अनुभव क्रमांक १ – कृतिका जाधव

लहानपणापासून ते अगदी आत्तापर्यंत मला एकाच गोष्टीची उत्सुकता लागलेली असायची ती म्हणजे आज आजी आपल्याला कोणती नवीन गोष्ट सांगणार. तिच्याकडून ऐकलेल्या बऱ्याच ‌गोष्टींपैकी ही एक गोष्ट अर्थात तिला तिच्या लहानपणी आलेला एक भयानक अनुभव….

 मी १२-१३ वर्षांची असेन… तेव्हा मला रोज सकाळी लवकर उठून फुले वेचाय ला जायचा छंद होता; माझ्या सोबत काही मैत्रिणीसुद्धा यायच्या. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका डोंगरा पलीकडे मोठी फुलबाग होती. रोज सकाळी लवकर उठून, फुलांची परडी घेऊन नेहमीच्या ठरलेल्या जागी जायचे… फुले वेचून झाली की मग गावातून फेरफटका मारत घरी परतायचे.. हा नेहमीचा दिनक्रम. 

असेच एक दिवस मी अचानक झोपेतून दचकून उठले.. मला वाटलं परत झोपावस.. पण अचानक डोळयांसमोर चित्त मोहून टाकणारी ती फुलं व त्यांचा सुगंध येऊ लागला. मी धावतच घराच्या अंगणात गेले.. बाहेर चंद्राचा मंद प्रकाश आणि शांतता पसरलेली.. मी सगळ्यांहून लवकर उठले म्हणून खूप खुश होते…आज सर्व फुले मी वेचणार या भावनेने मी लगेच फुलांची परडी घेऊन डोंगराकडच्या वाटेला लागले. पायाखाली काहीही न बघता अगदी बेभान धावत सुटले होते. जसे की कोणीतरी मला बोलावूनच घेत आहे… 

केवळ चंद्राच्या त्या उजेडावर मी पायवाट काढत होते. आता फुलांचा गंध अगदी माझ्या डोक्यात जाऊन भिनला. मला भोवळ येते न येते… तोच माझ्या डोळ्यांसमोर फुलांची ती बाग दिसली. मला थोडे हायसे वाटले. वेळ न दवडता मी फुले वेचू लागले…मोगरा, जाई-जुई, शेवंती, केवडा अगदी सगळीच.. एक..दोन असे करता करता किमान एक तास तरी त्याच फुलांभोवती मी फिरत राहिले. मला माझेच भान राहिले नव्हते. मात्र भरलेली फुलांची परडी बघून मला खूप बरे वाटले. 

कोणी यायच्या आधी लगेच घराची वाट धरायला हवी म्हणून पाठ वळवणार तोच दूरुन एक म्हातारे बुवा येताना दिसले.. माझ्याच दिशेने येत होते ते.. आता आपल्याला ओरडा मिळतोय की काय हया भीतीने जरा घाबरलेच. आता पळत तरी कुठे जाणार म्हणून तसेच खाली मान घालून उभे राहिले. ते जरी माझ्यापासून दूर अंतरावर असले तरी ते अगदी वाऱ्याच्या वेगातच थेट माझ्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी जरा रागातच विचारले,” इथे काय करतेस गं मुली ?… मी जरा चाचपडतच बोलले, “अं..ते…फु..ऽफुले वेचायला आले होते. मला फुले खूप आवडतात ना म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही रोज येतो इथे..पण तुम्ही कधी दिसला नाहीत आजोबा ?”… 

त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, “आता गप्प चल माझ्यासोबत घराकडे”..असे म्हणून ते पुढे चालू लागले. माझी ही पुष्कळ फुले गोळा करून झाली होती म्हणून मी ही त्यांच्या मागे मागे चालू लागले. वाटेत फक्त मी एकटीच बोलत होते ते आजोबा मात्र काही न बोलता पुढे चालत राहिले. बोलता बोलता माझं घर कधी आलं मला कळलंच नाही..त्या आजोबांना हाक देणार तोच ते तिथून पुढे निघून ही गेले होते. पुढे जायच्या घाईत असतील कदाचित असा विचार करून मी माझ्या घराच्या दारासमोर येऊन उभे राहिले. दार ठोठावणार तोच मला भोवळ आली आणि मी खाली पडले….

पहाट झाली होती.. अंग खूप जड झाल्यासारखे वाटत होते, तरी अंथरूणातून थोडे उठले आणि आवाज दिला, “अऽआई… बाबा… कुठे आहात सगळे?” इतक्यात घरातील सगळेच माझ्याभोवती येऊन उभे राहिले‌ आणि आश्चर्याने पाहू लागले. तसे मी म्हणाले,”काय झाले?..सर्वजण असे का बघताय?… अगं आई माझी फुलांची परडी कुठेय आणि?…आज मी खूप फुले आणली आहेत. मला छानसा गजरा ही बनवायचा आहे त्यातून…सांग ना गं”.. मला बोलताना बघूनच आई हुंदके देत रडू लागली आणि मला घट्ट कवटाळून म्हणाली,”देवाची च कृपा म्हणायची, वाचली माझी लेक..” बाबांनी मला विचारले की नक्की काय झाले काल रात्री तेव्हा मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

