अनुभव – संकेत खर्सेकर

अनुभव २०१९ मधला आहे. आम्ही सगळे मित्र कुठे तरी फिरायला जायचा प्लॅन करत होतो. त्यात १ मित्र म्हणाला की माझ्या गावाला जाऊया कोकणात. आम्ही सगळे लगेच जायला तयार झालो. सगळ्यांनी मिळून १ दिवस नक्की केला. जवळपास ६ तासांचा प्रवास झाला. पोहोचे पर्यंत ८ वाजून गेले होते. आम्ही खूप थकून गेलो होतो. काही वेळ तसेच बसून मग थोडे फ्रेश झालो. मित्राच्या आई ने खूप छान जेवण बनवले होते. आम्ही सगळे जेवलो. नंतर आम्ही झोपण्यासाठी मित्राच्या जुन्या घरी गेलो. त्याच्या राहत्या घरापासून ते अवघ्या काही मिनिटांवर होते. मित्राचे वडील आमच्या सोबत आले होते ते घर दाखवायला. पण मला एक गोष्ट थोडी खटकली ती म्हणजे त्या मित्राचे आई वडिलांनी त्याला आमच्या सोबत तिथे झोपायला पाठवले नाही. तो त्या नवीन घरीच होता. आम्हाला सगळ्यांनाच हे जरा पटले नाही पण नंतर वाटले की मित्र खूप महिन्यांनी भेटला म्हणून त्याला त्यांच्या जवळच झोपायला सांगितले असेल. काही वेळ गप्पा करून आम्ही पेंगु लागलो. आधीच प्रवासामुळे दमलो होतो म्हणून लगेच झोपून गेलो. रात्रीचा १ वाजला असेल. मी आणि माझे मित्र अगदी गाढ झोपेत होतो. अचानक रुमवरचा पत्रा वाजू लागला. आम्ही सगळेच त्या आवाजाने जागे झालो. 

सगळ्यांना वाटले की बाहेर जोराचा वारा सुटला असेल म्हणून पत्रे वाजत असतील. काही वेळाने तो आवाज कमी झाला. म्हणून आम्ही दुर्लक्ष करत परत झोपायचा प्रयत्न करू लागलो. पण १० मिनिट होत नाहीत तसे पत्रे पुन्हा वाजू लागले. यावेळेस एक भयानक गोष्ट जाणवू लागली. जसे पत्र्यावर कोणी तरी आहे आणि आपल्या नखांनी पत्र्यावर ओरबाडतेय. आता मात्र आम्ही समजून गेलो की घडत असलेला प्रकार साधा नाही. पाच मिनिटांनी आवाज बंद झाला. आम्ही घाबरून एकमेकांचा हात पकडुन बसलो होतो. वाटल की प्राणी असेल. पण तितक्यात अचानक पत्र्यावर मोठ मोठ्याने आघात होऊ लागला. जे एखाद्या प्राण्याला करणे जवळ जवळ अशक्य होते. आमची तर चांगलीच तंतरली होती. तितक्यात बाहेरून आवाज आला “कोण आहे तिथे..? निघून जा..” तो आवाज आल्या नंतर ते जे काही होत ते अजुन जोरात पत्र्यावर आघात करू लागलं. एके क्षणी तर वाटलं की ते पत्रा फोडून आत येतय की काय.. काय करावं काहीच सुचत नव्हत. धावत बाहेर जावं पण इतक्या रात्री ते ही अनोळखी ठिकाणी बाहेर कसं जाणार. वेळ ही तिथेच थांबली होती जणू. पुढे सरकतच नव्हती. आम्ही जीव मुठीत धरून तसेच बसून राहिलो. भीती मुळे झोप कुठच्या कुठे उडून गेली होती.

पहाटे ४ च्या सुमारास तो आवाज अचानक यायचा बंद झाला. तसे आमच्या जिवात जीव आला. तरीही आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो नाही. कारण अजून उजाडले नव्हते. साधारण ६ ला बऱ्यापैकी उजाडले तेव्हा आम्ही बाहेर आलो. मित्राच्या घरी जाताना वाटेत एक आजोबा बसलेले दिसले. नुकताच उठले असावेत असे वाटले. मी न राहवून त्यांना विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला एक भयानक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की या घरात आधी एक कुटुंब राहायचे, त्यांनी स्वतःला जाळून घेतले होते आणि त्यातच ते सगळ्यांची राख झाली. त्यांनी असे का केले हे मात्र कोणालाच माहीत नाही. त्या आजोबांचे बोलणे आम्हाला रुचले नाही म्हणून मित्राच्या घरी गेल्यावर आम्ही घडलेला सगळं प्रकार त्याला आणि त्याच्या आई वडिलांना सांगितला. पण त्यांचे वागणे पाहून असे वाटले की त्यांना ह्या प्रकाराबद्दल सगळे माहीत असावे पण ते काहीच बोलले नाहीत. इतके सगळे घडल्यावर कोणालाही तिथे थांबण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही आप आपल्या घरी निघून आलो. आजही कधी विषय निघाला की तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. 

This Post Has One Comment

Leave a Reply