मी गेले ६ वर्ष एका ग्राम पंचायत कार्यालयात क्लार्क या पदावर कार्यरत आहे. सदर अनुभव येण्याआधी मला भूत, आत्मा अश्या गोष्टीबद्दल विश्वास नव्हता. मला हा अनुभव सन २०१८ च्या मार्च महिन्याच्या शेवटी आला होता. त्यावेळी मार्च एडींग ची कामे जोरात सुरू होती कारण वार्षिक हिशोब क्लोज करणे हे काम खूप महत्वाचे होते. माझे गाव तसे 12000 लोकसंख्या असलेले गाव त्यामुळे साहजिक लोकांची दिवसा ये जा जास्तच असायची. त्यात सर्व कामे ही ऑनलाइन झाल्यामुळे सर्व महिन्याचे हिशोब हे ऑनलाइन भरावे लागत असत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात मार्च end असल्यामुळे सर्व ग्रामपंचायत आपली आपली सर्व कामे close करण्यात व्यस्त असल्यामुळे सर्व्हर चालत नसे. त्यामुळे मी रात्री उशिरा पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात कामे करण्यासाठी बसत असे. कारण तिथे मध्ये इंटरनेट ची सोय होती व सर्व लेखे जोखे तिथंच असायचे. त्यामुळे काम करायला रात्री लोड कमी असल्यामुळे सर्व्हर चांगले चालायचे. मला तो दिवस अजूनही आठवतोय. शुक्रवार होता. साधारण रात्रीची 8 वाजले असावेत. मी माझ्या कामात अगदी मग्न झालो होतो.

तितक्यात आमच्या गावापासून 3 कि. मी लांब असलेल्या एका वाडीवरचे नीलकंठ गाडेकर हे आजोबा आले. त्यांचं वय 88 असावे. ते एकटेच राहत होते. त्यांची मूल तशी कामा निमित्ताने मुंबईला असत. ते आले आणि त्यांनी मला विचारले “इतक्या रात्री पर्यंत काम करतोयस?” मी हो म्हटलं आणि मार्च end असल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले “मला माझ्या घराचा 8 अ उतारा हवा आहे”. त्यांना मी सांगितलं की ग्रामविकास अधिकारी साहेब आले की मी सही घेऊन ठेवतो, तुम्ही उद्या या. ते ठीक आहे म्हणत निघून गेले. गाव खूप मोठ असल्यामुळे आणि march end आणि त्यात आमच्या साहेबांची तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यांचा येण्याचा काही अंदाज नव्हता, तरी दुसऱ्या दिवशी रात्री त्याच वेळी 8 वाजता ते आजोबा आले. मी बघितलेच नाही ते कधी आले किंवा जाणवलं ही नाही. ते माझ्याशी काही बोलले ही नाहीत पण नकळत माझं लक्ष त्यांच्याकडे गेले. मी त्यांना विचारले “अहो आजोबा, कधी आलात..?” माझे बोलणे ऐकून ते काहीच बोलले नाहीत. फक्त एकटक माझ्याकडे बघत उभे होते. मी त्यांना म्हटलं ” अहो आजोबा मी तुम्हाला आज यायला सांगितले पण आमचे साहेब आजारी आहेत.. ते सुट्टीवर आहेत.. त्यामुळे तुमच्या घराच्या उताऱ्यावर सही नाही झाली”. ते थोडा वेळ तिथल्या एका बाकड्यावर जाऊन बसले. माझ्याकडे २-३ वेळा पाहिले.

मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला खरंच वेळ नव्हता म्हणून मी माझ्या कामात परत व्यस्त झालो. नंतर साधारण अर्ध्या l तासाने परत माझे लक्ष गेले. तर ते अजूनही गेले नव्हते. एकटक माझ्याकडे पाहत होते. मी त्यांना विनंती करत म्हटलं “आजोबा, घरी जा तुम्ही आता.. खूप उशीर झाला आहे.. मी साहेब आल्यावर घेईन सही आणि तुम्हाला कळवीन..” तसे ते निघून गेले.  दुसऱ्या दिवशी अगदी तसेच त्याच वेळेत ते आले. न बोलता माझ्याकडे एकटक बघत उभे, साहेब आजारी असल्यामुळे मला त्यांना घराचा उतारा देता येईना. मी तेच कारण संगितले, तरी ते तसेच उभे माझ्याकडे विचित्र एकटक बघत होते. त्यादिवशी ही मी माझ्या कामात खूप व्यस्त होतो म्हणून काम करू लागलो. पुन्हा साधारणतः १ तासाने पाहिले, ते तसेच तिथे बसून होते. मी त्यांना परत घरी जाण्यास सांगितले आणि त्यांची माझे ऐकलेही. पुढचे सलग 9 दिवस असाच प्रकार चालू होता. दहाव्या दिवशी साहेब आले आणि त्यांच्याकडून मी आठवणीत गाडेकर आजोबांच्या घराचा उतारा काढून सही घेऊन ठेवली, कारण मला माहित होते की ते येतीलच त्या रात्री. नेहमी प्रमाणे उशिरा पर्यंत काम करत राहिलो. 10 वाजले पण ते काही आले नव्हते. कधी नव्हे पण त्या दिवशी माझ्या मनात विचार आला की त्यांच्या वाडीवरून इतक्या लांब रोज रात्रीचे ते कसे काय येतात. ते रात्री १०.३० ला आले. 

त्यांना आल्याचे पाहून मी लगेच म्हणालो “झालं तुमचं काम आणि हे घ्या, घेऊन जा तुमच्या घराचे उतारे”. त्यांना कागदपत्रे दिली तरी ते तसेच माझ्याकडे सतत बघत होते. वयो मानानुसार त्यांचे वागणे थोडे बदलले असावे असे मला वाटून गेले. मी त्यांना जायला सांगितले आणि ते निघून गेले. ते गेल्यावर मला त्या रात्री खूप विचित्र वाटले. कारण गेली 10 दिवस हे काहीच बोलत नाही फक्त येऊन एकटक पाहतात आणि निघून जातात. आणि रात्रीच का येतात..? मी मनात म्हटलं जाऊ दे झालय त्यांचं काम.  त्या नंतर १ दिवस उलटला आणि दुपारी गाडेकर काकांचा मुलगा आला. त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यू ची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करायची होती. त्याने तशी चौकशी करताच मी झटकन त्याला विचारले “अहो कधी झालं.. काल आजोबा रात्री आले तेव्हा तर ठीक वाटत होते, घराचा उतारा घेऊन गेले, एका रात्रीत असे काय घडले. तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहून म्हणाला “काय बोलताय तुम्ही.. बाबाना जाऊन आज 11 दिवस झाले आणि मला त्यांच्या मृत्यूची नोंद करायची आहे आणि काही पण काय बोलता तुम्ही?” हे ऐकल्या नंतर मला दरदरून घाम फुटला. एक अवाक्षर बोलता येत नव्हते. कारण जर आजोबा ११ दिवसांपूर्वी गेले तर मग मागील 9 दिवस जे माझ्याकडे येत होते ते कोण होते…?

मी त्यांना माझ्या बरोबर आमच्या मिटिंग हॉल मध्ये घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलो “अहो मी खर सांगतोय मी गेले 9 दिवस त्यांना रात्री पाहतोय, मला माहित नाही पण हा काय प्रकार आहे..” त्यांनी मला धीर देत सावरलं आणि काळजी घ्या असे सांगितले. पण मी शांत बसलो नाही. मला लक्षात आले की नुकताच आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात सी सी टी व्ही लावण्यात आले आहेत. मी सर्व फुटेज चेक करण्यास सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गाडेकर आजोबा कुठेच दिसले नाही. मी खरंच खूप घाबरलो होतो. त्या दिवशी जाणवले की ही अश्या गोष्टी खऱ्या असतात. मी माझ्या काकांना याबाबतीत विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मृत्यू नंतर दशक्रिया हा विधी होई पर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा इथेच असतो आणि त्याला पुढील योनी किंवा मोक्ष हा दशक्रिये च्या नंतर मिळतो. जाताना आजोबा त्यांच्या घराचा उतारा घेऊनच गेले कारण पहिल्या दिवशी ते जेव्हा आले तेव्हा ते बोलत होते आणि त्यांना मी रोज उद्या या असच सांगत होतो. पण दुसऱ्या दिवसापासून ते काहीच बोलत नव्हते हे माझ्या लक्षात आले. पहिल्या रात्री आले त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे ते येत होते, म्हणजे मला ते दिसत होते. तो प्रसंग आजही आठवला तरी अंगावर काटा येऊन जातो.

Leave a Reply