अनुभव – डॉ. रोहित कुलकर्णी

मी डॉक्टर रोहित कुलकर्णी , माझ स्वतःच क्लिनिक आहे जिथे मी दिवसभर असतो आणि या व्यतिरिक्त एका छोट्या हॉस्पिटल मध्ये नाईट ड्युटी करतो.

माझ्या सोबत हॉस्पिटल मध्ये एक नर्सिंग स्टाफ, एक वॉर्ड बॉय ज्यांना आम्ही मामा म्हणतो आणि एक मावशी असायच्या.

पूर्ण हॉस्पिटल मध्ये आम्ही रात्री चौघचं असायचो.

रात्री काम उरकून झाल्यानंतर मामा खाली गेट जवळ झोपायचे ,मावशी आणि नर्स काउंटर जवळ झोपत ,आणि मी एका रूम मध्ये झोपत असे.

मी रूम मध्ये एकटा असायचो. पण मला सतत वाटत राहायचं की आमच्या चार जणांशिवाय कोणी तरी या हॉस्पिटल मध्ये आहे जे रात्री आमच्या वर नेहमी लक्ष ठेऊन असते.

पण कोणी कधीच दिसत नव्हतं त्या मुळे मी हा माझा भास असावा असं समजून दुर्लक्ष करायचो.

हॉस्पिटल जॉईन करून मला जवळपास दोन तीन महिने होऊन गेले असतील. मी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं. सगळे चांगले ओळखीचे झाले होते.

नेहमी प्रमाणे मी त्या रात्री 10 वाजता ड्युटी ला आलो. ऍडमिट असलेल्या पेशंट चा राऊंड घेतला. रायटिंग वर्क पूर्ण केलं. काम झाल्यानंतर आम्ही चौघे गप्पा मारत होतो. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या … त्या दिवशी मावशी बोलता बोलता बोलून गेल्या की आज अमावस्या आहे. त्यांचे ते एक वाक्य ऐकुन एकदम वेगळेच वाटले जसे काही तरी घडणार आहे. पण तेव्हा आम्ही गप्पांत रंगलो असल्यामुळे माझ दुर्लक्ष झालं.

काम कधीच आटोपले होते आणि गप्पा मारून ही झाल्या होत्या. एव्हाना जवळपास एक किंवा सव्वा वाजला असेल. आम्हाला सर्वांना झोप येऊ लागली म्हणून आम्ही आमच्या आमच्या जागेवर गेलो. मी रूम मध्ये गेलो, दरवाजा बंद केला आणि माझा बेड रेडी करून अंग टाकले. मी दिवसभर क्लिनिक मध्ये असल्याने थकून गेलो होतो म्हणून डोळे मिटल्या मिटल्या मला गाढ झोप लागली.

पण रात्री अचानक मला छाती मध्ये धडधड जाणवायला लागली आणि असे वाटू लागले, की आपल्या छातीवर कोणी तरी बसलय आणि ते जे काही आहे ते माझ्या कडे टक लावून बघत आहे. जणू मी डोळे उघडायची ते वाट बघत आहे. मला अचानक घाम फुटायला लागला. काही वेळात मी घामानी चिंब भिजून गेलो. माझं शरीर माझी साथ देत नव्हतं. तस बघितलं तर मला जाग आलेली होती. म्हणजे मेंटली मी जागा झालेलो होतो. त्यामुळे माझ्या सोबत काय घडतंय हे मला समजत होत. हात पाय एकदम परालाईझ झाल्यासारखे वाटत होते, काही हालचाल करण्याचा त्राण देखील माझ्या शरीरात नव्हता.

मी अगदी बेंबी च्या देठा पासून ओरडायचा प्रयत्न करत होतो आणि मदतीसाठी बोलावू बघत होतो. पण माझा आवाज निघणे सोडा माझे ओठ सुद्धा उघडले जात नव्हते. माझ्या बेंबीच्या देठापासून निघालेला आवाज जणू माझ्या घशामध्येच अडकला होता. डोळे उघडायचा अतोनात प्रयत्न सुरू होता पण ते ही जमत नव्हते.

माझे हात-पाय यांच्यावर माझं काहीही नियंत्रण नव्हतं. मी पूर्ण ताकद लावून हलण्याचा, उठण्याचा, ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण तो अयशस्वी ठरत होता.

मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागलो आणि माझ्या छातीवर बसलेली आकृती हळु हळु स्पष्ट होऊ लागली. संपूर्ण काळपट शरीर, नाकाचा भाग अतिशय टोकदार भासत होता. साधारण दोन अडीच इंच लांब असतील इतके काळे पिवळे झालेले सुळ्यासारखे तीक्ष्ण दात. तोंडातून गळणारी लाळ आणि डोळे. तिला डोळे नव्हतेच. डोळ्याच्या जागी होत्या फक्त रिकाम्या खोबण्या आणि त्यातून होत असलेला रक्तस्राव. चेहऱ्यावर आलेले काही राठ केस निव्वळ जटा भासत होत्या. पण आता तिच्या हाताची पकड मला माझ्या गळ्यावर जाणवू लागली. आणि या सगळ्यात भरीस भर म्हणून एक विचित्र आवाज माझ्या काळजाचा ठोका चुकवत होता.

लाख प्रयत्न करून देखील माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता ना स्वतःला हलता येत होतं. शेवटी मी हतबल होऊन तसाच निपचित पडून राहिलो. पण माझ्या विचारांना कोणतीही बंधन नव्हती. मनातल्या मनात स्वामी समर्थांचा जप करू लागलो. मध्येच हनुमान चालीसेचा जप करू लागलो.

आणि तितक्यात अचानक माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं.

त्या दृश्यात कोणाची तरी अंत यात्रा निघालेली होती. त्यातले बरेचशे लोक माझ्या ओळखीचे होते. मी प्रत्येकाला विचारत होतो. कुठे चालले आहात तुम्ही ?? आणि ही कोणाची अंत यात्रा आहे ?? पण कोणीही माझ्याकडे पाहत नव्हत आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर ही देत नव्हत. सगळे फक्त रडत होते ….

शेवटी स्मशानभूमी मध्ये पोहचल्यावर ते प्रेत खाली ठेवण्यात आलं.

कोणी ही आपल्याला उत्तर देत नाही म्हणून मी गर्दीतून वाट काढत पुढे आलो. ते प्रेत पाहिले आणि विजेचा तीव्र झटका बसावा तसे मी हादरलो आणि ताडकन उठून बसलो. अचानक माझ्या शरीरात इतका त्राण इतकी शक्ती कुठून आली हेच कळले नाही. आजू बाजूला बघितलं तर कोणी ही नव्हतं. मी घामानी पूर्ण पणे भिजलो होतो. मला धाप लागली होती. अजून देखील स्वतःच्या हृदयाचे ठोके मला ऐकायला येत होते. हात-पाय थर-थर कापत होते.

मी प्रचंड घाबरलो होतो. कारण त्या अंतयात्रेत मी स्वतःच प्रेत बघितलं होत.

नंतर मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी उठून मी हा प्रसंग सगळ्यांना सांगितला.

त्यांनी हसण्यावर नेला, पण त्या नंतर पुढच्या अमावास्येला माऊशी सोबत असाच प्रसंग घडला. तिला ही स्वतःची अंत्ययात्रा दिसली. तिला देखील तोच भास , तीच आकृती दिसली.. तिची ही अवस्था अगदी माझ्यासारखी झाली होती, घशातून आवाज निघत नव्हता आणि हातापायात हालण्या इतकी ताकद नव्हती.

हे सगळ इतक्यावरच थांबल नाही. त्या नंतर 2 महिन्यांनी अमवास्येलाच मामा सोबत देखील असचं घडलं. मामा नी लगेच दुसऱ्या दिवशी जॉब सोडला आणि काही दिवसात त्यांच्या जागी दुसरे मामा कामावर रुजू झाले. त्यांना देखील काही दिवसांनंतर अगदी तश्याच भयानक प्रसंगाचा अनुभव आला. 

आम्ही या बद्दल आमच्या हॉस्पिटल चे ओनर असलेल्या डॉक्टर सरांसोबत चर्चा केली तेव्हा आम्हाला समजलं की हॉस्पिटल नवीन सुरू झालं होतं तेव्हा सर आणि मॅडम इथेच एका रूम मध्ये राहत होते. आणि एके दिवशी अगदी असाच प्रसंग मॅडम सोबत घडला आणि त्या नंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये न राहायचा निर्णय घेतला.

दुसऱ्याच दिवशी आम्ही स्वामी समर्थांची प्रतिमा असलेली एक मोठी फोटो फ्रेम हॉस्पिटल मध्ये आणून लावली. आज माझ्या सोबत घडलेल्या घटनेला जवळपास दोन वर्ष झाली. फोटो लावल्यानंतर हा असला जीवघेणा अनुभव आमच्यापैकी पुन्हा कोणाला ही आला नाही आणि देव करो कोणाला ही असला अनुभव कधीच येऊ नये.

Leave a Reply