लेखिका – दर्शना शशिकांत कुलकर्णी

 हातातली सामानाची पिशवी सावरत मिनलने खिशातून मोबाईल काढला. आईचे 5 मिस कॉल्स झाले होते. मिनलने पटकन आईला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली आणि फोन कट झाला. आई कामात असेल असा विचार करून मिनल पुढे चालू लागली, हॉस्टेलच्या दारात पोहोचते न पोहोचते तोच आईचा व्हिडीओ  कॉल आला. मिनलने लगेच फोन घेतला आणि समोर धरला.

वेळेवर फोन का उचलला नाही म्हणुन नेहमीप्रमाणे आई आधी भरपूर ओरडली. मग विचारपूस सुरू केली. “काय मग नवीन हॉस्टेल मधे करमतय ना ? सगळ व्यवस्थित आहे ना तिकडे ? बाकी मुलींसोबत ओळख वगैरे झाली का ? ” आईने विचारल.

” हो..हो..अगं कालच तर शिफ्ट झालेय मी इकडे…अजून रूळायला वेळ लागेल आणि आत्ताच मार्केट मधुन काही सामान आणलय, अस म्हणत मिनलने हातातली पिशवी दाखवली….बर ते जाऊदे तु माझ हॉस्टेल बघ अस म्हणुन मिनल फोन फिरवुन दाखवू लागली. आई सुद्धा कुतुहलाने पाहत होती. “सो हे आहे ‘प्रतिक्षा वर्किंग वुमेन हॉस्टेल’ आणि ही आहे माझी रूम नंबर 37. दरवाजा उघडत मिनल पुढे बोलु लागली, “हा आहे माझा बेड..हे टेबल आणि हे माझ कपाट..काल रात्री जागुन सगळ सामान मी व्यवस्थित लावलय आणि हा आहे माझ्या रुममेटचा बेड आणि पलिकडे तिच सामान..रूचिता नाव आहे तिच..मागच्या आठवड्यातच ती इथे शिफ्ट झालीय. ” मिनलने व्हिडीओ कॉल मधुन आईला संपुर्ण रूम दाखवली..

” ते तिकडे समोर भिंतीवर पेपर कसले चिकटवले आहेत गं ?”,आईने विचारल. 

त्या भिंतीजवळ जात मिनल बोलली,”अग ही खिडकी आहे. हॉस्टेलच्या सगळ्या रूममध्ये या बाजूच्या खिडक्या अशाच न्यूजपेपर लावून बंद केल्या आहेत आणि त्यापुढे हे कपाट लावल होत..मला तिथे कपाटाची अडचण वाटली म्हणून मी ते बाजूला घेतल.”

आईला हा प्रकार जरा विचित्र वाटला..ती म्हणाली, “पण अस सगळ्या खिडक्या पेपर लावून का बंद केल्यात ? आणि कपाटामागे का लपवल्यात? काही कारण ? “

मिनल म्हणाली,”हो कारण आहे ना..रेक्टर नी इकडे सगळ्यांना सक्त ताकीद दिलीय की कुणीही रूममधली या बाजुची खिडकी उघडायची नाही आणि हॉस्टेलच्या पाठीमागच्या बाजुला तर अजिबात फिरकायच नाही.”

“का ?”,आईने विचारलं…

“का ते त्यांनी स्पष्ट नाही सांगितल..पण इतर मुलींकडून समजल की तिकडे एक तलाव आहे….त्या तलावात एका बाईचं भूत आहे म्हणे आणि तो तलाव या खिडकीतून स्पष्ट दिसतो म्हणुन यावर न्यूजपेपर लावून सगळ्या रूममधल्या खिडक्या कपाटामागे लपवल्यात.”, मिनल बिनधास्तपणे बोलुन मोकळी झाली पण तिची आई मात्र भलतीच घाबरली. ” मिनल जपून रहा ग बाई आणि तुला दुसर कुठल हॉस्टेल नाही का मिळाल “, आई रागवत म्हणाली.

” आई तुला माहितीय ना की माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. तसही प्रत्येक हॉस्टेल मध्ये घाबरवायला अशा काही ना काही गोष्टी सांगितल्या केला.

       संध्याकाळी कसल्यातरी आवाजानी मिनलला जाग आली. “झाली का झोप ?”,अस म्हणत रूचिता तिच्या शेजारी येऊन बसली. रात्रभर दोघींनी भरपूर गप्पा मारल्या. एका दिवसातच दोघींची चांगलीच गट्टी जमली.

          दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अॉफिस मधून परत येताना मिनलची नजर एका छोट्याशा मांजरीवर पडली. ती तिच्या मागे गेली पण ती मांजर एक तारेच कुंपण ओलांडून पलिकडे पळाली. मिनलने कुंपणाच्या पलिकडे पाहिल..तिकडे काही अंतरावर एक सुंदरसा तलाव होता. त्या तलावाच्या आसपासच वातावरण अतिशय रम्य होत. 

एक रमणिय सुर्यास्त, थंडगार वारा, पाण्याची संथ हालचाल,पाखरांची किलबिल कुणालाही अगदी सहज मोहून टाकेल अस वातावरण होत. मिनल मुग्ध होऊन त्या तलावाकडे पाहत होती इतक्यात तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला..तिने दचकुन मागे बघितल..

“अग घाबरतेस काय मी आहे रूचिता तुला इकडे येताना पाहिल म्हणून तुझ्या मागे आले.”

“तू आहेस काय..मी किती घाबरले माहितीय..”, मिनल म्हणाली

“पण तू इथे काय करतेय? इकडे यायच नाही सांगितलय ना आपल्याला..रेक्टरला जर कळाल ना तर आपली काही खैर नाही..”रूचिता म्हणाली 

“तुझा विश्वास आहे या गोष्टींवर ? “,मिनलने विचारल.”अजिबात नाही..मी तर तुला घाबरवण्यासाठी बोलले” ,अस बोलून रूचिता जोरजोरात हसू लागली…..

         दोघी परत जाण्यासाठीे वळल्या, मागे पाहताच दोघी दचकल्या. मागे वॉचमन काका उभे होते. 

” इथे नविन दिसताय तुम्ही दोघी म्हणून जास्त बोलत नाही..आत्ता इकडे आलात पुन्हा येऊ नका”,एवढ बोलून त्या वयस्कर वॉचमन काकांनी दोघींना तिथुन जायचा इशारा केला तशा त्या दोघी तिथुन निघुन आल्या. हॉस्टेलच्या  गेटजवळ आल्यावर रूचितानी वॉचमनला विचारल,”काका काय आहे ओ त्या तलावाजवळ ? का तिकडे कुणाला जाऊ देत नाही?”

ते वॉचमन काका बराच वेळ काहीच बोलले नाहीत. काही वेळानी ते सांगू लागले, इथल्या मुलींना घाबरवायचा माझा काही हेतू नाही पण त्यांना सावध करण हे माझ कर्तव्य आहे अस मी मानतो. त्यांनी दोघींना बसण्याचा इशारा केला तशा दोघी एका पायरीवर बसल्या. वॉचमन काका म्हणाले, “जवळपास 150 ते 200 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी या ठिकाणी एका सावकाराचा वाडा होता त्या वाड्यात ‘ कमला ‘नावाची एक दासी काम करायची..कमला दिसायला सुंदर होती आणि बुद्धीमान सुद्धा होती. वाड्यात नेहमी तिच्या चातुर्याच भरपूर कौतुक व्हायच. सावकार सुद्धा कमलाच नेहमी कौतुक करत असत. पण सावकारच्या पत्नीला मात्र कमलाचा प्रचंड हेवा वाटायचा. कमला सावकाराची खास दासी बनते की काय किंवा आपली जागा ती घेते की काय अशी धास्ती नेहमी तिच्या मनात असे. शेवटी एक दिवस सावकाराच्या पत्नीने काही शिपायांना हाताशी धरून एक कट रचला आणि कमलावर आपले दागिने चोरल्याचा आरोप लावला. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. शिपायांनी कमलाची झडती घेतली आणि ठरल्याप्रमाणे तिच्या गाठोड्यमध्ये सगळे दागिने सापडले. कमला चोर आहे तिने सावकाराच्या पत्नीचे दागिने चोरले अस म्हणत गावकरी लाठ्या काठ्या घेऊन तिला मारायला धावले. कमला जिव मुठीत धरून जंगलाच्या दिशेनी पळत सुटली. रात्रीची वेळ होती, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. हा तलाव तुडुंब भरला होता.

