प्रसंग माझ्या बालपणीचा आहे. नीट आठवत नाहीये पण बहुतेक पाचवी किंवा सहावी मध्ये शिकत असेन. शाळेतून नुकताच घरी आलो होतो. पण एरव्ही पेक्षा आज खूप खुश होतो कारण आज आम्ही घरातले सगळे म्हणजे मी, आई , बाबा आणि माझी लहान बहीण सिनेमा पाहायला जाणार होतो. बऱ्याच महिन्यांनी जाणार होतो. आमच्या घरापासून सिनेमागृह जवळच होते , म्हणजे चालत गेले तर १५-२० मिनिटात पोहोचू इतक्या जवळ. वडील तसे साडे आठ पर्यंत ऑफिस वरून घरी यायचे पण त्या दिवशी सिनेमा पाहायला जाणार म्हणून लवकर येणार होते. शाळेतून घरी आल्या आल्या मी हात पाय धुवून अभ्यासाला बसलो. म्हणजे नंतर आई चा ओरडा खायला नको. काही वेळ पुस्तक नुसते समोर धरून बसलो होतो, किती अभ्यास चालला होता माझे मलाच माहीत. खरे तर माझे लक्ष होते ते घड्याळाकडे कधी एकदा ८ वाजतात.

बघता बघता ८ वाजले, वडील घरी आले. आम्ही जेवण उरकले आणि ८.४० च्या सुमारास घराबाहेर पडलो. त्या काळी सिनेमा म्हंटला की वेगळीच मजा यायची कारण तेव्हा घरी टिव्ही वैगरे आले नव्हते. चालत निघालो असलो तरी काही वेळात आम्ही सिनेमा गृहाजवळ पोहोचलो, वडिलांनी तिकिटे काढली आणि आम्ही आत गेलो. कोणता सिनेमा होता माहीत नाही पण पाहायला गेलो ते महत्त्वाचे होते. सिनेमा संपल्यावर आम्ही बाहेर आलो आणि अगदी मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. निघताना जराही वाटले नव्हते की इतक्या जोरात पाऊस लागेल त्यामुळे छत्री, रेनकोट वैगरे सोबत काहीच आणले नव्हते. एखादे वाहन पहावे तर ते ही इतक्या रात्री मिळणे जवळजवळ अशक्य होते. 

वडील म्हणाले की काही वेळ थांबून पाहू एखादे वाहन मिळतेय का.? आणि नाही मिळाले तर तो पर्यंत पावसाचा जोर ही कमी होतो का ते बघू. वेळ लक्षात नाही पण सिनेमा संपूर्ण तास दीड तास झाला असेल. म्हणजे दीड वाजला असावा. पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिप रीप सुरूच होती. आम्ही तसेच भिजत घराकडे यायला निघालो. वडील निघताना फक्त एकच वाक्य बोलले की वाटेत जाताना जास्त बोलू नका, कोणी हाक मारली तर थांबून मागे वळू नका, प्रतिसाद देऊ नका. मला जर विचित्र च वाटले. कारण दिवसा असे ते बोलले असते तर मी समजू शकलो असतो पण इतक्या रात्री कोण का हाक मारेल.. आमच्या भागात तर साडे नऊ नंतर च शुकशुकाट व्हायला लागतो. असो. वडिलांचे बोलणे ऐकायचे ठरवले. आमच्या घरापासून काही अंतरावर एक चिंचेचे मोठे झाड आहे.

आम्ही तिथून जात असताना मला मागून कसला तरी आवाज आला. “श् शं..” मी पटकन थांबलो आणि मागे वळणार तितक्यात वडिलांनी माझा हात खेचला आणि मी भानावर आलो. ते मला काहीच बोलले नाहीत फक्त डोळ्यांनी इशारा केला की मागे बघू नकोस. अवघी २-३ पावलं टाकली आणि पुन्हा एक आवाज कानावर पडला “ ए थांब.. मी पण येते “. भीतीने सर्वांग शहारले. कारण तो आवाज खूप च विचित्र वाटत होता. माझी पावले जागीच खिळली. आई, बाबा आणि माझी लहान बहीण पुढे चालत जाऊ लागले. मी बाबांना हाक देणार तितक्यात जणू माझे तोंड दाबले गेले आणि मला काहीच बोलता आले नाही. काही अंतर पुढे चालत गेल्यावर माझ्या वडिलांनी सहज मागे वळून पाहिले आणि ते अतिशय वेगात माझ्याकडे धावत आले. 

एका झटक्यात त्यांनी मला उचलून घेतले आणि धावतच येत बहिणीला ही दुसऱ्या कडेवर घेत आई ला म्हणाले “ जागा ठीक नाही.. “ मी प्रचंड घाबरलो होतो. पुढच्या काही वेळात आम्ही घरी आलो. मी आई ला विचारले “ आई तुला पण हाक ऐकू आली का ? “ ती मला गप्प करत म्हणाली “ हळु बोल, बाबा ओरडतील.. त्या चिंचेच्या झाडाजवळ हडळ आहे असे गावातली लोक म्हणतात. लहान मुलांना भुलवून ती घेऊन जाते. कदाचित.. “  “काय नसत भरवते य पोरांच्या डोक्यात, काही कळतं की नाही तुला..” बाबा मोठ्याने आई वर ओरडले. त्या नंतर घरात तो विषय कधीच निघाला नाही. पण त्या चिंचेच्या झाडावर हडळ राहते य बद्दल मला आमच्या परिसरातल्या लोकांकडून कळाले होते.  

Leave a Reply