अनुभव -अभिराम

मी व माझे 2 मित्र सौरभ आणि प्रफुल्ल आमच्या एका मित्राच्या लग्नाला नागपूर हून नाशिक ला जायला निघालो होतो. जुलै महिना होता. पावसाळा नुकताच चालू झाला होता. ऍडव्हेंचर करू म्हणून प्रफुल्ल च्या स्कॉर्पियो एस.यु.व्ही. ने जायचं ठरलं. सकाळी उठून लवकर निघू आणि संध्याकाळी पर्यंत पोहोचू असा प्लॅन झाला. अचानक सौरभ ला एक महत्त्वाचं काम आल्यामुळे आम्ही सकाळी निघू शकलो नाही. मगं दुपारी 3 च्या सुमारास आम्ही निघायचे ठरवले. उशीर झाल्यामुळे गाडी आम्ही जरा जोरात घेतली. पुढे काही वेळात हलका पाऊस सुरू झाला. गाणे ऐकत गप्पा करत प्रवास छान सुरू होता. नॅशनल हायवे असल्यामुळे अम्ही जि.पी.एस. लावलं नाही. रस्ते चांगले होते आणि ठीक ठिकाणी माईलस्टोन दिशा दाखवत होते. तीन साडे तीन तासांच्या प्रवासानंतर अंधार व्हायला सुरुवात झाली. गाडी चांगल्या स्पीड ने जात होती. आम्ही एक छोटासा हॉल्ट घेऊन वॉश रूम ला जायचं म्हणून एखादी जागा पाहत होतो. बराच वेळ प्रवास झाल्यानंतर ही एकही पेट्रोल पंप किंवा टॉयलेट वैगरे दिसले नाही. एव्हाना अंधार गडद झाला होता. त्यात आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आम्ही जात असलेल्या रस्त्यावरून पुढे किंवा मागे एक ही गाडी दिसत नव्हती. चुकीच्या रस्त्याला लागलो हे आम्हाला समजल. लगेच मोबाईल काढून जि.पी.एस. लावायचा प्रयत्न केला पण नेटवर्क येत नव्हत. गाडी जरा बाजूला घेतली.

बराच वेळ वाट बघुन वॉश रूम कुठे दिसले नाही म्हणून मी आणि सौरभ रस्त्या कडेला गाडी पार्क करून रस्त्याकडे ला गेलो. तसा जंगलाचा म्हणजे गर्द झाडांचा भाग होता. इतक्यात सौरभ म्हणाला “अरे अभिराम तुला समोर काही चमकणार दिसत आहे का..?” त्याचे असे बोलणे ऐकून मी हसलो आणि म्हणालो “कुठे काय आहे यार..” त्यावर तो परत बोलला “अरे सरळ बघ..” मी त्या दिशेने निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. त्या मिट्ट काळोखात खरंच दुरून काहीतरी चमकत होत. मी तिथे पाहून समजण्याचा प्रयत्न करत होतो. दोन पिवळसर डोळे चमकावे असे वाटत होते. माझी नजर त्या दोन डोळ्यांवर स्थिरावली होती. जणू काही फक्त नजरेने मी बांधला गेलोय. तितक्यात सौरभ जोरात ओरडला “ते आपल्याकडे येतय.. चल गाडी कडे लवकर..” त्याचे बोलणे ऐकून मी भानावर आलो. तो गाडी जवळ धावत गेला तरी मी मात्र समोर पाहतच बसलो. कारण मला तिथून जायचे असून सुद्धा मी जणू तिथेच अडकलो होतो. सौरभ ला जेव्हा लक्षात आले तेव्हा तो मागे आला आणि मला जोरात ओढून गाडी कडे नेले. त्याने प्रफुल्ल ला सांगितला “लवकर हॉर्न मार..” त्याने जोरजोरात हॉर्न मारला आणि गाडीचे लाईट पण लावले. एकदम कळलच नाही झाल काय आपल्यासोबत. गाडीतून त्या दिशेला पाहिलं पण काहीच दिसलं नाही. काही वेळ गाडी पुढे गेल्यावर विचार केला जंगलात ल कुठल जनावर असेल आणि पुढचा प्रवास सुरू झाला. पण आम्हाला माहीत नव्हत की आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय.  

बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक गाव लागल. पण ते गाव एकदम शांत होत. एके क्षणी तर वाटल की इथे कर्फ्यु लावलाय की काय. पुढे एक टपरी लागली, तिथे अम्ही सगळ्यांनी चहा घेतला. झालेल्या गोष्टी बद्दल बोलत बसलो, प्रफुल्ल गाडीचे विंड शिल्ड साफ करत होता. तितक्यात सौरभ ने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला “त्या टपरी वाल्या माणसाकडे पाहू नको, इथून पळू लवकर आणि प्रफुल्ल ला बोलला “गाडी काढ पटकन..”

मला काहीच कळलं नाही की हा असे का बोलतोय. मी मागे वळून त्या टपरी वाल्याकडे नीट पाहिलं. माझी बोबडीच वळली. त्या माणसाचे डोळे अगदी तसेच चमकत होते जसे आम्ही त्या जंगलात त्या गडद अंधारात पाहिले होते. पुढे काहीच संवाद न साधता तिकडून कसा बसा पळ काढला. आम्ही गाडीत बसून तोच विषय बोलू लागलो. प्रफुल ला मात्र या सगळ्या बद्दल काही कल्पना नव्हती, ना त्याने काही पाहिले नव्हते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकून तो आम्हाला चिडवत होता की चहा पिऊन नशा आला की काय.. आम्ही दोघं मात्र एकदम शांत होतो, काय चालू आहे हाच विचार करत होतो. आमचे बोलणे चालू असतानाच प्रफुल्ल ने एकदम जोरात ब्रेक मारला. अम्ही ओरडलो “काय झालं रे..” त्यावर तो म्हणाला ” गाडी खाली काही तरी आल.” आम्ही घाबरून एकमेकांकडे बघू लागलो.

गाडी खाली काही येण्याचा आवाज तसा काही आला नाही. गाडी खाली उतरून बघायची हिम्मत कोणी करत नव्हत. 

शेवटी तिघांनीही उतरून पाहायचे ठरवले. धीर धरत तिघेही उतरलो. गाडी खाली, मागे आणि आजू बाजूला सगळी कडे पाहिले. पण कोणीच दुर पर्यंत कोणीही तिथे नव्हत. आता सगळेच विचारात पडले. प्रफुल्ल म्हणाला “मला सारखं सारखं डोळ्यात काही टोचतय.” आम्हाला काही कळले नाही म्हणून त्याला विचारले “तुला काही वेगळं वाटतय का.. नीट सांग आम्हाला..”. तसे तो म्हणाला “डोळ्यात एकदम विचित्र जळ जळ होतेय आणि खूप तहान लागतेय..” जवळ असलेला पाणी त्याला दिलं आणि एकदम जाणवल आपला घसा देखील सुकला आहे. तिघांनी मिळून पाण्याच्या जवळ पास 5 बॉटल संपवल्या. मग सौरभ ने गाडी आपल्या हातात घेतली. पुढे जाता जाता आम्हाला एक वळण लागले. तिकडे अम्ही नाशिकच डायरेक्शन शोधू लागलो. जि.पी.एस. सिग्नल मिळाला. या सगळ्यात रात्र खूप होऊन गेली होती. भूक आणि तहान खूप लागली होती. खूप उशीर झाल्यामुळे रस्त्यावरचे धाबे आणि हॉटेल सगळे बंद झाले होते.

रात्री 2 च्या सुमारास जि.पी.एस. सारखं सांगत होत Take Round About आणि तसा रस्ता पण दाखवत होत. आम्ही तो रस्ता घेतला. जरा वेळ पुढे गेल्यावर अगदी मातीचा रस्ता लागला. पुढे जात जात गावतल्या एके ठिकाणी तो रस्ता संपत होता. आणि कमाल म्हणजे जि.पी.एस. तोच रस्ता बरोबर पुढे दाखवत होत. 