धावता धावता एका दगडावरून कमलाचा पाय घसरला आणि ती या तलावात पडली. हात पाय मारत ती जिवाच्या आकांताने ओरडत होती पण कुणी तिला वाचवायला पुढे आल नाही. सगळे गावकरी तलावाच्या कडेला उभे राहून कमलाला बुडताना बघत राहिले. काही वेळाने पाणी शांत झाले आणि सगळीकडे एक भयाण शांतता पसरली. त्या दिवसानंतर जो कोणी त्या तलावाच्या जवळ गेलाय तो परत कधीच आला नाही आणि चुकून कुणी परत आलच तर त्या व्यक्तीची मानसिक स्थिती पुर्णपणे बिघडलेली असते. काय घडल, काय पाहिल हे सांगण्याइतपत शुद्ध त्या व्यक्तीमध्ये राहिलेली नसते. “

       कमलाची गोष्ट ऐकून रूचिता आणि मिनल आपल्या रूम मध्ये आल्या. जेवण उरकून त्या दोघी विचार करत बसल्या.

“तुझा या गोष्टीवर विश्वास आहे ?”, रूचिताने विचारले.

“नाही, मला हे पटत नाही…काका म्हणाले ती गोष्ट 150 ते 200 वर्षांपूर्वी घडून गेलीय..आणि ज्या गावकऱ्यांमुळे त्या कमलाचा जिव गेला ते लोक तर कधीच या जगातून गेले असतील मग आता अजूनही तिच भुत वगैरे लोकांना त्रास देत या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मला यामागे काहीच लॉजिकच सापडत नाही “,मिनल म्हणाली.

“मुळात माझा तर या कमलाच्या गोष्टीवरच विश्वास नाही कारण हे खरच घडलेल की नाही याबाबत काहीच पुरावा नाही, ऐकिवातल्या गोष्टी आहेत सगळ्या आणि तसही प्रत्येक हॉस्टेलमधे अशी एकतरी भुताची स्टोरी असतेच ना. आपण एक काम करू…..तिथे जाऊन हे सिद्ध करून दाखवू की ही स्टोरी साफ खोटी आहे. मला तर अशा थरारक गोष्टी करायला फार आवडत. मी या सगळ्या अनुभवाचा एक मस्त व्हिडीओ बनवणार आहे आणि आल्यावर सगळ्यांना दाखवणार आहे की हे बघा तुमच भूत. “,

अस म्हणत रूचिता हसू लागली.

       त्या रात्री दोघींनी मिळून त्या तलावाजवळ जाण्याचा प्लान बनवला. सुट्टीचा दिवस म्हणून रविवारी रात्री जायच अस ठरल. रविवारचा दिवस उजाडला ठरल्याप्रमाणे दोघी मागच्या गेटवरून उडी मारून बाहेर आल्या..वॉचमन काका झोपले होते. त्या दोघी तशाच कुंपणापर्यंत येऊन पोहोचल्या. काही ठिकाणी कुंपणाच्या तारा तुटलेल्या होत्या त्यांच्यामधून सहज पलिकडे जाता येत होत. थोड्याच वेळात दोघीजणी त्या तलावाच्या काठावर पोहोचल्या. रूचिता व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होती. तलावाजवळ एक वेगळीच शांतता होती. थंडगार वारा वाहत होता. मधेच कुठुनतरी रातराणीचा सुगंध दरवळत यायचा. लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी भरलेल आकाश किती सुंदर दिसत होत.  रातकिड्यांशिवाय दुसर कुठलही अस्तित्व त्या क्षणी त्यांना तिथे जाणवल नाही. बराच वेळ दोघींनी तलावाजवळ गप्पा मारल्या मग काही फोटो काढले आणि परत जायला निघणार इतक्यात तलावाच्या पाण्यात कसलीतरी हालचाल जाणवली. त्या जागीच थांबल्या. हवेमध्ये एक वेगळाच गारवा जाणवू लागला होता. इतका वेळ रम्य वाटणार वातावरण अचानक  बदलून गेलं. तलावाच्या पाण्यातून हळू हळू काही तरंग उठू लागले. गोल गोल उठणाऱ्या त्या तरंगांमधून पाण्याचे छोटे छोटे बुडबुडे वर येत होते. हा सगळा प्रकार रेकाँर्ड करण्यासाठी रूचिता फोन घेऊन पुढे गेली तिने काठावरून थोड पुढे जात पाण्यामध्ये डोकावून पाहिल, आतमध्ये एक पुसटशी आकृती तरंगत होती. पाणी जरा संथ झाल.  पुसट दिसणारी ती आकृती आता पाण्याच्या आत रूचिताला अगदी स्पष्ट दिसू लागली . 

