अनुभव – कुणाल रसाळ

ही गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली होती जी तिच्या लहानपणीची आहे. म्हणजे अगदी आजी १०-१२ वर्षांची होती तेव्हाची. तो काळ च वेगळा होता. त्या काळी आतासारखे टिव्ही, कंप्युटर, मोबाईल काहीच नव्हते. लहान मुलांसाठी मनोरंजन म्हणजे बाहेर जाऊन मनसोक्त खेळणे. जश्या सुट्ट्या लागायच्या तशी सगळी लहान मुले आप आपल्या नातेवाईकांकडे राहायला जायचे. कोणी मामा कडे, कोणी मावशी कडे. माझी आजी ही त्या काळी तिच्या मामा कडे म्हणजे रत्नागिरी ला जायची. चार भावंडांमध्ये ती एकटीच मुलगी होती. जेव्हा ते चारही जण गावी जायचे तेव्हा सगळे भाऊ बाहेर क्रिकेट, विटी दांडू खेळायला निघून जायचे. आजीची एक खूप जवळची मैत्रीण होती. ती शेजारच्या एका मात्रिकाची मुलगी होती. तिचे नाव लता होत. आजीची मामी तिला नेहमी बजावून सांगायची की त्या मुली सोबत जास्त खेळू नकोस, तिच्या शी जास्त बोलू नकोस. तिचे वडील बाहेरचे बघतात, अश्या काही गोष्टी जाणतात ज्या आपल्या कळण्या पलीकडच्या आहेत. गावातली आणि इतरही बाहेरची लोक त्या माणसाकडे आपल्या समस्या घेऊन येत असत. तर कोणी आपली भरभराट होण्यासाठी, आपले स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी उपाय विचारण्यास येत असत. 

एके दिवशी लता तिच्या सोबत खेळायला आली नाही. आजी बराच वेळ तिची वाट बघत थांबली आणि शेवटी तिच्या घरी तिला पाहायला जायचे ठरवले. तसे मामी ने आधीच बजावले होते पण तिला लताची खूप काळजी वाटत होती. लताचे घर गावातल्या अगदी एका कोपऱ्यात होते. घरांच्या रांगामधले अगदी शेवटचे घर. अगदी जुनाट, पडीक. बाहेरून पाहिले तर एकवेळ शंका येईल की इथे कोणी राहतेय की नाही. ती आत गेली. बाहेरून जीर्ण वाटत असलेले घर आतून मात्र अगदी वेगळेच होते. निरनिराळया रंगांनी रंगवलेल्या भिंती, पहिल्याच खोलीत एक मोठा झोपाळा. ती लता ला हाक मारतच घरात शिरली. पण ती घरात कुठे ही दिसत नव्हती. ती चालत च आत स्वयंपाक घरात गेली. लता ची आई जेवण करत होती. तिने विचारले की लता कुठे आहे. त्यावर तिची आई म्हणाली की लता तिच्या वडिलांबरोबर काकांच्या घरी गेली आहे, तिथे कुटुंबात मयत झाले आहे. माझी आजी तिच्या घरी पहिल्यांदाच गेली होती. त्यामुळे लताच्या आई ने तिला एक लाडू खायला दिला. ती लाडू खात खात घराबाहेर पडली. 

या वेळेस ती घराच्या मागच्या दारातून बाहेर आली. त्या घराच्या मागच्या वाड्यात तिला एक छोटासा बगीचा दिसला. त्यात बरीच सुंदर फुल होती. ते पाहून तिला राहवलं नाही म्हणून तिने जवळ जाऊन पाहण्याचे ठरवले. ती हळूच त्या बगीच्यात जाऊन जवळून फुल पाहू लागली तितक्यात तिला जाणवले की आपल्या मागे कोणी तरी उभ आहे आणि आपल्याला सतत पाहतंय. तिने झटकन मागे वळून पाहिलं. तिथं घोगडी घेऊन कोणी तरी उभ होत. तिला नीट दिसले नाही नक्की कोण आहे. तितक्यात तिला आठवले लता ने सांगितले होते की घरी ती आणि तिचे आई वडील तिघेच राहतात. मग या घोंगडी मध्ये कोण लपलय. उत्सुकतेपोटी जवळ जाऊन तिने घोंगडी हळूच खेचली आणि ती पाहतच राहिली. त्या घोंगडी मध्ये कोणीही नव्हते. ती जरा दचकली आणि आणि धावत जाऊन लताच्या आई ला सांगितले. तिची आई मात्र प्रचंड घाबरली. पटकन एका वाटी मध्ये काही तरी गोड पदार्थ घेतला आणि घराच्या मागच्या दिशेने धाव घेतली. तिथं आल्यावर तिने हाक मारली ” हे बघ, काय आणले आहे तुझ्यासाठी, तुझे आवडते आहे ये लवकर..”