आम्ही आजूबाजूला सगळीकडे पाहिलं पण तिकडे काहीच नव्हत. खाली उतरून चौफेर नजर फिरवत मी चालू लागलो. आणि रस्त्यात एक 20 फूट मोठा पाइप आडवा टाकलेला दिसला. मला समजायला वेळ लागला नाही की हा रस्ता बंद करण्यासाठी पाईप आडवा टाकलाय. हे पाहताच आम्हाला कळले की आपल्यासोबत काय घडतंय. पूर्ण गाडी रिवर्स घेतली आणि नव्यानी रस्ता शोधू लागलो. रात्र खूप झाल्यामुळे गाव अगदी शांत होत. अम्ही रस्ता फिरून फिरून परत त्या बंद रस्त्याकडे कडे वारंवार जात होतो. आता मात्र भीती वाटू लागली. परत रिवर्स घेऊन वेगळ्या रस्त्याला लागलो. तिथे आमची गाडी एका नाल्यात अडकली. खूप प्रयत्न करून सुद्धा गाडी काही निघत नव्हती. यात खूप वेळ गेला. वाटले की इथून बाहेर पडणे अशक्य आहे. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर कशी बशी गाडी तिथून निघाली आणि आम्ही एका गल्लीत गेलो. तिथे मोजकी घर होती. थोडे पुढे जाताच एक मुलगा दिसला. त्याला विचारलं हायवे ला कस आणि कुठून जायचं. तसे तो सांगू लागला. त्याला म्हंटल मित्रा जरा पाणी मिळू शकेल का. तो थांबा असे बोलला आणि आत निघून गेला. त्याने पाणी आणले. गाडीत कोण कोण आहे हे तो पाहू लागला. आणि अचानक जोरात घाबरून ओरडला. त्याच्या हातून पाण्याचा जग सांडला आणि तो ओरडत पळून गेला. आता मात्र आम्ही खूपच हादरून गेलो होतो. त्याने गाडीत आमच्या शिवाय असे काय पाहिले की तो इतक्या जोरात ओरडला हे कळायला मार्ग नव्हता. मला तर आमच्या तिघानशिवाय गाडीत कोणीच दिसत नव्हत. आम्ही सगळे स्तब्ध होऊन एकमेकांना पाहत होतो.

आता कोणीच कोणाशी एक शब्द ही बोलत नव्हता. त्या मुलाचा आवाज ऐकून तिथले 1,2 माणसं घरा बाहेर आली. आम्हाला विचारू लागली की काय झाले. आम्ही अगदी शांत होतो. त्यांनी बराच वेळ विचारपूस केली, कोण आहात, कुठे जात आहात वैगरे. शेवटी आम्ही रस्ता चुकलो आहोत आणि कुठे जायचं समजत नाही आहे हे त्यांना सांगितले. तसे त्यांनी सरळ जाऊन एक राईट टर्न घ्या आणि 10kms वरच तुम्हाला हाय वे मिळेल असे सांगितले. आम्ही पुढे गेलो. तिथे राईट टर्न सुद्धा मिळाला आणि बघतो तर काय.. गावात एक मोठे चौक होते जिकडून अम्ही 5 वेळा गेलो होतो, पण तेव्हा आम्हाला तो चौक आणि इतर रस्ते दिसलेच नाहीत. हाय वे लागण्या आधी एक हनुमान मंदिर दिसले. एव्हाना पहाटेचे ४ वाजत आले होते. उतरून दर्शन घेतल. मारुतीला जणू आम्ही सगळा प्रसंगच सांगितला आणि म्हंटल आमचा प्रवास आता चांगला होऊ दे. तिथून नाशिक सकाळी 9 वाजता पोहोचलो. त्या जंगलात काय होत ? त्या माणसाचे डोळे विचित्र चमकणारे कसे होते ? रात्री गाडी खाली काय आल? गाडी जि.पी.एस. लाऊन सुद्धा वारंवार त्या चुकीच्या रस्त्याला का जात होती आणि गावात त्या मुलानी आमच्या गाडीत नक्की काय पाहिलं याचे उत्तर आम्हाला आजतागायत मिळाले नाही. सगळ्यात भयानक म्हणजे नागपूरला परतताना पाहिलं तर गाडीतल्या त्या 5 च ही बाटल्या जश्याच्या तश्या होत्या. बॉटल वरचे सील ही काढले नव्हते.

Leave a Reply