त्या आकृतीकडे पाहून रूचिताचे पाय जागिच गोठून गेले होते. हातातला फोन खाली पडला. हिरवी साडी, कपाळावर मोठ्ठ लाल कुंकू, पांढर फुगलेल शरिर आणि उघडे डोळे जे नजर रोखून जणू आपल्याकडेच बघत आहेत अस तिला वाटलं. पाण्यामध्ये तरंगताना जे दिसत होत ते तिच्या समजण्यापलिकडच होतं. मागे वळून ती मिनलला काही सांगणार इतक्यात एक जोरदार किंकाळी त्यांच्या कानावर पडली. तलावाच्या पाण्यातून एक हात वर आला आणि त्याने रूचिताला त्या पाण्यात खेचून घेतल. हिरव्या बांगड्या घातलेला आणि रक्तबंबाळ झालेला तो सफेद हात पाहून मिनलच्या अंगाचा थरकाप उडाला. एका क्षणात तिच्या समोर तिची मैत्रिण अदृश्य झाली होती. मिनलला काय कराव काही सुचत नव्हत. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती जिव मुठीत धरून हॉस्टेलच्या दिशेने धावत सुटली. धावता धावता कुंपणाच्या तारेमधे पाय अडकून ती धाडकन जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. डोळे उघडले तेव्हा ती तिच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये होती. समोर तिची आई, रेक्टर, वॉचमन काका, डॉक्टर, इतर मुली सगळे तिच्याकडे पाहत उभे होते. सगळ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता, रूचिता कुठे आहे ? मिनलने बोलण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिने हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण शरिर साथ देईना.

तिने फक्त डोळ्यांनी एक नजर फिरवून त्या खिडकीकडे इशारा केला आणि त्यातच घडलेला प्रकार सर्वांनी समजून घेतला. पुढे रितसर पोलिस तक्रार करण्यात आली पण रूचिता कुठेच सापडली नाही. मिनल कायमची पुर्णपणे कोमात गेली. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तिला जाणवत होत्या पण ती प्रतिसाद देऊ शकत नव्हती. 

       पोलिसांच्या तपासात तलावाकाठी रूचिताचा फोन सापडला. त्यामध्ये रात्रीत रेकॉर्ड झालेले काही फुटेज आणि आवाजांवरून त्या जंगलाच्या आतल्या बाजूला एखाद्या टोळीकडून काही बेकायदेशीर कृत्य केलीे जात असावीत व कुणी जंगलाच्या दिशेने फिरकू नये म्हणून लोकांना घाबरवले जात असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला. पुढे त्यानुसार कारवाई देखिल करण्यात आली. पण दुर्दैवाने जंगलात झालेल्या एका अपघातात त्या टोळीतील सर्व सदस्य मारले गेले. 

       त्या रात्री तलावाकाठी मिनल आणि रूचिताने जे काही पाहिल तो त्यांचा भास होता, त्या टोळीने त्यांना घाबरवून दहशत पसरवण्यासाठी केलेला कट होता, जे दिसल ते खरचं कमलाच सत्य होत की आणखी काही हे कोड मात्र शेवटपर्यंत कुणालाच सुटल नाही. 

          रूचिता नक्की गायब कुठे झाली, त्या टोळाचा जर हा कट होता तर याआधी सुद्धा अशाच पद्धतीने घडलेल्या घटनांच काय, ती जर खरचं कमला होती तर ती अजूनही इतके वर्ष निर्दोष लोकांचे बळी का घेत होती……प्रश्न अनेक होते पण सगळ्यांची उत्तरं मात्र त्या तलावात दडली होती.

       स्थानिक लोकांच्या मते जंगलात बेकायदेशिर काम करणाऱ्या त्या टोळीच्या अपघातामागे कमलाचाच हात होता. त्या तलावाने रूचिताचा बळी घेतला होता आणि मिनलला जिवंतपणी मरणयातना देत स्वत:मधल्या रहस्याची सर्वांना नव्याने जाणिव करून दिली होती.

Leave a Reply