लताच्या आई चे असे वागणे पाहून आजी गोंधळली तर होतीच पण तितकीच घाबरली ही होती. लता ची आई घराला फेऱ्या मारू लागली आणि फक्त एकच वाक्य बोलत होती “ये लवकर.. खाऊन घे.. तुझ्या आवडीचे आहे..” आजी स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने न राहवून विचारले “काकू.. तुम्ही हे काय करताय..” पण ती चिडून म्हणाली “गप्प बस.. काही बोलू नकोस..” तसे आजी शांत झाली. एवढे मात्र पक्के होते की ती नक्की कोणाला तरी शोधतेय. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर ती म्हणाली “हे बघ.. इथे ठेवते, खाऊन घे..” तिने आजीचा हात पकडला आणि तिला म्हणाली “आत चल माझ्या सोबत..”. ते पुन्हा घराच्या पहिल्या खोलीत आले आणि त्यांना दिसले की झोपाळा आपोआप हलतोय. पण ते झोके साधे नव्हते ते कोणी तरी देत असल्यासारखे वाटत होते. आजी पटकन म्हणाली “कोण आहे तिकडे..”. तसे लताची आई म्हणाली “एक शब्द ही बोलू नकोस.. तिला राग आला तर भरी पडेल आपल्या दोघांना..” असे बोलणे ऐकून आजी एकदम शांत बसली. तसे ती पुढे म्हणाली “जा ती घोंगडी आणि वाड्यात ठेवलेली वाटी घेऊन ये पटकन..”

तसे तिने पटकन जाऊन दोन्ही गोष्टी आणल्या आणि लताच्या आईकडे दिल्या. ती हळु हळू त्या वस्तू घेऊन पुढे जाऊ लागली. खूप गोड गोड बोलत होती आणि पुढे सरकत होती. तुझ्या आवडीचे आणले आहे.. वैगरे.. त्या नंतर जे घडले ते पाहून आजीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास च बसला नाही. कोणी तरी त्या वाटी तले पदार्थ खात होते. दिसत तर काहीच नव्हत पण वाटी मध्ये जे होत ते संपताना दिसत होत. काय घडतंय ते कळण्या आधी लताच्या आई ने पटकन ती घोंगडी त्यावर टाकली आणि पुन्हा लाडी गोडी ने म्हणाली “अरे वा.. किती छान.. सगळा खाऊ संपवला.. आता शहाण्या सारखं आपल्या जागेवर जाऊन बसायचं..” इतकं म्हणत तिने आजीचा हात पकडला आणि पुन्हा स्वयंपाक घरात घेऊन आली. हा सगळा भयानक प्रकार पाहून तिला धक्का च बसला होता. लता ची आई आजीला समजावू लागली ‘ शांत हो बाळा.. मी आहे तुझ्या बरोबर..” तिने आजीला शांत होण्यासाठी थोडा वेळ दिला आणि विनंती करत म्हणाली “तू जे आता बघितले स ते कृपा करून कोणालाच सांगू नकोस..”

एव्हाना आजीने स्वतःला सावरले होते आणि आता तिच्या मनात असंख्य प्रश्न दाटून आले होते. तिने एक एक करत तिला विचारायला सुरुवात केली “मी नाही सांगणार कोणाला पण मला जाणून घ्यायचे आहे की हे नक्की काय आहे.. त्या घोंगडी मध्ये नक्की कोण होत..” लताच्या आई ने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. “बाहेर जे होत, त्याला बायंगी म्हणतात. ते कोणालाही दिसत नाही पण ते असते. ते या घरासाठी खूप काही करत, पैसे, सोन, भांडी आणि भरपूर काही आणून देत.” आजी तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली “पण हे सगळे कुठून आणि कसं आणतं..?. त्यावर ती पुन्हा सांगू लागली “ते आजूबाजूच्या घरातून चोरून आणते. ज्यांच्या कडून आणत त्यांना कळतही नाही बरेच दिवस की वस्तू किंवा पैसे, दागिने गेले कुठे..” आजी तिचे बोलणे ऐकतच होती तितक्यात तिने अजुन एक प्रश्न केला “पण हे तुमच्या घरी आले कसे..”. तसे लता ची आई थोडी शांत झाली आणि पुढे सांगू लागली. ” तंत्र विद्या करून आपण याला ताब्यात घेऊन शकतो.. लता चे बाबा हे सगळे करतात. बायंगी भूत असही म्हणतात याला. 

