अनुभव – निलेश गावडे

मी मुंबई ला राहायला आहे आणि माझे मूळ गाव कोल्हापूर आहे. गेल्या वर्षी महापुरात खूप नुकसान झाले. गणपती ला आम्ही सगळे गावी गेलो होतो. माझ्या घराचे पुरामुळे खूप नुकसान झाले होते. नीट झोपायला जागा सुद्धा नव्हती. म्हणून मी, माझा चुलत भाऊ पप्पू आणि प्रतीक असे तिघे जण रात्री झोपण्यासाठी जागा शोधत होतो. तेव्हा आम्हाला आठवले की आमच्या घरापासून काही अंतरावर एक बंगला आहे आणि तिथे फक्त आजी आजोबा राहतात. त्यांची मुलं बाहेरगावी असतात आणि म्हणून त्या बंगल्यात ते आजी आजोबा फक्त दोघेच. आम्ही विचार केला की आपण त्यांच्या घरी जाऊ झोपायला. त्या रात्री पावसाची रिप रिप चालूच होती. साधारण १० वाजता आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते दोघे बाहेरच बसले होते.

आम्ही त्यांना विचारले की आज पासून काही दिवस आम्ही तुमच्याकडे झोपायला आलो तर चालेल का? तसे ते म्हणाले “हो.. चालेल या ना”. त्या बंगल्यामध्ये वर ३ खोल्या होत्या. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही त्या वरच्या खोल्यांमध्ये झोपू शकता. ते दोघे खाली असलेल्या खोलीत झोपायला निघून गेले. आम्ही हॉल मधून जिना चढत वर गेलो. त्या ३ खोल्यांपैकी एकाही खोली ला दरवाजा नव्हता. थोडे वेगळे च वाटले. आम्ही एका खोलीत गेलो. खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर मागच्या बाजूला उसाचा मळा दृष्टीस पडला. मी तसा बराच भित्रा आहे म्हणून मी म्हणालो की मी मध्ये झोपीन. आम्ही अंथरूण केले. भिंती ला लागून प्रतीक, नंतर मी आणि नंतर पप्पू असे आम्ही तिघे झोपलो.

बराच वेळ आम्ही मोबाईल घेऊन टाईमपास करत होतो. साधारण तासाभराने ते दोघे पेंगू लागले तसे त्यांनी मोबाईल ठेवून दिला आणि ते गाढ झोपून ही गेले. मला मात्र खूप अस्वस्थ वाटत होत. अनोळखी घर आणि त्यात बाहेर वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज मनात एक वेगळीच भीती निर्माण करत होता. मी डोळे मिटून तसाच पडून राहिलो. साधारण अर्धा तास उलटला असेल. माझ्या पायावर एक हळुवार स्पर्श जाणवला आणि मी दचकून उठून बसलो. पण पाया शेजारी कोणीही नव्हते. कळले नाही भास होता की अजुन काही म्हणून मी दुर्लक्ष करून पुन्हा झोपलो. पण काही वेळा नंतर मला विचित्र भास होऊ लागला. असे वाटू लागले की माझ्या आणि प्रतीक च्या मध्ये अजुन कोणी तरी झोपले आहे. 

मला धडकी भरू लागली की हा सगळा प्रकार नक्की काय आहे. मी मन घट्ट करून हळु हळू माझी कुस बदलून आमच्या मध्ये कोण आहे हे पाहू लागलो. माझ्या अगदी तोंडासमोर एक म्हातारा माणूस डोळे बंद करून झोपला होता. डोक्यावर लाल रंगाचा फेटा होता आणि अंगात पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. त्याला इतक्या जवळ पाहून माझी तर वाचाच बंद झाली. मी ओरडायचा प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडातून शब्द च फुटत नव्हता. मी पप्पू ला हात लाऊन उठवू लागलो पण तो काही उठायचे नाव घेत नव्हता. शेवटी मी पुन्हा त्याच्या दिशेने वळलो आणि पाहतो तर काय त्याच्या बाजूला एक बाई मान खाली घालून बसली होती. 

आता मात्र भीतीने मी डोळे बंद करून घेतले आणि शरीरातला उरला सूरला त्राण एकत्र करून अतिशय जोरात ओरडलो. माझ्या ओरडण्याने पप्पू धडपडत उठला आणि घाबरून काय झाले म्हणून विचारू लागला. मी डोळे उघडून त्या रूम मध्ये सगळी कडे नजर फिरवली पण मला काही वेळा पूर्वी जे दिसले तसे तिथे कोणीही नव्हते. मी त्याला सांगितले की आपण फक्त तिघे नाही आहोत या खोलीत. अजुन दोघं जण आहेत. पण तो धीर देत मला समजावू लागला की असे काही नाहीये. त्याने उठून खोलीत ला लाईट चालू केला. मी पुन्हा एकदा सगळी कडे पाहिले पण तिथे आमच्या तिंघांशिवाय कोणीही नव्हते. तो मला समजावून सांगू लागला की तुला स्वप्नं पडलं असेल जास्त विचार नको करुस झोपून जा.

पण मला माहित होत की हे स्वप्न नव्हत. कारण मला झोपच लागली नव्हती. मी पुन्हा डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो पण काही केल्या झोपच लागत नव्हती. सतत कोणी तरी असल्याची चाहूल जाणवत होती. कोणी तरी असल्याचा भास होत होता. अगदी अस्वस्थ वाटत होत. मी पुन्हा पप्पू ला उठवले, त्याला समजावले आणि सांगितले की इथे झोपणे मला बरोबर वाटत नाही आपण जाऊ इथून. तसे त्याने ठीक आहे म्हंटले आणि आम्ही दोघांनी साधारण ३ वाजता प्रतीक उठवले. तो खूप गाढ झोपेत होता. मला होणाऱ्या भासाबद्दल मी त्याला सांगितले तसे तो ही जरा घाबरला. आता त्या खोलीच्या बाहेर जायची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. पण कशीबशी हिम्मत करून आम्ही एकमेकांचा हात धरून बाहेर पडलो आणि खाली आलो. 

आम्ही दबक्या पावलांनी त्या बंगल्याच्या बाहेर आलो आणि तिथून धावतच थेट आमचं घर गाठलं. घरी सगळे सांगितले तेव्हा कळले की त्या आजीची आई ६ महिन्यापूर्वी जिन्यावरून पडून गेली. बहुतेक तीच आमच्या शेजारी येऊन बसली होती. पण मग तो म्हातारा माणूस कोण होता हे मात्र कळले नाही. पण या प्रसंगानंतर मी कधी त्या बंगल्याच्या जवळून ही फिरकलो नाही. 

हि कथा युट्युब वर ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=Nc_HH-dIN14&t=312s

Leave a Reply