकन एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाऱ्याच्या वेगाने धावत गेली. माझे काळीज भीतीने धड धडू लागले होते. आम्ही एका क्षणासाठी नक्की काय पाहिले हेच उमगले नाही. आमच्या कोणाच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हता. आम्ही घाबरून सरळ घरात धाव घेतली. 

धावतच घरात शिरल्याने बाकीचे सगळे मित्र जागे झाले. त्यांना आम्ही सगळा प्रकार सांगितला. त्या रात्री भीतीपोटी आम्हाला एक क्षणही झोप लागली नाही. ती रात्र आम्ही कशी काढली आमचे आम्हालाच माहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आमच्या कुलदेवतेच्या मंदिरात गेलो तेव्हा थोडे शांत वाटले. तिथून निघताना माझ्या गावातले मित्र भेटले. त्यांना रात्रीचा प्रकार सांगितला. तेव्हा त्यातला एक मित्र म्हणाला “तुम्ही थोड्यासाठी वाचलात. तुम्ही फेऱ्यात अडकला होता सोनकीच्या. बऱ्याच वर्षांपूर्वी तिने घरच्यांना कंटाळून खालच्या विहिरीत जीव दिला होता, त्या नंतर ती बऱ्याच जणांना दिसते. तिचा रात्रीचा फेरा असतो. गावात ओरडत फिरते, सासूला आणि नवऱ्याला शिव्या देत.. तिच्या वाटेत कोणी आले तर त्यांना झपाटते. आम्ही सुद्धा त्या रात्री तिच्या फेऱ्यात अडकता अडकता वाचलो..” त्याचे बोलणे ऐकून आम्ही मित्र एकमेकांकडे पाहतच राहिलो.

या घटनेला आता बरीच वर्ष झाली. आम्ही दरवर्षी गावी जातो पण रात्री अपरात्री बाहेर अजिबात थांबत नाही. या प्रसंगानंतर एक गोष्ट कळली की माणसाला एखादा वाईट अनुभव आयुष्यभराची शिकवण देऊन जातो असे म्हणतात तेच खरे. 

https://youtu.be/9dGubfmjNPk

Leave a Reply