पौर्णिमेच्या रात्री बायांगी ला नारळात पकडतात आणि ती नारळ घरात अश्या ठिकाणी ठेवतात जिथे कोणाचेही लक्ष जात नाही. जिथे तो नारळ ठेवला जातो ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी लागते. बायंगी भूत हे अगदी एका लहान मुलासारखे असते. कशा साठी हट्ट करेल काही सांगता येत नाही. त्याला खुश ठेवावं च लागत नाही तर घरातल्या वस्तू आदळ आपट करत. आणि जर ते कधी रागवल गाड मग मात्र तर कोणाचाही जीव घेनासाठीही मागे पुढे बघत नाही. त्याला खायला त्याच्या आवडीचे पदार्थ लागतात. मघाशी मी किचन मध्ये त्याच्या साठीच दूध, साखर आणि चपाती करत होते. आजी अगदी शांत पणे लताच्या आईचे बोलणे ऐकत होती. कदाचित तिला आपले मन मोकळे करायचे होते पण ते तिला शक्य होत नव्हतं. आज बऱ्याच दिवसांनी ती आपल्या मुलीच्या मैत्रिणीशी का होईना आपल्या मनातले बोलत होती. ती पुढे सांगू लागली “हे आता अंगाशी येऊ लागले आहे. आम्हाला खूप पश्र्चाताप होतोय आता.. कोणत्या पाहुण्यांना सुद्धा बोलवायची सोय राहिली नाहीये.. 

जेवढे मी लता चे लहानपणी हट्ट पुरवले नाही तेवढे मी आता या बायगी चे पुरवते य. काय माहित कधी सुटका होणार यातून. घर श्रीमंती ने भरलय पण आम्हाला समाजातून वाळीत टाकल्या सारखं वाटतयं. हे बोलताना तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळल. तिने तिचे अनुभव सांगायला सुरुवात केली. “या बायगी ला गुंतून ठेवावं लागतं सारखं. 

सतत काही ना काही तरी काम द्यावं लागत. मी कधी तांदूळ निवडायला देते तर कधी गहू मोजायला. पण हे सगळे करून ते परत येत. शेवटी लताचे बाबा एक दिवशी बोलले की डोक्यावरचे केस काढून दे आणि त्याला सरळ करून द्यायला सांग. अश्या गोष्टी करण्यात ते खूप वेळ रमत पण भूक लागली की त्रास देत. काही आवडीचे बनत असेल तर धीर नसतो. त्याचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांद्याची भजी. लवकर ही पीडा घरातून निघून जावो हीच प्रार्थना मी देवाकडे रोज करते. हे सगळे बोलणे ऐकून आजी अगदीच सुन्न झाली आणि तिचा निरोप घेऊन घरा बाहेर पडली. 

घरी परतत असताना तिच्या मनात खूप विचार येत होते. अश्या गोष्टी सांभाळणं किती कठीण आहे, कसं करत असतील तिच्या घरचे..” आजी ने ही गोष्ट घरी कोणालाच सांगितली नाही. किंबहुना त्या नंतर तिचे लग्न होईपर्यंत ती मामा च्याच गावी गेली नाही. बऱ्याच वर्षानंतर ती मामा च्याच गावाला गेली. गावात आल्यावर तिला बातमी कळली की लता चे वडील हृदय विकाराच्या झटक्याने गेले आणि तिची आई सुद्धा विहिरीत पडून गेली. गावकरी निरनिराळ्या गोष्टी सांगायचे. कोणी म्हणे की तिने आत्महत्या केली, कोणी म्हणे की विहिरीतून पाणी काढताना ती तोल जाऊन आत पडली तर काही म्हणायचे की तिला कोणी तरी विहिरीत ढकलले. हे सगळे ऐकून आजीला वाटले की कदाचित बायगी ने च तिला विहिरीत ढकलले तर नसेल..? गेल्या काही वर्षांत लता चे कुटुंब श्रीमंती पासून अगदी दारिद्र्यात लोटले गेले होते. आजी ला लताच्या आई चे शब्द आठवले “जर तुम्ही बाय गी ला खुश ठेवू शकला नाहीत तर ते तुमच्याकडून तुमचं सर्वस्व हिरावून घेत..” लता चे लग्न बाहेरगावी कुठे तरी झाले होते पण ती सुखरुप आहे की नाही या बद्दल कोणाला पुसटशी कल्पना ही नव्हती. आजी हे सगळे मला सांगताना शेवटी एक वाक्य म्हणाली जे मला आयुष्यभर लक्षात राहिले ” असे जादू टोणा करू काही मिळवलेले कधीच टिकत नाही.. मेहनत आणि श्रम करून कमावलेले च आयुष्य भर राहत…”

Leave a Reply