अनुभव मी २०१७ मध्ये नोकरी निमित्त एके ठिकाणी राहायला होतो तेव्हाचा आहे. मी एक छोटेसे घर भाड्याने घेतले होते. घर एक मजल्याचे होते. म्हणजे खाली एक तळ मजला आणि वर एक. मी वरच्या मजल्यावर राहायचो आणि खालचा मजला ही एका व्यक्तीला दिला होता. नवीन जागा असल्यामुळे सुरवातीचे काही दिवस माझी आई माझ्या सोबत राहत होती. सगळं चांगल आणि सुरळीत चालू होत. काही दिवसांनी आई माझ्या राहत्या घरी म्हणजे मुंबई ला निघून गेली आणि मी त्या रूम वर एकटा राहू लागलो. सुरवातीला सगळं नॉर्मल चालू होत पण त्या घरात मला रात्री नीट झोप यायची नाही. मला वाटायचं की नवीन जागा आहे म्हणून तसे होत असेल पण त्याचे खरे कारण काही तरी वेगळेच होते. काही दिवस उलटले. खालच्या रूम मध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी लग्न कार्य असल्यामुळे तो रूम बंद करून त्याच्या गावाला निघून गेला. तेव्हा मी त्या संपूर्ण घरात एकटाच होतो. आधीच रात्री झोप लागायची नाही त्यात मला एकटे राहायचे आहे या कल्पनेने थोडी धास्ती वाटू लागली. मला तो दिवस अजुन ही आठवतोय. त्या दिवशी मी कामावरून उशिरा घरी आलो. भूक नसल्यामुळे हात पाय धुवून थेट अंथरुणात येऊन पडलो. थोड्या वेळ मोबाईल घेऊन नेट सर्फ केले. साहजिक च झोप लागत नव्हती. तितक्यात टेरेस वरून कसलासा आवाज आला. मला वाटले की उंदीर वैगरे असेल आणि तो वर ठेवलेल्या अडगळीतून जात असताना एखादे सामान पडले असेल. कारण टेरेस वर बरीच अडगळ होती, जुने सामान ठेवले होते. कोणाचे होते काय माहीत. म्हणून मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं.

बऱ्याच वेळा नंतर मला झोप लागली. पण पुन्हा कसल्याश्या आवाजाने जाग आली. तो आवाज वेगळाच होता. जसे टेरेस वर कोणी तरी चालतंय. मी कानोसा घेऊ लागलो तेव्हा वाटले की कोणीतरी हळूच एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे पळत गेलं. मी एकदम दचकलो. एकतर मी संपूर्ण घरात एकटा, त्यात मला चांगले लक्षात होते की मी आज घरी येताना मेन गेट चे कुलूप नीट लावले होते. त्यामुळे टेरेस वर जाण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. वर कोण असेल या कल्पनेनेच धडकी भरू लागली. ती रात्र मी तशीच जागून काढली. दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि मी सुट्टी निमित्त घरीच होतो. आदल्या रात्री सारखा १२.३० च्या सुमारास पुन्हा टेरेस वरून आवाज येऊ लागला. या वेळेस मात्र धीर केला आणि रूम मधून बाहेर पडलो. दबक्या पावलांनी वर जिना चढत गेलो आणि टेरेस वर आलो. पण तिथे कोणीही दिसले नाही. भास तर नक्कीच नव्हता कारण काल ही जवळजवळ संपूर्ण रात्र तो आवाज येत होता. निराश होऊन पुन्हा खाली रूम मध्ये आलो. जसे आत शिरलो तसा पुन्हा वर आवाज सुरू झाला. मी तसाच धावत वर गेलो पण वर पाहतो तर कोणीही नाही. हा प्रकार काही तरी विचित्र आहे हे एव्हाना कळून चुकले होते. म्हणून तसाच रूम मध्ये आलो.

पुढच्या विकेंड ला मी मुंबई ला गेलो आणि २ दिवस राहून सोमवारी सकाळी रूम वर आलो. खालच्या गेट च लॉक आणि माझ्या वरच्या रूम च लॉक उघडल आणि मला आश्चर्य वाटल. कारण घराच्या आत थोडी धूळ जमा झाली होती. म्हणजे घरात कसले फर्निचर वैगरे काम काढल्यावर कशी धूळ वजा माती जमा होते तसे काहीसे. मला विचित्र च वाटले कारण एरव्ही जरी दार आणि खिडक्या उघड्या राहिल्या तरी इतकी धूळ कधीच जमा होत नाही. तसाच रूम मध्ये आत चालत गेलो आणि समोरचे दृश्य पाहून जागीच स्तब्ध झालो. त्या धुळी मध्ये लहान मुलाच्या पायांचे ठसे उमटले होते. आणि ते ही घरभर फिरल्याचे. आता मात्र माझा सगळा धीर संपला कारण मी घराची चावी कोणालाच दिली नव्हती. माझ्या बंद घरात कोणी कस घुसू शकत आणि ते पण लहान मूल. बस निर्णय झाला, आता या पुढे इथे राहणे अशक्य आहे. तसाच मित्रांना फोन केला आणि नवीन घर शोधायला सांगितले. त्याच संध्याकाळी माझ्या मित्राच्या खोलीवर निघून गेलो. काही दिवस त्याच्याकडेच राहिलो. बरोबर लागणार सगळं सामान पण नेलं होत. 2 आठवड्यात मला दुसरी रूम मिळाली आणि मी ही सोडून दिली. त्या रूम मालकाला जास्त काहीच सांगितले नाही आणि सांगितलं असत तरी कोणी विश्वास ठेवला असता म्हणा. आज ही हा प्रसंग आठवला की वाटत तेव्हा त्या विकेंड ला जर मी मुंबई ला न जाता तिथेच थांबलो असतो तर मला काय पाहायला मिळालं असत याचा नेम नव्हता. ह्या प्रकरणातुन सहीसलामत सुटलो म्हणून देवांचे आणि माझ्या मित्रांचे खूप आभार मानले होते. 

Leave a Reply