घडलेलं सगळं त्यांच्या लक्षात आले, त्यावर ते म्हणाले की,”बाळं तुला आठवत नसेल तर एक सांगू, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत..उन्हाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झालेत..ह्या दरम्यान डोंगरा पलीकडची फुलबाग ओसाड पडली असते, अगदी निर्जिव.. तुला पहाट जरी वाटली असली तरी मध्यरात्री उठून तू फुल वेचायला गेली होतीस. चकव्याच्या जाळ्यात तू अडकली गेलीस. तुला तेथे चकव्याने नेलं हे खरंय..पण तुला ज्यांनी तेथून सुखरूप परत आणलं ते म्हातारे आजोबा दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या गावाचे राखणदार होते !”.

अनुभव क्रमांक २ –

अनुभव माझ्या आईच्या काकी ला आला होता. त्यांना आम्ही मोठी आई म्हणायचो. ही गोष्ट साधारण ३०-३५ वर्षांची असावी. माझ्या आईचे माहेर शहरात होते. ते एका चाळीत राहायचे. तेव्हा सगळे जवळच्या मिल मध्ये सकाळी कामाला जायचे. त्यामुळे त्यांचे डबे वैगरे करायला मोठ्या आईला पहाटे च लवकर उठायला लागायचे. 

चाळ म्हंटले की शौचालय सार्वजनिक. त्यामुळे तिथे कधी लाईट असायची तर कधी ट्यूब उडाल्यामुळे अंधारातच जावे लागायचे. चाळीपासून काही अंतरावर ते सार्वजनिक शौचालय होते. एके रात्री पहाट झाली म्हणून मोठी आई उठली. एका हातात रॉकेल चा दिवा आणि दुसऱ्या हातात पाण्याची बादली घेऊन ती शौचास जायला निघाली. तिथे महिलांसाठी २ शौचालय वेगळी होती. एक नवीनच बांधले होते तर एक बरेच जुने होते. जुने शौचालय बऱ्याच आतल्या बाजूला होते. शक्यतो तिथे कोणी जात नसे. पण त्या दिवशी मोठी आई तिच्याच धुंदीत त्या जुन्या ठिकाणी गेली.

तिने रॉकेल चा दिवा बाजूच्या धक्क्यावर ठेवला आणि मशेरी काढून दात घासू लागली. तितक्यात तिला जाणवले की तिच्या मागच्या बाजूला कोणी तरी उभे आहे. तिने थोडे मागे वळून पाहिले पण काळोख असल्याकारणाने चेहरा नीट दिसत नव्हता. तिला वाटले की आपल्याच चाळीतली एखादी बाई असावी म्हणून ती तिच्याशी बोलू लागली. पहाट झाली तरी अजुन बराच काळोख आहे ना आज. पण ती मागची बाई काहीच बोलली नाही. बहुतेक अंधार असल्यामुळे तिने तिला ओळखले नसेल असे समजून ती म्हणाली “अग बाई मी दाखवते उजेड माझ्याकडे दिवा आहे काळजी नको करुस”. 

मशेरी ची शेवटची पिचकारी मारत मोठ्या आई ने धक्यावर ठेवलेला बाजूचा दिवा उचलला आणि तिच्या दिशेने फिरवला. तितक्यात ती बाई आता शौचास निघून गेली. तिचा चेहरा तेव्हा ही नीट दिसला नाही कारण तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. तसे ती पुन्हा म्हणाली मी थांबते इथे बाहेर. तिने जवळ जाऊन दिवा तिच्या बाजूला ठेवला आणि तिची अवस्था पाहून मोठी आई स्तब्ध च झाली. ते दृश्य अस होत की तिने डोके शौचालयाच्या भांड्यात आत घालून पाय वर केले होते. तिची ती भयानक अवस्था पाहून मोठी आई जोरात ओरडली आणि तशीच घराच्या दिशेने धावत सुटली. धावत असताना मागून ती बाई सतत ओरडत होती “वाचलीस बाय तू.. परत ये सोडणार नाय तुला”

आईने अजिबात मागे वळून न पाहता घर गाठले आणि आत आली. नकळत तिचे घड्याळाकडे लक्ष गेले तर अडीच वाजले होते. दुसऱ्या दिवशी मोठ्या आईला ताप भरला होता. त्या नंतर ती कधीच रात्री किवा पहाटे एकटी गेली नाही. जेव्हा ही जायची तेव्हा सोबत कोणाला तरी घेऊन जायची. काही महिन्यानंतर तिने म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांना बोलताना ऐकले की ते जुने शौचालय होण्याआधी तिथे एका गरोदर बाईला मारून फेकले होते. असे म्हणायचे की ती कोणत्या न कोणत्या सुंदर बाईला घेऊन जायची आणि जेव्हा मोठी आई गेली तेव्हा अमावस्या होती. 

कथा ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा :

https://youtu.be/mRFYxNYImLg

Leave a Reply